मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वगत (निवासी ) आईचे.

रामदास · · जनातलं, मनातलं
परवा रात्री येताना माझ्यासाठी एक छोटसं पान बान्धून आणलं तेव्हांच माझ्या लक्षात आलं की बातमीचा सुगावा लागलेला दिसतोय्.मी पण वाट पहात होते कधी तोंड उघडून बोलतायेत त्याची.माणसाला थोडी तरी शिक्षा हवीच.यांचा एकमात्र सलग दुवा म्हणजे बँक वाला जोशी. जोशीणीला कळलं असणार ह्त्तंगडीच्या मोलकरणीकडून्.आता चार दिवस पान फुकट खायला जोशी बँकेचा जमाख्रर्च पण घडघडा वाचून दाखवेल गं. आल्याआल्या काही बोलले नाहीत.आधीच चार दिवस छळवाद मांडला होता.दिवसभर एकचं गाणं चालू होतं सैंया सैंया.ते पुरलं नाही तर पेटी काढून बसले. हव्या त्या पट्ट्या सापडेनात .दुप्पारभर हा संताप.आजकाल मी पण लक्ष घालत नाही.पण दुपारी झोप नाही. थोडा डोळा लागला तर चार वाजले. चहा-चहा म्हणून भूणभूण सुरु. तुझी आज्जी आणि हे माझ्या झोपेचे कायमचे शत्रू.जाउ दे मी भलतचं काहीतरी सांगत बसलेयं. रात्री दिवे मालवल्यावर हळूच विचारतायेत शर्वरीला मुलगा झाला तुला कळलं का? मी पण मुद्दाम रडवेल्या आवाजात म्हंटल मला काही सांगू नका . चार वर्षं पोरीचं तोंड पाहील नाहीत मुलांशी संबंध तोडलेत आणि आता मला सांगताय. एवढं बोलल्यावर मात्र मला खरोखरीच रडायला आलं.यांचं हे एक बरं आहे. दिवे मालवल्यावर सगळे कबुलीजबाब मुकाट देतात.(मला उगाचचं असं वाटतं की सगळ्या पुरुषांना उजेडाची भिती वाटते आपला उणेपणा कबूल करण्यासाठी )आपली वाट बघण्याची तयारी हवी. सगळं काही आपोआप सुरळीत होत. छे बाई मी पण आजकाल आज्जी सारखी भरकटतेयं. तर काय सांगायचं काय.... मला म्हणतात कसे जाउ दे .. रडू नकोस.. तू जा अमेरीकेला. मुलगा सहा महिन्याचा होस्तो थांब. मी राहतो इथे , मनी कडे कोण बघणार? ...(जशी मनीच्या बाळंतपणाची उस्तवार हे करणार..) आता मला अंदाज आला की हे निमंत्रणाची वाट बघतायत्.(सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं.) मी हुशारीनी रडं आवरलं . खरोखरीच वाईट वाटतंय का याचा अंदाज घेतला, आणि म्हटलं एकदा फोन तरी करा जावयाला आणि मुलीला. तर म्हण्तात कसे मी काही त्या मद्राशाशी बोलणार नाही. त्यानी करावा मला फोन.( मला अगदी मनातून खदखदून हसावसं वाटत होतं ) पण यांचा भरवसा काय गं.पंताच्या राज्यात घटकेत सौभाग्यवती .. तर घटकेत गंगाभारती.पण मग धीराने शेवटचा पत्ता टाकला आणि म्हंटल त्यानी फोन केला तर याल का माझ्यासोबत? पटकन उठून बसले. म्हणले ठिक आहे येईन पण एका अटीवर. (माझ्या पोटात परत गोळा आला.) अगं एवढी वर्ष झाली लग्नाला पण अंदाज चूकतो कधी कधी. आता कसली अट? मी ये ईन पण राहीन नाडकर्णीकडे. (हत्तगंडीचा जावई) मी म्हटलं अमेरीका म्हणजे आपली अहमद सेलरची चाळ वाटली का हो ? उतरला दादरला की चालले दोन नंबरमधे.(शरू ,विट आणला होता गं पाहुण्यांनी तिथे) मग काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळानी कबूल झाले.(अगदी ठरल्याप्रमाणे सगळं चाललं होतं) *********************************************************************

वाचन 8016 प्रतिक्रिया 0