मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सायन्स-सुपरनॅचरल फिक्शन कादंबरी : "जलजीवा"( भाग १ ते ८)

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
[माझी आतापर्यंत क्रमश: प्रसिद्ध झालेली कादंबरी "जलजीवा" ही आता येथे पुन्हा वाचकांच्या सोयीसाठी सर्व १६ भाग एकत्रीत करून देत आहे] सूचना: ही एक "काल्पनिक सत्यकथा" असून यातील पात्रे, घटना आणि ठिकाणे यांचे जगातल्या इतर काही ठिकाणे, व्यक्ती किंवा घटना यांच्याशी साम्य आढळले तर त्याला योगायोग मानायचा की सत्य मानायचे हे मी वाचकांवर सोपवत आहे. (भाग-1) लंडन शहरातल्या ट्यूब (लोकल ट्रेन्स) मध्ये प्रवास करत असतांनाच त्याला तो कॉल आला. असा एक कॉल ज्याने आपले आयुष्य खुप बदलणार आहे, आपले ते पूर्वायुष्य आपल्याला पुन्हा भेटणार आहे याची त्याला पुसटशीही जाणीव नव्हती. लंडन शहरातल्या एका प्राणिसंग्रहालयाला भेट देवून त्याची सगळी माहिती रेकॉर्ड करून ती तो काम करत असलेल्या चॅनेलवर लाईव्ह टेलीकास्ट करून झाली होती आणि आता तो पुन्हा यु.एस.मध्ये परतणार होता. त्यानंतर त्याला दोन दिवस सुट्टी होती आणि मग पुढची असाईनमेंट येण्याची तो वाट बघणार होता. पण ट्रेनमध्येच त्याला तो कॉल त्याला आला आणि - " गुड मॉर्निंग मिस्टर अमेया. हाऊ आर यु? (सुप्रभात अमेय. कसा आहेस?) " - पलीकडून कॉल आला तो त्या चॅनेलचे आशीया खंडातील कार्यक्रमांचे काम बघणारे लेस्टर बेनेट यांचा. " या! आय एम गुड. हाऊ अबाऊट यू? ( मी ठीक आहे. आपण कसे आहात?)" - अमेय " फाईन. अमेया, देयर इज अ‍ॅन न्यू असाईनमेंट फॉर यु. यु वुड लाईक ईट इन फॅक्ट! (फाईन. अमेय, तुझ्यासाठी एक नवीन काम आहे. खरी गोष्ट तर अशी आहे की ते काम तुला खुप आवडेल.) " - लेस्टर "या. टेल मी सर. आय एम रेडी. बट ऑन्ली आफ्टर संडे. लेट मी टेक सम ब्रेदिंग स्पेस ऑन संडे. (होय. चालेल. पण रविवार नंतरच. मला थोडा रविवारी आराम करु द्यात..)" - अमेय "नॉट अ‍ॅन इश्यू. टेक यूर टाईम. बट बी अवेअर दॅट, द असाईनमेंट इज इन युवर ओन कंट्री.. (चालेल. पण लक्षात घे की पुढचे तुझे काम हे तुझ्या भारतातले आहे.)" - लेस्टर ट्यूब मध्ये आता त्याला बसायला जागा मिळाली. खिडकी बाहेर बघता बघता तो बोलायला लागला. "दॅट्स ग्रेट. आय वुड डेफिनेटली लाईक टू गो देयर..( फारच छान. मी नक्कीच तेथे जाईन)" - अमेय लेस्टर पुढे म्हणाला - " यु हॅव टू गो टू द शार्वारी जंगल्स इन मध्या प्रडेश... डिटेल्स विल बी सेण्ट टु युर ईमेल आयडी ameya.a@naft.com - अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स विल बी क्रेडीटेट टू युर अकाऊंट. ऑन वेन्सडे, त्रीशा फ्रॉम मुंबई-ऑफिस अ‍ॅण्ड भार्गवी फ्रोम डेल्ही-ऑफिस विल असिस्ट यु. बेस्ट लक! बाय. (तुला मध्य प्रदेशातले शर्वरी जंगल येथे जायचे आहे. कामाबद्दलचे बारकावे, माहिती हे ईमेल द्वारे पाठवले जातील आणि अ‍ॅडव्हान्स पैसे हे तुझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येतील. बुधवारी मुंबई च्या आपल्या ऑफिसमधून त्रीशा आणि दिल्ली ऑफिस मधून भार्गवी तुला मदत करायला येतील. शुभेच्छा. बराय.)!" शर्वरी जंगल - नाव ऐकताच त्याच्या अंगावर शहारे आले. सरसरून काटे आले. आणि एका आठवणीने मन व्याकूळ झाले.... ते पाणी... तो जार्वार पर्वत. ढग दाटुन आलेले. पर्वतावर पाऊस पडत असतांना पर्वता वर त्याला दिसलेले ते दृश्य... आपल्याला तेथे जायला मिळणे हा योगायोग आहे की नियतीचा ठरवलेला डाव?... नियती.. भाग्य... असे खरेच काही असते का? आपण हे जन्मापासून मृत्युपर्यंतचे जीवन जगतो ते कसे असावे हे कोण ठरवतं? आपण स्वत: ? की दुसरंच कुणी? त्याला तशा बरेचदा भारत आणि आसपासच्या देशातील कामे मिळत होती. पण मध्य प्रदेशात त्याला प्रथमच आता पाठवण्यात येणार होते. भारतात जायला मिळाल्याने त्याला आनंद नक्कीच झाला होता. सगळ्यांची भेट होणार होती. तो - म्हणजे - अमेय आचरेकर हा एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि हौशी प्रवासी. जीममध्ये जावून जावून सिक्स पॅक अ‍ॅब्स कमावलेले. लहानपणापासून साहसी. वय वर्षे - २५. अजूनपर्यंत अविवाहित. त्याचे आई- वडील मुंबईत विले पार्ले येथे त्याच्या मोठ्या भावासह - म्हणजे अमोल सोबत राहात होते. अमेय हा जगप्रसिद्ध अमेरिकन चॅनेल - "नेचर, अनिमल्स, फुड अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स" (NAFT - नाफ्ट) मध्ये काम करत होता. नाफ्ट हे चॅनेल जगभरातील निसर्ग आणि प्राणी यांचेबाबत विविध अंगानी विचार करून त्याची माहिती लोकांसमोर आणते. तसेच विविध प्रकारची स्थळे तेथील संस्कृती, तेथील खाद्यपदार्थ याबद्दल विविध प्रकारची माहिती चोवीस तास पुरवत असते. जगभर या चॅनेलचे असंख्य चाह्ते आहेत. त्याच चॅनेलचा नुकताच जन्मलेला जुळा भाऊ - "नॅचरल ऑर सुपरनॅचरल (Natural Or Supernatural- NOS- नॉस) " हाही लोकांमध्ये लोकप्रिय होत होता. त्यांची सर्वात मोठी बहीण आरती ही लग्नानंतर यु.एस. ला सेटल्ड होती. तीचे मिस्टर एका शहरात आयटी क्षेत्रात ट्रेनर. अमोल हा विवाहीत. अमोल हा एका आयटी कंपनीत नोकरीला. त्याची पत्नी डॉक्टर सौ. आसावरी आंबेकर - आचरेकर. अमेयला लहानपणापासूनच फोटोग्राफी ची सुद्धा आवड होती. वडीलांनी दोघांना त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करण्याची मोकळीक दिली होती. त्याच्या भावाला अमोलला यु.एस. , यु. के मध्ये सेटल होण्यात एवढा रस नव्हता. पण तो एक दोन वेळा परदेशात जावून आलेला होता. वडीलांचे भाऊ अशोकराव हे मध्य प्रदेशातल्या एका छोट्याश्या खेड्यात - आसंद येथे राहात होते. त्यांची तेथे शेत्ती असल्याने आणि ती व्यवस्थित पैसा मिळवून देत असल्याने ते तेथेच असत. त्यांच्या वडीलांसोबत. ... रविवारी पुन्हा एकदा क्रुझ वरची सफर केल्यानंतर संध्याकाळी तेथील त्याची एक मैत्रीण अ‍ॅना हॉफमन हीला तो भेटायला गेला. दुसर्‍या दिवशी - सोमवारच्या दुपारच्या फ्लाईटचे तिकिट होते. रविवारी तीने त्याला घरी बोलावण्या ऐवजी त्याला वेस्टमिन्स्टर स्टेशन जवळ बोलावले. लंडन आय जवळ तीची वाट बघत तो उभा राहीला. विचारांत असतांनाच त्याचे लक्ष समोरच्या एका जोडप्याकडे गेले. ते जोडपे एकमेकांचे चुंबन घेत असतांनाच त्याला अ‍ॅनाची प्रकर्षाने आठवण व्हायला लागली आणि त्याने तीला परत फोन लावला... (भाग-2) अ‍ॅना हॉफमन. वय वर्षे २६. गोरीपान ब्रिटीश तरूणी. दिसताक्षणी कुणालाही भुरळ पडेल अशीच. अंगाने भरलेली आणि आजच्या आधुनिक जमान्यातील परफेक्ट फिगर असलेली. तीची आई भारतीय आणि वडील ब्रिटीश. अ‍ॅना लहान असतांनाच वडीलांचा मृत्यु झालेला. वडील जहाजावरील टेलीकॉम इंजिनीयर होते. आईने त्यानंतर लग्न केले नाही. एकाकीपणा दूर करण्यासाठी आणि थोडेफार पैसे मिळवण्यासाठी तीने लायब्ररीयन म्हणून जॉब पत्करला होता. अ‍ॅना एन. एच. एस्. मध्ये डॉक्टर. लंडनला असताना एकदा रिपोर्टींग करता करता अमेय जखमी झाला होता. जेव्हा त्याला अ‍ॅना कडे योगायोगाने उपचारासाठी नेण्यात आले होते, त्यावेळेस दोघांमध्ये आकर्षण निर्माण झाले होते. प्रेम बसले. एकमेकांवर. ओळख पाळख झाली. त्याने त्याच्या मॅनेजरला यु. के. मध्ये सेटल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणजे अ‍ॅनासोबत रहायला मिळेल आणि मुंबईला त्याने एक फ्लॅट घेतलेला होताच. दोघांनी लग्नानंतर यु.के. ला रहायचे की भारतात हे अजून त्यांनी ठरवले नव्हते. ती हौस म्हणून काही सिरियल आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये काम करत असे. अ‍ॅना च्या भारतीय आईशी - रोझी डिमेलो शी सुद्धा त्याची ओळख झाली होती आणि अमेय तीलाही पसंत होता. त्याच्या पसंतीला घरच्यांचा होकार मिळणार हे त्याने गृहीत धरले होते. तसे त्याने घरी स्पष्ट सांगितले नव्हते पण, थोडीशी कल्पना दिली होती. ..लंडन आय जवळ वाट बघत असतांना त्याने तीला फोन लावला. ती त्याच्या जवळपासच होती आणी पोहोचतच होती. तीला पाहाताच त्याने तीला मिठी मारली. तीचा किस घेतला. नंतर बराच वेळ तेथे स्तब्धता होती आणि ते दोघे एकमेकांकडे नुसते नि:शब्द बघत होते... भानावर आल्यानंतर ते बोलू लागले. त्यांनी पुन्हा एकदा "लंडन आय" मधून लंडन एन्जॉय करायचे ठरवले. एका काचेच्या सेल मध्ये ते बसले. लंडन शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. तो सेल अगदी हळूहळू वर चढत होता. "अ‍ॅना, मला तुला एक सांगायचे आहे!" " बोल ना, लाडक्या!" "मी तुला मागे एकदा लहानपणी भारतात भेटलेल्या एका मुलीबद्दल सांगितले होते. माझे पहिले प्रेम...त्याबद्दल मी तुला सविस्तर बोलेलो नव्हतो..पण?" "सोन्या! अरे, काही सांगायची गरज सुद्धा मी समजत नाही. मला तुझ्यावर विश्वास आहे, आणि सविस्तर मला ऐकायचे नाही. आता ते संपलं असे तूच म्हणाला होतास ना?" "हो गं. ते संपलं...पण, योगायोगाने त्याच ठीकाणी नेमके मला कामानिमित्ताने जायले मिळते आहे, त्यानिमित्तने माझ्या मागच्या सगळया आठवणी परत जाग्या झाल्यात. असं वाटतंय की ..." "हे बघ. तुला जर सांगावेसे वाटत असेल तर सांग. त्याने मन मोकळे होणार असेल तर जरूर सांग. आणि तेथे जाण्याने जर का तुला त्रास होणार असेल तर .. नकोच जावूस. नाही सांग त्यांना ..ती असाईनमेंट स्वीकारु नकोस!" "तसे नाही गं. तसे तर त्या मुलीबद्दल सत्य कळल्यानंतर मी तीला विसरलो सुद्धा होतो. पण त्या घटनेबद्दल मला असे काही तुला सांगायचे आहे., जे मी तुला आजपर्यंत सांगितले नव्हते.!" "सांग ना राजा. मी तुझीच आहे ना!" अमेय ने सांगायला सुरूवात केली. "तेव्हा मी वीस वर्षांचा असेन. ... माझ्या वडीलांचे भाऊ मिस्टर अशोक हे भारतातल्या मध्य प्रदेशातल्या एका छोट्याश्या खेड्यात - आसंद येथे राहातात. त्यांची तेथे शेत्ती असल्याने आणि ती व्यवस्थित पैसा मिळवून देत असल्याने ते तेथेच असतात. त्यांच्या वडीलांसोबत. मी एकदा सुट्टीत तेथे गेलो होतो. सोबत माझा मित्रही होता- जितिन. तेथून जवळच असलेले शर्वरी जंगल - आणि त्याजवळचा जार्वार पर्वत. नाफ्ट चॅनेलने आयोजीत केलेल्या तीन्ही जागतीक पातळीवरच्या ऑनलाईन परिक्षा मी नुकताच पास झालो होतो. टेलीफोनीक इंटरव्ह्यू ही झाला होता. माझ्यासारखे अनेक जण सिलेक्ट झाले होते. आता वेळ होती प्रत्यक्ष साहसाची. ती डॉक्युमेंटरी नव्याने सुरु झालेल्या त्या चॅनेलकडे सिलेक्शनसाठी पाठवण्यात येणार होती. त्यासाठी खुप स्पर्धक होते. ते ही वेगवेगळ्या ठीकाणांहून वेगवेगळे फिल्मस बनवून आणणार होते. या फिल्म साठी मी खुप मेहेनत घेणार होतो. सहाजिकच मी हे हक्काचे ठीकाण निवडले जेथे जास दिवस रहाता येईल्..आणि माझ्या मित्राला सहज सोबतीला म्हणून मी आणले होते. आम्ही आजोबांच्या घरापासून दूर पर्वताच्या पायथ्याशी आमचा तंबू वसवला होता. तसा आजूबाजूला धोका नव्हता. मोबाईल सोबत होतेच. कॅमेरा आणि इतर आधुनिक साहित्य होते. पण पर्वताच्या आसपास वस्ती नव्हती. सकाळी दहा वाजता तंबू बसवून पूर्ण झाला. आजचा तो दिवस साहसपूर्ण असणार होता.... " (भाग-3) त्याचे बोलणे थांबवत अ‍ॅना त्याला पुढे म्हणाली, " होय. आणि मग एके दिवशी तुझा मित्र तुझ्या सोबत त्या जंगलात आला नसताना ती तुला भेटली होती. तुम्ही दोघे दिवसभर सोबत होते. संध्याकाळी ती अचानक नाहीशी झाली, तू तीला नाव गाव काहीच विचारले नव्हते, पण ते तुझे पहिले प्रेम होते, ते तू बरेच दिवस विसरला नव्हतास आणि ती खुप सुंदर होती, दुसर्‍या दिवशी तुझा कॅमेरा गायब झाला होता. तुझी सगळी मेहेनत वाया गेली पण मग तुला दुसरीकडचा कुठलातरी व्हि. डी. ओ. शूट करावा लागला होता. नंतर या चॅनेलतर्फे तू सिलेक्ट झालास, पण तुझा तो प्रथम व्हीडीओ हा त्या जंगलातला नव्हता याचे तुला वाईट वाटते वगैरे वगैरे...बरोबर?" "हो. पण ती मुलगी तेथे आली कशी आणि ती नाहीशी कशी झाली हे मला तुला सांगायचे होते... ते सांगितले तर तुझा विश्वास बसणार नाही आणि हे तुला आत्ताच सांगावेसे मला वाटले कारण मला तेथे जाण्याचा योग पुन्हा येतो आहे..आणि.." "होय रे. पुन्हा कधीतरी सांग. ते मी कधीतरी ऐकेनच, अमेय. आता मला एक गोष्ट फक्त महत्त्वाची वाटतेय, ती म्हणजे आपण आपल्या लग्नाचे ठरवू या. आईची ही इच्छा आहे तशी. लवकरात लवकर!" "वाव. दॅट्स ग्रेट देन. इन फॅक्ट मीच तुला हे सांगायचे ठरवले होतेच. मी ही यावेळेस बोलतो घरच्यांशी. मला खात्री आहे ते अर्थातच नाही म्हणणार नाहीत." एव्हाना त्यांचा लंडन आयचा सेल सर्वात उंचावर होता. " तू एकदा का तुझी ही असाईनमेंट पूर्ण केली, की आपण पुन्हा भेटू आणि मग लग्नाचे प्लान करूया. तू तोपर्यंत घरच्यांशी बोलून घे.." - अ‍ॅना. "ओ.क्के. ठिक." - अमेय. काही वेळाने त्यांचा लंडन आय मधला "प्रवास" संपला. रात्री मार्केट मध्ये फिरून स्वत: साठी, घरच्यांसाठी आणि अ‍ॅनासाठी खरेदी केल्यानंतर झाल्यानंतर तो तीच्या आईला भेटायला गेला आणि दुसर्‍या दिवशी सोमवारी रात्री भारतात- मुंबईत घरी पोहोचला. अ‍ॅना ला त्याने पोहोचल्याचा फोन केला. दुसर्‍या दिवशी मंगळवारी त्यला जाग आली ती सकाळी अकरा वाजता. चर्चगेटला असलेल्या नाफ्ट च्या ऑफिस मध्ये रिपोर्टींग करून तो परत आला. तेथे त्रीशा ला भेटला. इतर क्रू मेंबर्स ना भेटला. बर्‍याच दिवसांनंतर त्यांना तो भेटत होता. त्रीशा सोबत ऑफिशियल बोलणे झाल्यानंतर तो सगळ्यांचा निरोप घेवून परतला. ती आणि इतर क्रू मेंबर्स त्याला शुक्रवारी जॉईन होणार होते. ईमेल मध्ये सविस्तर असाईनमेंट होतीच. घरी आल्यानंतर सगळयांसाठी केलेली खरेदी आणि चॉकलेट्स वगैरे दिल्यानंतर त्याने सर्वांसमोर अ‍ॅना शी त्याने ठरवेलेल्या लग्नाचा विषय काढला. तीचा, तीच्या आईवडीलांचा इतिहास थोडक्यात सांगितला. आधी सगळ्यांना थोडी कल्पना होतीच. फक्त आता त्यावर शिक्कामोर्तब झाले. विविध विषयांवरच्या गप्पा- गोष्टी झाल्या. जेवणं वगरे झालीत. लग्नाची तारीख वगैरे अजून ठरायची होती. त्या संदर्भात त्याने अजून अ‍ॅना आणि तीच्या आईशी चर्चा केली नव्हती. बुधवारी पहाटे त्याचा प्रवास सुरु झाला. तसे त्याला फ्लाईटचे तिकिट मिळाले असते पण त्याने ट्रेन निवडली. जस्ट फॉर एन्जॉय. तो आसंद येथे जाण्यासाठी निघाला होता. सोबत कॅमेरा, लॅपटॉप, वायरलेस इंटरनेट व इतर अनेक वस्तू असलेली पाठीवरची सॅक आणि आणखी एक कपड्यांची बॅग. त्रीशा आणि भार्गवीला त्याने कॉल करून तो आल्याचे कळवले. ट्रेनने प्रवास करत प्रवासात अ‍ॅनाचा विचार चालू होता. लग्नाचा मार्ग आता मोकळा झाला होता. अ‍ॅनाशी लग्न होणार. आवडीच्या क्षेत्रात करियर करायला मिळाले आणि तेही व्यवस्थित सुरु आहे. त्याच्या चेहेर्‍यावर समाधानयुक्त हास्याची लकेर उमटली. येथे त्याला आलेले अनुभव जरी विचित्र होते तरी एका गोष्टीमुळे त्याने हे असाईनमेंट स्वीकारले होते - "त्या" मुलीची पुन्हा भेट होईल अशी एक मनात कुठेतरी त्याला आशा होती. असा विचार हास्यास्पद होता, बालिश होता तरी त्याला तसे वाटत जरुर होते. अनाकलनीय अनुभव कुणी सहसा विसरत नाही आणि पहिले प्रेम सुद्धा. अनाकलनीय असले तरी! त्या दिवशीच्या एका दिवसात कितीतरी गोष्टी घडल्या होत्या. त्या मुली शी झालेली भेट त्याने फक्त अ‍ॅनाला सांगीतली होती. ...एवढे मोठे ब्रम्हांड. त्यात अनेक आकाशगंगा... त्यात अनेक ग्रहतारे.. आणि त्यात आपली छोटीशी पृथ्वी. त्यावरचे प्राणी आणि इतर दृश्य- अदृश्य जीव. पृथ्वीवर मानवाने वाटून घेतलेले अनेक देश. अजस्त्र ब्रम्हांडाच्या तुलनेने अगदी नगण्य असलेल्या या पृथ्वीवर असलेल्या भारतातल्या एका धावत्या ट्रेनमधला तो एक तुलनेने नगण्य जीव- अमेय. आपण म्हणतो सगळे काही आपल्या हातात असते. पण, या ब्रम्हांडात, या पृथ्वीवर, या निसर्गात अशा अनेक गूढ, चमत्कारीक, गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि आपणच बनवलेल्या विज्ञानाच्या आकलनशक्तीच्या इतक्या पलीकडच्या आहेत की त्यांचे रहस्य अजूनपर्यंत कुणालाही समजले नाही. आपण त्यापासून अनभिज्ञ आहोत. काही फार थोडे जीव फक्त अशा काही गोष्टींच्या थोडेफार जवळ जावून त्यातले रहस्य काही प्रमाणात समजून शकले आहेत. फार थोडे! ट्रेनमधल्या त्या एका डब्यात असलेल्या आणि चेहेर्‍यावर समाधानाची लकेर असणार्‍या अमेय च्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे हे त्यालाही माहिती नव्हते. माहिती नव्हते म्हणूनच तो आनंदात, मजेत होता. काकांच्या घरी पोहोचल्यावर त्याचे जंगी स्वागत झाले. जितिन ला तो येणार याची आधीपासून खबर मिळाली होती. तो आधीच त्याच्या आजोबांकडे - काकांकडे येवून बसला होता. आजोबांकडे पोहोचल्यावर सेटल वगैरे झाल्यानंतर तो त्याच दिवशी संध्याकाळी जितिनला घेवून काकांच्या जीपमध्ये भटकंती करायला निघाला. (भाग-4) जितिन शर्मा. आसंद गावतला एक सरकारी नोकर. एक वर्षापूर्वीच लग्न झालेला. ओपन जीपमध्ये मागच्या बाजूस अमेय दोन्ही हात डोक्यामागे ठेवून मस्त आकाशाकडे बघत होता आणि जितिन जीप चालवत होता. गावातल्या गल्ल्यांनधून जीप वळणे घेत घेत जात होती. जितिन - "काय मग, अमेय. काय म्हणतं लंडन आणि अंग्रेजी मेम मतलब, हमारी होनेवाली भाभी?" अमेय- " बस. सगळं ठीक. एकदम झकास. आणि कामानिमित्ताने येथे प्रथमच मी एखादी फिल्म शूट करणार आहे." जितिन- " हो ना. मागच्या वेळेस तुझा कॅमेरा नाहीसा झाला होता. " अमेय - " बरं, घरी सगळं कसं आहे? " जितिन- " बस. भगवान की कृपा से ठीक चल रहा है" इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ते गावाबाहेरच्या नदीजवळच्या रस्त्याच्या बाजूने चालत होते. आकाशात बरेचसे ढग होते. तसे त्या ढगांचा आकार कसाही असतो. ते आकारहीन असतात असे म्हटले तरी हरकत नाही. पण आकार नसला तरी तो कोणता तरी आकार असतोच की. फक्त तो आकार आपण या आधी पाहिलेल्या कोणत्याच आकारांशी मिळताजुळता नसतो, एवढेच! असे ढगांचे आकार बघायला लहानपणापासूनच अमेय ला आवडायचे. एखाद्या कॅम्प मध्ये किंवा बाहेर आउटींगला गेला असता गवतावर पडल्या पडल्या तो तास न तास आकाशातल्या या ढगांच्या अद्भुत आकारांकडे बघत बसायचा. आताही तो मस्तपैकी आकाशातल्या ढगांकडे बघत बघत जितिनशी बोलत होता. अमेय- "अरे, उद्या गुरुवारी तुला सुटी आहे का?" जितिन- "का?" अमेय- " अरे शर्वरी जंगलात आणि जार्वार पर्वताजवळ आणि आसपास मला जी फिल्म बनवायची आहे, त्यासाठी तू सुद्धा माझेसोबत चल! उद्या मला तेथे जावून सर्वे करायचा आहे, तंबू ठोकायचा आहे. काही भाग मी एकटाच शूट करणार आहे." जितिन - "ओ. सॉरी. मी उद्या नाही पण शुक्रवारी येवू शकेन. उद्या मला महत्त्वाचे काम आहे." अमेय- " पण शुक्रवारी मुंबई आणि दिल्ली ऑफिसहून टीम येणार आहेच. ओके. मी उद्या एकटाच जाईन. नो प्रोब्लेम" आकाशाकडे बघतांना त्याला एका ढगामध्ये दोन मोती चमकताहेत असे उगाच वाटून गेले. त्याने पटकन जितिनला वर बघायला सांगितले. अमेय अगदी मोठ्याने ओरडला- "जितिन, अरे ते बघ. ते चमकणारे मोती." जितिन मागे वळून दचकून म्हणाला- "चमकणारे मोती? कुठे? झाडावर? जीपखाली" अमेय- " अरे मुर्खा वर बघ. वर पटकन. ढगांत?" जितिन- "ढगांत? कुठे? थांब. मी चालवता चालवता वर बघितले तर अ‍ॅक्सीडेंट होईल" जितिने झाडाखाली गाडी थांबवली आनि वर बघितले. वर काहीच नव्हते. जितिनने वर बघायच्या आंत त्या ढगातल्या दोन मोत्यांतून डॉळे उघडल्याचा भास अमेयला झाला, ते डोळे अमेयकडे रोखून बघत होते आणि ते डोळे (की मोती?) अचानके वेगाने मिटले आणि गायब झाले. जितिन- "काय रे. झोप झाली ना व्यवस्थित? आकशात काय मोती असतात? " अमेयलाही आश्चर्य वाटले. ते डोळे गेले कुठे? तो स्तब्ध होवून वर बघत होता. जितिन म्हणाला, " अरे, चल, आता समोरच्या मारुतीच्या देवळात पायी जावून दर्शन घेवून परतूया. अंधार होत आलाय. आपण गावाच्या वेशीजवळ पोहोचलोय." अमेय- "होय. मला वाटते मला भासच झाला असावा. चल जावूया!" पण आतून तो थोडा घाबरला होता. दर्शन घेवून आल्यानंतर जीपमध्ये ते दोघे पुढेच बसले. गावाकडे परत येत असतांना सहज म्हणुन एकदा अमेयने वर पाहीले तर तो ढ्ग त्यांच्या गाडीचा पाठलाग करतोय असे त्याला वाटले. ते डोळे पुन्हा त्याचेकडॅ रोखून बघत होते. त्याने पटकन खाली पाहीले. पुन्हा वर पाहीले. वर तो ढग होता, पण ते चमकणारे डोळे नव्हते. घरी रात्री जेवण झाल्यावर त्याला लगेच झोप लागली. सकाळी नऊ वाजता जाग आली. त्याने लॅपटॉप काढले, त्यावर ईमेल चेक केले. त्याचे आजोबा सहसा वरच्या खोलीत असत कारण ते म्हातारे झाले होते. आंथरूणावरच असत. काकांशी जुजबी बोलणे झाल्यावर ते शेतावर व इतर कामासाठी निघून गेले. आज तो दिवस होता. लवकरच त्याची या जंगलातली पहीली फिल्म शूट होणार होती. खरी गोष्ट ही की, या जंगलातली ही फिल्म जगातली सर्वप्रथम फिल्म असणार होती. काकूंचा निरोप घेवून, पाठीवर सॅक घेवून तो गुरूवारी जंगलाकडे जीपने निघाला. (भाग-5) अमेय जीप घेवून निघाला. आजचा दिवस महत्त्वपूर्ण होता. त्याने रस्त्याने जातांना शूटींग करायला सुरुवात केली. अर्थात शूटींग करण्यासाठीचे परवाने व कायदेशीर बाबींची पूर्तता योग्य ठिकाणी केल्यानंतरच त्याने शूटींगला सुरुवात केली होती. कालच्याच रस्त्याने तो जीप नेत होता. गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता. सकाळचे दहा वाजले होते. नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव होता. त्यावर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता. चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आणि मग ते शर्वरी जंगल होते. जंगलाच्या सुरुवातीला काही स्थानिक लोकवस्ती होती. अन मग पुढे सुना रस्ता. वर आकाशात पाहील्यावर त्याला फक्त थोडेसेच ढग दिसले. त्यातले काही काळे आणि काही पांढरे. कालच्यासारखे ते डोळे आज काही दिसत नव्हते. काल मात्र तो खुप घाबरला होता. त्याने जितिनला फोन लावला - "जितू, येतोस का?" जितिन -"नाही ना यार. महत्त्वाचं काम आहे. उद्या नक्की येतो. तू काय एकटा चाल्ल्यायस का?" अमेय- " होय रे. जावू जरा म्हट्लं. पूर्वतयारी करूया." जितिन -" तसे भितीदायक असे काही नाही तेथे! गरज पडली तर मला फोन कर. मी कुणाला तरी मदतीला पाठवीन." अमेय -" ओके. थॅंक्स! चल बाय!" या जंगलाचे एक वैशिष्ट्य अमेयच्या लक्षात राहीले होते ते म्हणजे तीन पंखांचा एक छोटा पक्षी. स्थानिक लोक त्या पक्ष्याला नामातुआ म्हणायचे. शास्त्रीय भाषेत त्याला "एरिन्होटा टेस्कावोया" असे नाव होते. त्याला तीन पंख असतात आणि तो तुआआ तुआआ असा आवाज करत जंगलात उडत असे. जंगला जवळची लोकवस्ती संपल्यानंतर तो पक्षी उडतांना त्याला दिसला. त्याने अर्थातच लगेच त्या पक्ष्याच्या प्रत्येक हालचाली शूट केल्या. जस जसा तो जंगलात आत जात होता तसा त्या मुलीची त्याला आठवण झाली.... तो स्वत:शी हसला. बीप बीप बीप करत त्याचा मोबाईल वाजला. अ‍ॅनाचा कॉल होता. साधारण अकरा वाजले होते. तेथे लंडनमध्ये अजून सकाळी सात वाजले होते. "हाऊ आर यु, माय डियर. आय लव्ह यू" "लव्ह यु टू. आज लवकर उठलीस?" "होय रे. तुझी प्रकर्षाने आज आठवण आली, म्हणून केला फोन. कुठे आहेस. पोहचलास वाटते त्या जंगलात?" "हो. शेवटी सुरु झाली शूटींग. पण आज मी एकटाच आहे. उद्या सगळेजण जॉईन होतील मला. आता मी त्या पक्ष्याची शूटींग करतोय ज्याला तीन पंख आहेत- नामातुआ." "वाव. ग्रेट. चल बाय्. कीस यु. कॉल मी अगेन. आय वील वेट फोर योर कॉल." "या. बाय. कीस यु लॉट. बाय." अमेयचे लक्ष वर आकाशाकडे नव्हते तेव्हा एका ढगातले ते दोन डोळे त्याचा माग घेत होते. तो ढग त्याच्या मागोमाग येत होता. पण अमेयचे तिकडे लक्ष नव्हते. आतापर्यंत जीपच्या जवळ उडणारा नामातुआ गर्द झाडींमध्ये दिसेनासा झाला. तसे या जंगलात हिस्त्र प्राणी नव्हते. पण काही वेगळ्याच प्रकारचे प्राणी होते. जसे रानमांजरासारखे दिसणारे - एक वेगळेच मांजर- त्या मांजराचे डोळे अंधारात हिरवे न दिसता पिवळे दिसत. अजून तो प्राणी दृष्टीस पडला नव्हता. पूर्वी ज्या तळ्याकाठी अमेय ने तंबू ठोकला होता ते ठीकाण आले. तेथे त्याने तंबू ठोकला. जागा सेफ होती. तेथे थोडी झाडी आणि थोडे मोकळे मैदान होते. त्याच्या थोडे पुढे गेले की होता जार्वार पर्वत. त्या पर्वताचे वैषिष्ट्य म्हणजे तो पर्वत हिरवट होता. त्यावर गवत वगैरे नव्हते तर मातीचा रंग हिरवा होता. अंधारून आल्यासारखे वाटत होते. आकाशात विविध आकाराचे ढग गर्दी करत होते. सोबत आणलेल्या सर्व वस्तू जागच्या जागी सेट केल्यावर तो थोडा पहुडला. दहा मिनिटे डोळा लागल्यावर त्याला नामातुआ च्या जोरा जोरात ओरडण्याने जाग आली. पुन्हा त्या पक्ष्याची फिल्म शूट केल्यावर त्याने सोबत आणलेला टीफिन संपवला. समोरच्या तळ्यातले पाणी तसे शांत होते. तो तळ्याकडे एकटक बघत बसला. जार्वार पर्वताच्या टोकावर पाऊस पडायला सुरुवात झाली. त्याला काकांचा फोन आला, " बेटा, पाऊस सुरु झाला आहे. लवकर निघून ये घरी संध्याकाळच्या आत. बाकी तुझं शूटींग वगैरे कसं चाल्लंय?" अमेय - "ठीक आहे. व्यवस्थित. मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. बरं ठेवतो." बराचसा भाग शूटींग करून झाल्यावर दुपारी एक वाजता त्या जार्वार पर्वतावरच्या पडणार्‍या पावसाकडे तो पहात होता. ढगांतून पडणारे विविध थेंब आता एकत्र येत होते. नैसर्गिकरित्या जेव्हा पाऊस पडतो तेव्हा थेंब सरळ पडतात. आता ते अनेक थेंब एकमेकांकडे आकर्षले जावून आकाशातच अधांतरी एके ठीकाणी एकत्र येत होते. त्या अनेक थेंबाचा एक मोठा थेंब झाला. असे अनेक मोठे थेंब एकत्र आले. त्यातून मानवी डोक्याचा आकार तयार होत होता. तेच ते. पूर्वी बघितले होते तसे. तेच. तेच.... इकडे तळ्यात मानवी डोक्याच्या आकाराचे मोठे बुडबुडे आळीपाळीने डोके वर करत होते. त्याचा आवाज एवढा मोठा होता की अमेयचे तिकडे तळ्याकडे लक्ष गेले. अंधारलेले तळे आणि त्यातून मानवी डोक्याच्या आकाराचे मोठे बुडबुडे आळी पाळीने डोके वर खाली करत होते. दृश्य मोठे अद्भुत आणि भीतीदायक होते. त्या प्रत्येक डोक्यामध्ये दोन मोत्यासारखे चमकणारे डोळे होते. तिकडे पर्वतावरच्या पावसातून डोके आणि मानेपर्यंतची स्त्री- मानवाकृती तयार होत होती. मग माने पासूनचा खालचा भाग दिसायला लागला. चेहेरा अजून ओळखीचा वाटत नव्हता. पण ती आकृती खुपच सुंदर होती. पावसाच्या थेंबाथेंबांपासून हळूहळू एक स्त्री तयार होत होती. अमेय उठून उभा राहीला आणि त्या अद्भुत दृश्याकडे पाहू लागला. कॅमेरा घेवुन याची शूटींग केली पाहीजे असा विचार त्याच्या मनात आला. पण त्या दृश्याकडे पाहून तो इतका हरखला होता की डोळ्याची पापणी न लवता तो समोर बघत होता. अ‍ॅनाचा कॉल आल्याने अमेयचा तंबूतला मोबाईल वाजू लागला. (भाग-6) पावसाच्या थेंबापासून तयार होणार्‍या त्या स्त्रीचा चेहेरा तयार झालयानंतर मानेपासूनचा खालचा भाग हळूहळू तयार होत होता. मग त्या स्त्रीची पूर्ण आकृती तयार झाली. एक अद्भुत सुंदर स्त्री. यापेक्षा सुंदर स्त्री या भूतालावर असूच शकत नाही, असे वाटण्याइतकी सुंदर आकृती तेथे तयार होत होती. तीचे डोळे अजूनपर्यंत बंद होते. ती पाठमोरी होती. तीने डोळे उघडले आणि अमेयकडे बघितले. तीच् ती! त्या दिवशी भेटलेली. अमेय उठून उभा राहीला आणि त्या अद्भुत दृश्याकडे पाहू लागला. डोळ्याची पापणी न लवता तो समोर बघत होता. त्याला आठवले : "मागच्या वेळेस ती स्त्री त्याला जेव्हा प्रथम भेटली होती तेव्हा ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात असताना काही वेळ त्याला कसा गेला ते कळलेच नाही, जवळपास एखाद्या संमोहनासारख्या अवस्थेत तो होता आणि त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर नंतर पाण्याने पूर्ण ओला झालेला होता आणि ती मात्र तेथे नव्हती" अ‍ॅनाचा कॉल आल्याने वा़जणारा मोबाईल उत्तर न मिळाल्याने थोड्यावेळाने वाजणे बंद झाला. एव्हाना ते तळ्यातले वर डोके काढणारे बुडबुडे जास्त वेळा वर खाली व्हायला लागले, ते आता पूर्ण वर आले आणि पाण्यात पूर्ण उभे राहीले होते आणि आता तळ्यातल्या अंधारात उभे होते सात पाणी-सदृश्य मानव! चमकणारे डोळे असणार्‍या पाणीयुक्त मानवाकृती. ते सात पाणी-मानव होते किंवा जलजीवा. ते सातही जलजीवा एकमेकांकडे पाहून हसत होते. मग ते त्या स्त्रीकडे पाहून ओळखीचे हसले. एक जलजीवा म्हणाला: "मागच्या वेळेस आपण चुकलो आता चुकणार नाही." दुसरा जलजीवा म्हणाला: "इथपर्यंत येणे काही साधी गोष्ट नाही. किती वर्षे निघून गेलीत, तेव्हा आपण येथेपर्यंत आणि या साध्यापर्यंत पोचलो आहोत. पण आपल्यासाठी काळ, वेळ गौण आहे. काळ-वेळाच्या सीमारेषेंचे बंधन आपण कधीच तोडले आहे. आता लवकरच आपल्याला विविध ठीकाणी सावजांच्या शोधात जायचे आहे. आपण निवडलेले ते अनेक सावज." तिसरा जलजीवा म्हणाला: "आता वेळ आली आहे. सगळ्या दुनियेला आता कळेल लवकरच. आम्ही कोण आहोत ते!" ते जलजीवा एकमेकांशी बोलू लागले. नमातुआ जोराजोरात किलकिल करू लागला. तेथे मग पाच सहा नामातुआ पक्षी आले. त्या जलजीवांनी त्या पक्ष्यांवर हल्ला चढवला. तळ्यातले पाणी स्वयंस्फूर्तीने तळ्यातून वर जावून त्या पक्ष्यांच्या अवती भवती घोंगावू लागले. त्त्या पक्ष्यांच्या नाकातोंडात घुसू लागले. ते पक्षी जीवाच्या आकांताने ओरडू लागले आणि तेथून पळून गेले. एक जंगल. मध्यवर्ती ठिकाणातले तळे. संध्याकाळ. पाऊस पडतोय. अंधारलेल्या त्या तळ्यात उद्भवलेले सात जलजीवा आणि एक स्त्री जलजीवा. त्यांच्या मधोमध सापडलेला अमेय. मागच्या वेळेस तो आला होता तेव्हा फक्त तीच तेथे होती. ते तळयातले सातजण तो प्रथमच पाहात होता. ती स्त्री-जलजीवा त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत होती. अमेय ला हे दृश्य पाहून भोवळ आली. भोवळ येता येता त्याने एक नांव त्या सगळ्या जलजीवांच्या तोंडून पुसटसे ऐकले. ते नांव त्याने या आधी नक्की ऐकले होते असे त्याला वाटत होते.. पण काही समजण्याच्या आतच तो कोसळला. पण अंगात त्राण होते. तो उठून पळायला लागला. ते तळ्यातले पाणी जलजीवांच्या रुपाने आपोआप वर उडाले आणि अमेयच्या मागे मागे येवू लागले. ते पाणी अमेयच्या शरीराला वेढा घालू लागले. तो जीवाच्या आकांताने पळू लागला. पाणी पायापासून त्याच्या शरीराला वेढा घालत घालत कमरेपर्यंत येत होते. *** "व्ह्याय अमेय नॉट पिकींग अप फोन?" अ‍ॅना विचार करत होती. तीच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती. ते सांगायला तीने त्याला फोन केला होता. "कुठे गेला असेल तो? आणखी थोड्यावेळाने ट्राय करून बघते." असे म्हणून ती कार मध्ये बसली आणि तीच्या आईला जेथे अ‍ॅडमीट केले होते त्या हॉस्पीटल मध्ये ती जायला निघाली. आई बेशुद्धावस्थेत होती. तीला अचानक भोवळ आली होती. त्यानंतर तीला दवाखान्यात अ‍ॅडमीट केले होते. संध्याकाळी तीने पुन्हा अमेयला कॉल केला पण कुणी उचलत नव्हतं. *** संध्याकाळी सहा वाजता काकूंना चिंतेत पाहून अशोकराव म्हणाले, "काय ग? काय झाले? अहो अमेयचा नंबर लागत नाही आणि तुम्हाला फोन करत होते तर तुमचा नंबय सतत बिझी येतोय. " अशोकराव - " काय? म्हणजे अजून अमेय घरी आला नाही? मी तर त्याला फोन केला होता, पावसाचं लवकर निघण्यासाठी... अजून आला कसा नाही?" तेवढ्यात अशोकरावांच्या मोबाईलवर कॉल आला. मुंबईहून. अरविंद म्हणजे अमेयचे वडील यांचा. अरविंद- "अमेय ला कॉल केला तो उचलत नाही म्हणून तुम्हाला केला. कुठे आहे तो?" अशोक - "अरे मी आता बाहेरून येतोय. अमेय अजून आला नाही. मी ही त्याला लवकर निघून येण्यास सांगितले होते, पण अजूनपर्यंत तो आला नाही. मी जातोय त्याला आता बघायला. माझ्या सोबत काही जणांना घेवून जातो" अरविंद- "काय? मला वाटते तो आज एकटा होता. त्याची टीम उद्या येणार होती. त्याचा मित्र जितिन? तो नाही का गेला त्याचेबरोबर आज?" अशोक - "तसा काही धोका नाही आहे तेथे, पण ... मी आता जातो आणि कळवतो. तू निश्चिंत रहा." अशोकराव त्यांची मोटारसायकल घेवून जंगला कडे निघाले. "अगं! मी येतो. असेल कुठेतरी. कदाचीत तो रस्त्याने परत यत असेल आणि मोबाईल कुठे विसरला असेल. मी बघतो." असे म्हणत आणि रेनेकोट अंगावर चढवत त्यांनी आपली मोटारसायकल सुरु केली. त्यांनी सोबत टॉर्च घेतला होता. तो जार्वार पर्वताच्या पायथ्याशी गेला असेल याची त्यांना कल्पना होती. पाऊस थोडा थोडा पडत होताच. त्यांनी शेतातला गडी धोंडू याला ही सोबत घेतले होते. गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता. संध्याकाळचे सहा वाजले होते. नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव आला. मग वर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता. चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आला आणि मग ते शर्वरी जंगल होते. स्थानिक लोकवस्ती होती. त्यांच्या झोपड्यांत अंधुक प्रकाश येत होता अन मग पुढे सुना कच्चा रस्ता. कच्च्या रस्त्यावर पावसात गाडीचा प्रकाशझोत पडत होता. नामातुआ जोरात ओरडत यांच्या गाडीच्या मागे येत होता. एव्हाना जितिनलाही ही खबर काकूंकडून कळली आणि तोही अशोकरावांच्या गाडी मागोमाग मोटारसायकलवरून आला. *** दिल्ली आणि मुंबईहून आलेली टीम आसंद जवळच्या एका शहरातल्या हॉटेलमध्ये सात वाजता येवून थांबली होती. त्यात त्रीशा आणि भार्गवी दोन्ही होत्या. त्यांनी आल्यावर सेटल झाल्यावर अमेयला कॉल केला. पलीकडून अमेयचा फोन उचलला गेला. (भाग-7) दिल्ली आणि मुंबईहून आलेली टीम आसंद जवळच्या एका शहरातल्या हॉटेलमध्ये सात वाजता येवून थांबली होती. त्यात त्रीशा आणि भार्गवी दोन्ही होत्या. त्यांनी आल्यावर सेटल झाल्यावर अमेयला कॉल केला. पलीकडून अमेयचा फोन उचलला गेला आणि तो उचलला होता अशोकरावांनी. त्या जंगलाच्या मध्यभागी तळ्याच्या जवळ भर पावसात अमेयला शोधून शोधून थकलेले अशोकराव, जितिन आणि धोंडू हे तिघे उभे होते. शेवटी जवळपास मोबाईलची बीप बीप ऐकू आल्याने त्यांना अमेयचा मोबाईल सापडला आणि त्यांनी तो उचलला. पण, बॅटरी फारच थोडी उरली होती. अशोकराव- "हॅलो! कोण?" भार्गवी- "हाय.. अमेय?... मै भार्गवी बोल रही हू... नाफ्ट चॅनेल की टीम से." अशोकराव- "अरे. ओके. मला तुम्हाला हे सांगायला थोडं अवघडल्यासारखं होतय की, अमेय हरवलाय, जंगलातून गायब झालाय. आम्ही त्याला शोधतोय." सांगतांना अशोकरावंचा आवाज थरथरत होता. कॉल अचानक कट झाला. कारण मोबाईलमधली बॅटरी संपली होती. भार्गवीने आपल्या टीमला हा निरोप दिला. ती ही हादरली होती. पण बोलता बोलता अचानक कॉल कट झाल्याने त्यातले बारकावे तीला कळले नाहीत. भार्गवी- "पण, अमेय ऐसे कैसे गायब हो सकता ऐ, समझ नही आ रहा है!" त्रीशा- "आपण, लेस्टर बेनेटला कॉल करूयात का? की आधी वस्तुस्थिती जाणून घेतल्या नंतरच काय ते ठरवायचे?" टीम बराच वेळ चर्चा करत होती. जर अमेय खरंच हरवला असेल तर शूटींग पुढे करायची की परत जायचे की आणखी काही? त्यांनी प्रथम वस्तुस्थिती जाणून मगच लेस्टर बेनेटला दुसर्‍या दिवशी कॉल करायचे ठरवले. शूटींगचा स्पॉट आणि इतर माहिती या टीमला ही होतीच. पण, अमेयवीना ही शूटींग? शक्य नव्हते. अमेय ची शूटईंग करतांनाची स्टाईल, त्याची बोलण्याची लकब आणि तो स्वतः हे अगदी लोकप्रिय होते. अमेयच्या या आणि इतर अनेक वैशिष्ट्यांमुळेच त्याहे व्हिडीओज खुप लोकप्रिय झाले होते. बरेच लोक फक्त तो एखाद्या व्हिडीओत अ‍ॅन्कर आहे म्हणून फक्त त्याची डॉक्युमेंटरी वगैरे बघायचे. भार्गवी -"अरे त्रीशा, एक मिनीट! अमेय के काका के घर चलते है हम सब.... किसी के पास उनका अ‍ॅड्रेस तो जरूर होगा?" त्रीशा- "लेकीन, अब यहासे बस मिलेगी क्या हमें?" टीम मधील एक जण राहुल म्हणाला- " मै नीचे जाकर पूछ्ताछ करके आता हू, वरना कल चलेंगे...!" **** इकडे अ‍ॅनाची आई बेशुद्धावस्थेत होती. तीला अचानक भोवळ आलेली होती आणि त्यानंतर तीला मोठ्या हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट केले गेले होते. तीने एन. एच. एस. मधून पूर्ण सुटी घेतली होती आणि तीची आई दाखल असलेल्या हॉस्पीटलमध्ये ती आली होती. संध्याकाळी मुख्य डॉक्टर नुकतेच आले होते आणि ते तीच्या आईला चेक करायला आतमध्ये गेले होते. डॉक्टरांच्या येण्याची वाट बघत ती बाहेर बेंचवर बसली होती. तीच्या सोबत मदतीला म्हणून बाजूच्याच रस्त्यापलीकडे राहाणार्‍या तीच्या एका मित्रास - जेफ ट्रेल यास ती घेवून आली होती. ते दोघे स्कूलमध्ये सोबत शिकले होते. तो संध्याकाळी मदत लागल्यास पुन्हा येणार होताच. ....आता संध्याकाळी तीने पुन्हा अमेयला कॉल केला पण कुणी उचलत नव्हतं. नंतर पुन्हा कॉल लावल्यानंतर मोबाईल स्वीच ऑफ येत होता. तीने त्याला कॉल करण्याचा नाद तात्पुरता सोडून दिला. पुन्हा तीला रडू यायला आले. शक्यतो तीची आई वाचणार नव्हतीच. पण तीला आशा होतीच! पण डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी तो निरोप सांगितला. डॉक्टर- "मिस अ‍ॅना, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी टू से... युवर मदर हॅज ऑन्ली टूमॉरोज टाईम. शी इज नाऊ कॉन्शस अ‍ॅण्ड कॅन स्पीक.. ती आता शुद्धीवर आहे आणि, तीच्या जवळ फक्त उद्याचा दिवस आहे. तीला तू घरी घेवून जावू शकतेस. तू स्वतः डॉक्टर असल्याने तुला माहिती आहे की हा आजार किती तीव्र आणि असाध्य आहे... मी माझ्या परीने प्रयत्न केले..." अ‍ॅनाला रडू कोसळले आणि तीला प्रकर्षाने अमेयची आठवण आली. पण फोन लागत बव्हता. काय झाले याला? आज दुपारनंतर त्याने फोन का केला नाही? त्याचा फोन का लागत नाही आहे? तेवढ्यात कारने जेफ आला आणि रडणार्‍या अ‍ॅनाला पाहून त्याच्याही पोटात गोळा आला आणि त्याला पुढची धोक्याची सूचना आपोआप समजली. डॉक्टर ने त्यालासुद्धा समजावून सांगितले आणि अ‍ॅनाला आधार देण्यास सांगितले. मग ते तीघे हॉस्पीटलच्या अँम्ब्युलन्स ने अ‍ॅनाच्या घरी आले. प्रवासात आई निश्चल पडून होती आणि अ‍ॅना सारखी रडत होती. घरी बेडवर आईला व्यवस्थीत झोपवल्यानंतर अँम्ब्युलन्स आणि इतर कर्मचारी सूचना देवून निघून गेली..... जेफ- "रात्री मी थांबू का मदतीला?" अ‍ॅना- " यस, प्लीज. थॅन्क्स! तू खालच्या हॉलमध्ये झोपू शकतोस.. खरंच प्लीज थांब आजच्या रात्री... आईला काही त्रास झाला तर तुझी फार मोलाची मदत होईल." जेफ- "आय वील ब्रीग यु अ सॅण्डविच ऑर समथिंग..?" अ‍ॅना- "नो आय एम फाईन" जेफ- "काहीतरी खावून घे. अशाने तब्येत बिघडेल. मी आणतो. तोपर्यंत आईशी बोल् टिची काळजी घे...तीला काही बोलायचे असेल! चल येतो." जेफ कारने बाहेर निघून गेला. अ‍ॅना ने पुन्हा अमेयला फोन लावला पण व्यर्थ. मग तीला अचानक आठवलं की त्याचा मुंबईचा पत्ता आणि त्याच्या भावाचा अमोलचा नंबर तीने एकदा कुठेतरी लिहून घेतला होता. तो शोधायला ती टेबलाकडे वळताच तीला आईने हाक मारली. आई- "अ‍ॅना.. इकडे ये.. मला तुला काहीतरी सांगायचंय!" अ‍ॅना ला हुंदका आवरला गेला नाही- "आई... सांग ना" आई- "अमेय ला फोन केला होतास? " अ‍ॅना- "नाही... फोन लागत नाही आहे." आई- "माझी शेवटच्या दोन इच्छा आहेत: एक म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न करावे आणि दुसरी म्हणजे तुझ्या बाबांच्या काही गोष्टी मला तुला आताच सांगायच्या आहेत." अ‍ॅना- "तसंच होईल आई. सांग कोणत्या गोष्टी आहेत त्या?" आई- "माझा लॅपटॉप ऑन कर!" अ‍ॅना ने लॅपटॉप ऑन केला. विंडोज सुरू झाले. टास्क बार आणि स्टार्ट मेनू दिसयला लागला. आई- "डी ड्राईव्ह मध्ये माझी एक एक्सेल फाईल आहे, ती पासवर्डनेच ओपन होते. त्यात माझे सगळे ईमेल आणि बँकेचे पासवर्ड आहेत..." अ‍ॅना- "ममा... ते ठीक आहे. या पैशांच्या गोष्टी आता इतक्या महत्त्वाच्या नाहीत...." आई- "मी काय म्हणते ते पुढे ऐक्....त्या फाईलमध्ये तुझ्या वडीलांच्या अनेक सिडीज ओपन करण्याचे पासवर्ड्स लिहिलेले आहेत. ते फक्त तुलाच देण्याचे मला त्यांनी सांगितले होते... त्या सीडींमध्ये बरीच रहस्ये आहेत...." आई पुढे म्हणाली- "त्या सिडीं मध्ये बरीच रहस्य आणि माहिती आहे. ती मी तुला सगळी आता सांगू शकत नाही. पण, त्यातली कोणती माहीती जगजाहीर करायची आणि कोणती नाही हे सगळं त्यात लिहिलं आहे. ते पाळ!!! तुला माहीतीच आहे की तुझे वडील जहाजावर इंजिनियर होते. तू बरीच लहान असतांना ते वारले...झाली का ओपन फाईल" अ‍ॅना- "ठीक आहे आई. सांग तुझ्या एक्सेल फाईलचा पासवर्ड.." आईच्या त्या फाईलचा पासवर्ड म्हणजे वडीलांच्या नावाचा होता. ऑर्थर हॉफमन. पासवर्ड टाकताच फाईल ओपन झाली. सहज फाईलवर नजर टाकताच त्यात अनेक पुस्तकांबद्दल माहिती होती...अनेक सीडींची माहिती, त्यातल्या फाईल्स त्यांचे पासवर्ड व इतर अशी अनेक प्रकारची माहिती होती. त्यात लिहीलेल्या प्रत्येक फाईलचा प्रत्येक पासवर्ड एकाच शब्दाने बनलेला होता पण फक्त त्यात नंबर्स वेगवेगळे होते. तो पासवर्ड होता- "डेव्हिल्स स्क्वेअर"!! (DEVIL'S SQUARE) (भाग-8) त्या मुख्य एक्सेल फाईलचा पासवर्ड तीच्या वडीलांच्या नावाचा होता पण फक्त स्पेलींगमध्ये थोडा फेरफार केलेला होता तो आईने तीला सांगितला होताच! फक्त चकीत करणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या फाईलमध्ये ज्या इतर सिडीजची, तारखेवार विविध प्रकारच्या फाईलसची जी लीस्ट होती, त्यांचे पासवर्ड समोरच्या कॉलममध्ये लिहिले होतेच पण प्रत्येक फाईलचा पासवर्ड डेव्हील्स स्क्वेअर या शब्दानेच बनलेला होता आणि फक्त त्यात विविध अंकांची योजना केली होती. आणखी वरच्या बाजूला एक बारीक सूचना लिहीली होती, की हे जे लिहीलेले पासवर्ड्स होते त्यांच्या अंकात अजून काहितरी एक ठरावीक बदल करायचा आणि मगच तो पासवर्ड व्हॅलीडेट (प्रमाणीत) झाला असता. आणि काय फेरफार करायचा हे पुन्हा एका फाईलमध्ये लिहिले होते आणि ती फाईल कशी ओपन करायची याबद्दलही काही सूचना होत्या. "सगळे काही विस्मयकारक आहे, आश्चर्यजनक आणि अविश्वसनीय आहे", अ‍ॅना विचार करत होती. "ठीक आहे, आणखी काही आहे की फक्त हेच आहे जे तुला सांगायचे होते?" अ‍ॅना आईला म्हणाली. "नाही लाडके, एवढीच एक फाईल दाखवायची होती", आईचा श्वास थोडा गुदमरल्यासारखा वाटत होता. "बंद कर ती फाईल आणि शट डाऊन कर..." अ‍ॅना म्हणाली, "ओ.के. नंतर मी बघेन सगळं! आता मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे." असे म्हणत तीने विन्डोज शट डाऊन केले. पण जसा कॉम्प्युटर आणि विंडोज शट डाऊन केल्यावर पुन्हा स्टार्ट करता येतात तसे मानवी जन्म शट डाऊन केल्यावर नंतर पुन्हा स्टार्ट करता येत नाही, किमान आपल्या हाती तरी ते नसतं. मानवी आयुष्य शट डाऊन करणं आपल्या हातात नसतं. ते या पृथ्वीला चालवणारा कुणीतरी प्रोग्रामर असतो की आणखी कुणीतरी, त्याच्या हातात असते. मानवी जन्म शट डाऊन झाल्यावर पुडे काय होते? हे आजपर्यंत कुणालाही कळलं नाही. पण, नक्की काहीतरी होत असावं. कारण, शरीर जरी नष्ट होत असलं तरी त्यात असलेल्या मेंदूंमधले विचार? त्यांचं अस्तित्त्व नेमकं शरिरात कसं, कुठे असतं (आपण मानतो की ते मेंदूत असतं), मृत्यू सोबत शरीराबरोबर ते विचारही नष्ट होतात? नाही! विचारांना वस्तुमान नसतं. विचार ही एक उर्जा असते का? आणि उर्जा नष्ट केली जाऊ शकत नाही, फक्त उर्जेचे रुपांतर होवू शकते. कशात होते रूपांतर या सगळ्या विचारांचे, विचारांना उर्जा मानले तर?? रोझी डिमेलो- हॉफमन चे आयुष्य शट डाऊन झाले होते. इकडे कॉम्प्युटर आणि तिकडे अ‍ॅनाच्या आईचे जीवन. अ‍ॅनाचे लक्ष मॉनिटरकडून उजवीकडे हातात सॅण्डविच असलेल्या आणि डोळ्यातून अश्रू गाळत असलेल्या जेफकडे गेले. आणि तीने गर्रकन मागे वळून बघितले. आताच आपल्याशी बोलत असलेली आई अशी अचानक निघून गेली? निदान डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे उद्यापर्यंत तरी तीचा सहवास लाभला असता. पण, ती तीच्या शेवटच्या इच्छा सांगू शकली हे महत्त्वाचे होतेच. अमेय? कुठे आहेस तू? आई आता या जगात नसल्याने तीला रडू कोसळले. जेफने तीला आधार दिला. मनातल्या तीव्र भावनेतून निर्माण झालेला तो अ‍ॅनाच्या डोळ्यातला अश्रू!! अ‍ॅनाच्या नाजुक, सुंदर गालावरून ओघळत जाणारा तो तीव्र भावनेचा अश्रू!! त्या अश्रू सारखेच असलेले दोन मोत्यासारखे भितीदायक डोळे त्या जंगलातल्या तळ्याजवळून घरी परतणार्‍या अशोकराव, जितिन आणि धोंडू यांचे कडे रोखून पाहात होते. त्या तिघांना त्याची अर्थातच कल्पना नव्हती. अमेयचा फक्त मोबाईल त्यांना सापड्ला. बाकी कॅमेरा आणि इतर वस्तू गायब होत्या. बॅग ही कुठे सापडत नव्हती. जंगलात नामातुआंची अखंड किलकिल सुरूच होती. नेहेमी पेक्षा त्यांच्या ओरडण्याला आज एक विचित्र अशी मिती होती.अमेयचा शोध न लागल्यामुळे ते तिघे घाबरले होते, काळजी करत होते. ते भर पावसात बाईकवर परत येत असतांना त्या जंगलातल्या मध्यभागी असलेल्या जार्वार पर्वतावर उभी असलेली अद्वीतीय सुंदर स्त्री पावसाच्या पाण्यात हसत हसत विरघळत होती. विरघळून ती पर्वताच्या टोकाशी जात होती. इतर पावसाचे पाणी पर्वतावरून खाली कोसळत होते, पण "ते" पाणी, पर्वताच्या पायथ्यापासून वरच्या दिशेने चढत होते. असे अनेक जलजीवा पाणी रुपात पर्वताच्या टोकाकडे उलट वाहात जात होते. दॄश्य मोठे अदभुत होते. रस्त्यावरून परत येत असतांना एक वीज कडाडली आणि त्या विजेच्या प्रकाशात आकाशात अनेक मोत्यासारखे डोळे पापणी न लवता पॄथ्वीवर बघतांना दिसत होते. पाऊस सुरु असतांना खिडकीतून कडाडल्या वीजेकडे सहज म्हणून बघतांना अ‍ॅनाला त्या वीजेच्या प्रकाशात आकाशात अनेक डोळे पापणी न लवता पॄथ्वीवर बघतांना दिसत होते. एव्हाना तीला अमोलला कॉल केल्यावर अमेयच्या गायब होण्याची बातमी समजली होती आणि तीच्या साठी हा दुसरा धक्का होता. अरविंद आणि अमोल वगैरे सगळ्यांना बातमी समजलेली होती. सगळ्यांनी आपापल्या परीने तपास करायला सुरूवात केली होती. अशोकरावांचे मित्र असलेले पोलीस सुद्धा सत्य परिस्थिती समजावीन घेवून तपस करण्याचे ठरवून, विविध प्रश्न विचारून निघून गेले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी टीव्ही टीम सुद्धा अशोकरावांकडे येवून पोहोचली होती. यापूर्वी जगातल्या विविध अशा अनोळखी आणि दुर्गम पर्वतात, जंगलात कधी एकट्याने तर कधी टिमसोबत कितीतरी वेळा अमेयने शूटींग केली होती, पाण्याखाली सुद्धा त्याने बरेच व्हीडीओज शूट केले होते. पण स्वतःच्या काकांच्या गावी ओळखीच्या अशा ठीकाणी अमेय अचानक नाहीसा कसा झाला? तशा व्यक्ती रहस्यमयपणे नाहीश्या होणाच्या अनेक घटना आतापर्यंत जगात विविध ठिकाणी घडल्या आहेत आणि त्या व्यक्तीचा नंतर कसलाच ठावठीकाणा, थांगपत्ता लागला नाही. पण, काही बाबतीत गायब होणारी व्यक्ती ही एक्तीच असायची. त्या व्यक्तीसोबत काय घडले हे त्यामुळे कुणालच कळत नव्हते. अमेयचा कॅमेरा सुद्धा गायब होता. त्यामुळे काय झाले हे इतरांना कळायला काही मार्ग नव्हता. जंगलात हिस्र प्राणी नव्हते. फक्त रानमांजरासारखे दिसणारे काहीतरी त्या जंगलात राहात होते, पण त्यापासून तसा धोका नव्हता. लेस्टर बेनेट ला परिस्थीती समजावून सांगितल्या नंतर त्यांनी शूटींग रद्द करायचे ठरवले आणि टीम आपापल्या स्टुडीओत परत गेली. रोझी डीमेलो चे तसे कुणी फारसे नातेवाईक भारतात नव्हते. जे होते त्यांना अ‍ॅनाने बातमी कळवली. ऑर्थर चा एकमेव भाऊ होता तोही राहात होता ऑस्ट्रेलीयात आणि इतर काही नावापुरते दूरचे नातेवाईक होते. त्याला ही बातमी अ‍ॅनाने कळवली होतीच. रविवारी दुपारी जड डोळ्यांनी अ‍ॅना ने लॅपटॉप काढला. ती फाईल ओपन केली. कसलाही पासवर्ड न टाकता ओपन होवू शकणार्‍या फाईलही त्यात खुप होत्या. त्यात विविध प्रकारची माहिती होती. आतापर्यंत अ‍ॅनाला वडीलांच्या या जॉबबद्दल जास्त काही माहिती नव्हते. आईकडूनचे जे काय ते तीने ऐकले होते. या लॅपटॉपबद्दल सुद्धा तीला आताच माहिती झाले होते. जहाजावरच्या जीवनावरच्या काही नोंदी असलेली पासवर्ड असलेली एक फाईल तीने ओपन केली. त्या फाईलमध्ये तीच्या वडीलांनी लिहिलेली डेव्हिल्स स्क्वेअर बद्दलची माहिती होती. फाईल बरीच मोठी होती. तीने वाचायला सुरुवात केली: "साऊथ अटलांटीक ओशन जवळच्या "साऊथ जॉर्जिया" या यु.के. च्या अधिपत्याखाली असलेल्या बेटाच्या थोडे खाली दक्षिणेकडे गेले असता एक चौकोनी आकाराचे बेट आहे. ते बेट आणि त्याच्या आसपासचा भाग मिळून डेव्हिल्स स्क्वेअर म्हणून ओळखले जाते. तसे त्या बेटाचे नाव कागदोपत्री - जॉर्जियन स्क्वेअर आयलॅण्ड असे आहे. त्या बेटावर जंगल आणि मोठमोठे पहाड आहेत. त्या पहाडांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील मातीचा रंग हिरवा आहे. हे बेट तसे सर्वज्ञात नाही. फार थोड्या लोकांना याबद्दल माहिती आहे. त्या बेटाच्या आजूबाजूला अनेक छोटीछोटी बेटे आहेत. असे म्हणतात की काही बेटांवर समुद्री चाचे वास्तव करून असतात. डेव्हिल्स स्क्वेअर हे बेट मोठे चमत्कारीक आहे. त्या बेटाबद्दल आणि आसपासच्या समुद्रा बद्दल अनेकांना वेगेवेगळे चमत्कारीक आणि भीतीदायक अनुभव आले आहेत!!! मी जहाजावर असतांना त्याबद्दलच्या, त्यावर वास्तव्य करून असलेल्या चाच्यांबद्दलच्या अनेक कथा ऐकायचो. तेथे खरोखरीच चाचे होते की नाही माहीत नाही पण, तेथे जाण्यार्‍या जहाजांवर चाचे अनेकदा हला करत हे नक्की! ते चाचे कोठून येत, कोठे जात कुणाला नीट सांगता येत नाही.... पण ते येत. अचानक येत. बरोबर त्यांना जहाज येण्याचा सुगावा लागे आणि ते जहाजावर दाखल होत. त्यांच्या ग्रुपमध्ये एक स्त्रीही असायची. मोठी सुंदर, मादक आणि अद्भुत स्त्री असायची ती..... तो प्रसंग माझ्या चांगलाच आठवणीत आहे.... एकदा माझी नियुक्ती लंडनहून साऊथ जॉर्जिया कडे जाणार्‍या जहाजावर होती. जहाजावर असलेल्या अनेक टेलीकॉम इंजिनियर्स पैकी मी एक होतो. आमच्या तीन शिफ्ट मध्ये ड्युटीज असायच्या. कामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळात मी आमच्या स्पेशल रुममध्ये महत्त्वाचे प्रसंग फाईल्स मध्ये लिहायचो. मला जलप्रवास खुप आवडतो. माझ्या सोबत मी माझा लॅपटॉप नेहेमी बाळगतो. महत्त्वाच्या नोंदी करण्यासाठी....पण बरेचदा घरी आल्यानंतरच घडलेले प्रसंग मी लिहीतो. ... जहाज साऊथ जॉर्जिया कडे जात होते. हाडे गोठवून टाकणारी थंडी. सगळे काही सुरळीत चालले होते. रात्र झाली. त्या रात्री माझी ड्युटी होती.."

वाचने 1645 वाचनखूण प्रतिक्रिया 1

आत्मशून्य 07/03/2011 - 15:10
तसच वेग सतत साधला गेलेला नाहीये. आणी शेवट तर आजीबात वीस्तृत नाहीये. काही तरी राहून गेलंय अस वाटते. अवांतर - आता अशी भाषाशैली बघून मी ज्योतीषीतर नाहीना अशी शंका काढू नये.