Skip to main content

आणि दरवाजा तोंडावर बंद झाला.. किस्सा नवी दिल्लीचा .

Published on बुधवार, 15/06/2011
गोष्ट हवाईदलातील ... असे अनेक प्रसंग येतात कि तेंव्हा काय करावे सुचत नाही. धीर धरून त्यातून मार्ग काढला तर अनपेक्षित परिणाम होतो. माझ्याबाबत असे अनेकदा घडले. पैकी एक किस्सा... हवाईदलाच्या पोलिसांची व्हॅन. पुढे मी, वेस्टर्न एयर कमांड कँपसचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणून. मागे दोन रिव्हॉल्वरधारी बळकट एयर वॉरियर साथिदार. नवी दिल्लीतील रिंग रोड वरून डिफेंन्स कोलोनीच्या एका कोठीपाशी आम्ही थांबलो. कडक गणवेष, वर पीक कॅप, हातात व्हीआयपीची ब्रीफकेस मागे दोन हत्यारबंद सहकारी, असा मी ऐटीत घराची घंटी वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात उभा. किलकिला दरवाजाकरुन आतल्या व्यक्तीने अंदाज घेतला. 'कोई एयरफोर्सवाले लगते है', वर्दी आतवर गेल्याचे ऐकायला आले. 'हकाल दो..---.चोदों को' सणसणीत गालीत उर्मटपणा कूटून कूटून भरला होता. तरीही दरवाजा उघडला. तो बंद करायच्याआत 'आपसे कोई नही मिलना नही चाहता' बोल सुनावले गेले. दरवाज्याने माझ्या नाकाचा वेध घेत आपले तोंड धाडकन बंद केल्याने मागे उभा सार्जंट, 'सीआयडी' सिरियल मधील 'दया टाईप' आवाजात म्हणाला, 'सर, लात मारकरे तोडता हूँ . साले की ऐसी की तैसी.' मी काही न बोलता पुन्हा बेल खणकावली. चांगली दोनदा. आता दरवाजा झपकन उघडला. 'क्या है' म्हणत. वेशावरून त्या घरमालकीण होत्या हे मी ताडले. आताच मौका होता. अभी नही तो कभी नही. असे निर्वाणीचे म्हणत मी म्हणालो, 'मॅडम, मैं आपसे मिलने आया हूं. सर से नही. 'क्यो हमारे पीछे आप पडे है?' म्हणत त्या बाईंनी रागाचा स्वर धरला. गोऱ्यापान, सुंदर, सलवार खमीज, केसांचा बॉब. कानाच्या पाळ्यांवरून लटकणारी काश्मीरी कर्णभूषणे. 'कुछ डॉक्युमेंट्स आपसे चाहिए थी. आपण आमच्या अनेक पत्रांना उत्तर देत नाही आमच्याकडून पत्ता तर चुकीचा नाही याची खात्री करायला आलोय. ठंडा पानी मिलेगा क्या?' त्या आत गेल्या. थंडपाणी आले. तो वर पिंजारलेल्या केसांचा ,गॉल्फच्या हाफपँटमधील झुपकेदार मिशांचा विंग कमांडर प्रवेशला. चेहऱ्यावर तुच्छतेचा भाव ओसंडत होता. मी पटकन उभा. 'सर, गुड आफ्टरनून, करत. मी हस्तांदोलनाला पुढाकार घेतला. ओके, ओके म्हणत नाईलाजाने पोकळ हाताने तो स्वीकारला. तोवर पाणी आल्याने मला बसायची खुण केली. ग्लास खाली ठेवायच्या पर्यंत मी दिवाणखाना न्याहाळला. उदासवाणे वातावरण, मळके सोफे, जुनाट फर्निचर, जळमटे लटकतायत. 'देख स्क्वाड्रन लीडर ओक, माझ्या छातीवरील नेमप्लेट वाचत तो म्हणाला, 'आय हेट एयर फोर्स. प्लीज गो अवे.' दरवाज्याने आपटून जे सांगितले तेच सौम्य शब्दात मला पुन्हा सुनावले गेले. 'सर, मला आपल्याला प्रत्यक्ष भेटायला यायचे कारण असे की आपण आयडेंटिटी कार्ड, फ्लाईंग क्लोदिग व कार्ड वगैरे जमा केलेले नाही. मला वरिष्ठांकडून तगादा होतोय की ते मिळवा. नाहीतर माझ्यावर एक्शन घेतली जाईल. शिवाय मला उत्सुकता आहे की आपण कोण? हवाईदलावर इतके का खार खाऊन का आहात? 'तू अभी बच्चा है. मेरी बॉससे नही बनी. मला कोणाचे उगीच ऐकायची सवय नाही. चुकीचे असेल तर कधीच नाही' म्हणून काही वर्षांपुर्वी एक दिवशी मी वेस्टर्न एयर कमांडच्या चीफशी भांडून परत त्याठिकाणी न जाण्याच्या निश्चयाने पेपर टाकले व डिस्चार्ज मिळवून घरी बसतोय.' 'आय केअर टू हूट्स फॉर एयर फोर्स' तणतणत ते म्हणाले. 'वेल सर, यु मे बी राईट, पण माझी काय चुक त्यामुळे मला वरिष्ठांचा दट्या बसतोय? मी आपल्याला विनंती करायला आलोय की आपण आपल्याकडील आयडेंटिटी कार्ड तरी मला द्या. कारण ती डिसिप्लिन केस होतेय म्हणून मी सिक्युरिटी ऑफिसरम्हणून आपल्याला प्रत्यक्ष भेटायला आलोय' 'यू कॅन अंडरस्ट्रॅंड माय पोझिशन सर'. त्यांनी मान हलवली. ते आत गेले. कार्ड घेऊनच परतले. माझ्यापाशी पोहोचेल अशा बेताने दुरून टाकत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'थँक्स' म्हणत मी उठलो. म्हणालो, 'सर हे काम तर झाले पण एक विचारु का?' आपला राग हवाईदलावर नाही. त्यात असलेल्या व्यक्तींवर आहे. पण आपण आपल्याला ती शिक्षा का करून घेता आहात? 'मैं समझा नही?' ते म्हणाले, 'सर, माझा प्रोफेशन अकाऊंट्सचा आहे. मी आपले नाव दर महिन्याच्या आऊटस्टँडींग केसेसच्या रिव्हूमधे पहातो. आपला पी एफ तसाच पडलाय तो आपण क्लेम का करत नाही? ते काही बोलले नाहीत. सर, ते पैसे तुमचे, स्वतः कमावलेले आहेत. त्याचा एयर फोर्सशी काही एक संबंध नाही. ती रक्कम आपण का नाकारता आहात?' 'आय से', म्हणत त्यांच्या मिसेस पतीला संबोधून माझ्याशी बोलू लागल्या. 'एके, विल नेव्हर रिअलाईज धिस. मी आज सेंट्रल स्कूल मधे शिकवते म्हणून आम्ही कसेबसे घर चालवतोय.प्रॉव्हिडंट फंडाचे पैसै, पेन्शन काहीच घ्यायला हा तयार नाही.' आता मिसेस बोलत होत्या व मी ऐकत होतो. 'काय करायचे सांगा. नवऱ्याकडे पहात म्हणाल्या, 'ठीक, तू बरोबर आहेस, पण आता आपली परिस्थिती पहा. मुलांच्या कडे पहा... कितीदा सांगून पाहिले तर ऐकायला तयार नाहीस.... आता तरी समजून घे.... 'स्क्वाड्रन लीडर ओक, यु मे गो नाऊ.' असे म्हणून त्या विंग कमांडरने माझ्यासमोर पत्नीने केलेल्या कागाळ्यांमुळे परेशान होत आपला पत्नीवरील राग आवरत मला सुनावले. मी ही प्रसंगाची नजाकत ओळखून म्हटले, 'सर इफ यू डोंट माइंड, मी एक कागद आणला आहे. त्यावर आपण सही केलीत तर मी आपल्या प्रॉव्हीडंडं फंडाचे पैसै मिळवून देऊ शकतो. माझेच मित्र सेंट्रल एकौंट्सला आहेत. मी त्यांच्याशी संपर्क करीन. रेव्हेन्यू स्टँप सकट तयार ब्लँक क्लेमवर त्याने घुश्सात सही केली व तो आत निघुन गेला.... नंतर काही दिवसांनी ... माझ्या ऑफिसचे दार खटखटले म्हणून मी वर पहिले. तो एक अनोळखी व्यक्तीमत्व उभे. ' हाय, आय एम एके , यू हॅड कम टू माय हाऊस, म्हणत त्याने हस्तांदोलनाला हात पुढे केला. हाच तो विंग कमांडर? केस पिंजारलेला ... दाढी वाढलेला... माझा विश्वास बसेना... 'प्लीज हॅव अ सीट' म्हणताच तो बसला. पुन्हा हातात हात घट्ट धरत म्हणाला, 'स्कावाड्रन लीडर शशिकांत ओक तू जर त्या दिवशी आला नसतास तर मी आज कदाचित तुला दिसलो नसतो.' 'थँक्स, माझे पैसे मला मिळाले. आता पेन्शनचे पेपर ही तयार झाले. तुझ्यामुळे मी खाल्लेली कसम मात्र मला तोडावी लागली. 'मी या वेस्टर्न एयर कमांडच्या इमारतीत कधीही पाऊल ठेवणार नाही' म्हणून शपथ घेतली होती. पण मी फक्त तुला प्रत्यक्ष भेटायला आलोय. तू वेळीच भेटून मला लक्षात आणून दिलेस की ऑर्गनायझेशन वाईट नसते त्यातील काही व्यक्तींमुळे रागावून आमच्यासारखे आपल्या पायावर धो़डा पा़डून घेत असतात. आज तुझ्यासारखे लोक मान-अपमानाची पर्वा न करता हवाईदलात काम करतात. त्या दलाचा एक प्रतिनिधी म्हणून मला सहानुभूतीने भेटलास. थँक्स.' त्याच्या हाताची मुठ माझ्यावरील निर्व्याज भावना व्यक्त कराये काम करत होती. .. मी ही गहिवरलो. एक दरवाजा तोंडावर बंद होतानाच्या वेदनांना काबूत करत... वेस्टर्न एयर कमांडचे एक विहंगम दृश्य.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 7074
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

तुमच्यासारखे लोक आमच्या ऑफिसमधे का नाहित ओ? तीन वर्ष झाली तरी पी.एफ. मिळालेला नाही. आणि आता पी.एफ. ऑफिसला चकरा मारणंही परवडत नाही :( असो छान किस्सा.

तुमचा खरोखर अभिमान वाटतो.. तुमच्यासारखे लोक सर्वच ठिकाणी असावेत असे वाटते..

प्रत्येक नाडीसंबंधित लिखाणानंतर तुमचे असे अनुभव पण लिहाल का? प्रतिक्रिया काय लिहू? रंगतदार शैलीत मांडलेला एक ह्रॄदयस्पर्शी किस्सा.

अशा आठवणी आणखीन येऊ द्यात. शरद

लेख छानच .. पण मला राहून राहून या लेखाचा शेवट "ते नोकरीवर लाथ मारणारे तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे दूसरे तिसरे कुणीही नसून हैय्यो हैयय्यो होय" असा होणार असे लेख वाचताना वाट होते.

In reply to by गोगोल

हा हा हा शेवटी एम के अन शशिकांतजी या दोघांची नाडी जुळली म्हणायची तर! मस्त किस्सा, चला एका माणसाला तुम्ही माणसात आणले. चांगले काम केलेत.

In reply to by गोगोल

मित्रा,
ते नोकरीवर लाथ मारणारे तडफदार व्यक्तिमत्व
सगळेच नोकरीवर लाथ मारणारे त़डफदार असतात असे नाही. काही अविचारी असतात. हैयोंचे व्यक्तीत्व अशा अविवेकी लोकांसारखे नाही. प्रत्यक्ष भेटल्यावर कळू येईल. वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।

खूपच छान अनुभव. हवाईदलातले अजूनही अनुभव येउ द्यात.

ओक सर आवडला किस्सा. मजा आली वाचताना.

In reply to by मनिष

हेच म्हणतो. अत्यंत सुंदर लेख.. नवीन काहीतरी वाचायला मिळाले. तुमचे एअरफोर्सचे अनुभवविश्व नक्कीच "नाडी"शास्त्रापेक्षा जास्त अद्भुत(रम्य) असणार. अशाच लिखाणाची वाट पाहतो.

In reply to by गवि

+ १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० :)

ओक साहेबांकडून नाडि सोडून जास्त इंटरेस्टिंग किश्श्यांची अपेक्षा आहे. ;) (योग्य अर्थाने वाचावे) अभिज्ञ.

धीर धरून त्यातून मार्ग काढला तर अनपेक्षित परिणाम होतो------आपला राग हवाईदलावर नाही. त्यात असलेल्या व्यक्तींवर आहे. पण आपण आपल्याला ती शिक्षा का करून घेता आहात? एकदम मस्त!.

ओकसाहेब, एकदम झकास! "युद्धस्य कथा: रम्या:" असे म्हणतात ते उगीच नाहीं. तुमची तर्कसंगत विचार करायची पद्धत आणि असे तर्कसंगत विचार समजावून सांगायची पद्धत एकदम 'टाप' ('निघाली वार्‍यावरची वरात'मधील श्रीकांत मोघे डोळ्यासमोर आणा!) आणखी एक लक्षात आले कीं बायका जास्त चतुर आणि व्यवहारी असतात. अजून लिहा. वाचायला आवडेल.

एका स्वाभिमानी, कडव्या व्यक्तीमत्वाची छानशी ओझरती ओळख करून दिलीत.

ओकांची नाडीपट्टी वाचलीच पाहिजे एकदा. त्यात हे गृहस्थ कधीतरी असे लेखन करतील, असे लिहिले आहे का हे पहायचे आहे. :)

मित्र हो, धन्यवाद आपल्या प्रतिसादांकरिता. हवाईदलाने आयुष्यात मला जे भरभरून दिले त्यातील काही क्षणिक आठवणींचे तुषार. असेच किस्से कधीतरी लिहून माझा आनंद आपल्याशी वाटेन.

मित्र हो,
रंगतदार शैलीत मांडलेला एक ह्रॄदयस्पर्शी किस्सा.
तुमची तर्कसंगत विचार करायची पद्धत आणि असे तर्कसंगत विचार समजावून सांगायची पद्धत एकदम 'टाप'
आपल्या प्रतिसादाने आनंद पावलो. नाडीग्रंथांची आता पाळी आली आहे.

In reply to by शशिकांत ओक

आपल्या प्रतिसादाने आनंद पावलो. नाडीग्रंथांची आता पाळी आली आहे.
मि विचारलेल्या व तरीही अजून अजूनही अनूत्तरीत ठेवलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचीही पाळी आली आहे. इथे बघावे http://misalpav.com/node/18171#comment-317942