Skip to main content

एका भारतीय पुरुषाची डायरी

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 20/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांकः २० ऑगस्ट ४०११ कंटाळा आलाय! का काय विचारता? ऑफीसमधल्या राजकारणाने कंटाळा आला होता. माझी बॉस म्हणाली शनिवारी यावं लागेल. अस्सं डोकं फिरलं आणि लवकर निघालो. तसं डोकंही दुखत होतं. म्हटलं बाबांकडे चार घटका जावं, बाबांच्या हातच्या चहाने डोकंदुखीच काय पण जगातले सारे रोग दुर होऊ शकतात. पुन्हा एकदा आपल्या घरी गेलं की रोजचं जेवण करणं, पोरांचा अभ्यास, सासर्‍यांची काहि कामं वगैरे रोजची कामं आहेतच. तर बाबांकडे गेलो होतो. नेमकं मला राजनने बघितलं. आता हा सासर्‍यांना नक्की सांगणार. याला काय नोकर्‍या करायच्या नाहीत. बायको मोठ्या हुद्द्यावर आहे. घरी सिरीयल बघितल्या, मुलांना झोपवलं की झालं. त्यात त्याच्या बायकोचीही अजिबात नाटकं नाहीत. एकतर ती वेळेवर घरी येते. हा जेवण करेपर्यंत मुलांकडे बघते. रात्री भांडी पुसून लावायलाही मदत करते. नाहीतर माझ्या ह्या! आता ऑफीस सुटल्यावर सरळ घरी यायचं की नाही? पण नाही एखाद्या मैत्रिणीचंच काम करून दे, अर्जंट काम आहे म्हणून तास-तास ऑफीसात थांब. मला घराकडे बघावं लागतं. ते जाऊ दे तर सांगत होतो की या राजनने बघितल्यामुळे मी घरी जायच्या घाईत होतो. इतक्यात बाबा चहा घेऊन आले. आईने काहि पत्रं माझ्यापुढे टाकली "ह्या बघ काहि स्कीम्स आहेत. सुनबाई म्हणत होत्या की इन्व्हेस्टमेंट करायची आहे काहि चांगल्या स्कीम्स आल्या तर दाखवा. तेव्हा ही पाम्प्लेट्स नेऊन दे तिला. ती ठरवेल काय ते." मी ती पाम्प्लेट्स उघडली तर म्हणते कशी "तुला काय कळतंय त्यातलं? मुलाच्या जातीनं आपलं लक्ष घरातल्यांच्या आरोग्याकडे आणि मुलांकडे द्यावं. नको तिथे नाकं खुपसु नकोस. मी आणि सुनबाई काय ते बघुन घेऊ. आणि उगाच उचकु नकोस तो गठ्ठा! एखादं पाम्प्लेट विसरशील नी बायकोचा ओरडा खाशील" आता मुलीच नाहि तर मुलगेही शिकतात, कमावतात हे तीच्यासारख्या पुराणमतवादी बायकांना कळेल तर शप्पथ. आपलीच आई म्हणून गप्प बसतो झालं. मी आईला काहि उलटून बोलणार इतक्यात बाबांनी विषय बदलला "अरे मस्त नारळाच्या वड्या केल्या आहेत खाणार?" "कधी केल्यात. अहो मलाही करायच्या होत्या. सांगायचं नाही का? सासुबाईंनाही आवडतात. माझे सासरेही चांगल्या करतात असा त्यांचा दावा आहे पण खरं सांगुका सासुबाईंना तुमच्याच हातच्या आवडतात. आणि माझा खरवसाचा डबा राहिला होता गेल्यावेळी तोही द्या. आणि त्यात थोड्या वड्या द्या घालून. तसंही त्या राजनने माहिलं आहे इथे शिरताना मला. सासर्‍यांपर्यंत पोचली असेल बातमी. वड्या आणल्या की हबसतील गप्प" "काय रे बाकी कसं चालू आहे" आता लग्नाला इतकी वर्ष झाली पण बाबांची काळजी काहि संपत नाही. हा प्रश्न विचारताना तोच कातर आवाज, तीच हुरहुर, तीच माया, तेच प्रेम! उगाच नाही लग्ना आधी बाबांना सगळे दिलरुबा म्हणत. "ठिक चालु आहे.. सासर्‍यांचाही फारसा जाच नाही. आता तेही थकलेत" खरंतर मला बायकोच्या दुसर्‍या मुलाच्या हट्टाबद्दल सांगायचं होत. एकाचंच करताना माझ्या नाकात कसा दम आलाय हे मलाच ठाऊक. दुसर्‍या चान्स नंतर तर मला नोकरी सोडूनच बसावं लागेल. तरी बरं पहिलीच मुलगीच झाली नाहितर आमच्या ह्यांचा आग्रह फारच वाढला असता. पण बाबांच्या काळजीयुक्त चेहर्‍याकडे बघुन नाहि सांगितलं "हे बघ. सहनशील असावं! नाहितर हल्लीची मुलं जरा खुट्ट नाहि झालं तर येतात माहेरी निघुन" मला तो विषय नको होता. बाबांकडून वड्या घातलेला खरवसाचा डबा घेतला आणि घरी निघालो. घरी सासरे टिव्ही बघत बसले होते. सासुबाई, बायको यायला अवकाश होता. मुलगी शाळेत गेली होती. राजन येऊन गेला आहे की नाही कळायला मार्ग नव्हता. मला बघताच सासरे म्हणाले "काय रे आज लवकर कसा?" "बाबांकडे जाऊन आलो त्यांनी नारळाच्या वड्या पाठवल्यात" मीच आधी खरं सांगुन टाकलं. पण राजन बहुदा येऊन गेलेला नसावा. "ते जाऊदे आज जरा घर आवरून ठेव. रघुला बघायला मुलीकडचे येणार आहेत" रघु म्हणजे माझा मेव्हणा. दिसायला ध्यान आहे. फक्त अभ्यास एके अभ्यास. आता पुरुषाच्या जातीला चार पोळ्या तरी लाटता याला नकोत का? पण सासर्‍यांनीच लाडावून ठेवला आहे. आता याचं लग्न झालं की त्याची बेडरूम मिळेल मग दुसर्‍या मुलाचा विचार करता येईल असा विचार मी करू लागलो. असो आता बरीच कामं आहेत..म्हणून जर वेळ आहे तोवर डायरी लिहुन टाकतोय.. सकाळपासून जो राबतो आहे तो साधी पाठ टेकलेली नाही. आता रघुचं ठरलं म्हणजे मिळवलं. शिवाय कामं इथेच थोडीच संपणार आहेत. मुलीच्या शाळेतल्या फॅन्सीड्रेस स्पर्धेसाठी कल्पना शोधायची आहे. त्यात त्या अनिलच्या मुलीने सैनिक व्हायचे ठरवले आहे. मी हिला माफिया किंवा झाशीची राणी करू का? शिवाय रात्री काय ह्या आल्या की त्यांची इच्छा असेल तर रात्रभर पाठ दुखवून घ्यावी लागेल ते वेगळीच.. छे छे छे देवीआई काहिहि कर पुढचा जन्म जर मनुष्य पोटी देणार असशील तर स्त्रीचाच दे गं बाई! ======= या लेखनाची प्रेरणा इथून :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4398
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

पण या गोष्टीला प्रत्यक्षात यायला आणखी २००० वर्षं लागतील असं का वाटलं ब्वॉ? ;)

"काल रात्री ते मंगळसूत्र टोचतं म्हणून उशाखाली ठेवलं होतं, ते अभ्रे बदलताना नेमकं सासरेबुवांना सापडलं. इतकं टाकून बोलले मला. म्हणाले तुला मुलीची काही कदर नाही. सौभाग्याचं लक्षण असं उशाखाली ठेवून झोपायला लाज कशी वाटत नाही म्हणतो मी? निदान या वर्षी तरी शंकर-पार्वती व्रत नियमाने कर. शंकराने पहिली बायको गेल्यावर लगेच दुसरीशी लग्न नाही केलं. सतीचा पार्वती म्हणून पुनर्जन्म होईपर्यंत थांबला आणि पत्नीनिष्ठेचा पाठ त्याने घालून दिला. जन्मभर शंकर सासरी कैलासावर सुखाने नांदला... शीक काहीतरी त्याच्याकडून" बाकी, लेख मस्तच हं! ;)

In reply to by ऋषिकेश

अरे देवा, आणि खरेदीला कधी रे वेळ मिळतो तुला, ऋ? किती कामं असतात ना पुरूषांच्या जातीला!! बाकी लेख अतिशय वास्तववादी आहे. ;-)

दुसर्‍या मुलाच्या हट्टाबद्दल सांगायचं होत. एकाचंच करताना माझ्या नाकात कसा दम आलाय हे मलाच ठाऊक. अर्थ नीट नाही कळला. जास्त फोड करुन सांगावे. पाम्प्लेट वाचून पॉपलेटची आठवण आली. आमच्या काळी त्याला 'पॅम्प्लेट' असं म्हणायचे. तसेच आमच्या काळी, ' पुरुष हा क्षणाचा पिता व अनंतकाळचा हुंग्या असतो' अशी म्हण होती.

४०११ मधे टिव्हीवर काय? सगळे स्पोर्ट अथवा न्युज चॅनेल की हटके सिरीयल्स? हटके सिरीयल्स असतील तर त्यावर एक लेख येउ दे :-) बाकी ४०११ मधे अशी परिस्थिती पाहून 'भगवान के घर देर है पर अंधेर नही!' असे कोण म्हणाले उत्तरः सहज्सु

आवडल्या गेल्या आहे. आता 'बोका पार्टी' (किटि पार्टी हो) वर होऊन जाऊदे!

एक नंबर !! मस्त फटका आहे ;)

ही ही ही... असेच होवो. आता मेव्हण्याचं लग्न झालं की दुसर्‍या अपत्याचं तेवढं ठरवून टाका. पहिल्यावेळी झालिये ना मुलगी, सासरच्या देण्यातून सुटलात, आता मुलग्याची हौस पुरी व्हायला हवी. नाहीतरी बाजारात कित्ती सुंदर सुंदर कपडे येतात नै आजकाल! सायकली, स्कुटरींची हौस होऊ दे त्या बिचार्‍याची. आत्ता काय अंगणात नाचेल आणि चिमणा भुर्र्कन उडून जाईल सासरी! (इथे डोळ्याला लावायला रुमाल किंवा जे मिळेल ते फडकं.)

या लेखाच्या शिर्षकात राष्ट्र संकल्पना आणि लिंगभेद दाखवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. तो माझ्या संवेदनाशील मनाला रुचला नाही, याची येथे नोंद करतो. ;) उर्वरीत प्रतिसाद लेख वाचल्यावर. :-)

आमच्या विचक्षण अर्थात मामा (माजी मास्तर) दृष्टीला दोन दुरुस्त्या सुचल्या, बघा पटतायत का? पहिले म्हणजे शीर्षक अंमळ गंडले आहे 'एका भारतीय पुरूषाचा डायरिया*' असे हवे. दुसरे म्हणजे '...पुन्हा एकदा आपल्या घरी गेलं की रोजचं जेवण करणं, पोरांचा अभ्यास, सासर्‍यांची काहि कामं वगैरे रोजची कामं आहेतच....' ठळक शब्दाच्या जागी 'सासूची कामे' असा बदल सुचवतो. (*डायरीचा हा लिंगबदल परागुरूंच्या कृपेने)

वस्तुतः लेखाचे नाव-'' एका पुरुषाची-भारतीय डायरी'' असे हवे..... :wink: ह्हा ह्हा ह्हा...

डायरिया आवडला! ;) -रंगा खुद के साथ बातां : चल ऊठ रे रंगा, कधीचा बसला आहेस मिपा-मिपा खेळत चल चटकन कणीक मळून ठेव, कूकर लाव आणि भाजी फोडणीला टाकून घे. भूक भूक करत येतीलच चिरंजीव आता.

In reply to by चतुरंग

:) चिरंजीव आल्यावर त्यालाही चार ताटं घ्यायला लाव हो.. आतापासून सवय असुदे.. पुढे जड जाणार नाही :)