तोक्यो गोमी ओन्ना
तोक्यो गोमी ओन्ना
अर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल
मियुकी (नाकामुरा मामी) ही तोक्यो मधल्या एका कॅफेमध्ये वेट्रेस आहे. तिला या कॅफेमध्ये एक मैत्रिण आहे. ही बिनधास्त मैत्रिण नवनवीन जोडीदार शोधत राहते. आपल्या शैय्यासुखाचे किस्से मियुकीला ऐकवत राहते.
मियुकी तिच्या अपार्टमेंट मध्ये राहणार्या संगीतकाराच्या (कझुमा सुझुकी) प्रेमात पडली आहे. पण हे प्रेम व्यक्त करण्याचे धाडस तिच्या मध्ये नाही. रोज रात्री ती कुणी पाहत नसतांना त्याचा कचरा उचलून आपल्या घरी घेऊन येते. त्यातून त्याच्या आयुष्याची चाहूल घेत राहते. त्याचा कफल्लकपणा, त्याच्या सिगारेटस् आणि त्यांची पाकिटे जमा करत राहते. त्याने टाकून दिलेले फाटलेले जीन्स चे जॅकेट शिवून घेऊन वापरते. आपल्या छोट्याश्या जगात ती हे सगळे करत असते. एकदा तीला त्या कचर्यात एक वापरलेला निरोध सापडतो. स्पर्धा आल्याचे जाणवल्याने अचानकपणे तीच्या प्रेमाला प्रखरता येते.
याच वेळी मियुकीवर एक साधासा नऊ ते पाच नोकरी करणारा तरूणही प्रेम करत असतो. पण ती त्याला झिडकारत राहते.
एका क्षणी एका ओस पडलेल्या मद्यालयात त्या संगीतकाराची आणि मियुकीची भेट होते. पुढे जाऊन ती रात्र त्याच्या सोबत घालवते. हा काळ बरोबर घालवल्यावर तिला काही गोष्टींची जाणीव होते.
तिने त्याच्या कचर्यातून आपल्या मनात विणलेली प्रतिमा प्रत्यक्षाहून भिन्न असते. तिचे प्रेम त्या प्रतिमेवर असते. प्रतिमेला तडा गेल्याने ती अचानकपणे मुक्त होते आणि एका क्षणी तिने गोळा केलेला सर्व कचरा फेकून देते.
चित्रपटातल्या कोणत्याही व्यक्तीरेखा फारश्या परिणामकारक दिसत नाहीत. मियुकी साधीशी पण चमत्कारीक वाटते.
चित्रपट बघून संपल्यावरही मी बराच काळ विचारच करत बसलो. मला चित्रपट विस्कळीत वाटला. पण र्युचि हिरोकी इतका ढोबळ चित्रपट बनवेल असे वाटले नाही. अजून विचार केल्यावर मला वाटले की यातून अजून काही अर्थ असावा. कदाचित मला हा चित्रपट पूर्णत्वाने समजला नाही. कदाचित भाषांतराचाही परिणाम असावा. हा चित्रपट कंझ्युमरिझमवर भाष्य करतो वगैरे वाचले पण मला तितकेसे झेपले नाही. तुम्ही पाहिला असेल नि या चित्रपटात तुम्हाला काही अर्थ सापडत असेल तर अवश्य कळवा, लिहा.
चित्रपटाचे नावः तोक्यो गोमी ओन्ना Tokyo Trash Baby
भाषा: जपानी
वर्षः २०००
पटकथा लेखक: शोतारो ओइकावा Shôtarô Oikawa
दिग्दर्शकः र्युचि हिरोकी Ryuichi Hiroki
प्रमुख अभिनेते: नाकामुरा मामी Nakamura Mami, कझुमा सुझुकी Kazuma Suzuki
वाचने
2225
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
मी चित्रपट पाहिलेला नाही, पण समकालीन जपानी संस्कृतीवर भाष्य करणारे इतर चित्रपट पाहिलेले आहेत. पाश्चिमात्यांची जीवनशैली अजिबात आधुनिक वाटणार नाही इतकी आजची जपानी (आणि दक्षिण कोरिअनही) तरुण पिढी तंत्रारूढ आणि एकलकोंडी झालेली आहे. एका बाजूला सतत 'कनेक्टेड' असणं, सर्व सुखं (लैंगिकही) सहज उपलब्ध असणं आणि दुसर्या बाजूला तितकंच रितं, भकास आयुष्य जगत राहणं यांचा तिथं कडेलोट जाणवतो. जुन्या जपानी संस्कृतीशी त्यांचं अजिबात नातं लागत नाही. त्याचंच या चित्रपटात एक दर्शन घडत असेल असं वाटतं.
In reply to जपानी समकालीन संस्कृती by चिंतातुर जंतू
>>"पाश्चिमात्यांची जीवनशैली ...जुन्या जपानी संस्कृतीशी त्यांचं अजिबात नातं लागत नाही"
आपल्या देशात देखील हेच पहायला मिळणार आहे का निकट भविष्यात??? :(
अर्धवटराव
In reply to जपानी समकालीन संस्कृती by चिंतातुर जंतू
जपानी जीवनशैली अति पाश्चात्य(? की मुक्त की अति बंधित?) आहे हे अनेक चित्रपटांवरून कळते. रिते आयुष्य मात्र जगात सर्वत्रच पाहायला मिळते असे वाटते. कारण रितेपण हा बहुदा मनात असतो.
या चित्रपटात मियुकीची मैत्रिण मुक्त लैगीक जीवन अनुभवते आहे. पण ती त्यात बुडालेली असली तरी मला त्यात रितेपणाच वाटला. पण त्याच वेळी मियुकी मात्र रितेपणात बुडालेली नाही. ती संगीतकाराच्या प्रेमात आहे. आणि त्यासाठी ती काहीसा विद्रोही आणि एकलकोंडा मार्ग शोधते आहे असे दिसते.
जुन्या नव्या विषयी झगडा या चित्रपटातही दिसून येतो. मियुकी जेथे काम करते त्या कॅफे मधले एक गिर्हाईक सदैव त्याने (किंवा त्याच्या पीढीने) कसे भव्य काम केले आहे ते ऐकवत राहतो. 'आम्ही जर नवीन कचरागृह बांधले नसते तर आज तोक्यो म्हणजे एक मोठी कचराकुंडी झाले असते' असे त्याचे उद्गार येतात.
कुठे सापडेल?
बघायला हवा..
कन्झ्युमरिझम आणि कचरा गोळा करणे यात फारसा फरक नाही म्हणून तसे म्हटले गेले असावे.
कथा तर चांगली आहे पण तरीही पाहावासा वाटत नाहीये.
मी स्वतः जपानला गेलो नसलो तरी बायको जपानला बरेच वास्तव्य करून होती. तिच्या कडून ऐकलेल्या माहितीशी सुसंगत कथा आहे. तिथे हल्लीच्या पिढीतील बर्याच मुलींना लग्नच करायचे नाहीये. ज्यांना करायचे आहे त्या अत्यंत कल्पनारम्य जगतात वावरणार्या आहेत व एखादा राजपुत्र कल्पित आहेत. या एकूणच समाजाच्या तुकड्याचे चित्रण ह्या चित्रपटात केले आहे. कचरा हा समाजातून हद्दपार होत असलेल्या भावना आहेत.. आधी छोट्या गोष्टी, कपडे(लज्जा) आणि शेवटी प्रेम जाऊन फक्त शय्यासुख उरले असल्याची पावती (निरोध) अश्या दृष्टीकोनातून हा चित्रपट मी पाहिला होता
मात्र विचित्र प्रकाश योजना, नको तेव्हा ध्वनीचा वापर, अजिबात उठाव नसलेली पात्र यामुळे मला चित्रपट आवडला नाही
जपानी समकालीन संस्कृती