Skip to main content

संस्कार १: येतोच... आलोच....

लेखक नीधप यांनी शनिवार, 23/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं. आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते. नाही वाजली. भारतीय प्रमाण वेळेनुसार अजून अर्धा तास शिल्लक होताच म्हणा. पण एव्हाना सगळं आवरण्यात ब्रेकफास्टला फाटा मारल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागले होते. आता किचनमधे जाऊन काहीतरी करून घ्यायचं म्हणजे परत पसारा. परत तो आवरा आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणजे? असा विचार करत मी चुळबुळत खुर्चीवर बसून होते. खूप वाजून गेले आणि बेल वाजलीच नाही. भुकेने आणि वाट बघण्याने डोकं तडकलंच होतं. पोटातल्या कावळ्यांना न्याय द्यायचं ठरवलं शेवटी. त्या आणि बाकी कामांना लागले. हे असं सलग आठवडाभर चाललं. आता माझा संताप आणि वैताग उतू जाऊन जाऊन संपायला आला होता. फोनवर फोन करणे, संताप व्यक्त करणे याचाही कंटाळा आला होता. पण अडला हरी.... करणार काय. असेच सीन्स आयुष्यात वारंवार घडत होते. घडतायत. बेल वाजवणारा माणूस वेगळा एवढाच काय तो फरक. गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी. केलीच तर त्या लोकांची एवढी वाट नाही बघणार. मी त्यांची वाट बघावी हे भाग्य ज्यांच्या नशिबी ते म्हणजे विविध फिटिंग्ज करणारे लोक. केबल, गॅस, फोन इत्यादी. दर वेळेला मी घर बदलल्यावर या लोकांच्या नशिबात मी त्यांची वाट बघणं असतं. फोनवर अमुक दिवशी येतो, अर्ध्या तासात येतोच असं सांगून हे कधीच येत नाहीत. आपल्याला कुठलीतरी सर्व्हिस हवीये आणि ती जोडून देऊन हे आपल्यावर डोंगराएवढे उपकार करणारेत हे त्यांचं ठरलेलं असतं. सर्व्हिस चार्ज आणि बक्षिस असं दोन्ही आपल्याकडून उपटूनही उपकारच असतात ते. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणं हे आपलं जिवितकार्यच आहे असं हे लोक समजतात. आपल्याला बाकीची कामे, पोटापाण्याचे व्यवसाय काहीही असत नाहीत (तरीही आपण सर्व्हिस जोडून घेणार असतो आणि बिलंही भरणार असतो ते राहूद्या). आठवडाभर तंगवल्यावर यांची हृदये द्रवतात. मग अचानक एक दिवस आपलं घर तिटपावडरविरहित असताना, आपण बाहेर निघालो असताना हे उगवतात. ते आल्या वेळेला काम करून घेतलं नाही तर आपलाच गुन्हा असतो. मग आपली अतिप्रचंड महत्वाची मिटींग का असेना. या लोकांच्यापुढे ते झ्याडम्याडच ना हे त्यांचं पक्कं ठरलेलं असतं. तर असं सध्या चालू आहे माझ्या आयुष्यात. कधी चुकून फोन करून वेळच्या वेळेला एखादा माणूस आलाच तर धक्का बसेल मला. आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याकडे हे झेलण्याशिवाय पर्याय नसतोच पण कधी कधी समोरच्याची गरज असूनही समोरचा असंच वागतो ते मात्र मला आश्चर्याचं वाटतं. नवर्‍याला दहादा फोन करून असिस्ट करायला येऊ पाहणारे स्ट्रग्लर्स, मला असिस्ट करायला इच्छुक असलेले माझेच काही विद्यार्थी, मला या क्षेत्रात काही करायचंय तर मदत कराल का अश्या आर्जवासकट फोन करणारे ओळखीपाळखीचे लोक हे पण जेव्हा भेटायची वेळ ठरवून त्या वेळेला गायब असतात, येत नाहीये/ उशीरा येतोय असं काही कळवण्याची जरूरही समजत नाहीत तेव्हा अश्यांना कोणी का काम द्यावे हा विचार अर्थातच केला जातोच. त्या माणसावर फुली मारली जाते. आणि आपला खलनायक होतो ते वेगळंच. दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही? हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का? ------------------------- संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून. - नीरजा पटवर्धन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4509
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

चांगला आणि माझ्या मनातला विषय. पुढे अजून लिहाल अशी लेखावरून आशा वाटतेय. भ्रष्टाचारापासून पर्यावरणापर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे संस्कारात आहेत, आणि त्यातच आपण अधोगती करीत आहोत. म्हणून लिहा, काय चुकतंय ते आणि कसं सुधारायचं, तेही.

दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही?
टेकींग फॉर ग्रान्टेड, समोरच्याला फालतु समजणे, कवचित प्रसंगी समोरच्या व्यक्तीला आपले काम होण्या आधीच आदर दिला तर ती जास्त माजेल वैग्रे असा समज असणे.
हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?
जरूर असावं. पण असे संस्कार पालक वैग्रे आपल्या वागण्यातुन करु शकतात, आपल्या पाल्यांना, "बाळ/बाळे वेळेत जा, समयपालन अत्यंत म्हत्त्वाचं.." असं केवळ सांगुन नाही!

अगदी मनातले बोललात. मला पण खूप राग येतो अशा लोकांचा. आपण कोणाला वेळ दिली की घरात आटापिटा करुन (ब-याच वेळेला त्या मुळे घरात भांडण होऊन) वेळ सांभाळतो पण आपल्या कडे येणारी मंडळी (काही सगळी नाहीत) असे दाखवतात की कामं व व्याप फक्त त्यांना आहेत व आपण पंजाबीत बोलायचे म्हणजे हम वेले बैठे हैं घरमें। वेळ देऊन न पाळणे म्हणजे शब्द देऊन न पाळणे ह्याच सारखे आहे. काय करायचे. आलिया भोगासी असावे सादर एवढेच म्हणतो.

सहमत आहे... वाट पाहण्यात फार त्रास असतो. आयटी क्षेत्रात हे अधिक प्रमानात चालते. पण प्लंबर, केबलवाल्यांसाठी आम्ही घराला पावडर तीट लावत नाही. :) एकूण सुधारणा होतील तसे हे करणे (आलोच म्हणणे) अवघड होईल. म्हणजे मी लोकलमध्ये असताना मला फोन यावा (ज्याला मी दादरला भेटायला येतो म्हटले आहे त्याचा); मी म्हणावे आता गाडीत आहे १० मिनिटात पोचेनच. असे म्हणतो आहे तोच गाडीत सुस्पष्ट घोषणा*, "पुढील स्टेशन मुलुंड-अगला स्टेशन मुलुंड-द नेक्स्ट स्टेशन मुलुंड"**. असे होऊ लागले तर याला आळा बसेल. *परदेशस्थ भारतीयांसाठी माहिती: हल्ली मुंबईच्या लोकलगाडीत अशी घोषणा होते. **अ-मुंबईकरांसाठी माहिती : मुलुंडहून दादरला पोचायला सुमारे ३०-३५ मिनिटे लागतात.

In reply to by नितिन थत्ते

पण प्लंबर, केबलवाल्यांसाठी आम्ही घराला पावडर तीट लावत नाही. ते काही जणांच्या मॅन्युफॅक्चरींग डिफेक्टसमधे असतं हो. त्यातली मी. :) बेडरूममधल्या स्टीलच्या कपाटाचे दार नीट करायला आलेल्या माणसासाठी मी कपाट हॉलमधे आणू शकत नाही किंवा फोन लाइन आतल्या रूम्समधेही फिरवायची असल्यावर पर्याय काय उरतो? इत्यादी...

आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याकडे हे झेलण्याशिवाय पर्याय नसतोच इतकीच गोष्ट खरी आहे. बाकी, तुम्ही जास्तच आवरा आवरी करता असे वाटले. प्लंबर, वायरमन,फोनच्या वायरी चेक करणारे इ. कडे मी इतके दुर्लक्ष करतो की विचारु नका. आल्यावर तर त्याला असे वाटले पाहिजे की तू नाही तर तुझ्या नंतर पाच मिंटांनी दुसरा काम करायला कमी पैशात येणारच होता. (मग त्याच्याकडूनच काम करुन घ्या असे म्हणनारेही भेटतात तो भाग वेगळा) असे दाखवतो. असो, बाकी, वेळेवर काम करायची कोणालाच सवय राहीली नाही त्यामुळे संस्कार वगैरेने काही बदल होतील असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे

अहो काका, आपल्या घरातल्या वस्तू आंडू पांडू लोकांना दिसू नयेत म्हणून आवराआवरी करायची असते. त्यांच्या स्वागतासाठी नाही. :)

In reply to by नीधप

...'आपल्या घरातल्या वस्तू आंडूपांडू लोकांनी उचलू नयेत, म्हणून' असे स्पष्ट म्हणा की! :) नाहीतर दिसल्या, तर नेमके काय बिघडते? आपण आपल्या घरात आपल्या सोयीने राहतो; उगाच नको त्या लोकांना भाव कशाला द्यायचा?

In reply to by पंगा

>>>> आपण आपल्या घरात आपल्या सोयीने राहतो; उगाच नको त्या लोकांना भाव कशाला द्यायचा? हेच म्हणतो. आम्ही आहोत हे असे आहोत. कशाला आंडुपांडुचे दडपण घ्यायचे. -दिलीप बिरुटे

हो उचलू नयेत म्हणूनही. पण सिरीयसली मी कुठल्या वस्तू वापरते, माझ्या घरी काय काय आहे अथवा नाही हे कुणाही बाहेरच्यासमोर मांडणे हे मला तरी इरिटेट होते. इथे मुद्दा मी घर का आवरते हा नसून एकुणात वेळ पाळणे हा आहे. तेव्हा माझ्या घर आवरण्याच्या सवयींवर टिकासत्र आपण नंतर ठेवूया. ओके?

In reply to by नीधप

इथे मुद्दा मी घर का आवरते हा नसून एकुणात वेळ पाळणे हा आहे. तेव्हा माझ्या घर आवरण्याच्या सवयींवर टिकासत्र आपण नंतर ठेवूया. ओके? वेळ पाळणे हा तुमचा मुद्दा अत्यंत व्हॅलिड आहे. पण तुमच्या इरिटेशनची मात्रा १० फोल्डनी वाढवण्यात मात्र त्या कोणी येणार त्याला दिसू नये म्हणून म्हणा किंवा काहीही उद्देशाने "पसारा लपवणे" या वृत्तीचाच १०० % हातभार आहे. कायमच घर चकाचक ठेवणे आणि त्यासाठी सदैव सफाई आवराआवरी मोडमधे राहणे,पसारा होऊच न देणे हा काहीजणांना असलेला सिंड्रोम एकतर तथाकथित उत्तम संस्कार किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर या कशाततरी घालता येतो. पण तुम्ही वर्णन केलेली सवय (पक्षी: पसारा असतोच आणि तो कोणी आंडू पांडूच्या नजरेला पडू नये म्हणूनच ते येण्यापूर्वी आवरायचा) ही अतिशय कॉमनली आढळते, घराघरात. अगदी माझ्याही. आणि ही सवय सोडणे सोपे आहे. त्याने त्रास नक्की कमी होईल. त्यामुळे त्यावर टीका नंतर वेगळ्या सत्रात करणे अप्रस्तुत आहे. तुमच्या अनुभवकथनात या गोष्टी इंटरलिंक्ड दिसल्याने अनेकांनी "टीका" नव्हे, पण मतप्रदर्शन केले असावे आवराआवरीबद्दल. "आंडूपांडू" विषयी गंमत आहे. प्लंबर, फिटर आणि अशाच अनेक लोकांना "आंडूपांडू" म्हणून नकळत कमी लेखण्याची वृत्ती भारतीय संस्कारांचीच म्हणायची का? अमेरिकेत अशा सर्व्हिस देणार्‍यांना इतक्या घाऊकरित्या कमी समजले जाते का? मी ऐकलंय त्याप्रमाणे तिथे श्रमांना प्रतिष्ठाच आहे. अगदी कामवाल्या बाईलाही. समजा आंडूपांडू नसलेली व्यक्ती (मित्रमैत्रिणी, नातेवाईक, ज्येष्ठ, सहकारी) घरी आले तरी त्यांनाही काही दिसू नये म्हणून घर आवरणारच ना? की ते प्लंबर, केबलवाले यांपैकी नाहीत म्हणून मग पसारा तसाच पडू देणार का? तुम्ही पुणे मुंबईपैकी एका ठिकाणी राहात असलात तर बर्‍याच हाउसहोल्ड कामांसाठी आता सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या निघाल्या आहेत. एकच नंबर - अनेक सेवा. त्यांना अ‍ॅज अ कंपनी, रेप्युटेशन जपायचं असल्याने ते असली चालढकल करत नाहीत. सर्व्हिसवाला माणूस बर्‍यापैकी वेळेत येतो आणि कामं करतो. लहान गावात मात्र अजूनही फार अवघड स्थिती आहे.. एकूण वेळ पाळण्याबाबतीत अत्यंत आनंद आहे सर्वत्र..सर्वच पातळ्यांवर.

In reply to by गवि

मी घर आवरलं म्हणून लोकांनी वेळेवर आलं पाहिजे हे माझं म्हणणं नाहीये. घर आवरण्याचा मला त्रासही होत नाही. मला कुठल्या डिसऑर्डर्स आहेत वा नाहीयेत याबद्दल मी कुणाचंच मत विचारलं नाहीये. तेव्हा त्या मौलिक टिप्पण्यांबद्दल थँक्स बट नो थँक्स. एखाद्याला स्वतःचं खाजगीपण जपण्यासाठी आपल्या वस्तू समोर पडलेल्या नको वाटत असतील तर त्याला डिसऑर्डरपर्यंत नेऊन जोडणे हे अंमळ अतिच आहे. >>>>"आंडूपांडू" विषयी गंमत आहे. प्लंबर, फिटर आणि अशाच अनेक लोकांना "आंडूपांडू" म्हणून नकळत कमी लेखण्याची वृत्ती भारतीय संस्कारांचीच म्हणायची का? अमेरिकेत अशा सर्व्हिस देणार्‍यांना इतक्या घाऊकरित्या कमी समजले जाते का? मी ऐकलंय त्याप्रमाणे तिथे श्रमांना प्रतिष्ठाच आहे. अगदी कामवाल्या बाईलाही. तुमचे पूर्वग्रह तुमच्यापाशीच ठेवा बरंका. आंडूपांडू याचा अर्थ माझ्या आयुष्याशी आणि घराशी संबंधित नसलेले अनोळखी लोक. ज्यांच्याकडून क्वचित सर्व्हिस घ्यावी लागते. जे एकाला झाकून दुसर्‍याला काढावा इतके कामाच्या आणि गोंधळ करण्याच्याही बाबतीत सारखे असतात. अनोळखी माणसांवर मूर्खासारखा विश्वास टाकून मग वस्तू गेल्या रे म्हणून रडत बसण्याइतका प्रेमळ विचार मी करू शकत नाही. मी अमेरिकेत रहात नाही. त्यामुळे तिथे काय होतं किंवा नाही यावर मी माझं भारतातलं घर मापत नाही. आणि माझी कामवाली बाई ही माझी सपोर्ट सिस्टीम असते. बाकी एका साध्या लेखातून लिहिणार्‍याच्या वैयक्तिक डिसऑर्डर्स, वृत्ती यापर्यंत पोचणारे या जगात असतात हे परत एकदा बघून खूपच मजा आली.

In reply to by नीधप

कायमच घर चकाचक ठेवणे आणि त्यासाठी सदैव सफाई आवराआवरी मोडमधे राहणे,पसारा होऊच न देणे हा काहीजणांना असलेला सिंड्रोम एकतर तथाकथित उत्तम संस्कार किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर या कशाततरी घालता येतो. पण तुम्ही वर्णन केलेली सवय (पक्षी: पसारा असतोच आणि तो कोणी आंडू पांडूच्या नजरेला पडू नये म्हणूनच ते येण्यापूर्वी आवरायचा) ही अतिशय कॉमनली आढळते, घराघरात. अगदी माझ्याही. >>>> "पण तुम्ही वर्णन केलेली सवय".. Asaa clear separator thevun tumhee varnan keleli savay tyaa disorder madhali nahi aani tee majhyaahee gharee aahe..common aahe.. "savay" ha shabd.. Yaa sarv spasht contrast nanatarhi tumhee ghaai ghaaine "disorder" svat:la chikatavoon ghetalit aani "mat vicharale nahi" ase jhatakoon mokalya jhalaat.. .............. आंडूपांडू याचा अर्थ माझ्या आयुष्याशी आणि घराशी संबंधित नसलेले अनोळखी लोक. ज्यांच्याकडून क्वचित सर्व्हिस घ्यावी लागते. >>> Yaa khulaashyabaddal thanks.. Baki tumhi vegalya mata vishayi khoop sensitive aahaat he samajale. Aata comment detana kalji ghein. Kshamasv

In reply to by गवि

लेखाचा जो विषयच नाही त्यावरून वाद घालणे आणि संबंध नसलेल्या गोष्टींना पकडून माझ्यावर वैयक्तिक डिसऑर्डर इत्यादी बडबड... असल्या मतांची मला खरच किंमत नाही.

In reply to by विनायक प्रभू

@नी ताई मी इतकं स्पष्ट स्पष्टीकरण देऊनही तुम्ही पुन्हा वैयक्तिक डिसऑर्डर बडबड असाच आरोप माझ्या प्रातिक्रियेवर करता आहात हे माझं दुर्दैव आहे. काही व्यक्तींना मुळात घर घाणच होऊ न देणे आणि त्यासाठी सदैव "साफसफाई आणि आवरा" मोडमधे असणे अशी डिसऑर्डर असते.. पण तुम्ही सांगितलेली सवय (पक्षी: मुळात घर पसरलेलं असणे आणि कोणी येणार म्हणून आवरण्याची लगबग ही मात्र अगदी कॉमन (सामान्य, नॉर्मल) सवय आहे (डिसऑर्डर नव्हे) आणि ती कॉमन असल्याचा दाखला म्हणून ती माझ्या देखील (वैयक्तिक) घरातसुद्धा आहे असेही त्याच वाक्यात लिहीले. शिवाय ही सवय कॉमन असल्याने सोडणेही सोपे आहे (इन काँट्रास्ट टू आधी मेन्शन केलेली "डिसऑर्डर" जी सुटणे अवघड).. ...इतक्या सर्व मार्गांनी तुम्ही त्या डिसऑर्डरपासून दूर आहात हे लिहिलं होतं. अजूनही ते वर तस्संच आहे. मूळ वेळ पाळण्याचा मुद्दा अगदी ग्राह्य असल्याची कॉमेंटही मी तिथ्थेच केली आहे. मूळ विषय फक्त वेळ पाळण्यापर्यंत मर्यादित होता आणि फक्त तितक्या भागावरच मतं मागवली होती हे लक्षात नाही आलं. इरिटेशन कमी करण्याचा उपाय सुचवला. ते तुमच्या अपेक्षित प्रतिसादांच्या स्कोपबाहेर आहे हे लक्षात आलं नाही त्याबद्दल आणि एकूणच तुमच्या परसेप्शनने का होईना पण अल्टिमेटली तुम्हाला त्यात काही वैयक्तिक वाटलं, एकूण रिझल्ट तुम्हाला अपसेट वाटण्यात झाला, त्याबद्दल अशी एकत्रित बिनशर्त माफी मागत आहे. बिनकिमतीचं असलं तरी प्रामाणिक म्हणणं आहे. आणि एकच विनंती, आता परत इतक्या स्पष्टीकरणानंतरही माझ्यावर वैयक्तिक डिसओर्डर आणि बडबडीचा आरोप लावू नका. त्यातून उगीच तुम्हाला मी बिलकूल न म्हटलेले (उलट तुमचं तसं नाही असं आवर्जून म्हणूनही) ..ते अस्पष्ट झालं असेल तर मी त्यावर पुन्हा स्पष्ट प्रतिसाद लिहून्..तरीही पुन्हा तसंच वाटून घेऊन आणि म्हणत राहून तुम्ही याबाबतीत सेल्फ कन्व्हिन्स्ड असल्याची (अर्थातच चुकीची) समजूत होईल. @विनायक प्रभू.. :) या ठिकाणीही मी नी ताईंच्या या सवयीला ओसीडीपासून वेगळं आणि कॉमन (नॉर्मल) उल्लेखूनसुद्धा.. आणि शिवाय वरील सर्व वाचूनही आणि (अ‍ॅश्युमिंगली) माझ्या इतरत्र येणार्‍या निदान काही प्रतिक्रिया वाचून.. त्याउप्पर तुम्हाला असं म्हणावंसं वाटलं की "सर्व ठिकाणी" ओसीडी शोधण्याची सवय माझ्या प्रतिक्रियांत दिसते तर निव्वळ खेदाखेरीज मला काहीच व्यक्त करता येत नाहीये.

In reply to by गवि

आयला गवि, तुम्ही जामच पोलिटीकली करेक्ट लिहिता हो. तुम्ही कधी कुणाशी भांडला आहात का आजवर, असा प्रश्न पडतो मला कधी कधी.

In reply to by नीधप

समजा आंडूपांडू नसलेली व्यक्ती (मित्रमैत्रिणी, नातेवाईक, ज्येष्ठ, सहकारी) घरी आले तरी त्यांनाही काही दिसू नये म्हणून घर आवरणारच ना? की ते प्लंबर, केबलवाले यांपैकी नाहीत म्हणून मग पसारा तसाच पडू देणार का?
मित्रमंडळी, नातेवाईक, ज्येष्ठ, सहकारी वगैरे घरी आले, तर माझ्या घराचा दर्शनी भाग (हॉल, डायनिंग रूम, झालेच तर स्वयंपाकघर) वगळता इतर खोल्यांत एक म्हणजे ते आपण होऊन जाणार नाहीत, आणि मी नेणारही नाही. (नेण्याची वेळ येण्याचे कारणही नसावे.) पण गेलेच, तर त्याचा अर्थ: (१) एक तर ते माझ्या इतके जवळचे आहेत, की माझ्या घरी येऊन बिनधास्त माझ्या बेडरूममध्ये घुसू शकतात (किंवा मी त्यांना नेऊ शकतो), ज्या परिस्थितीत माझ्या बेडरूममधील पसार्‍याचे त्यांना काही वाटू नये आणि मलाही माझ्या बेडरूममधील पसारा त्यांनी पाहिल्याचे काही वाटू नये, किंवा (२) तशी परिस्थिती नसल्यास (आणि तितके जवळचे नसूनही आगाऊपणे ते माझ्या बेडरूममध्ये घुसल्यास), they deserve to see what they see. दोन्हीं परिस्थितींत, मला चिंता करण्याचे काहीच कारण नसावे. मामला खतम.

वाट बघण्यापलिकडे आपण काय करू शकतो अशा वेळी? याला काही उपाय नाही कारण या "लहरी कलाकार मंडळींवर" आपण बर्‍याच गोष्टींसाठी अवलंबून असतो, आणि त्यांना उशीर केल्याबद्दल रागावण्यापेक्षा आलास तर बाबा, कसंही काम करूनच जा! असं म्हणणं भागच पडतं.

आलिया भोगासी असावे सादर......

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

नको नको मग ते फारच क्लिष्ट प्रकरण होते. स्वताच स्वताला फोन करुन अपॉईंटमेंट घ्यायची, स्वताच स्वताची वाट बघायची, स्वताच स्वताला पसारा दिसु नये म्हणून आवरुन ठेवायचे, स्वताच स्वताला कामात फसवायचे, स्वताच स्वताकडे संशयाने पहायचे, स्वताच स्वतावर धागा काढायचा... कशाला आपणच आपल्याच पायावर धोंडा / मेंदुचा भुगा करायचा???? छे छे असे काही नकोच! म्हणूनच म्हणले ना जेणो काम तेणो ठाय, दुजा करे सो गोता खाय!

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

एकाच जन्मात माणूस कायकाय म्हणून शिकणार? प्लंबिंग, सुतारकाम, झालेच तर गवंडीकाम, बागकाम, माफक इलेक्ट्रिशियनगिरी, हे सगळे शिकायला हरकत तर काहीच नाही. जमले, तर उत्तमच आहे. पण प्रत्येकाला जमेलच, असे नाही. (जमणे ही पुढची गोष्ट. तेवढा वेळ देता येईल, किंवा ती प्रायॉरिटी असेल, असेही नाही.) शिवाय, हौशीने शिकले, तरी त्याचा उपयोग करण्यासाठी नेहमीच्या कामाधंद्याच्या व्यापातून वेळ मिळणे हेही प्रत्येकाला शक्य होईलच, असेही नाही. त्यापेक्षा त्यात्या क्षेत्रातील प्रोफेशनलकडून पैशांच्या मोबदल्यात असे काम करवून घेणे काहींना सोयिस्कर असू शकेल. (अवांतर: 'काही लोक अत्यंत बिज़ी असतात, म्हणजे बाकीचे काय रिकामटेकडे असतात की काय' हा निष्कर्ष यातून काढता येऊ नये. अनेकांची ही वाजवी अडचण असू शकते.)

नी, कदाचित हा वक्तशीरपणा रक्तातच असावा लागतो. तशी सामाजिक जाण पण असावी लागते. आपण भारतीय ह्यात फार फार कमी पडतो. फक्त संस्कारांपेक्षा मला तो प्रोब्लेम वाटतो:
  • सामाजिक मुल्यांना महत्व ने देणार्‍या शिक्षणपद्धतीचा
  • सामाजिक मुल्यांना फाट्यावर मारणार्‍या पालकांचा/समाजाचा
  • एकंदरीत "चलता है" हा ऍटीट्युड असणार्‍या भारतीय मनोवृत्तीचा
पण हे बदलायचे असेल तर आपल्याला बदलले पाहिजे. कठिण आहे पण अशक्य नाही. मला स्वतःला वेळ पाळणे फार महत्वाचे वाटते आणि कोणाचे वाट बघायल लागणे ह्याचा तर भय़ंकर तिटकारा आहे :( ह्या सवयीमुळे जपानमधे क्लायंटच्या आणि एकंदरीत जपानी लोक़ांच्या अंतर्गत गोटात जाउ शकलो (फार कठीण काम आहे हे). जनरली जपान्यांचे भारतीयांबद्दलचे मत 'वेळ न पाळण्याच्या वाइट सवइमुळे' फार चांगले नाही. तर तुझ्या मुळ प्रश्नाला (हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?) माझे उत्तर: जरूर असावे. - (वक्तशीरपणा हा डीसऑर्डर असलेला) सोकाजी अवांतर: (>>गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी बरे झाले हे स्पष्ट केलेस नाहीतर गैरसमज होउ लागलाच होता) ;)