खरेदीची सुरुवात-आजच्या सामनातील लेखन
पिडांकाकांनी सामनातील लेख येथे प्रकाशित करावेत अशी सूचना केली आहे.त्यानुसार आजचा लेख येथे डकवीत आहे.
सेकंडरी मार्केटमध्ये खरेदीची सुरुवात आज आपण करू या .या खरेदीच्या प्रस्तावापूर्वी काही महत्वाची सूत्रे .
१)
अ : ट्रेडींग खाते आहे आणि हातात रोख रक्कम आहे म्हणून रोज खरेदी विक्री करावी असे नाही .
ब: जास्त उलाढाल म्हणजे जास्त नफा असे नाही.
क: बाजारात केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत हजर राहणे सुध्दा बाजारात असण्यासारखे आहे.
क्रिकेटच्या खेळात फलंदाज प्रत्येक बॉलवर रन काढतोच असे नाही. काही बॉल फक्त तटवायचे असतात ,काही बॉलवर किरकोळ धावा काढायच्या असतात. योग्य संधी मिळताच काही बॉल सिमापार करायचे असतात.. तर काही वेळा पिचवर टिकून उभे राहणे हाच खेळ असतो.
२)
अ: काही गुंतवणूकदारांची पैसे गुंतवल्यानंतर वर्षभर थांबण्याची तयारी आणि कुवत असेल तर काही गुंतवणूकदारांचा धीर तीन महीन्यात संपेल . म्हणून खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूकीचा कालावधी नक्की करावा .
ब:हा कालावधी निश्चीत केल्यावर नफ्याचे अपेक्षीत प्रमाण टक्केवारीतच ठरवावे.
क : ही टक्केवारी कालावधीच्या आधीच मिळत असेल तर विक्री करून नफा जमा करावा.कालच्या पेक्षा आजचा दिवस बरा असेल या भ्रमात जमा झालेला नफा काहीवेळा अनपेक्षीतरित्या वाया जातो.
येथे टक्केवारीतच नफ्याचा विचार करावा असे सांगतो आहे कारण वर्षानुवर्षे गुंतवणूकीची काही विचीत्र कल्पना आपल्या मनात कळत नकळत जमा झालेल्या असतात.
उदाहरणार्थ ,किती वर्षात दुप्पट? हा प्रश्न. गुंतवणूकीचा प्रस्ताव केवळ दुप्पटीच्या कसावर तपासून बघण्याची सवय आपल्याला लागली १९८५ च्या बजेट नंतर.या बजेटमध्ये सहा वर्षात दुप्पटीचा फायदा देणार्या नॅशनल सेव्हींग सर्टीफीकेटचा समावेश आयकरातील सूट मिळण्यासाठी केला गेला होता. अर्थात ही स्किम लोकप्रिय झाल्यामुळे भविष्य काळातल्या कुठल्याही प्रस्तावाला किती वर्षात दुप्पट हा एकच नियम लागू केला गेला. दुप्पट म्हणजे वार्षीक बारा- साडेबारा टक्क्याचा परतावा म्हटले की लोकांना समजेनासे झाले .सहा किंवा साडेसहा वर्षात दुप्पट म्हटले की गुंतवणूक चांगली हा नियम सगळ्यांना सरसकट लावायला सुरुवात झाली . अशा अडाणी अनुमानानी शेअर बाजारात गुंतवणूक करू नये हा माझा सल्ला आहे. पटीत बोलण्यापेक्षा टक्केवारीत बोलणे जास्त योग्य आहे. दुप्पट म्हणजे स्वतःच्या मनाची सोयीस्कर समजूत आहे तर टक्केवारी म्हणजे गुंतवणूकीचे योग्य माप आहे.
शेअर खरेदीचे काही बारकावे आता बघू या . समजा पन्नास शेअरची खरेदी करायची असेल तर एकाच वेळी एकाच भावात पन्नास शेअर खरेदी करण्याची ऑर्डर देऊ नये. समजा त्या शेअरचा भाव २१० दहा रुपये असेल तर २०५ ते २१० या दरम्यान दहा किंवा पंधरा शेअर खरेदी करण्याची ऑर्डर डिलरला द्यावी. अशी ऑर्डर देण्याचा हेतू असा की सकाळपासून सुरु होणार्या ट्रेडींग सेशनच्या चढउताराचा पूर्ण फायदा आपल्याला व्हावा.काही वेळा असे होण्याची शक्यता असते की सगळे पन्नास शेअर एकाच दिवसात खरेदी होणार नाहीत.हरकत नाही. दुसर्या दिवशी खरेदी करता येईल. खरेदीची सरासरी कमी ठेवणे म्हणजेच नफ्याकडे वाटचाल.
अपेक्षीत नफा कमावण्यासाठी शेअर खरेदी करण्यापूर्वी खरेदी कशी करावी हे ठरवण्याची अनेक तंत्रे आहेत. बाजारातला प्रत्येक गुंतवणूकदार स्वतःच्या अनुभवानुसार आपले तंत्र वापरत असतो. माझ्या अभ्यासातील दोन तंत्रे आज मी तुम्हाला सांगणार आहे,
१) आयपीओतल्या नविन समभागाची नोंदणी झाल्यानंतर काही दिवसानी त्या समभागाचे भाव स्थिरावतात.त्यानंतरच्या मंदीच्या काळात हे समभाग आणखी स्वस्तात मिळतात. हीच योग्य वेळ असते हे समभाग खरेदी करण्याची . या तंत्रानुसार काही महीन्यांपूर्वी येऊन गेलेल्या गुजरात पिपावाव पोर्ट लिमीटेड या कंपनीचे समभाग सध्या स्थिरावलेल्या भावात उपलब्ध आहेत. साधारण ५७ ते ५८ रुपयांच्या सरासरीत खरेदी करून -गुंतवणूकीचा कालावधी अठरा महीन्याचा ठेवल्यास ४० ते ५० टक्के नफ्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही..(आयपीओ ग्रेड ४किंवा५ चा असावा)
२)बोनस सहीत मिळणारे सरकारी कंपन्यांचे शेअर खरेदी करणे हा दुसरा सोपा मार्ग आहे. बोनस म्हणजे हा समभाग खरेदी केल्यावर वाढीव शेअर मोफत मिळतात.(त्याचे प्रमाण आधीच जाहीर झालेले असते ).गेल्या काही आठवड्यात ओएनजीसी या सरकारी कंपनीचे शेअर बर्याच म्युच्युअल फंडंनी विकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हा समभाग बोनस सहीत स्वस्तात मिळतो आहे .समजा दहा समभाग खरेदी केले तर दहा समभाग मोफत मिळणार आहेत.अर्थात तारीख गेल्यानंतर या समभागाची किंमत कमी होईल . जे गुंतवणूकदार दोन वर्षे थांबण्याच्या मनस्थितीत असतील त्यांनी हा समभाग खरेदी करून भरघोस नफा कमवावा अशी माझी सूचना आहे.
ही दोम्ही खरेदीची तंत्रे झाली पण अमुक एक कंपनीची निवड का करावी याचा अभ्यास वेगळा असतो .त्या अभ्यासाची सुरुवात पुढच्या भागात करू या .
लक्षात घ्या समभाग खरेदी -विक्रीचे तंत्र हा अनुशासनाचा किंवा शिस्तीचा भाग आहे . ह्या तंत्रांची अंमलबजावणी शिस्तीत करणार्याला बक्षीस म्हणून (फायद्याचा) मौका हमेशा मिलता है.
-----------------------------------------------------------------------------------------
या लेखातील चौकटीत दिली माहीती.
कल्याण आणि वरळी-मेन मुळे ओपन आणि क्लोज हे दोन्ही शब्द बर्याच जणांच्या परीचयाचे असतीलच .आपल्या बाजारातसुध्दा हे दोन्ही शब्द वारंवार वापरले जातात. ओपन -खुलता भाव म्हणजे सकाळी बाजार सुरु झाल्यावरचा भाव आणि क्लोज -बंद भाव म्हणजे बाजार बंद होतानाचा भाव. याखेरीज महत्वाचे शब्द म्हणजे हाय आणि लो .हाय म्हणजे त्या दिवसाचा जास्तीतजास्त भाव आणि लो म्हणजे त्या दिवशीचा कमीतकमी भाव .या दोन्ही शब्दांना जोडून ५२ वीक हाय -लो असा शब्द प्रयोग देखील होताना दिसतो. त्याचा सरळ साधा अर्थ म्हणजे गेल्या वर्षभरातला जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव . एखाद्या शेअरच्या भावाचा विचार करताना त्याचा टप्पा म्हणजे वधघटीची कुवत समजण्यासाठी याचा उपयोग होतो. हे सगळे शब्द शेअरचा भाव सांगण्यासाठी वापरले जातात.
शेअर बाजार आज कसा आहे किंवा गेले काही दिवस कसा आहे हे सांगण्यासाठीचे जे शब्दप्रयोग केले जातात त्याची पण ओळख करून घेऊ या. बुल फेज म्हणजे सरासरीनुसार रोज बाजारातले शेअरचे भाव वाढत जातात तो काल खंड (तेजीचा बाजार ). बेअर फेज मध्ये अगदी याच्या उलट म्हणजेच सरासरीनुसार शेअरच्या भावामध्ये रोज घट होते तो कालखंड (मंदीचा बाजार ).काहीवेळा बाजार तेज आहे असेही म्हणता येत नाही किंवा मंद आहे असेही सांगता येत नाही त्या कालखंडाचा उल्लेख साईडवेज मार्केट असा होतो.
मराठीत या सगळ्या शब्दांसाठी निश्चीत असे काही शब्द नाहीत त्यामुळे आपण जेथे शक्य आहे तेथे मराठी शब्द वापरू किंवा जेथे नवीन शब्दप्रयोग अमलात आणणे आहे तेथे नविन प्रयोग करू. उदाहरणार्थ साईडवेज मार्केटला लेझीम हा शब्द वापरू या .जसे लेझीम खेळताना दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे अशी हालचाल होते तसेच साईडवेज मार्केट असते. काही जण याला ग्यानबा -तुकाराम बाजार म्हणतात .ग्यानबा म्हतले की दोन पावले पुढे आणि तुकाराम म्हटले की एक पाऊल मागे .
बर्याच वेळा रेंज बाउंड मार्केट आहे असे म्हटले जाते .रेंजबाउंड म्हणजे विशिष्ट टप्प्याच्या पलीकडे बाजार हलत नाही अशी स्थिती. यासाठी मराठी शब्द आहे टप्पाबंद बाजार.
सकाळी शेअरबाजाराची वेगवेगळी चॅनेल बघताना बर्याच वेळा रॅली हा शब्द कानावर पडत असेल. रॅली दोन प्रकारची असते बुल रॅली किंवा बेअर रॅली .आधी हे लक्षात घेऊ या की बुल म्हणजे तेजी आणि बेअर म्हणजे मंदी. आता बुल रॅली म्हणजे बाजाराची गतीमान हालचाल ज्यात बाजार वेगाने तेजीच्या दिशेने जात असतो .अर्थातच बेअर रॅलीत या उलट हालचाल होत असते. रॅलीसाठी मराठीत दंगल हा शब्द तुम्हाला सुचवतो आहे .तेजीची दंगल आणि मंदीची दंगल .बघा हे शब्द जमतात का ?
वाचने
4600
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
हे ब्येस केलं बघा, ते सामनावर
सर या आधिचे २/३ लेख पण इथे
धन्यवाद!
संगणकीकरणानंतर आणि डी मॅट खात्यानंतर
मस्त
लै भारी रामदास सर !! जरा
In reply to लै भारी रामदास सर !! जरा by टारझन
असेह म्हणतो......
एकदम उत्तम लेख
वा! या विषयावर इतक्या सुंदर