Skip to main content

ऑन फायरींग अ सेल्स्मन - कविता

ऑन फायरींग अ सेल्स्मन - कविता

Published on 06/08/2011 - 01:32 प्रकाशित मुखपृष्ठ
"ऑन फायरींग अ सेल्स्मन" या कवितेतील मध्यवर्ती पत्र एक वयस्क असा विक्रेता आहे, ज्याच्या जोम आणि उत्साहाला वयापरत्वे ओहोटी लागली आहे. रोज सकाळी तो लवकर उठतो, ट्रेन पकडायला धावतो, हसतमुख चेहेर्‍याने क्लायंटच्या गाठीभेटी घेतो. क्लायंटला त्याचे प्रॉडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ऊर फुटेस्तोवर धावतो पण अनेकदा तर नव्याने एम बी ए झालेला पोरसवदा सहकारीत्याचा क्लायंट त्याच्या डोळ्यादेखत पळवतो. त्याचे दिवस असे व्यस्त, व्यग्र आहेत तर त्याच्या संध्याकाळी अतिशय करड्या, निराशाजनक आहेत. तो येईयेइपर्यंत मुले झोपून गेलेली असतात, बयकोचे मूळातले कडू तोंड अधिकच वाकडे झालेले असते. एकंदर आयुष्याच्या संध्याकाळी सगळं खूप अवघड होऊन बसलं आहे. त्यातच भर म्हणून त्याची नोकरी जाते. त्याला काढून टाकले जाते. कारण? त्याचे वय!!! तो वयस्क आहे, त्याचे प्रॉडक्ट खपत नाही. अणि आपल्या कामामधे जीवाचा आटापीटा करणार्‍या अशा या विक्रेत्याचा जणू आपण खून करतोय, त्याला नोकरीवरून काढून टाकून त्याचं आयुष्य जगायची कारणंच आपण उध्वस्त करतोय हेही कोणाच्या खिजगणतीत येत नाही. अशी विक्रेत्याची व्यथा मांडणारी जेम्स ऑट्री यांची ही" चित्रमय करूण कविता आहे. ___________ ही कविता वाचून २ दिवस तरी मी अस्वस्थ होते. कोणीतरी मला पूर्वी म्हणालं होतं - आपल्याला आहोत तिथे राहण्याकरता देखील सतत धावावं लागतं कारण जग धावतं आहे. नोकरीत अनुभव आणि तरुण रक्त हा संघर्ष नवा नाही. आणि तो अपरिहार्य आहे. वरील कविता किती जणांना अपील होईल माहीत नाही. मला खूप आवडली..... पेक्षा चटका बसला.
लेखनप्रकार

याद्या 2318
प्रतिक्रिया 11

तुमच्या या लेखनाच्या निमित्ताने, "दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे, काम कर - सबको सलाम कर प्यारे.." हे गाणं आठवुन गेलं.. एका चांगल्या कवितेची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी आहे. ही कविता जीवन जगण्यासाठी करावा लागणारा अपरिहार्य संघर्ष डोळ्यासमोर उभा करते.

कविता आणि तुमचे त्यावरचे प्रकटन मनाला स्पर्शून गेले. नैसर्गिक असो की कृत्रिम, कोणत्याही व्यवस्थेत जगण्याची स्पर्धा अटळ आहे. नैसर्गिक व्यवस्थेत जो पर्यंत तुम्ही स्वतःला जिवंत ठेवू शकाल तो पर्यंत तुम्ही स्पर्धेत आहात आणि कृत्रिम व्यवस्थेत जो पर्यंत स्वतःला उपयुक्त ठेवू शकाल तो पर्यंत तुम्ही स्पर्धेत आहात. माणसाचे सरासरी आयुष्य वाढवण्याचा दावा करणार्‍या व्यवस्थेसाठी ही गोष्ट किती भूषणास्पद आहे कोण जाणे?

शुचिताइंनी करून दिलेला या र्‍हदयस्पर्शी कविचा परिचय ही सुद्धा एक कविताच आहे.... बघा: रोज सकाळी तो लवकर उठतो... ट्रेन पकडायला धावतो हसतमुख चेहेर्‍याने क्लायंटच्या गाठीभेटी घेतो क्लायंटला त्याचे प्रॉडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो ऊर फुटेस्तोवर धावतो, पण अनेकदा.... नव्याने एम बी ए झालेला, पोरसवदा सहकारी... त्याचा क्लायंट त्याच्या डोळ्यादेखत पळवतो. त्याचे दिवस असे व्यस्त, व्यग्र आहेत तर त्याच्या संध्याकाळी अतिशय करड्या, निराशाजनक.... तो येईपर्यंत मुले झोपून गेलेली असतात, बायकोचे मूळातले कडू तोंड... अधिकच वाकडे झालेले असते एकंदर आयुष्याच्या संध्याकाळी- सगळं खूप अवघड होऊन बसलं आहे. त्यातच भर म्हणून त्याची नोकरी जाते, त्याला काढून टाकले जाते.... कारण? त्याचे वय!!! तो वयस्क आहे, त्याचे प्रॉडक्ट खपत नाही. आणि आपल्या कामामधे जीवाचा आटापीटा करणार्‍या... अशा या विक्रेत्याचा जणू आपण खून करतोय, त्याला नोकरीवरून काढून टाकून त्याचं आयुष्य जगायची कारणंच आपण उध्वस्त करतोय हेही कोणाच्या खिजगणतीत येत नाही.....

In reply to by चित्रगुप्त

शुचिमॅडमची कविताओळख खूपच छान आहे आणि चित्रगुप्तसाहेबांनी त्यातलं काव्य अलगदपणे बाहेर काढलं. खूप छान!! :-)

शुचि मामी बर्‍याच दिवसांनी लिहिती झाली :) कविता आणि परिचय आवडला. मुख्य म्हणजे भाषांतर वैग्रेच्या भानगडीत न पडता तू तुझ्या शब्दात त्याचा आशय आमच्यापर्यंत पोहोचवलास हे जास्ती भावले. धन्यवाद. चित्रगुप्त ह्यांचे पद्य देखील आवडले.

शुचि, अपील झालीच कविता. कारण माझे आजोबा. आधी हातातोंडाचा मेळ बसावा म्हणुन आणि उत्तरायणात वेळ जावा म्हणुन अगदी गेल्या वर्षापर्यंत त्यांनी शिंपीकाम केले. आता ऐंशीव्या वर्षी दिसत नाही, ऐकु येत नाही, लक्षात राहत नाही म्हणुन नाईलाजाने त्यांना काम थांबवावे लागले. आता चेहर्‍यावर फक्त भकासपणा असतो त्यांच्या. आत्मा कधीच निघुन गेलेला असावा आणि श्वास चालू आहेत म्हणुन जिवंत म्हणावं तसं काहीसं. असो. तू छान लिहीले आहेस. लिहीत रहा. :)

कवीता मागेही ऐकली होती.. विषय भिडावा असाच आहे, पण या निमीत्त एक वैश्वीक सत्य परत समोर आले, जर तुमच वय वाढत असेल, शारीरीक क्षमता कमी होत असेल, तर बौद्धीक क्षमता वाढवलीच पाहीजे.. अनुभवाचा उपयोग करुन हळुहळु तुम्ही इतरांना मार्ग्दर्शन करण्याची हातोटी कमावलीच पाहिजे, अन्यथा नुस्त्या धावण्याची शर्यत तुम्ही जिंकुच शकत नाही..

डेथ ऑफ अ सेल्समन अभ्यासाला होती.तेव्हा पाठ्यपुस्तक म्हणून वाचली होती. त्या नाटकाचे गांभीर्य कळण्याचे ते वय नव्ह्ते.पण डोक्यात ते कथानक अजूनही अधून मधून डोकावते. आज कविता वाचल्यावर पुन्हा तेच आठवले

छान लिहिलेत.भावना पोहचल्या. कधी कधी जीवनातल्या आपल्याशी निगडीत असणाऱ्या काही व्यक्ती बाबत आपण granted असतो. पण जेव्हा कधी त्यांचे खरे आयुष्य आपल्याला समजते तेव्हा मात्र मनाला चटका लावून जाते.