Skip to main content

गडद

गडद

Published on 05/09/2011 - 14:52 प्रकाशित मुखपृष्ठ
काचेच्या तावदानातून बाहेर खिन्नपणे बघत सायली एका खुर्चीत विसावली होती. चेहरा घामाने डबडबलेला होता. नाकपुड्या किंचित फुगलेल्या होत्या. दोन्ही ओठ मुडपत सायली मोठे श्वास घेत बसली होती. बाहेर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. डोळ्यातून पाणी बाहेर येऊ नये म्हणून सायलीची केविलवाणी धडपड सुरु होती. समोर पडलेले एखादे मासिक उघड, मोबाईलमधला एखादा गेम खेळ असे काहीतरी करून सायली आपले चित्त थार्‍यावर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. हॉस्पिटलच्या त्या भल्यामोठ्या पॅसेजमध्ये कित्येक लोकांची धावपळ सुरु होती. बाहेरचा पाऊस हॉस्पिटलमधल्या त्या भयाण शांततेला अधिकच गडद करत होता... पाऊस! लहानपणापासून पाऊस तिला पाऊस खूप आवडायचा. शाळेतून चिंब भिजून आल्यावर आईच्या हातचा आले घालून केलेला वाफाळणारा चहा पितांना ती पावसाच्या अधिकच प्रेमात पडायची. आई काहीबाही बोलत रहायची. सायलीचं लक्ष मात्र पावसात गुंतून पडायचं. सुटीच्या दिवशी मैत्रीणींसोबत अंगणातल्या डबक्यात होड्या सोडतांना आणि डौलदारपणे पुढे सरकणार्‍या त्या होड्या बघतांना सायलीचा आनंद त्या पावसासारखाच उमलून यायचा. सायलीला तिच्या बालपणीचा पाऊस आठवत होता. आई-बाबांच्या त्या बैठ्या घराच्या गच्चीवर दादासोबत पाऊसधारा अंगावर झेलतांना तिचं काळीज शेतातली काळ्या मातीची ढेकळं पावसाच्या पाण्याने विरघळावीत तसं विरघळायचं. मग बाबा दोघांना खाली अक्षरशः ओढत घेऊन जात. आतल्या खोलीतून कांदाभजी तळल्याचा खमंग वास नाकात शिरताच सायली आणि तिचा दादा आरडाओरडा करत आईकडे जात. दादा समोरच्या खुर्चीत बसला होता. सायलीने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. किती बदललाय दादा आता. किंचित सुटलेलं पोट दादाच्या पोक्तपणाची ओळख पटवत होतं. केसांमध्ये रुपेरी छटा जरा जास्तच दिसतायत. कपाळ मागे सरकलय. रुबाब वाढलाय. बाहेर दादाची मोठी गाडी उभी होती. दादाच्या कर्तबगारीची साक्षच देत होती ती जणू.... "बाबा, मला आर्किटेक्ट व्हायचंय. मला नाही दादासारखं यंत्रांमध्ये हरवून जायला जमत. त्याने आय. आय. टी. मध्ये शिकलं म्हणून मी पण तिथंच शिकलं पाहिजे असं काही आहे का?" सायलीला बाबांशी घातलेला वाद आठवला. बारावीला उत्तम मार्क्स मिळाल्यावर काय करायचं याचा ऊहापोह चालला होता. "सयु, अगं आय. आय. टी. मध्ये नको जाऊस हवं तर पण निदान एम. बी. बी. एस. चा तरी विचार करशील की नाही? तुला दोन्ही गृप्समध्ये चांगले मार्क्स आहेत. तुला सहजच मिळेल अ‍ॅडमिशन मेडिकल कॉलेजला. आपण शिक्षण भक्कम करावं बघ; म्हणजे मग आयुष्यातल्या कुठल्याही अडचणीला खंबीरपणे तोंड देता येतं." "हो बाबा, मग आर्किटेक्चर काय वाईट आहे? मला आवडतं रेषांशी खेळायला. आणि आर्किटेक्टला नोकर्‍या मिळतात चांगल्या. शिवाय स्वतंत्र काम करण्यासाठी फारसं भांडवल ही नाही लागत...." "सयु, तुला जे हवं ते कर. मी आडकाठी करणार नाही. जे काही करशील ते विचारपूर्वक कर...." सायलीच्या चेहर्‍यावर एक निखळ स्मित उमटलं. हॉस्पिटलच्या त्या नीरस आणि कुबट वातावरणात काहीतरी हवंहवंस वाटणारं तिला सुखावून गेलं. एखाद्या फुलाचा वास कसा कितीही घेतला, अगदी श्वास लांबवून घेतला, छाती पूर्णपणे फुलवून घेतला तरी तो छातीत पूर्ण साठवता येत नाही, तशी गत तिला बाबांच्या आठवणीने झाली. बाबा! किती छान समजावून सांगायचे. आई होती ताज्या दुधावरची स्निग्ध साय तर बाबा होते सायसाखर! हळवे. तितकेच खंबीर. कुठल्याही कठीण प्रसंगात आपल्या हळव्या वागण्याचा गोडवा पेरून तो प्रसंग अलगद झेलणारे...बाबा गेले त्यादिवशी काय रडलो होतो आपण. दादा रडून कोरडा झाला होता. आई लवकर सावरली. आमचं आईपण आणि बाबापण तिने सहज आपल्याकडे घेतलं.... सायली कष्टाने खाली वाकली आणि पिशवीतून तिने पाण्याची बाटली काढली. "सयु, त्रास होतोय का? कपिलराव कुठे आहेत?" दादा कळवळून म्हणाला. "नाही रे, थोडं पोट दुखतंय. कपिल औषंधं आणायला गेलाय आईंची." "काही खायला आणू का?" "नको, बिस्किटं आहेत माझ्याकडे. बाहेरचं खाणं टाळतेच मी आजकाल." सायलीने बिस्किटं काढली. कधी येईल कपिल? कशा असतील आई? फारच धावपळ होतेय कपिलची. ऑफीसचं काम, आईंचं दुखणं, माझी प्रेग्नंसी...त्यात हा प्रश्न. काय करणार तो तरी? कात्रीत सापडलाय बिचारा...किती बाजू मांडली त्याने आपली. तिला सकाळचा प्रसंग आठवला... "या, काय म्हणाले डॉक्टर?" "आई, एक नाही, जुळं नाही, तिळं नाही, चक्क चार आहेत." "अरे काय सांगतोस? देव पावला गं बाई. अहो, ऐकलंत का? चार-चार नातू येणार आहेत तुम्हाला त्रास द्यायला. गोकूळ होणार आहे घर आता...." "काय? चार??? वा वा...सायली, कपिल...अभिनंदन! अरे मग येतांनाच चार किलो पेढे घेऊन यायचे होतेस ना? थांबा, मीच घेऊन येतो..." "आई, अगं चार-चार नातूच होतील कशावरून? दोन नातू आणि दोन नाती असतील; किंवा चारही नाती असतील; किंवा तीन नाती आणि एक नातू असेल...." "तू चूप बस. दोन-तीन तरी नातू पाहिजेच आपल्या वंशाला. सायली, आता तू काहीच करायचं नाही. नुसता आराम करायचा आणि ऑर्डर सोडायची...मी तुला काय हवं ते करून खाऊ घालीन. अगदी दणक्यात करू तुझं डोहाळजेवण..." "अहो आई, ऐकून तरी घ्या..." "ते काही नाही...सगळं मेलं किडूक-मिडूक केलं, काही हौस नाही, मौज नाही. डोहाळजेवण मात्र मी लग्नापेक्षा मोठं करणार..." "अगं आई, थांब जरा. डॉक्टर म्हणाले की सायलीला चार झेपणार नाहीत. चौघांची व्यवस्थित वाढ होणं आणि सायलीची प्रकृती चांगली राहणं आवश्यक आहे. सायलीची उंची कमी असल्याने चौघांची वाढ नीट होणं अवघड आहे आणि त्यात सायलीच्या जीवाला धोका होऊ शकतो...." "तू आता काहीतरी खुसपट काढू नकोस. असं काहीही होणार नाही. माझी पूर्ण श्रद्धा आहे देवावर. तो सगळं नीट करेल. आणि आपण काळजी घेऊ नं तिची. मग काय प्रश्न आहे? देवानं मोठ्या मनाने दिलेलं दान देवच कसं बरं ओढून नेईल? काहीतरीच तुमचं..." "अगं आई, तसं नाहीये. सायलीची प्रेग्नंसी आय. व्ही. एफ. मुळे झालेली आहे. नैसर्गिक प्रेग्नंसी कंन्सिव्ह होत नव्हती म्हणून आपण आय. व्ही. एफ. केलं. पहिले तीन आय. व्ही. एफ. अयशस्वी ठरले पण देवाच्या कृपेने चौथं यशस्वी ठरलं. आय. व्ही. एफ. मध्ये मल्टिप्रेग्नंसीचा फार मोठा धोका असतो. म्हणजे बाहेर फलन केलेली बीजे गर्भात टाकतात. प्रेग्नंसीची शक्यता वाढावी म्हणून ४-५ बीजे गर्भात टाकतात. पण त्यामुळे एकापेक्षा अधिक बीजे रुजतात आणि मग दोन, तीन आणि कधी-कधी चार बाळांची प्रेग्नंसी होते. आईच्या प्रकृतीच्या दृष्टीकोनातून तीन किंवा चार बाळांची प्रेग्नंसी तिला पार पाडता येईलच याची शाश्वती नसते. म्हणून सगळ्या गोष्टी विचारात घेऊन डॉक्टर काही बीजांची वाढ थांबवतात. आणि मग एक किंवा फार तर दोन सुदृढ बाळांची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ देण्याचा मार्ग मोकळा करतात. त्यामुळे आईच्या जीवाचा धोकादेखील कमी होतो. आज डॉक्टर हेच म्हणाले. सायलीला तीन फलन झालेल्या बीजांची वाढ थांबवल्याने एकच पण निरोगी आणि व्यवस्थित वाढ झालेलं बाळ होईल. हे बाळाच्या आणि सायलीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे...." "काय? तीन बाळांना मारणार तुम्ही?" "आई, माझ्यासाठी हा निर्णय किती अवघड असणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही. माझीच तीन पोरं, माझ्याच काळजाचे ते तीन तुकडे, माझ्याच गर्भातलं पाणी पिऊन वाढणार आहेत ती; त्यांना मारायचं. ती चारही बाळं श्वास घेताय माझ्या गर्भात. त्यांच्या हृदयाची धडधड मला जाणवतेय. त्या बिचार्‍यांना काय माहित की ती धडधड सुरू होते न होते तोच थांबवण्याचा कट बाहेर शिजतोय...काय अवस्था असेल माझी?..." "सयु, शांत हो. तुला माहिती आहे नं की हे अपरिहार्य आहे ते? प्लीज शांत हो...." "काय शांत हो, कपिल? ती म्हणतेय ते बरोबर आहे. तिच्या पिलांचा जाणून-बुजून जीव घ्यायचा? या जगात मुक्त श्वास घेण्याची त्यांना संधी द्यायची नाही?" "आई, काय करणार? त्याला नाईलाज आहे. आपल्याला बाळ हवंय आणि सायली पण हवीय. आणि समजा चारही बाळांना आपण जन्माला घातलं आणि त्यांच्यापैकी कुणाची वाढ व्यवस्थित नाही झाली, कुणी मतिमंद असलं, किंवा अपंग असलं तर त्याला आपली तयारी आहे का? किती त्रास असतो अशा अपत्यांचा तुला माहित आहे ना?" "अगं, कपिल काय म्हणतोय त्यात तथ्य आहे..." "तुम्ही थांबा. काय तथ्य आहे? देवाने इतकं भरभरून दिलयं आणि तुम्ही त्याला लाथाडायच्या गोष्टी करता?" "अहो आई, त्याशिवाय पर्याय नाहीये आपल्याकडे. तुम्हाला वाटतंय का की मी याला तयार झाले असते? डॉक्टरांनी सगळं नीट समजावून सांगीतलंय. हवं तर आपण सगळे डॉक्टरांना भेटू...." "काही नकोय डॉक्टरांना भेटायला. तो काय देव आहे? त्याला काय माहित की चार पोरं जगणार नाहीत ते?..." "अगं आई, ते देव नाहीयेत म्हणूनच काळजी घ्यायला सांगत आहे ना?" "आणि ज्या तीन पोरांना तुम्ही मारणार ते नेमके मुलगेच असले तर? आणि राहिलेली मुलगी असली तर? आपला वंश कोण चालवणार पुढे? आपल्या कुटुंबाचं नाव कोण चालवणार?" "अगं तू काय या खुळचट कल्पना घेऊन बसली आहेस? कसला वंश? कुठलं कुटुंबाचं नाव? जग बदललयं आता. सोड या कल्पना आणि त्यांना निर्णय घेऊ दे त्यांचा...ते समर्थ आहेत." "अजिबात नाही...मला हे पटत नाही." "आई, अगं मुलगा काय आणि मुलगी काय? दोन्ही सारखेच. अपत्यसुख मिळतंय हे काय कमी आहे? अगं कित्येक बायकांना ८-१० आय. व्ही. एफ. करूनदेखील काही होत नाही. औषधांनी आणि इंजेक्शन्सनी त्यांच्या शरीराची चाळणी होऊन जाते. तरीही अपत्य होण्याच्या ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. लाखो रुपये खर्च करून त्या पुन्हा-पुन्हा आय. व्ही. एफ. करतच राहतात. देवाने आपली हाक ऐकली आहे तर आपण त्यात समाधान नको का मानायला? आपल्याला आपल्या भवितव्याचा आणि सायलीच्या आरोग्याचा विचार करायलाच हवा ना?" "कपिल, बंद ठेव तुझं थोबाड. मला काहीही ऐकायचं नाहीये. तुम्ही असा त्यांचा जीव घेणार असाल तर माझ्याशी तुमचा संबंध तुटला म्हणून समजा...सगळे मुलगेच या नरसंहारात गेले तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं?..." "आई, अहो ऐकून तर घ्या..." "गप्प बस तू सायली. काय तरी वेळ आणून ठेवलीये कार्टीने...चांगलं म्हणत होते की त्या शंकररावाच्या मीनलशी लग्न कर....पण हा कपिल कसला ऐकतोय..." "आई, सायलीला दोष नको देऊस. तिचा काय दोष आहे यात? आणि मीनलला असा प्रॉब्लेम नसता झाला याची काय शाश्वती? अकारण वाद घालू नकोस..." "तू बोल मलाच...तुझी काळजी करते हाच माझा दोष...तुझा संसार फुललेला बघण्याची इच्छा असणं हाच माझा दोष...अजिबात ही हत्या करू द्यायची नाही मी...अजिबात नाही...अजि..आ..आ...आ" "आई, आई, काय होतंय? काही त्रास होतोय का?" "क पि ल...अजि...आ" "बाबा, आईंचे डोळे असे कसे होतायत? डॉक्टरांना फोन करा..." "आई, काय झालं? थांब मी डॉक्टरांना फोन करतो...आई...सायली, तू शांत रहा. धावपळ करू नकोस..." एक बिस्किट संपवून सायलीने दुसरे बिस्किट काढले. तितक्यात कपिल आला. "कशा आहेत आई? काय झालंय त्यांना" सायलीने अधीरतेने विचारले. "आयसीयू मध्ये आहे. सध्या बेशुद्ध आहे. डॉक्टर म्हणतायत की ब्लडप्रेशर एकदम वाढले आणि मग हार्ट अ‍ॅटॅक आला...." "अरे बाप रे, पण आता कसं आहे बीपी? सायलीचा फोन आल्यावर मी लगेच आलो...काय झालं अचानक?" "कपिल, आता कशा अहेत त्या?" "माहित नाही..." कपिल गदगदून म्हणाला.... "अरे दादा, सकाळी आईंना एकदम त्रास सुरु झाला आणि घाम आला...आणि त्या खाली कोसळल्या." "ओह...पण कशामुळे?" "अचानकच झालं...चहा करत होत्या आणि अचानकच कोसळल्या...टेंशन आलं असेल कसलं तरी..." "सायली, तू घरी जा. मी तुझ्या डॉक्टरांना भेटून आलोय. तुझी प्रोसिजर करायला अजून अवकाश आहे. साधारण अजून महिना तरी लागेल...तोपर्यंत हे निवळेल सगळं...पण तुझा आराम होणं महत्वाचं आहे...दादा, तुम्ही सायलीला घरी सोडता का प्लीज? मी थांबतो इथे." "हो कपिलराव...मी सोडतो तिला आणि थांबतो तिथं. बाबा कुठे आहेत?" "बाबा आयसीयूजवळ थांबले आहेत...तुम्ही निघा...मी नंतर बाबांना आणून सोडीन. काही हवं असलं तर फोन करतो मी. दादा, तुम्ही आजच्या दिवस थांबू शकाल का आमच्याजवळ?" "काय बोलताय कपिलराव? अहो, मी आज तर थांबतोच पण गरज पडली तर २-३ दिवस इकडेच थांबतो. इथे थांबणं, डबा आणणं-नेणं, त्यात सायलीची काळजी घ्यायला कुणीतरी पाहिजेच...मी आताच फोन करून स्मिताला घरी सायलीजवळ थांबायला सांगतो आणि पुन्हा हॉस्पिटलला येतो...चल सायली...सावकाश..." सायली हळू-हळू पावलं टाकत निघाली. बाहेर अजून पाऊस पडतच होता...तसाच जसा तो काही वेळापूर्वी पडत होता...गडद...खिन्न...
लेखनप्रकार

याद्या 4397
प्रतिक्रिया 17

......... शब्दच नाहीयेत ... --

जबरदस्त लिखाण रे, ह्या भावनिक गुंतागुंतीच्या गोष्टी सोसण्याची ताकद असणं हे फार महत्वाचं असतं आणि आज आपण तेच हरवुन बसतोय याची भिती वाटतेय क्षणाक्षणाला.

वेगळ्या धाटणीची कथा आवडून गेली एकदम. तकलादू शेवट करण्याचा प्रयत्न जाणून बुजून टाळला आहे ते सगळ्यात जास्ती आवडले.
आई-बाबांच्या त्या बैठ्या घराच्या गच्चीवर दादासोबत पाऊसधारा अंगावर झेलतांना तिचं काळीज शेतातली काळ्या मातीची ढेकळं पावसाच्या पाण्याने विरघळावीत तसं विरघळायचं.
एखाद्या फुलाचा वास कसा कितीही घेतला, अगदी श्वास लांबवून घेतला, छाती पूर्णपणे फुलवून घेतला तरी तो छातीत पूर्ण साठवता येत नाही, तशी गत तिला बाबांच्या आठवणीने झाली.
ह्या सारखी वाक्ये दाद देण्याजोगी.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! ही कथा (किंवा काय जे आहे ते) सत्य घटनेवर आधारित आहे; अर्थात वाचनानंदासाठी काही प्रमाणात कल्पनाविलासाचे स्वातंत्र्य घेतले आहे. समीर

अटॅक येउन रुग्णालयात दाखल झालेली स्त्री गेली तर उत्तम असे वाटून गेले. तिच्याबद्दल जराही सहानुभूती वाटली नाही.

भावनांच एकदम मस्त चित्रण केलयं, वाचताना ते खरोखर घडतय असचं वाटत होत. अवांतर :- प्रसंग (जसाच्या तसा) खरा असेल तर काहीसा संतापदायी सूध्दा आहे.

बाप्रे! काय काय इश्यूज असतात! ही काल्पनिक कथा आहे असं स्वतःला समजवल्यामुळे थोडा दिलासा मिळाला... कथा छान लिहिली आहे..... बाकी नेहेमी वाचण्यात/ऐकण्यात आलेला आणि आजच्या घरांघरांतला 'सो कॉल्ड' 'प्रेसिंग इश्यू' "आपला वंश कोण चालवणार पुढे?" हा आलाच ! आपण वंश पुढे चालू ठेवला नाही तर मानवाची प्रगती आणि उत्क्रांती थांबेल असं काहीसं सर्वांना (मोस्टली, सासू-सासरे, म्हातारे आई-वडील ह्या वयातल्या लोकांना) वाटत असावं!