संकल्प करावा नेटका...

समीरसूर जनातलं, मनातलं
यावर्षअखेरीस पुन्हा संकल्पांची जत्रा भरेल. सगळे उत्साहात नवनवीन संकल्प करतील. दिनांक १-जानेवारी-२०११ पासून काहीतरी खास नवीन करायला सुरुवात करायची असे मनाशी खूणगाठ मारून ठरवले जाईल. थोडा विचार करता आपल्या लक्षात असे येईल की संकल्प हे तीन प्रकारचे असतात. कुठल्याही गोष्टीचा, घटनेचा, समस्येचा तीन भागात विचार केल्यास आकलन नीट होऊन प्रश्न मार्गी लागतात असे काही व्यवस्थापन क्षेत्रातल्या तज्ञांचे मत आहे. म्हणजे "याचा विचार आपल्याला तीन मार्गांनी करावा लागेल..." अशी सुरुवात केली की आपली छाप पडलीच म्हणून समजा. खोटं नाही सांगत मी, खात्रीसाठी 'द मॅकन्सी वे' हे पुस्तक वाचा. असो. तर पहिल्या प्रकारचे संकल्प म्हणजे लक्षवेधी संकल्प. "महाराष्ट्रातल्या लोप पावत चाललेल्या लोककलांचा धांडोळा घेऊन, त्यांचा सांगोपांग अभ्यास करून महाराष्ट्राच्या मातीचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा एक नवा चेहरा जगासमोर ठेवणे हा माझा या नवीन वर्षासाठीचा संकल्प असेल." कुठल्यातरी स्वयंघोषित लोककलाअभ्यासकाने किंवा कुठल्यातरी विद्यापीठातल्या कला विभागातल्या एका होतकरू प्राध्यापकाने केलेला हा संकल्प आहे हे कळण्यास कुठल्याच प्रकारचा 'धांडोळा' घ्यायची गरज नाही. कुठल्यातरी मुलाखतीत, कुठेतरी कोपर्‍यात आयोजित केलेल्या भव्य चर्चासत्रात किंवा कुठल्यातरी शासकीय छापाच्या अधिवेशनात असा संकल्प केला की मग वारेमाप कौतुक होते आणि प्रसिद्धी मिळते ती वेगळीच. "मला चित्रपटाच्या ऑफर्स खूप येत आहेत पण मला माझ्यातल्या कलाकाराची भूक भागेल असेच चित्रपट नवीन वर्षात करायचे आहेत. सर्जनशीलतेचा कस लागेल अशा दर्जाच्या भूमिका येत्या नवीन वर्षात करायच्या हा माझा संकल्प आहे..." "ऑफर्स तो बहुत हैं पर आय डोंट वाँट टू बी टाईपकास्ट, आय वाँट टू प्रूव्ह माय कॅलिबर इन व्हरायटी ऑफ रोल्स...तो कुछ अलग, कुछ मेरे अंदर के कलाकार को चॅलेंज कर सके ऐसे रोल्स मैं करू यही मेरा न्यू ईयर रेसॉल्युशन हैं..." आफ्ताब शिवदासानी, शेरलीन चोप्रा, सायली भगत, विवेक ओबेरॉय, लारा दत्ता असल्या पडेल कलाकारांचा संकल्प वाटतो ना हा? हो, त्यांचाच आहे. चित्रपट मिळवता मिळवता यांची दमछाक होते; पण सांगणार कसे? असो. "जनतेचे प्रश्न ताबडतोब सोडवून या ठिकानी त्यांच्यावर होनार्‍या अन्यायाला वाचा फोडने, महागाईच्या विरोधात आवाज उठवून जनतेसाठी या ठिकानी स्वस्त भाजीपाला उपलब्ध करून देन्याची मागनी करने आनि जनता हाच खरा देव असा मंत्र मानून त्यांच्या भल्यासाठी या ठिकानी झटने हा माझा यावर्षीचा संकल्प आहे..." विरोधी पक्षाचा एखादा आमदार आला की नाही डोळ्यासमोर? संकल्पाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वचित्तवेधक संकल्प! काही काही माणसे असतात मजबूत इराद्याची. त्यांच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली की मग ते अजिबात त्यांच्या ध्येयापासून ढळत नाहीत. ठरवलं म्हणजे ठरवलं असा त्यांचा बाणा असतो. त्यांचे सगळे चित्त त्यांच्या संकल्पाने भारावलेले असते. मग नीट विचार करून, योजना आखून, निश्चित ध्येय-धोरणं आखून ही माणसे आपल्या संकल्पपूर्तीच्या दिशेने आगेकूच करतात. आणि यांचे संकल्प हे निश्चित आणि निर्णायक असतात. उदाहरण द्यायचं झालं तर कुणीतरी एखादी अवघड परीक्षा उत्तीर्ण होण्याचा संकल्प करतात, कुणी एखादी बढती मिळवण्याचा संकल्प करतात. आणि असा हा निर्णायक संकल्प पूर्ण करण्यासाठी ही माणसे जीवाचे रान करतात. अशा व्यक्तींच्या आयुष्यात उत्कर्ष अगदी ठायी-ठायी दिसतो. संकल्पाचा सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे समाधान संकल्प! संकल्प केल्याचे मनाला समाधान लाभावे म्हणून केलेला संकल्प म्हणजे समाधान संकल्प! अगदी ढोबळ, प्रसंगी निरर्थक अशा संकल्पांचा भरणा या प्रकारात असतो. "मी नवीन वर्षात खूप वाचण्याचा संकल्प केला आहे..." आता या संकल्पात खरंच काही अर्थ आहे का? अरे बाबा, तू काय वाचणार आहेस? तुझी आवड कुठल्या प्रकारच्या साहित्याची आहे? रोजचे वृत्तपत्र वाचणार आहेस की कथा-कादंबर्‍या वाचणार आहेस? कुठल्या एका विषयासंदर्भात वाचणार आहेस की 'पोलीस टाईम्स' आणि 'हैदोस' वाचणार आहेस? मराठी वाचणार आहेस की इंग्रजी? काही अभ्यास म्हणून वाचणार आहेस की सहज विरंगुळा म्हणून वाचणार आहेस? वर्षाच्या शेवटी तुझा संकल्प पूर्ण झाला अथवा नाही हे कसे ठरवणार आहेस? हे कुठलेच प्रश्न संकल्प करणार्‍या माणसाला पडत नाहीत. संकल्पवीर पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाने एकदम 'द गॉडफादर' घेऊन येतो. लहानपणी वाचलेल्या 'चांदोबा' आणि 'चंपक'च्या अनुभवाच्या बळावर तो एकदम 'द गॉडफादर' वर उडी टाकतो. म्हणजे दिनो मोरया किंवा अश्मित पटेल यांनी जर 'दीवार' मधली अमिताभची भूमिका करायची ठरवली तर जे काही होईल तेच आपल्या वीराचे 'द गॉडफादर' सुरु केल्यावर होते. दोन-तीन पाने वाचल्यावर पुढच्या पानावर त्याला झोप यायला लागते. नंतर गुन्हेगारी जगताच्या अनिभिषिक्त सम्राटावर आधारित 'द गॉडफादर' वर फक्त धुळीचेच साम्राज्य पसरते. साधारण नव्वद टक्के संकल्प समाधान संकल्प या प्रकारात मोडतात. वजन कमी करण्याचा संकल्प हा असाच एक ऑलटाईम फेवरीट संकल्प असतो. "बघ हं, आज ८० किलो आहे. आज एक तास व्यायाम केला आणि एक तास फिरायला गेलो, गोड, भात, बटाटे बंद!..." "आज पाय दुखतायेत यार...आज थोडाच व्यायाम करतो. फिरायला नाही जात आज...अरे, आज मानसीकडे पार्टी आहे ना? आजच्या दिवस गोड खाईन यार...." "च्यायला, वजन तर ८२ किलो झालंय यार...साला, काय करायचं यार?" झालं, वजन कमी करण्याचा संकल्प घामावाटे वाहून जातो. अजून एक असा लोकप्रिय संकल्प म्हणजे धुम्रपान सोडण्याचा संकल्प. मोठ्या कष्टाने आपला एखादा हीरो धुम्रपान सोडण्याचा संकल्प सोडतो. मित्र सिगारेट ओढत असतांना आपला हीरो ओठांवरून जीभ फिरवत लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. मुद्दाम मग धुम्रपानाचे दुष्परिणाम, आदर्श घोटाळा, वाढता भ्रष्टाचार असल्या वेळकाढू विषयांवर तावातावाने बोलत तो आपली तलफ दाबून ठेवतो....असाच एक दिवस आपला हीरो आणि त्याचा एक मित्र ऑफीसजवळच्या एका टपरीवर चहा घेत बसलेले असतात. हीरोचा मित्र निवांत धूर सोडत बसलेला असतो. संध्याकाळची हूरहूर लावणारी वेळ असते. अचानक आकाशात काळेकुट्ट ढग गोळा होतात. वातावरण एकदम पावसाळी होते. आपला हीरो टक लावून गच्च भरलेल्या ढगांकडे बघत असतो. ढगांच्या आड त्याला त्याच्या आठवी ब मधल्या प्रेयसीचा चेहरा दिसतो. आपला हीरो व्याकूळ होतो. कुठे असेल ती? मी लक्षात असेन का तिच्या? मागच्या बेंचवर बसून कशी खुदकन हसायची आपल्याकडे बघून...आता हसत असेल का ती तसं? किती वर्ष लोटली....आपला हीरो एक निश्वास टाकतो. त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. तो शाहरुखसारखं त्या ओलावलेल्या कडा टिपतो...काय सुंदर होती ना ती! तिच्या त्या दोन वेण्या, निळा फ्रॉक, तिचे ते काळेभोर डोळे, मऊ गाल...अहाहा...आठवलं की कळ निघते छातीतून...तेवढ्यात फोन वाजतो. "हं, काय गं?" (आत्ताच फोन करायचा होता हिला? च्यायला, कुठे आठवी ब...) "केव्हा येणार आहेस घरी? मी वाट बघतेय..." "कशाला?" (वस्सकन ओरडणे कसे असते हे वेगळं सांगायला हवं का?) "अरे असं काय करतोयस? तुझ्या लक्षात नाही का?" "नाही. काय आहे?" (आता म्हणेल, शिंगाड्याचं पीठ आणि गूळ आणा येतांना. काय खरं आपलं नशीब!) "तुझ्या खरंच लक्षात नाही?" "हे बघ, डोकं नको खाऊस. काय ते पटकन सांग, कामं आहेत मला." (सच मेरे यार हैं, बस वही प्यार हैं, जिसके बदले में कोई तो प्यार दे, बाकी बेकार हैं, यार मेरे...) "अरे आज आपली अ‍ॅनिव्हर्सरी आहे, विसरलास ना तू?" "अर्र...च्यायला... नाही गं, विसरेन कसा? मी आलोच अर्ध्या तासात..तुझं गिफ्ट पण घेतलेलं आहे मी...अरे वा...असं कसं..." (च्यायला, काय घ्यावं हिच्यासाठी? परफ्युम घेऊन टाकू एक. स्वस्तात आणि लगेच घेता येतो...येस्स) "आता बस तिथेच...मी चाललेय मानसीकडे. तिने पिझ्झा मागवलाय..." "अगं पण..." (फोन बंद) च्यायला...काय डोक्याला ताप आहे राव हा! ढगाआड ती आठवी ब, कोसळणारा पाऊस, कुरतडणारी संध्याकाळ...अरे पाऊस तर पडतोय पण माझ्या हृदयाच्या तृष्णेचं काय? ते तर तहानलयं ना अजून....त्यात आता ही रुसली म्हणजे घालवा आता एक दिवस तिला वाटेवर आणायला....जाऊ दे मरू दे "एक कश दे रे..." असा हा एक कश हळूहळू आपल्या हीरोला पूर्वपदावर आणतो....संकल्प धूरासोबत उडून जातो...राहते ती फक्त आपल्या इच्छाशक्तीची राख!!
वर्गीकरण
लेखनप्रकार

16 टिप्पण्या 3,322 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

चिगो नवीन

कुठल्या एका विषयासंदर्भात वाचणार आहेस की 'पोलीस टाईम्स' आणि 'हैदोस' वाचणार आहेस? अधोरेखीत पुस्तकामुळे विवाहीत/ अविवाहीत/अर्धविवाहीत/घटस्फोटीत इत्यादी लोकांच्या व एकूणच समाज-मनाच्या (का समाज-मानसाच्या?) दाबून दाबून कुंठीत झालेल्या भावनांचा निचरा कसा होतो, ह्याचा समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून अभ्यास करणार आहे...

utkarsh shah नवीन

In reply to by चिगो

अधोरेखीत पुस्तकामुळे विवाहीत/ अविवाहीत/अर्धविवाहीत/घटस्फोटीत इत्यादी लोकांच्या व एकूणच समाज-मनाच्या (का समाज-मानसाच्या?) दाबून दाबून कुंठीत झालेल्या भावनांचा निचरा कसा होतो, ह्याचा समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून अभ्यास करणार आहे... अर्धविवाहीत हा काय प्रकार असतो चिगो??? कॄपया शंकानिरसन केले तर आमच्या ज्ञानात अजुन भर पडेल.........

विनायक बेलापुरे नवीन

In reply to by utkarsh shah

अर्धविवाहित म्हण्जे जे अद्यापि मांड्वाखालून गेलेले नाहीत पण मांडवाखालून गेल्यासारखे राहतात ते (हुशार लोक ?;)) !

नगरीनिरंजन नवीन

मस्त! भारी निरीक्षणे आणि खुसखुशीत लिखाण! एकवेळ स्वतःचं नाव विसरला तर चालेल पण लग्नाचा वाढदिवस विसरला तर नवर्‍याची धडगत नसते. मग शेवटची इच्छा म्हणून सिगारेट प्यायली जाते. :-)

५० फक्त नवीन

छान लेख आहे, येत्या वर्षात हसत खेळत सुखानं जगायचं असा नेहमीचा संकल्प मागील पानावरुन पुढे चालु ठेवायचा असं ठरलं आहे.

विनायक बेलापुरे नवीन

छान लेख आहे. संकल्प वगैरे करुन काहीहि होत नाही असे लक्षात आल्यामुळे संकल्प करत नाही. स्पॉन्टेनीटी शुड ड्राईव्ह मी !!! :)

इन्द्र्राज पवार नवीन

धाग्याचे जे शीर्षक आहे "संकल्प करावा नेटका..." तेच खरे तर संकल्पाचा 'पक्का दुश्मन' होते. संकल्प तर प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरुवातीस मनी येतोच पण तो 'नेटका' कसा सिद्धीस न्यावा हेच उमगत नसल्याने, निव्वळ संकल्पांची जंत्री करून त्या महिन्यातच तरंगत राहायचे आणि फेब्रुवारी उजाडला की परत ये रे माझ्या मागल्या म्हणत रहाटगाडग्याला जुंपून घ्यायचे...हे जवळपास प्रत्येकाच्याबाबतीत घडत असावे. वर श्री.समीर यानी म्हटल्याप्रमाणे "समाधान संकल्प" हेच खरे. "या वर्षी मी होंडाऐवजी सायकल वापरणार...", "मी आता रात्रीचे जागरण करणार नाही...", "कोणत्याही परिस्थितीत चालू वर्षी समग्र शेक्सपीअर वाचून संपविणारच....", "या वर्षी बघ नेफा भागात भटकंती करून दाखविणारच..." ~ हे वर्षानुवर्षे मनी ठेवूनही पूर्ण न झालेले तरीही ताजे टवटवीत राहिलेले काही संकल्प. तर आता २०११ चा संकल्प ~~ जर करण थापर हे थोर गृहस्थ 'डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट' या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्याचे मत/वाक्य मध्येच तोडून आपलेच घोडे बेमुर्वतखोरपणे दामटत राहतील तर त्यापुढील मुलाखत पाहायची नाही ~ पाहू या, निदान हे तरी शेवटपर्यंत सिद्धीस जाते का. इन्द्रा