Skip to main content

सायलेंटियम

निनाद यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
सायलेंटियम साल्झबर्ग या ऑस्ट्रीयातल्या छोट्याश्या गावात आत्महत्त्या करण्याची लाट आली आहे की काय असे वाटत असते. त्यातच गावातील प्रतिष्ठित अश्या समारोह अध्यक्षांच्या जावयाच्या आत्महत्त्येने गावात खळबळ माजते. हे अध्यक्ष साल्झबर्ग गावाचे नाव मोठे व्हावे म्हणून निरनिराळे समारोह आयोजित करण्याचे मनावर घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे कलाकार मिनतवारीने गावात बोलावले जातात. पण यावेळी ही आत्महत्त्या नसून खून आहे असा संशय तयार होतो. कारण या माणसाने चर्चच्या सध्या आर्चबिशप असलेल्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे जाहीर आरोप केलेले असतात. कट्टर धार्मिक ख्रिश्चन मंडळी यामुळे बिथरलेली असतात. अशावेळी ब्रेनर (जोसेफ हेदर) नावाचा एक खासगी गुप्तहेर तेथे येतो. हा गुंता सोडवण्याच्या प्रयत्नाला लागतो. चर्चमध्ये एक मुला-मुलींची बोर्डींग शाळाही असते. या शाळेत मुली मात्र बहुदा गरीब आशियातील देशातून येत असतात. ब्रेनर चर्चमध्ये नोकरी मिळवतो आणि ती जागा आतून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ब्रेनरला चर्चमध्ये ख्रिस्ताचा क्रूस दुरुस्त करण्याचे काम दिले जाते. तो जड आणि भला मोठा क्रुस वाहून नेतांना ब्रेनर जिन्यावरून धडपडतो आणि बेशुद्ध पडतो. त्या रुग्णवाहीकेमध्ये जाग येते. नशीबाने रुग्णवाहीकेचा चालक बर्टी, त्याचा जुना मित्र निघतो. हा चालकही नकळतपणे या गुंत्यात सामील झालेला असतो. ब्रेनरला हळूहळू ध्यानात येऊ लागते की चर्चने चालवलेली शाळा म्हणजे प्रत्यक्षातला एक कुंटणखाना आहे. बाहेरून ऑस्ट्रीयन किंवा जर्मन भाषा न येणार्‍या गरीब मुली आणवल्याने त्या गायब झाल्या तरी कुणाला फार फरक पडत नाही. पण अजूनही या भानगडी मागे नक्की कोण आणि कसे गुंतले आहे याचा संदर्भ त्याला लागत नाही. त्यात अजून एक आत्महत्त्या होते. त्यात ब्रेनर संशयित ठरवला जातो. चर्चचा फादर, फरारी असलेल्या ब्रेनरला सत्य सांगण्याचे आमिष दाखवून एका ठिकाणी बोलावतो आणि पोलिसांच्या हवाली करतो. ब्रेनरला समारोह अध्यक्षांची सुंदर आणि तरुण मुलगी सोडवते. शिवाय त्याला आपल्या नवर्‍याच्या आत्महत्येचा गुंता सोडवण्याचे कामही देते. ब्रेनर हा गुंता सोडवतो का? कोण असते या खुनी मालिकेत आणि का? चर्चचे काम नक्की कसे चालत असते? समारोह पूर्ण होतो का? त्या मुलींचे पुढे काय होते ते चित्रपटातच पहा. थ्रिलर स्वरूपाचा बर्‍यापैकी वेगवान आणि गुंतागुंतीची कथा असलेला हा चित्रपट आहे. मला बरा वाटला. कथेमध्ये बर्‍यापैकी गुंतून राहिलो. पुढे काय होणार ही उत्कंठा शेवटपर्यंत राहिली. चर्चच्या पवित्र स्वरूपा मागचे काळेकुट्ट सत्य पाहतांना कसे तरीच झाले. कथेला येणारी अनपेक्षित वळणे आणि कलाटण्या मस्त आहेत. ब्रेनरने क्रुस आपल्या खांद्यावरून वाहून नेणे वगैरे कथेला सयुक्तिक. (चित्रपट पाहतांना कृपया ऍक्शन सीन्सची हॉलिवुडशी तुलना करू नका. कारण त्यातल्या ऍनिमेशन्सनी आपला अपेक्षांचा 'बार' फार उंचावून ठेवलाय. यातल्या ऍक्शन्स बर्‍यापैकी वेगवान आहेत.) चित्रपटाचे नाव : सायलेंटीयम Silentium भाषा: ऑस्ट्रियन- जर्मन वर्षः २००४ लेखक: वुल्फ हास Wolf Haas दिग्दर्शकः वुल्फगॅन्ग मुर्नबर्गर Wolfgang Murnberger प्रमुख भुमिकेत: जोसेफ हेदर Josef Hader, सायमन श्वार्झ Simon Schwarz आणि इतर
छोटा डॉन

In reply to by ऋषिकेश

सहमत आहे. सिनेमा पहावा अशी इच्छा झाली. अवांतर : एकाहुन एक असे अपरिचीत आणि अनवट चित्रपटांची ओळख करुन देणार्‍या निनाद ह्यांचे कौतुक आहे आणि त्याबद्दल त्यांचे आभार मानतो ... :) - छोटा डॉन
07/01/2011 - 10:33 Permalink
गणपा

In reply to by छोटा डॉन

डॉनच्या शब्दा शब्दाशी सहमत.
07/01/2011 - 13:14 Permalink
निनाद

In reply to by छोटा डॉन

धन्यवाद डॉन आणि गणपा, कौतुक आवडले. जमेल तशी चित्रपट ओळख मालिका सुरु राहील...
09/01/2011 - 04:36 Permalink
ढब्बू पैसा

निनाद तुन्ही इतके उत्तम आणि देशोदेशीचे चित्रपट पाहता त्याचा खरंच हेवा वाटतो! तुमचं लि़खाणही तसंच खूप सुंदर असतं. ही एक अख्खी लेखमाला होऊ शकते, संग्रही ठेवावी अशी :)
07/01/2011 - 11:33 Permalink
सहज

In reply to by ढब्बू पैसा

सहमत आहे. पण श्री. निनाद सिनेमाची सगळी स्टोरी सांगून मोकळे होतात त्यामुळे त्यांचे लेख वाचावे की नको असा प्रश्न पडतो. प्रतिसाद पाहून ठरवत जाईन आता. अगदी हाच विषय नाही पण युरोपात ह्युमन (फिमेल)ट्र्रॅफिकींग व अब्युज विषयावर आधारलेला एक्शन थ्रिलर (पैसा वसुल मसाला सिनेमा) - टेकन (दिग्दर्शक - लुक बेसन व अभिनेता - लियाम निसन) बघायला थ्रिल वाटले होते. तमीळ सिनेरसीकांसाठी अवांतर - डॉ. विजयकांत या सदाबहार अभिनेत्याने टेकन सिनेमावर आधारीत विरुधागिरी चित्रपट काढून दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला.
07/01/2011 - 13:03 Permalink
निनाद

In reply to by सहज

सॉरी सहज! मागल्यावेळी भावनेच्या भरात ती सांगून गेलो. पण यावेळी ती चूक केलेली नाही. पुढेही जर कथा पुर्णे दिली तर पांढर्‍या रंगातच देईन. हा चित्रपट ह्युमन ट्रॅफिकींग यापुरता मर्यादीत नाही.त्यात्या कथानकात दिसणारे एक अंग आहे इतकेच. मी पाहिलेला खिळवून ठेवणारा ह्युमन ट्रॅफिकींग व अब्युज विषयावर आधारलेला चित्रपट म्हणजे लिल्ल्या फोर एव्हर Lilya 4-ever. हा नक्क्की पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट मझ्या मनातून जाऊच शकला नाहीये आजवर...
09/01/2011 - 04:48 Permalink
निनाद

In reply to by ढब्बू पैसा

एक काळ असा होता की भारतीय आणि हॉलिवुडचे देमार मठ्ठ चित्रपट याशिवाय काही पाहायला मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. म्हणून आज आयुष्यात संधी मिळाली आहे तर त्याचा पुरेपूर फायदा घेतो आहे! माझ्यासारखेही कुणी असतील ज्यांना हे पाहावेसे वाटत असेल पण मिळत नसेल त्यांच्यासाठी हा लिखाणाचा खटाटोप. माझे लिखाण आवडते आहे हे वाचून आनंद झाला. ही एक लेखमालाच आहे आणि ती जमेल तशी सुरु राहील.
09/01/2011 - 04:42 Permalink
विनायक बेलापुरे

निनाद एक चांगला चित्रपट. तुमचे लिखाण नेहमीच आवडते. धन्यवाद. असाच एक पोलिश चित्रपट पाहिल्याचे आठवते. फ्रान्समध्ये अल्बानीयन्स,इटालियन्स आणि उत्तर आफ्रिकन्स असली नाटके करत असतात पण जर्मनीत अश्या गोष्टी चालू असतात वाचून आश्चर्य वाटले.
09/01/2011 - 07:00 Permalink