मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्लाईट ९

निनाद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
फ्लाईट ९ १९८२ सालचा २४ जूनचा दिवस. ब्रिटिश एयरवेजचे फ्लाईट ९ लंडन च्या हीथ्रो विमानतळावरून निघाले होते. ही फ्लाईट मुंबई, चेन्नई, कौलालम्पूर, पर्थ अशा मार्गे मेलबर्नला जायची होती. हे एक बोईंगचे ७४७ जातीचे विमान होते. चार इंजिने असलेले हे भले मोठे विमान ब्रिटिश एयरवेजच्या ताफ्यात अनेक वर्षांपासून होते. फ्लाईट उत्तमरित्या चालली होती. विमान निरनिराळ्या ठिकाणी थांबत प्रवासी उतरवत घेत होते. आता विमानाने भारतीय उपखंड जवळपास सोडला होता. आता भारतीय समुद्रावरून मलेशिया इंडोनेशिया या मार्गावरून मार्गक्रमण सुरू झाले. रॉजर ग्रिव्हज हा अतिशय अनुभवी इंजिनियर आणि एरिक मूडी हा पायलट विमानाचे सारथ्य घेऊन बसला होता. सोबत बॅरी फ्रीमन हा सिनियर इंजिनियर ऑफिसर होता. रडारचा पडदा सर्वकाही आलबेल असल्याचे दर्शवत होता. हवामान उत्तम आणि निर्वेध आहे असे कळवण्यात आल्याने पायलटही निवांत होते. गपाटप्पा आणि मस्करी अशी मस्त फ्लाईट चालली होती. मूडी ने अकरा हजार मिटर्सची उंची गाठल्यावर विमान ऑटॉपायलटवर टाकले. लघवीला जाण्यासाठी म्हणून टॉयलेटमध्ये गेला. आत गेल्यावर त्याला काहीतरी जळते आहे की काय असा वास आला. म्हणून त्याने तेथे शोधाशोध केली पण त्याला तसे काही आढळले नाही. काहीवेळा काही मूर्ख प्रवासी त्यांच्या जळत्या सिगारेटी भलतीकडे टाकून असले प्रकार घडवत, हे त्याला माहिती होते. तरीही त्याने कॉकपीट मध्ये येऊन त्याच्या क्रू ला सर्व टॉयलेट निट पाहून यायला सांगितले. याच वेळी काही प्रवाश्यांना विमानात धूर येत आहे असे वाटत होते. पण कदाचित हा धूर विमानात सुरु असणार्‍या धूम्रपानामुळे असावा असा समज त्यांनी करून घेतला होता. त्याकाळी विमानात धूम्रपानास परवानगी होती. कॉकपीटमध्ये पायलटस वेगळ्याच प्रसंगात होते. त्यांना त्यांच्या काचेवर समोरून ठिणग्यांचा एक प्रवाहच विमानावर आदळतांना दिसत होता. रॉजर ने परत परत रडार पाहिली पण त्यावर काहीच वेगळे दिसत नव्हते. एयर ट्रॅफिकनेही सांगितले की मार्ग निर्वेध आहे. बॅरीला संशय आला की ही सेंट एल्मोची आग तर नव्हे? सेंट एल्मोच्या आगीत हवेतील प्लाझ्मा वातावरणातील विजेमुळे प्रज्वलीत झाल्यासारखा दिसतो. या नीळसर रंगाच्या दीप्तीमान कणांना सेंट एल्मोची आग म्हणतात. प्रामुख्याने वादळात हे प्रकार दिसून येतात. परंतु एयर ट्रॅफिकनेही सांगितले की वादळ वगैरे या मार्गात नाही, मार्ग निर्वेध आहे. विमानात धूर मात्र दाटतच होता. तो कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्याबरोबर जळाल्याचा गंधकाचा दर्पही विमानात जाणवत होता. अचानकपणे खिडकीशी बसलेल्या एका लहान मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले की विमानाच्या एका इंजिनामागे मला आग दिसली. इतर अनेक प्रवाश्यांनाही विमानाच्या इंजिनांमागे आग दिसत होती. अचानकपणे चौथ्या क्रमांकाच्या इंजिनातून आग निघून ते बंद पडले. रॉजरने तात्काळ त्या इंजिनांची शटडाउन ड्रिल सुरु केली. इंधनाचा पुरवठा खंडित केला. एका मिनिटात दुसर्‍या क्रमांकाचे इंजिन बंद पडले. आणि काही सेकंदाच्या अंतराने इतरही इंजिने बंद पडली! बॅरीने भयचकित झाला आणि म्हणाला,' हे अविश्वसनिय आहे, आपली चारही इंजिने बंद पडली आहेत.' कोणत्याही इंजिनाशिवाय बोईंगचे ७४७ जातीचे विमान आता वेगाने खाली समुद्राकडे येत चालले होते. दर १५ किलोमिटर्स ना १ किलोमीटर इतक्या भयावह वेगाने ते समुद्राकडे झेपावू लागले. रॉजरने गणित करून मांडले की आपण बहुदा फक्त १६९ किलोमिटर्स अंतर असे कापू शकू. मूडीने तत्काळ एयर ट्रॅफिकला चारही इंजिने बंद पडून आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याचे कळवले. (तत्कालीन इंडोनेशियाच्या एयर ट्रॅफिकच्या माणसाने चुकीचे ऐकले की फक्त चौथे इंजिन बंद पडले आहे. ) जावा बेटावर उभा असलेला पर्वत या विमानाच्या मार्गात होता. हा अडथळा पार करून जाण्यासाठी किमान ३७०० मिटर्सची उंची आवश्यक होती अन्यथा विमानाचा कपाळमोक्ष. पायलट क्रूने परत इंजिने सुरू करण्याची ड्रिल केली. पण कोणतेही इंजिन सुरू झाले नाही. रॉजरने ही ड्रिल करत रहायची असे ठरवले. या सर्व घटनांमुळे विमानातील प्रवासी हबकलेच होते. रॉजरने घोषणा केली, ' आपल्या प्रवासात एक छोटा अडथळा उभा राहिला आहे. विमानाची चारही इंजिने बंद पडली आहेत. आम्ही सर्व प्रकारे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आशा आहे या गोष्टीने तुमच्यावर फार ताण आला नसेल!' थोड्यावेळातच विमानातला हवेचा दाबही खाली आला आणि ऑक्सिजन पुरवणारे मास्क प्रवाश्यांसमोर खाली आले. बहुतेकांनी आपले काही खरे दिसत नाही ही खुणगाठ मनाशी बांधली. क्रू ने ठरवले की जर विमानाने आवश्यक ती उंची राखली नाही तर विमान परत वळवायचे आणि समुद्रावर उतरण्याचा प्रयत्न करायचा. तोवर इंजिने सुरू करण्याची पद्धती वापरत प्रयत्न सातत्याने सुरू ठेवायचे. यावेळे पर्यंत विमान ४१०० मिटर्सवर येऊन ठेपले. आणि अचानकपणे सुखद धक्का बसला - चौथे इंजिन सुरू झाले. त्यामागोमाग इतर सर्व इंजिने सुरू झाली. सर्वांनी एकच जल्लोष केला. विमानाने परत ११५०० मिटर्सची सुरक्षित उंची गाठली आणि... आणि परत तीच सेंत एल्मोची आग पायलटना समोर दिसू लागली. दोन नंबरचे इंजिन परत बंद पडले. आता मात्र मूडीने विमान कमी उंची वरूनच उडवण्याचा निर्णय घेतला. विमान सुमारे ३५०० मिटर्स वरून जाऊ लागले. इतर तिन्ही इंजिने काम करत राहिली. विमानाने जकार्ताला उतरण्याची परवानगी मागितली. परवानगी होती शिवाय अग्निशमन दलाचे ट्रक्स तयारच उभे होते. उतरतांना पायलटस च्या लक्षात आले की त्यांना काचेतून धावपट्टी आणि इतर काहीच दिसत नाहीये. फक्त धुरकट असे दिवे दिसत आहेत. विमानाचे लँडिंग लाईटस काम करत नव्हते असे लक्षात आले. ग्लाईडस्कोप धड मिळत नसल्याने शेवटी कसेबसे 'अंतर मापक' वापरत, प्रयत्नपूर्वक हे विमान जमिनीवर उतरवण्यात त्यांना यश मिळाले. विमान उतरल्यावर विमानात एकच जल्लोष झाला. सर्वजण आनंदाने एकमेकांना मिठ्या मारू लागले आयुष्याची दोरी सलग राखल्याबद्दल देवाचे आभार मानू लागले. --- आता ही भानगड झाली कशी? जावा बेटावरचा गालूंगंग नावाचा ज्वालामुखी या काळात जागृत झाला होता. या ज्वालामुखीने हवेत मोठाच धूर सोडला होता. या धूरात ज्वालामुखीची राखही मिसळली होती. या धूरात विमान घुसले. त्याबरोबर ही राख घर्षणाने पेटल्या सारखी दिसू लागली आणि सेंट एल्मोची आग असल्याचा संशय पायलटसना आला. पण ते तसे नव्हते. हे खरबरीत राख विमानाच्या इंजिनातही घुसली. परंतु तेथील सुमारे २०० सेल्सिअसच्या तापमानामुळे हे कण वितळले त्याची एक पेस्ट तयार झाली. ती सर्वत्र पसरत इंजिन जाम होऊन बंद पडले. मात्र इंजिन बंद पडले आणि गार झाले तसेच ते खालीही आल्याने तेथे राख नव्हती. आतापर्यंत तापमानामुळे पेस्ट झालेली ही राख घट्ट झाली आणि वार्‍याच्या जोराने उडून गेली. मूडीच्या सातत्याच्या प्रयत्नाने इंजिने सुरु झाली. त्या राखेमुळेच विमानाच्या काचाही घासल्या जाऊन त्यातली दृष्यता गेली. या नंतरही असे प्रकार याच मार्गावर झाल्याने, हा हवाई मार्ग काही काळ बंद करण्यात आला. चौकशी नंतर सर्व प्रकारच्या ज्वालामुखीच्या राखेमध्ये विमाने नेण्यावर बंदी घालण्यात आले.

वाचने 6180 वाचनखूण प्रतिक्रिया 37

ब्रिटिश टिंग्या 11/02/2011 - 08:35
या राखेच्या घर्षणाने विमानाचा रंगदेखील उडाला होता! :) याचा मेडे विडियो मिळाला तर जरुर पहा! मस्त आहे!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

निनाद 11/02/2011 - 08:44
हो विमानाचा रंग उडाला होता. रोल्सरॉइसची ही इंजिने फोरेन्सिक तपासणीसाठी इंग्लंडात नेण्यात आली की काय असे आठवते.

छोटा डॉन 11/02/2011 - 09:41
एक नविनच माहिती मिळाली. अशा अनवट लेखासाठी पुन्हा एकदा निनाद ह्यांचे आभार ... - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

निनाद 11/02/2011 - 09:45
हा लेख खरे तर मध्ये युरोपात ज्वालामुखीच्या राखेमुळे विमान वाहतूक बंद पडली तेव्हा लिहायला घेतला होता. पण तो नंतर 'चित्रपट ओळख' या मालिकेच्या नादात पूर्ण करायचा राहून गेला. गविचे लेखन पाहून आठवला आणि लगेच पूर्ण करून टाकला.

ब्रिटिश टिंग्या 11/02/2011 - 10:07
तुम्ही दोघेही इतकं चांगलं लिहीता या विषयावर, तुमच्या पोतडीतुन अजुन येउ देत.......विशेषत: अलोहा, एअर ट्रँसॅट अन् बीए ५३९० च्या बाबत :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

मुख्य प्रॉब्लेम असा आहे की क्रॅशच्या अनेक केसेस प्रसिद्ध आहेत आणि त्यावर भरपूर डिटेलमधे लिखाण / रिपोर्ट्स (एनटीएसबी, डीजीसीए वगैरेंचे) पब्लिकली उपलब्ध आहेत. शिवाय नॅट जिओ वर त्यांच्या सुंदर डोक्युमेंट्रीज बनल्या आहेत. तुनळी आहेच. त्यावरच परत लिहायचे म्हणजे विकिपीडियाची कॉपी उचलल्यासारखे वाटणार. अशा अपघातांचा संदर्भ इतर काही लिखाणात वापरायला लागतो ते ठीक आहे. निनादने ही घटना खूपच चित्तथरारकपणे मांडली हे कौतुक. हे अवघड आहे. ते त्याने केलं. पण तरीही तो माझ्या या म्हणण्याशी सहमत असावा असं वाटतं.

In reply to by गवि

गणेशा 11/02/2011 - 13:14
गवि/निनाद असे नाहिये, विकीपेडीया किंवा इतर सर्व ठिकानी आहे हे मान्य, पण प्रत्येक गोष्ट सर्वजन वाचत / पाहत नाहि ... तुमच्या लेखा नंतरच मला जास्त असले लिखान वाचण्याची आवड निर्माण झाली आहे.. त्या अगोदर फक्त ओसामा ने घडविलेला घातपात याचेच काय ते डिस्कवरी वर पाहिले होतेआणि एक पायलट विमानाच्या काचेतुन पुढे गेला होता, आणि दुसर्याने त्याला ओढले होते .. मायनस तापमानामुळे तो मानुस मरण पावला होता मात्र .. हे दोनच काय ते मला महैत होते. तुम्ही बिंधास्त लिहित रहा.. काही कॉपी वगैरे नाहि वाटत. आणि आपण आपल्या अनुभवावरुन तर लिहितोच पण आपण जे वाचले आहे ते आणि आपल्या कलपना शक्तीने पण लिहितोच ना... तुम्ही लिहित रहा .. वाचत आहे आम्ही माझेच एक वाक्य आठवले देतो प्रामाणिक पणे लिखान केले तर ते फक्त लिखान होत नाहि तर तो जीवनाचा शिलालेख ठरतो - गणेशा आपल्या अश्या वेगळ्या गोष्टी वाचण्यात आनंद मिळतो आहे..

In reply to by गणेशा

निनाद 14/02/2011 - 03:48
आपल्याला लिखाण आवडले हे वाचून बरे वाटले. मालिका वगैरे करण्याचा माझा हेतू नाही. त्या युरोपच्या ज्वालामुखी राखेत विमाने जाऊ देत नव्हते. त्याकाळात उडालेला गोंधळ पाहून यावर लिहू इतकेच डोक्यात होते. नचिकेतने केलेले लिखाण वाचून मला तो अर्धवट लेख आठवला आणि मी तो पूर्ण केला. वर नचिकेतने म्हंटले आहे की ती विकिची कॉपी वाटते ते म्हणणे खरे आहे. माहितीचे कथेत रुपांतर करायला माहितीच्या ऐवजाला मानवी आकारात घडवावे लागते. आणि त्यासाठी 'हे नक्की कसे घडले' याला मनात आकार देत बसावा लागतो. खरे सांगायचे तर या लेखनातही वाचकांना नंतर शेवटाकडे कथा वेगळ्या बाजात गेल्याचे जाणवलेच असेल. खरे तर त्या लिखाणाच्यावेळी जी कथा डोक्यात होती ती हरवून गेली होती. :) असो, विकीची कॉपी करायला माझी काहीच हरकत नसते. पण वर म्हण्टले तसे कथा डोक्यात तयार व्हावी लागते. ती जमत नाही तोवर लिखाणात मजा वाटत नाही. शिवाय, विमान आणि त्यावरचे लेखन हा माझा प्रांत नाही. मला त्या विषयातले खास ज्ञानही नाही. विमान प्रवास आवडतो म्हणून त्यात बसण्याव्यतिरिक्त की कधी काही केलेले नाही. त्यात तरीही या विषयावर जमले मला तर लिहिन अजून.

In reply to by निनाद

नाही. निनाद,तुझ्या लेखाबाबतीत विकिपिडियाची कॉपी हा शब्द अगदी चुकीचा आहे.उलट तू खूप रोचक आणि ओरिजिनल लिहिलेस.मी अशाच प्रकारच्या इतर केसेस आपल्या दोघांकडून याव्यात याविषयी बोलत होतो. I meant it WILL start looking like wiki if many cases are covered. उलट माझी हेलिओस पोस्ट पाहिलीस तर तुला विकि इफ़ेक्ट वाटेल. I have not used wiki except for image. तरी वाटतं तसं.म्हणून ते म्हटलं.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

छोटा डॉन 11/02/2011 - 10:17
टिंग्याशी सहमत ... असेच अजुन लेखन यावे, तसेच ह्या विषयावर जर इतर काही व्हिडिओ क्लिप्स वगैरे उपलब्ध असतील तर त्यांच्याही लिंका मिळाव्यात अशी जादाची मागणी करतो. लेखन आवडते आहेच, मात्र ते अजुन रंजक व्हावे अशी हावरट मागणी :) - छोटा डॉन

गौरव व्यवहारे 11/02/2011 - 10:19
मस्त माहिती दिलीत, धन्यवाद

मनराव 11/02/2011 - 11:03
चांगली माहिती दिलीत निनाद....... केबीन क्रुने ज्या शांततेने परिस्थिती हाताळली ते खरोखरच स्तुत्य आहे...........

निनाद 11/02/2011 - 11:09
तेथील सुमारे २०० सेल्सिअसच्या तापमानामुळे हे कण वितळले हे कृपया २००० असे वाचावे. २०० सेल्सिअसच्या तापमानामुळे हे राखेचे कण वितळणे शक्य नाही :)

स्पंदना 11/02/2011 - 11:17
अरे वा निनाद केव्हढी माहिती आहे या लेखात. परव त्या युरोप मध्ये अडकलेल्या अन संतापलेल्या प्रवाशांना जरा हे असल लिखाण वाचायला द्यायला पाहिजे. आता हल्ली बाली बंद आहे ना? खुप रोचक वाटल. (बाय द वे तुमचा फोटो नाही मग त्या जर्मन नातेवाईकांना कस कळणार तुमचा लेख आहे ते?)

In reply to by स्पंदना

निनाद 11/02/2011 - 13:04
अपर्णा काहीतरी घोळ होतोय. माझे जर्मन नातेवाईक नाहीत हो (अजून!) मी तो चित्रपट ओळखवाला निनाद... आठवला? प.ज.निनाद पासून हजारो मैल दूर पार पाताळात बसलोय! पाताळ भैरवीवाला - निनाद

गणेशा 11/02/2011 - 13:08
अतिशय जबरदस्त लिखान खुप आवडले... चित्तथरारक ... अवांतर : सिनेमा परिक्षण नक्कीच करा.. परंतु असे सुंदर लिखान कायम आधी पुर्ण करा अशी विनंती लिहित रहा .. वाचत आहे

परिकथेतील राजकुमार 11/02/2011 - 13:14
निनादशेठ मस्त लेखन. आधी डिस्कव्हरी वर हे थोडे बघण्यात आले होते, पण नक्की काय दाखवत आहे समजण्याच्या आधीच आम्ही आपली अक्कल चालवुन चॅनेल बदलुन 'वाँटेड' पाहात बसलो. धन्यवाद ह्या माहितीपूर्ण लेखनाबद्दल.

भडकमकर मास्तर 11/02/2011 - 14:25
इथेच तो सरेन्डर मेन्टॅलिटीवाला देवाचं नाव घेऊन बसणारा पायलट असता तर विमान समुद्रात उतरवायची / सापडायची लक्षणं होती.....

स्वाती दिनेश 11/02/2011 - 14:35
वाचताना शहारे आले, लेख आवडला.. स्वाती

In reply to by रेवती

निनाद 14/02/2011 - 03:56
घाबरवण्याचा हेतू नाही. उलट तुम्हाला आता असे अपघात होणार नाहीत म्हणून निवांत वाटले पाहिजे. कारण तसे राखेत विमान न चालवण्याचे नियम करण्यात आले. आणि विमान वाहतूक त्या नियमांनीच चालेल याची काळजीही घेण्यात आली - घेण्यात येते. मग काळजी कशाला. निवांतपणे (जमेल तितके) पाय पसरून बसायचे आणि हवाई सुंदरे आणि सुंदर्‍यांच्या हवाईसेवेची मजा घ्यायची! ;)