मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सबला

कवितानागेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सबला 'स्त्री आणी तिची मुक्ती' अशा विषयावर सध्या चाललेल्या चर्चा वाचून मला राहून राहून एकाच स्त्रीची आठवण होत रहातेय. माझी आजी. मी तिच्याकडून कळतनकळत खूप शिकले. हे व्यक्तीचित्र मी आदर्श म्हणून अजिबात लिहीत नाहीये. कारण कुणीच कुणासाठी 'आदर्श' असू शकते असे मला वाटत नाही. पण तरी तिच्याकडे बघताबघ्ता मला माझ्या आतल्याच खूप गोष्टी 'सापडल्या'. तिचा 'स्त्रीमुक्ती' या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे 'डायरेक्ट मोक्ष' हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा. मुक्त होऊन 'स्त्री' नक्की करणार तरी काय, असा प्रश्न तिला कायम पडायचा. पुरुष आणि स्त्री या दोघामधाला नैसर्गिक फरक संपणार नाही, तो संपवायची गरजही नाही, कारण तो फरकच त्याना पूरक असतो, याबद्दल तिची मते ठाम होती. त्यामुळे तिने ना कधी पुरुषांना शत्रू मानले , ना स्त्रियांना. . एकंदरीत पुरुषांची थट्टा मात्र पुष्कळ करायची ती. 'मुलांबद्दल बोलताना, तुझी मुले बघ कशी वागतायत , आणि लंगोट हरवला की 'आपला तो लंगोट कुठे गेला ग?' असे असतात पुरुष! तश्या त्या पिढीतल्या बर्‍याच बायका तिच्यासारख्याच होत्या. म्हटले तर सरळ सध्या, म्हटले तर हिकमती! ना वैतागता, ना घाबरता पण न भांडता, समरसून जगणार्‍या. तिच्या 'टिन एज' मध्ये तिनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकाना भाकर्‍या पोचवणे, त्याच्या पिस्तुली गोठ्यात लपवून रोज स्वच्छ करणे वगरै कामे केली होती. ती मेट्रिक झाली, हिंगण्याला होस्टेलवर राहून देखील शिकली. तिला मराठी इंग्लिश, हिंदी, तेलुगु आणि कानडी या भाषा वाचता, लिहिता, बोलता यायच्या. तिला उत्तम पोहता यायचे. गाण्याची, नृत्याची, नाटकाची उत्तम जाण होती. सुग्रणपणाला तर तिच्या पिढीत ऑप्शनच नव्हता! तशी ती मुक्त कधीच नव्हती, पण ती 'बद्ध' पण नव्हती. तिनी कधीही पैसे कमावले नाहीत, पण त्यामुळे ती कधीही दीनवाणी झाली नाही. उलट तिचा हात कायम 'देणारा' होता. कसे काय कुणास ठाऊक? ती आजोबांशी कधीही भांडली नाही, तिनी त्यांचे मन कधीही मोडले नाही; पण त्यासाठी तिनी स्वत:चे मनदेखील मोडले नाही. घरादारावर कायम तिच्याच नजरेचा वचक असायचा! तिनी जे असेल त्यात संसार केला, पण तिचा चेहरा कधी कुणी उदास, रडका पहिला नाही. पैशाची कायमच चणचण असायची, पण आनंदाची नसायची. तिनी कधीही आजोबांकडे त्यांनी अजून पैसे कमवावेत म्हणून हट्ट केला नाही. तिच्या वागण्यात मात्र कधीच गरिबी नसायची. आजोबाना अपमानास्पद वागणूक दिलेल्या, तिच्या २ जवळच्या नातेवाईकान्च्या घरात तिनी आयुष्यभर पाउल टाकले नाही. तिनी त्याबद्दल कडवटपण आणि द्वेषही बाळगला नाही. पण स्वत:चा पैसा आणि स्वत:च्या मालकीचे घर वगरै काहीही नसून, तिची मान कायम ताठ राहिली. तिच्या आयुष्याची आणि तिच्या संसाराची ती कायम 'बॉस' होती. आजोबा त्यावेळेसची 'अ‍ॅडव्होकेट' ची परिक्षा देऊन वकिली करत होते. आलेल्या अशीलाना कोर्टात नेण्याऐवजी बर्‍याचवेळेस ते काहीतरी मधला उपाय काढून , दोन्ही बाजूना बोलावून घेऊन, समजावून, तंटा सोडवून आनंदानी घरी परत पाठवून द्यायचे, ते देखील एकाही पैसा ना घेता. याबद्दल आजीची काहीही तक्रार नसायची. घरात ७ मुले, सासर, माहेरचे विश्रांतीसाठी आलेले आजारी पाहुणे, इतर मित्रमंडळी, नातेवाईक सतत असायचे. घरातले, नातेवाईक, शेजारचे, मित्रमंडली, अगदी पाळलेली कुत्रे मांजरे यांच्यापैकी कुणालाही शुश्रुषेची गरज असेल, तर ती तिथे असायची. शिवाय चातुर्मासात, नादारीवर शिकणारे विद्यार्थी, एकटे रामादासीबुवा, पुजारी अश्या कुणालातरी जेवायला बोलवायची पद्धत तिनी अनेक वर्षे पाळली. तिचे माहेर म्हणजे,कडक सोवळ्यातले वैष्णव, असल्यानी ती कधीच आंघोळीशिवाय स्वैपाकाला लागली नाही. पण ती सकाळी १०- १०.३० वाजता, अगदी सणावाराला सुद्धा, स्वैपाकघरातून मोकळी झालेली असायची! तिचा स्वैपाक कधी बिघडला नाही, कधी कमी पडला नाही की कधी उरला नाही! तिनी नोकरी केली नाही, पण कामे मात्र खूप केली. अगदी स्वत:च्या आवडीचीच केली. पुष्कळ कविता लिहिल्या, कथा लिहिल्या. साहित्य संमेलनातून काम केले. अनेक वर्षे दासबोध मंडळाच्या परिक्षांसाठी लोकाना घरोघर जाऊन माहिती देणे, शिकवणे, मदत करणे, पेपर तपासणे हे काम तिनी विनामोबदला केले. या सगळ्यात अनेक वेळेस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या 'पुरुष'मंडळींबरोबरच कामे असायची. पण त्यातदेखील कधी तिला/ आजोबांना कुणाला काही चुकीचे वगरै वाटले नाही. तिच्या ९२ वर्षांच्या आयुष्यात तिच्या तोंडून कधीही कुणीही 'कंटाळा' हा शब्द ऐकला नाही. तिनी कधी वेळ वाया देखील घालवला नाही की कधी घाईगडबड, धावाधावही केली नाही. तिची सगळी कामे एका 'रिदम' मध्ये चालायची. तीनी नोकारी करणार्‍या सुनेला सकाळी डबा करून दिलाय, नोकरी ना करणार्‍या सुनेला भरतकाम, विणकाम, आणि खास सुग्रणपणाचे जिलेबी, बालुशाही वगरै पदार्थ शिकवलेत. तिची ७ मुले, १५ भाचे, १८ नातवंडे, १४ पतवंडे इथपर्यंत सगळ्या तान्ह्या बाळांचे तेल-उटणे-आंघोळ-गुटी इ. सगळे प्रकार तिनी केले. तिचा चेहरा कायम प्रसन्न असायचा. तिची हिम्मत जबरदस्त होती. तिच्या वयाच्या तिशीतच अचानक आलेल्या कर्जामुळे आजोबा डीप्रेस होऊन कुठेतरी रामाच्या मंदिरात जाऊन बसले होते. तिनी त्यांना शोधून काढून, समजावून परत घरी आणले आणि हिम्मत देऊन पुन्हां कामाला लावले. तिच्या वयाच्या पन्नाशीत, भर बाजारात उधळलेला बैल समोर आल्यावर, त्याची शिंग रोखून तिनी त्याला अडवले होते. तिला कधीच आम्ही रिकामे बसलेले पहिले नाही. मेंगळटासारखे, दमलेले, थकलेले देखील पहिले नाही. तिनी कायम कष्ट केले, पण त्या कष्टांनी ती कधीच 'गांजली' नाही. तरी तिच्या एका स्त्रीयांना उद्देशून केलेल्या कवितेतल्या ओळी मला लहानपणी नेहमी खटकायच्या, जात तुझी चंदनाची, असे झिजू दे ग अंग, सये! मांडिलीस पूजा, होऊ देई यथासांग ........ माझ्या मुळातल्या आळशी स्वभावाला हे असे 'झिजणे' वगरै कधीच झेपण्यासारखे नव्हते. पण कदाचित, ते ओळखूनच, माझ्यावर स्वैपाक शिकण्यासाठी तिच्याकडून जास्त दट्ट्या असायचा. मला तर नारळ खवायचा सुद्धा कंटाळा यायचा. मग ती सांगायची, 'आपलयाला आवडते ना चटणी, छान लागते ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार. कंटाळत बसलीस तर काम लांबेल. आहे काय त्यात एवढे? करून टाक चटकीन!' खरें तर तिचा सगळ्याच कामांसाठी हाच मंत्र असायाचा, "आहे काय त्यात एवढे? करून टाक चटकीन!" शिवाय काहीतरी 'मिळवण्यासाठी' काहीतरी 'द्यावे' लागते, हे शिकण्याची माझी हीच पहिली पायरी होती. तशी ती बुरसटलेल्या विचारांची अजिबात नव्हती. मुलांना नवीन , वेगळे असे काहीतरी आवडते हे तिला पक्के माहित होते. १९५० च्या दशकात तिनी घरीच पाव, बिस्किटे केके, वगरै केले होते- अर्थात बिना अंड्याचे. पपई, पेरू, अंजीर, जांभूळ अशा फळामध्ये अंगचेच 'पेक्तीन' असते हे शोधून काढले, आणि ती फळे वापरून ती घरीच जाम जेली वगरै करायची. अर्थातच शेजारीपाजारीपण वाटायची. बॉबकटची फॅशन आल्यावर, मुलींना हौस असते हे ओळखून तिनी घरीच माझ्या मावश्यांचे अतिशय सुंदर हेअरकट केले होते. येकदम हिरवीण दिसायच्या दोघी! मी कोलेज मध्ये असताना तिनी एका माझ्या वाढदिवसाला मला 'तुला आवडते ना, तुझ्यासाठी जीन्स घे' असे सांगून पैसे दिले होते. तशी विचारानीपण ती मोकळी होती. माझ्या मावशीच्या एका मैत्रिणीचे पती चाळीशीतच अचानक गेले. २ मुले होते. पण तिचे लग्न परत करून द्यावे, यासाठी तिनी स्वत: घरी जाऊन त्या मैत्रिणीच्या वडलांशी चर्चा केली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही याबद्दल मात्र तिला कायम खंत होती. माझ्या बहिणीच्या एका जवळच्या मैत्रिणीचे परधर्मीय मुलाशी 'जमले' होते. तिच्या घरात 'वादळ' वगरै सुरु होते. ती बिचारी बहिणीकडे येऊन रडत बसायची. आजीनी सरळ त्या मुलीच्या आईची कानउघाडणी केली, 'मुलगी कुठेतरी सासरी जाणारच ना शेवटी. धर्म वेगळा असला म्हणून काय झाले. नवरा तो नवराच, सासर ते सासरच! तिला दुखवू तरी नका. तिच्या मनाविरुद्ध जायचे नाही.' त्या मुलीलापण समजावले. 'मात्र आधी शिक्षण पूर्ण कर. दोघे नोकरी बघा नीट. ' आमच्या 'हिंदुत्ववादी' आजीकडून हे ऐकून आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला होता! ती वयानुरूप आलेल्या शहाणपणाने फक्त शिकवत, सल्ले देत राहिली असेही नाही. उतार वयातदेखील तिच्याकडे स्वत:ला पारखण्याची हिम्मत होती. माझी आई, मावशी, मामा वगरै , आमच्याशी मुलांशी भरपूर गप्पा मारतात हे बघून ती एकदा आईला म्हणाली, 'मला तुम्हा मुलांबरोबर कधीच असा इतका वेळ घालवता आला नाही. तेदेखील महत्त्वाचे आहे. माझे थोडे चुकलंच. ' तसे म्हटले तर तिची खूप गोष्टीत निराशाच झाले होती. ती स्वत:, आजोबा, तिची मुले यांच्यापैकी कुणाचेच त्याच्या गुणांच्या मानानी, नाव, करियर, प्रसिद्धी, कोतूक, वगरै गोष्टी झाल्या नाहीत. उलट जरा खडतरच योग आले. पण ती त्यामुळे कधी कावलेली दिसली नाही. जे जे समोर येईल त्याला तोंड देणे, ते मनापासून, उत्तम करणे हे तिला पक्के माहित होते. तिच्या अशा मृदू आणि लढाऊ अशा दोन्ही गुण दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विचार केल्यावर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की तिनी स्वत:ला पूर्ण ओळखलेले होते, ती कशी आहे, तिला स्वत:ला काय हवय, ती काय करू शकते आणि तिच्या आणि तिच्या संसारातल्या सर्वांच्या संपन्न आयुष्यासाठी तिनी काय करायला हवय याची तिला पूर्ण जाण होती. तिनी तिचे चंदनाचे गुण पूर्ण ओळखले होते. त्याच कवितेतल्या शेवटच्या ओळी होत्या, चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही गंध जोडी, जात तुझी चंदनाची, तुझे 'मी' पण ना सोडी! एक स्त्री म्हणून नैसर्गिकरीत्याच व समजव्यवस्थेचा भाग म्हणून, जमवून घेणे, कष्ट करणे, दु:ख सोसणे या गोष्टी वाट्याला येणार हे तिनी गृहीत धरले होते. पण सगळे निभावून नेण्याचे सामर्थ्य देखील स्त्री म्हणूनच वाट्याला आले आहे हेदेखील तिला पक्के माहित होते. तिनी आजोबांचे, मुलांचे, नातवंडांचे सगळे लहानमोठे हट्ट पुरवले, पण कधीही स्वत:ला किंवा कुणालाही पायाची दासी वगरै मानले नाही. कुणासाठीही काही करताना ती नोकर, आया वगरै नसायची, ती 'दात्री' होती! ती ''सबला' होती!

वाचन 17819 प्रतिक्रिया 57