मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

५. सार्वजनिक सुविधा

डॉ.श्रीराम दिवटे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गावाकडच्या पाणवठ्यावर उडणारा गडबड गोंधळ, आरडा ओरडा, वादावादी आजोळच्या सार्वजनिक नळावर कधी पहायला मिळाली नाही. सकाळी सात वाजता नळ आला (माझ्या दृष्टीने नवा वाक्प्रचार) की चाळीतल्या भांड्यांची धावपळ उडे. परंतु तीही शिस्तीत. खोली क्रमांकानुसार पाणी भरायचं. साधारणतः चार कुटुंबात एक नळ म्हणजे तोटी ठरवून दिलेली. एक नंबरच्या कुटुंबाने चार नंबरच्या नळाकडे जायचं नाही तर चार नंबरवाल्यांनी एक नंबरच्या तोटीखाली भांडं सरकवाचं नाही. असा अलिखित नियम असायचा, पाळलाही जायचा. गावाकडच्या बायकांना गप्पा झोडायला, चारचौघीत भांडणं उकरायला निवांत वेळ असायचा. नळ जाण्याची (आणखी एक वाक्प्रचार) त्यांना चिँता कसली? त्यामानाने आजोळच्या महिला शांत वाटायच्या. वेळेचं बंधन त्यांच्या भोवती असल्याने वितंडवाद करायला तरी त्यांच्याकडे एवढा वेळ कुठला? म्हणूनच मला या शांत कार्यरत पुणेरी आजोळाचं मोठं अप्रूप असायचं. जशी पाणी भरण्याची रीत तशीच सार्वजनिक शौचालयाची नियमावली. तिथे प्रत्येकाने बादलीभर पाणी नेलंच पाहिजे असा दंडक. साफसफाईच्या कुटुंब क्रमांकानुसार प्रतिसप्ताह पाळ्या लावलेल्या. मामाच्या चाळीसाठी तीन संडास.आणखीही होते, पण ते इतर चाळकऱ्यांसाठी. तिथेही शिस्त दिसे. आपला नंबर आहे, हे दर्शवण्यासाठी रांगेत बादली ठेवायची. इतरांनी मध्ये घुसखोरी करायची नाही, असा दंडक. सकाळच्यावेळी गर्दी नको म्हणून काही चाळकऱ्यांनी आपल्या वेळाही बदलून घेतल्या होत्या! किती हा सोशिकपणा? गावाकडं मात्र याविरुद्ध परिस्थिती.तिकडे ‘होल वावर इज अवर’ असा मामला. कुणीही, कधीही, कुठेही बसावे अशी मोकळी ढाकळी पद्धत. त्या सवयीमुळे मला आजोळच्या चार भिंतीतल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला फार कष्ट पडले. अगदी सुरुवातीला तर मी दार उघडे ठेवूनच बसायचो. तशा बंदिस्त ठिकाणी गुदमरायला व्हायचं. मग दरवाजा किलकिला ठेवूनच मला आपला कार्यभाग साधावा लागे. असो. तर त्या दिवशी चाळीतले एक थकलेले आजोबा शौचाला गेले होते. आम्ही मुलं-मुली परिसरातच खेळत होतो. माझे कान इतरांपेक्षा जरा तिखटच असावेत. ‘आरं ये मर्दांनु, थांबा जराशिक. म्हातारं आतमदी बसून कसं कण्हतंय बगा.’ ‘शी.! फारच वेडा आहे बाई हा मुलगा.’ असं म्हणत एक मुलगी घरी पळाली. इतर मुलींनी सुद्धा तिचंच अनुकरण केलं. आता आम्ही दोघे तिघेच राहिलो होतो. ‘आरं पोरांनु खरंच. म्हातारं आतून आवाज देतंय बगा.’ मी कानोसा घेत म्हटलं. त्यांनीही ऐकल्यासारखं केलं. त्यांनाही आजोबांचं विव्हळणं ऐकू आलं असावं. ‘आजोबा पडले, आजोबा पडले.’ असं किंचाळत एकजण घरी सांगायला गेला. ‘म्हातारं आपटलं, म्हातारं संडासात पडलं.’ मीही ओरडू लागलो. काही क्षणातच मामेभावाने माझ्या कानफडात ठेवून दिली. ‘मुर्खा, आजोबा म्हण की.’ मी गाल चोळीत बाजूला उभारलो. चाळीत गडबड उडाली. माणसं जमा झाली. आजोबांनी आतून कडी घातली असल्याने दरवाजा काहीकेल्या उघडत नव्हता. तो तोडताही येण्याजोगा नव्हता. त्याकाळी संडासांना देखील दणकट दरवाजे बसविण्याची पद्धत होती. काय करावं? चाळकरी विचार करू लागले. सुताराला बोलावून दार कापून काढावं असं ठरत होतं. सहज माझं लक्ष दारावरील तावदानाकडे गेलं. ‘आरं सोप्पं हाय की. वरतून दरवाजा उघडा की बाप्यांनु.’ मी ओरडलो अन् सर्वांचं लक्ष माझ्याकडे गेलं. माझ्या गावठी हेलाचा राग न मानता त्यांनी माझा सल्ला मानला. लगेच मोठा उंच स्टूल आणला गेला. एकजण त्यावर चढलासुद्धा. परंतु वर चढून कडी पर्यंत हात पोचणार कुणाचा? इथे गाडी अडली. तिथेही मीच काहीतरी युक्ती सुचवावी या हेतूने दोघांनी माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकला. मी जरा डोकं खाजवलं. ‘जमंल की. एक काठी आना, वरल्या खिडकीतून आतमदी घाला. आन उघडा कडी.’ मी सुचवलं. प्रत्येकाला ते पटलं. वर चढलेल्याच्या हाती काठी आली. त्याने ती आत सोडून दोन तीन वेळा प्रयत्न केला. त्याला यश आलं. कडी निघाली. सर्वांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव पसरला. माझ्या युक्तीचंही त्यांना कौतुक वाटलं असावं. दार उघडून आजोबांना बाहेर आणलं. पाय घसरून ते आत पडले होते. त्यांना उठताही येत नव्हतं कारण खुब्याचं हाड मोडलं होतं. माझ्या तत्परतेमुळे अन् ऐनवेळी सुचलेल्या युक्तींमुळे आजोबांना बाहेर आणता आलं होतं. मी स्वत:वरच खुश झालो होतो... ( पुणेरी आजोळ मधून..)

वाचने 1697 वाचनखूण प्रतिक्रिया 3