"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग १(ब) "परिचय" प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती
"भारतीय - कसा मी? असा मी"
प्रकरण पहिले-भाग १(ब) "परिचय"
प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती
मूळ लेखक: पवनकुमार वर्मा
अनुवाद:सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकाची आहेत.)
-------------------------------------------------------------------------------------------------
एकाद्या समाजाने "आपण कसे आहोत किंवा कसे असायला हवे" याबद्दल कांहीं च्या आधीपासूनच बनविलेल्या असतात. त्या समाजाच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दलचे केलेले चित्रण त्या कल्पनांशी तंतोतंत जुळत नाहीं म्हणून त्या चित्रणातली टीका चुकीची ठरत नाहीं.
समाजाचे स्वभाववैशिष्ट्य कांहीं एकाद्या जादूगाराच्या पोतडीतून बाहेर काढता येत नाही, मग त्या जादूगाराचा हेतू कितीही चांगला असो! या उलट राष्ट्राची खरी शक्ती आणि चिकाटी बर्याचदा आपल्या स्वत:बद्दलच्या अशा अतिरंजत कल्पनांशी संबंध नसलेल्या स्वभाववैशिष्ट्यांतच असते. तसेच कुठलेही एक स्वभाववैशिष्ट्य बाकीच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून अलग करून पहाता येणार नाहीं, सगळी स्वभाववैशिष्ट्ये एकत्रच पाहिली पाहिजेत. उदाहरणार्थ भारतातील ऊतू जाणारा प्रचंड भ्रष्टाचार! मूलभूतपणे पाहिल्यास भ्रष्टाचार नकारात्मकच आहे पण भारतीयांनी भौतिक ऐश्वर्याला इतके महत्व दिले नसते तर ते कल्पक व्यावसायिक बनूच शकले नसते. या उलट ते जर इतके व्यावहारिक नसते, सचोटीने वागणारे असते आणि अंतिम यश मिळविण्यासाठी कांहींही बरे-वाईट करायला तयार झाले नसते तर ते इतके भ्रष्टही झाले नसते!
एकाद्या समाजाचे व्यक्तिमत्व हा खूपच गुंतागुंतीचा आणि परस्पर जुडलेला विषय आहे हेच खरे. त्याचे हवे तसे तुकडे करता येणार नाहींत. खरे तर पूर्वीच्या काळी भारतीयांचे तथाकथित ’फारसे कौतुकास्पद नसलेले’ गुणच भारताला उपयोगी पडले होते असे सिद्ध करण्याचा हे पुस्तक प्रयत्न करणार आहे. उदाहरणार्थ विलायती विचारांनी प्रभावित असलेले घटना परिषदेतील कांहीं सभासद मानत कीं समाजातील प्रत्येक घटकाला समानता देण्यासाठी सांसदीय लोकशाही हीच एक जादूची कांडी आहे. ज्या भारतीयांना त्यावेळी खरोखरच जर असे वाटले होते त्यांचा आज पार भ्रमनिरास झाला असता आणि जसा इतर विकसनशील देशानी हुकुमशाहीचा अवलंब केला तसा भारतानेही केला असता. पण इंग्लंडहून आयात केलेले हे ’कलमी रोपटे’ इथे जगले त्याचे कारण वेगळेच आहे. बहुतेक भारतीयांना लोकशाही म्हणजे स्वत:चे वैभव वाढविण्याचा राजरोस आणि परिणामकारक मार्ग आहे हे लक्षात आले होते हेच ते कारण आहे. भारतातील लोकशाहीच्या वाढीच्या दृष्टीने ही घटना सुदैवी होती असेच म्हणावे लागेल. पुरेसा वेळ दिल्यानंतर हे लोकशाहीचे फुलपाखरू आपल्या सदोष कोषावस्थेमधून बाहेर पडायला आता तयार झाले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या स्वाभाविक मोहाने लोकशाहीच्या प्रक्रियेत भाग घेण्यात जास्त-जास्त मातब्बर लोकांना (आणि त्यांच्या ’कळपा’तल्या अनुयायांना) एक तर्हेची प्रेरणाच मिळाली. अनियंत्रित अस्थिरतेच्या जन्मजात भीतीचे कितीही बाकी दोष असोत पण त्या भीतीने ’कुदेता’सारख्या हिंसापूर्ण पद्धतीने सरकार इथले सरकार बदलले गेलेले नाहीं. आर्थिक फायद्याला मिळणारा अस्थानी आदर आणि त्यातून मिळणारी ऐहिक सुखे यामुळे व्यापारी वर्ग दिवाळखोरीपासून दूर राहिला व त्यांच्यातील उद्योजकतेला खतपाणी मिळाले. उदाहरणार्थ "बर्कीना फासो" या आफ्रिका खंडातील देशाच्या ’वागाडूगू’ या राजधानीतले एकुलते एक डिपार्टमेंटल स्टोअर निर्धन अवस्थेत हातात फक्त एक लोटा घेऊन कांहीं वर्षांपूर्वी आलेल्या एका भारतीयाच्या मालकीचे आहे. जिथे जीवावरच बेतते तिथे वीरोचितपणे शेवटच्या सैनिकापर्यंत लढण्यापेक्षा तडजोड करून मिळून-मिसळून जगण्याकडे जात्याच असलेल्या कलामुळेच हिंदू धर्म आणि संस्कृती दोन्ही एका पाठोपाठ आलेल्या आणि जबरदस्तीने धर्मांतर करविणार्या आक्रमकांना पुरून उरल्या.
या पुस्तकात नजीकच्या भविष्यकाळात होऊ घातलेल्या तीन घडामोडींची चर्चा केलेली आहे. येत्या कांहीं वर्षात या घडामोडींचा भारतीयांच्या व्यक्तिमत्वावर खूपच प्रभाव पडणार आहे. पहिली घडामोड आहे सकल-भारतीयत्वाबद्दल (pan-Indianness). भारताच्या सांस्कृतिक ऐक्यावर खूप लिखाण झालेले आहे आणि ते योग्यच आहे. पण या लिखाणांतून एकमेकांपासून दूर गेलेल्या आणि खूप विविधता असलेल्या भारतीयांच्या संस्कृतील साधर्म्य सूक्ष्म दृष्टीने ओळखण्याचा प्रयत्न होता. इतिहास, संस्कृती, परंपरा आणि भारतीय मानसिकतेतील स्पष्ट छटांचा उपयोग करून भारतीयांचे स्वत:चे असे व्यक्तित्व घडविले गेले आहे. पण या व्यक्तित्वाला अद्याप अखिल भारतीय स्वरूप आलेले नव्हते. वाराणसीतील भारतीय आणि त्रिचुर येथील भारतीय संस्कृतमधले तेच धडे गिरवत असले किंवा दोघेही तेच सण साजरे करत असले तरी एकमेकांबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. आपापसात फारसा संपर्क नसल्यामुळे या भारतीयांची आपापसात अनुभवांची देवाण-घेवाणही नव्हती. १९४७ सालानंतरच्या दशकांत यात हळूहळू बदल होत गेला व अलीकडच्या कांहीं वर्षांत हा बदल नाट्यपूर्ण वेगाने घडलेला आहे!
दुसरी आगामी घडामोड आहे पूर्वीच्या काळी अत्यंत अढळ समजल्या जाणार्या समाजरचनेतील (social hierarchy) हळू-हळू पण लक्षात येण्याइतका झालेला र्हास. भारतीय लोकांना आपल्या समाजरचनेची, पदक्रमाबाबतची (hierarchy) खूपच जाणीव असते. त्यात आपापल्या जातीवरील एकनिष्ठा आजही अस्तित्वात आहे. पण यात आतापर्यंत शांत असलेले दलित लोक ही बंधने झुकारून टाकायला पूर्वी कधीही नव्हते इतके उत्सुक आहेत. देशाच्या संपत्तीतील मोठा हिस्सा आपल्याला मिळण्याबद्दलची त्यांची महत्वाकांक्षा आता दडपणे किंवा लपविणे आता शक्य नाहीं. लोकशाहीच्या राजकारणात असले उच्चभ्रूंना ’असले अनपेक्षित’ परिणाम पसंत नसतील पण लोकशाहीने टप्प्याटप्प्याने बहाल केले अधिकार आणि त्यातून ठिबकत खाली आलेली आर्थिक सुबत्ता यामुळे जास्त-जास्त भारतीयांमध्ये त्याबद्दलच्या महत्वाकांक्षा आणि अपेक्षा पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या ज्वलंत झाल्या. अशा तर्हेने नव्याने अधिकार मिळविलेले आणि प्रगतीच्या दिशेने निघालेले भारतीय एकविसाव्या शतकात भारताचे परावर्तन कसे करतील? समाजात शतकानुशतके चालत येऊन प्रस्थापित झालेल्या चालीरीतींची नव्याने छाननी केली जाऊन त्यांना जेंव्हां आव्हान देण्यात येईल-तेसुद्धा राजकीय नेतृत्वाच्या शाब्दिक अवडंबराच्या पलीकडे जाऊन-तेंव्हां कसल्या तर्हेचा आगडोंब उसळेल? जुन्या समाजरचना आणि त्या समाजरचनांतून उद्भवलेली मानसिक प्रवृत्ती यांचे नव्याने जोषात आलेल्या आणि हिरीरीने बदल घडवू पहाणार्या सुधारकांकडून संपूर्ण उच्चाटन होईल? कीं हे सुधारक जुलुमी प्रवृत्तीचा नाश करण्याऐवजी त्यांच्यावर एकेकाळी अन्याय करणार्यांचे अनुकरण करून फक्त आपल्या पोळीवर ओढता येईल तितके तूप ओढण्यातच दंग होतील?
भारताचा माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक "जागतिक शक्ती" या नात्याने झालेला उदय ही तिसरी घटना आहे. जगातल्या सर्वात जास्त अशिक्षित लोक असलेल्या देशाकडे असे माहिती-तंत्रज्ञानाचे नेतृत्व यावे हा एक विरोधाभास आहे, पण शिक्षणाला भारतातील उच्चभ्रू (Elite) समाजाने-त्यातही ब्राह्मण समाजाने-आपले प्रस्थापित श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी नेहमीच अनन्यसाधारण महत्व दिले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर प्राथमिक शिक्षणाची खोटी-खोटी जपमाळ ओढता-ओढता उच्च शिक्षण देणार्या संस्था उभारून त्या चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतविणे सत्ताधार्यांनी सातत्याने चालू ठेवले. या दुटप्पी धोरणाचे परिणाम भाकितानुसार झालेले दिसून येत आहेत. तंत्रज्ञानात प्राविण्य असलेला जगातील एक सर्वात मोठा समाज आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि संगणकाच्या तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण देऊ शकणार्या अनेक संस्था भारतात उभारल्या गेल्या. राजकारणाच्या ’व्यवसाया’प्रमाणेच उच्च शिक्षणाने विभूषित असणे ही झटपट प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारी एक गुरुकिल्लीच ठरली. माहितीतंत्रज्ञानाच्या या क्रांतीसाठी तरुण भारतीयांच्या सहभागाकडे या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. भारतातील ’सॉफ्टवेअर’मधील व्यवसायिकांना जागतिक स्तरावर मागणी आहे. आज भारताच्या ’सॉफ्टवेअर’ उद्योगाच्या निर्यातीची तूलना अरब देशांच्या तेलनिर्यातीशी केली जाऊ लागली आहे. ’कॉल सेंटर’ उद्योगात भारताला एक जागतिक शक्ती (Superpower) समजले जाऊ लागले आहे. जगातील ५०० सर्वात मोठ्या उद्योगातील ४० टक्के उद्योग त्यांचे हिशेब-ताळेबद ठेवणे, डिझाईन-ड्रॉइंगचे काम, गिर्हाइकांबरोबर संपर्क ठेवण्याचे काम वगैरे आज भारतात करत आहेत. ही चढती कमान अशीच टिकून राहील काय? भारतीयांना या क्षेत्रात स्वाभाविक उपजत कौशल्य आहे काय? या क्रांतीत किती भारतीय सहभागी होतील आणि या क्रांतीचा फायदा घेतील? ’सिलिकन व्हॅली’तील नवकोट्याधीशांच्या या नवीन उपक्रमाचे किती प्रमाणावर अनुकरण केले जाईल? कीं आपण ’सॉफ्टवेअर’ क्षेत्रातले हमाल रहाण्यातच समाधान मानू? याही पुढे जाऊन हे पाहिले पाहिजे कीं या नव्या प्रथेचा किंवा प्रवृत्तीचा भारतीयांच्या प्रतिमेवर कसा परिणाम होईल? उदाहरणार्थ सायप्रसमध्ये घरकामाला येणार्या मोलकरणी आणि नोकर-चाकर श्री लंकेतून आणि फिलिपीन्समधून येतात तर ’सॉफ्टवेअर’ क्षेत्रातले तंत्रज्ञ भारतातून येतात. भारतीय तंत्रज्ञ अशा तर्हेच्या जागतिक अपेक्षानुसार स्वतःला बदलतील काय? आणि कुठल्या बाबतीत ते न बदलता आहेत तसेच रहातील?
समाज बदलत रहातो पण बदल किती घडेल यालाही सीमा असते. शतकानुशतके अंगवळणी पडलेली कांहीं स्वभाववैशिष्ट्ये, लकबी बदलणार नाहींत. आणि ही न बदलणारी स्वभाववैशिष्ट्येच समाजाच्या व्यक्तिमत्वाला एक स्पष्ट आणि स्वतःचे असे सांस्कृतिक ’खूणचिठ्ठी (label)’ देतात. बाकीची स्वभाववैशिष्ट्ये सौम्य होऊ शकतात किंवा बदलता येऊ शकतात. कांहीं आधी नसलेल्या स्वभाववैशिष्ट्यांची भर घालता येते पण अशा तर्हेने वाढविलेली स्वभाववैशिष्ट्ये म्हणजे एकाद्या भव्य इमारतीवर काम करताना कामगारांना उभे रहाण्यासाठी तात्पुरत्या उभारलेल्या आधारफळ्यासारखीच (scaffolding) असतात. आणि या नव्या-जुन्या स्वभाववैशिष्ट्यांच्या संयोगातून होणारी सांस्कृतिक घडणच प्रत्येक मनुष्याला आयुष्यभर साथ देते.
The End of History and the Last Man या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक फ्रान्सिस फुकुयामा यांना वाटले कीं शीतयुद्ध संपल्यावर आणि भांडवलशाहीच्या पाश्चात्य विचारसरणीची स्वीकृती झाल्यावर वर्तमानकाळात आजच भविष्यकाळ अवतरला आहे. पण ही घटना सगळीकडे लागू पडते असे जरी अंगिकारले तरी भारतासारख्या जुन्या संस्कृती आपले ध्येय कसे गाठतात यात नवा एक इतिहास घडणार आहे. एकमेकांशी संपूर्णपणे जोडल्या गेलेल्या या जगात अमेरिकन्स, जपानी, चिनी किंवा जर्मन लोकांपेक्षा भारतीय कुठल्या बाबतीत आणि किती वेगळे आहेत हे फारच महत्वाचे असणार आहे. आपल्या "Trust; The Social Virtues and the Creation of Prosperity" या नव्या पुस्तकात फुकुयामांनी स्वतःच नंतर हे कबूल केले.
वेगवेगळ्या राष्ट्रांची सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष निर्माण करण्याची क्षमता किती आहे हे त्या त्या राष्ट्राच्या संस्कृतीवर अवलंबून असते असे ते म्हणतात. संस्कृतीची व्याख्या ते "नैतिक संवयींचा वारसा" अशी करतात. प्रतिमा, संवयी आणि बुद्धीला सहज पटणारी सामाजिक मते या तीन्हींच्या एकत्रीकरणातून बनते. एकाद्या सर्वत्र लागू पडणार्या नियमात तिचे रूपांतर होत नाही. कांहीं रूढी आणि कांहीं विशिष्ठ सांस्कृतिक संवयी कुठल्याही समाजाच्या अंगवळणी पडलेल्या असतात. अर्थशास्त्रात सर्व लोकांना सारखा लागू होईल आणि बदलणार नाहीं असा कुठलाच नियम अस्तित्वात नाहीं. कारण अर्थशास्त्र सामाजिक जीवनावर आधारित असते आणि आधुनिक समाजाची रचना कशी आहे हे कळल्यावरच तिथे अर्थशास्त्राचे नियम वापरता येतील. या सिद्धांतावर फुकुयामांनी निष्कर्ष काढला कीं ज्या समाजात परस्परांबद्दल भरपूर विश्वास असेल आणि ज्या समाजात प्रामाणिकपणा आणि परस्परसहाय्य याबाबत आपापसात मान्य असलेले परिमाण असेल असेच समाज मोठ्या आणि परिवर्तनशील व्यावसायिक संस्था (business organisations) उभारू शकतील.
फुकुयामांनी अमेरिकन समाजाचा आणि अमेरिकनाना स्वतःच्याच समाजाला नीट ओळखण्यात आलेल्या अपयशाचा अभ्यास केला. त्यानी चिनी, फ्रेंच इटालियन दक्षिण कोरियन जपानी आणि जर्मन समाजांचासुद्धा सखोल अभ्यास केला. पण भारतीय समाजाचा मात्र केला नाहीं. तसेच The Clash of Civilizations and the Remaking of World Order सारख्या पुस्तकाचे लेखक सॅम्युएल हंटिंग्टन यांनीही भारतीय समाजाचा अभ्यास केला नाहीं. फुकुयामा यांच्याप्रमाणेच हंटिंग्टन यांनीही संस्कृती आणि संस्कृतीवर आधारित व्यक्तित्व यालाच बहुतांश लोक महत्व देतात असे प्रतिपादन केले.
शीतयुद्धानंतरच्या जगात वेगवेगळ्या समाजातला सर्वात मोठा फरक राजकीय किंवा आर्थिक किंवा कुठल्या विचारसरणीवर आधारित नसतो तर सांस्कृतिकच असतो. आणि पारंपारिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक, नैतिक असे रीतीरिवाज व संस्था यांच्या सहाय्याने समाजातील व्यक्ती स्वतःला रेखतात. वेगवेगळ्या संस्कृतींच्या राजकीय आणि आर्थिक सुधारणातील फरक मुख्यतः त्यांच्या-त्यांच्या संस्कृतीतील फरकामुळेच असतो असेही ते ठासून सांगतात. पाश्चात्यांच्या "सरसकट श्रेष्ठत्व" ’मिरविण्या’च्या वृत्तीवर टीका करत ते त्यांच्या इतर संस्कृतींशी-मुख्यत्वेकरून मुस्लिम आणि चिनी संस्कृतीशी-लवकरच होणार्या आणि जागतिक शांततेला गंभीर धोका असलेल्या संघर्षाबद्दल ताकीतही देतात.
हंटिंग्टन यांची वेगवेगळे लोक आणि त्यांची संस्कृती यांच्याबद्दलची व्यापक विधाने खूप चांगल्या संशोधनावर आधारित आहेत. पण त्यातली लक्षणीय बाब म्हणजे त्यांच्या प्रबंधावरील चर्चेनंतर त्यांनी कबूली दिली कीं हिंदुसंस्कृतीखेरीज इतर संस्कृतीवरच त्यांचे संशोधन झाले होते. फुकुयामा आणि हंटिंग्टन या दोघांनी सार्या विश्वातल्या संस्कृतींचा अभ्यास केला पण नेमकी हिंदू संस्कृतीच का वगळली? कदाचित् भारतीय लोक "या सम हा-sui generis" प्रकारचे लोक आहेत म्हणून असेल. किंवा त्यांचे गोरे, काळे किंवा पिवळे असे त्यांच्या वर्णाप्रमाणे वर्गीकरण करता येत नाहीं म्हणून असेल. ते ख्रिश्चन किंवा मुस्लिम जगात मोडत नाहींत म्हणून असेल. भारतात बहुसंख्यांक असलेले हिंदू अशा मोठ्या प्रमाणात फक्त भारतात आणि नेपाळमध्येच रहातात. ते कुठल्याही छापात सहजा-सहजी बसत नाहींत. ते साम्यवादाच्या नंतरचे नाहींत आणि लोकशाहीच्या पूर्वीचेही नाहींत. ते धर्माधिष्टित राज्यसंस्थेचे पुरस्कर्ते नाहीत किंवा अधार्मिकसुद्धा नाहींत. त्यांची संख्या इतकी मोठी आहे कीं त्यांना दुर्लक्षिताही येत नाहीं पण ते इतरांपेक्षा इतके निराळे आहेत कीं त्यांचे सरसकट वर्गीकरणही करता येत नाहीं. आणि इतके गुंतागुंतीयुक्त असूनही ते तसे पूर्णपणे अप्रिचितही नाहींत! ते सांसदीय लोकशाही राबवितात आणि त्यांच्यातले सुशिक्षित लोक सुरेख इंग्रजी बोलू शकतात.
पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारतीयांची उपेक्षा करणे किंवा भारतीय कसे असतात आणि ते भारताला एकवीसाव्या शतकात कुठे नेणार आहेत याबाबत दुर्लक्ष करणे हे कुणाच्याच हिताचे नाहीं.
The Protestant Ethic and the Spirit of Capitalism या पुस्तकात त्याचे लेखक मॅक्स वेबर भाडवलशाहीच्या पश्चिम युरोपमधील झपाट्याने झालेल्या वाढीचा संबंध काटकसरी, मितव्ययी आणि ऐहिक सुखात रुची असणार्या पूर्वीच्या धर्मनिष्ठ लोकांच्या स्वभावाशी लावतात. भारतीयांत कांहीं स्वत:चे असे वैषिष्ट्य (USP*) आहे कां? असल्यास कुठले? फुकुयामांना अभिप्रेत असलेली सामाजिक निष्ठा भारतीयांत कदाचित् कमी असेल पण या कमीपणामुळे भारतीय आपल्यासाठी कधीच एकादा टिकाऊ आणि भांडवलशाहीवर आधारित उज्ज्वल भविष्यकाळ निर्मूच शकणार नाहींत असा त्याचा अर्थ होतो कां? भारतीयांची स्वाभाविक अनैतिक प्रवृत्ती त्यांना एका खूप खोल अशा कायमच्या भ्रष्ट समाजाच्या गर्तेत खेचेल? कीं भारतीयांचा ऐहिक सुखांविषयी आस्था असलेला व्यवहारीपणा आणि त्यांचे ’उपयुक्तता’वादी तत्वज्ञान त्यांच्या दोषांवर मात करून त्यांना आर्थिक सुबत्ता सातत्याने मिळवून देईल? त्यांचा कुठल्याही मार्गाने अंतिम यश मिळविण्याकडे असलेला कल त्यांना नको त्या अनुत्पादक shortcuts च्या दलदलीत पोचवेल? कीं हा कमकुवतपणच त्यांना कुठलेही अडथळे पार करून विजय मिळविण्याची क्षमता देईल?
भारतीयांना सत्तेबरोबर मिळणार्या ’अवांतर’ सुखसोयींबद्दल (Perquisites) असलेल्या फाजील आकर्षणाचा परिणाम त्यांच्या राजनैतिक संस्थांच्या अवमूल्यनात होईल? त्यांची संवेदनशीलता राज्यव्यवस्था जगविण्यासाठी आवश्यक असलेली नियमनाच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन देईल? भारतीय लोक सांप्रदायिक अतिरेकाचा अवलंब करतील कीं त्यांची अक्कल आणि अराजकाची नावड त्यांच्यातील (गरजेपोटी) एकत्र रहाण्यासाठी लागणारे व्यवहारचातुर्य बळकट करेल? त्यांच्यातले कांहीं नेते निधर्मीपणावर आधारित समाजरचनेला धोका निर्माण करतील कीं भारतात यशस्वी राजकारणाला निधर्मी राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा कुठालाच पर्याय नाहीं हे त्यांना उमजेल? प्रादेशिक संवेदनशीलता वाढीला लागून भारताची शकले होतील कीं ’सर्व-भारतीय-एक’ ही भावना वाढेल? भारतीय उच्चभ्रू समाजाची भारताला एक जागतिक महाशक्ती बनविण्याची तीव्र इच्छा लष्करी साहस करायला प्रवृत्त करेल कीं तडजोडीला आणि स्वरक्षणाला महत्व देण्याकडे असलेला भारतीयांचा कल आपल्याला एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवेल? शेवटी अलीकडील माहिती तंत्रज्ञानातील उज्ज्वल यश भारताची प्रतिमा दीर्घकाळपर्यंत टिकेल अशा तर्हेने बदलेल कीं हे ’स्वप्न’ आगामी जागतिक मंदीपर्यंतच टिकेल?
हे पुस्तक या व असल्या कांहीं प्रश्नांची उत्तरे शोधायचासुद्धा प्रयत्न करेल. ही उत्तरे सुस्पष्ट आणि निर्विवाद असतीलच असे नाहीं. पण ही उत्तरे "भारतीयत्व म्हणजे काय" याचा आधार घेऊन भारताचे प्रारब्ध, भारताचे भवितव्य काय असेल याबद्दल मार्गदर्शन नक्कीच करतील. गेले शतक संपायच्या सहा वर्षे आधी (१९९४ साली) हेन्री किसिंजर यांनी असे भाकित केले होते कीं एकवीसाव्या शतकात अमेरिका, युरोप, रशिया, जपान, चीन आणि भारत या सहा महाशक्तींचाच दबदबा असेल. या वर्णनातील अनिश्चिततेची सतत चुकचुकणारी पालच भारताचे भविष्य ठरवेल? कदाचित् तसे होणार नाहीं पण भारताच्या प्रारब्धाबद्दल कुठलेही मूल्यमापन गंभीरपणे करावयाचे असल्यास केवळ वरवर दिसणारी जमेच्या बाजूची संपत्ती आणि खर्चाच्या बाजूचे दायित्व यांची यांत्रिकपणे बेरीज-वजाबाकी करून चालणार नाहीं तर भारतीयांचे व्यक्तिमत्व आणि हे व्यक्तिमत्व बनविणारी त्यांची संस्कृती यांचाही अभ्यास व पृथःकरण करावे लागेल.
भारताच्या गुणदोषांचे अचूक आकलन बाहेरील जगाला अशा तर्हेच्या अभ्यासानेच होईल आणि त्यांचा भारतीयांशी होणारा विचारविनिमय जास्त परिणामकारक होऊ शकेल. सर्वात महत्वाची गोष्ट अशी कीं अशा अभ्यासावरून भारतीय नेतृत्वाला भारताची धोरणे अशा रीतीने आखता येतील कीं ती भारतीयांच्या मानसिक ठेवणीशी एकरूप असतील. आपल्या नागरिकांची स्वभाववैशिष्ट्ये आणि त्यांचे व्यक्तिमत्व याबाबतच्या चुकीच्या अनुमानांवर आखलेली धोरणे व्यवहारात उलथून पाडली जाऊ शकतात आणि योजलेली राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यात अपयशी ठरतात. भारतीय जनता ध्येयवादी, आदर्शवादी आहे आणि जनतेसाठी व्यापक प्रमाणावर कांही चांगले निर्मिण्याची बांधिलकी त्यांच्यात आहे असे समजण्यात भारताची राष्ट्रीय धोरणे आखणार्या नेत्यांनी मूलभूत चूक केली. आपल्या लोकसभेतील आणि विधानसभेतील प्रतिनिधींनी श्रेष्ठ अशी इच्छित उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आणि ती साध्य करण्यासाठी पावलेही टाकायला सुरुवात केली, पण भारतीयांच्या संकुचित अशा वैयक्तिक हितसंबंधांवर लक्ष केंद्रित न केल्यास भारतीय समाज अशा गोष्टीत मनापासून कार्यरत होत नाहीं हे ते विसरले. परिणाम असा झाला कीं जगातला सर्वात मोठा असा उच्च विचारसरणीयुक्त कायद्यांचा संग्रह एका बाजूला आणि त्याची कवडीमोलाची कार्यवाही दुसर्या बाजूला! या उलट आपण आपल्या जनतेच्या स्वभाववैशिष्ट्यांचे प्रमाणिक मूल्यमापन केले असते तर आपली धोरणे निःपक्षपातीपणापेक्षा किंवा समतेपेक्षा कल्पकतेला, अनुकंपेपेक्षा युक्तिबाजपणाला, समाजकल्याणापेक्षा नफ्याला सरकारी उद्योगांपेक्षा खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देणारी अशी आखली गेली असती. उदाहरणार्थ आपल्याला आता-आताच कळू लागले आहे कीं सामाजिक संपत्तीच्या न्याय्य वाटपाच्या दिशेने केलेले प्रयत्न श्रीमंतांकडून यशस्वीपणे पराजित केले जातील तर गरीब लोक त्यांच्या वाट्याला आलेले पूर्णपणे उपयोगात न आणता त्याची नासधूस करतील. भारतीयांच्या अशा मूळ स्वभावाकडे पहाता संपत्तीच्या विपुल निर्मितीनेच करोडो गरीबांचे कल्याण होऊ शकेल.
या पुस्तकात भारतीयांची आणखी दोन स्वभाववैषिष्ट्यांवरही प्रकाश टाकला जाईल. एक आहे भारतीयांचा सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारा दुर्दम्य आशावाद, आज मुंबईतील एकाद्या महाभयानक झोपडपट्टीत रहाणारा भारतीय माणूस एक दिवस खूप मोठा होण्याची आणि आपल्या मुलाबाळांसाठी जास्त चांगले आयुष्य निर्मिण्याची आशा ठेवून असतो. श्रीमंतांकडून गरीबांकडे येणारी संपत्ती ठिबकतच येत असल्यामुळे अपुरी असली तरी ती भारतीयांतील आशा न सोडण्याची नैसर्गिक अंगभूत प्रवृत्ती जिवंत ठेवण्यास पुरेशी ठरलेली आहे. भारतीयांचे दुसरे स्वभाववैशिष्ट्य आहे सातत्याने अडचणीला तोंड द्यावे लागल्यामुळे अंगात बाणलेली चिकाटी! मध्यमवर्गी भारतीयसुद्धा वीज, पाणी, वाहन आणि वैद्यकीय सेवा यासारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी धडपडत असतो. अगदी गरीब असतात ते तर या मूलभूत गरजांशिवायच जगतात. पण अशा तर्हेने सदैव प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागल्याने भारतीयांत एक कल्पकतेची, शोध लावण्याची आणि जगायची दुर्दम्य आणि असामान्य इच्छाशक्ती निर्माण झाली आहे.
शेवटी या पुस्तकाची निवेदनपद्धती! एकाद्या समाजाचे चित्रण केवळ सैद्धांतिक रचनेवर (theoretical paradigms) करणे अशक्य आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व गुंतागुंतीचे असते आणि संस्कृती तर फारच खोल असते त्यामुळे उदाहरणे, घटनांवर आधारित अनुमान आणि लेखकाच्या अनुभवांवर आधारलेले निष्कर्ष यांच्या सहाय्याने त्यावर प्रकाश टाकल्याशिवाय समाजाचे चित्रण कोरड्या आणि अपुर्या सिद्धांताच्या सहाय्याने करणे शक्य नाहीं. अर्थशास्त्रज्ञ एकूण एक समाजांना लागू पडतील अशा वैश्विक नियमांवर विश्वास ठेवतात. पण जे एकाद्या समाजाचा अभ्यास त्या समाजाच्या अद्वितीय संस्कृतीच्या उगमाच्या संदर्भात करतात त्यांना एकाद्या ठळक आराखड्य़ापासून सुरुवात करून या समाजातील लोक रोजच्या जीवनात कसे वागतात, त्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद कसे असतात आणि त्यांचे सर्वसामान्य आचरण कसे असते अशा मुद्द्यांची भार घालत-घालतच करावे लागते. त्यामुळे या पुस्तकाचे स्वरूप एकाद्या शिक्षणक्रमातील व्याख्यानाप्रमाणे नसून त्यात एकादी गोष्ट, एकादा प्रसंग, एकादी घटना, किंवा भारतीयांच्या रोजच्या जीवनातील एकादे सत्य सांगून भारतीयाच्या व्यक्तिमत्वाचे चित्रण करेल. या पुस्तकातील विद्वत्तेच्या अभावाचा कमीपणा या पुस्तकाच्या अधीक वाचनीयतेमुळे भरून निघेल अशी आशा लेखकाला आहे.
----------------------------------------
*USP stands for Unique Selling Proposition. म्हणजे आपल्यात असे काय विशेष किंवा अद्वितीय गुण आहेत कीं ज्यामुळे आपण आपल्या व्यवसायात अतीशय यशस्वी होऊ किंवा आपल्याला खूप मोठे नेतेपद मिळेल, आपल्याला खास चांगली नोकरी मिळेल वगैरे.

वाचने
3966
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
काका एक सूचना
In reply to काका एक सूचना by गोगोल
ख्या ख्या. एवढाल्ले लेख
In reply to काका एक सूचना by गोगोल
'धमु'सारखीच तुझी ही सूचनाही रास्त आहे!
वा अप्रतिम!!
कुदेता म्हणजे "Coup d'Etat" या फ्रेंच शब्दांचा मराठी उच्चार
हा परिच्छेद मस्तच...
हेच म्हणते पुस्तक वाचावे असे
In reply to हेच म्हणते पुस्तक वाचावे असे by प्राजु
shot-in-the-arm
ह्या पुस्तकाची टिपणे काढून
रोचक आहे. भाषा थोडी क्लिष्ट
+१