Skip to main content

मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव

मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव

Published on 20/10/2010 - 13:07 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी, सध्या अच्युत गोडबोलेंच किमयागार वाचतोय. खुपच छान पुस्तक. शक्य असेल तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वाचायला द्यावे. नक्कीच सायन्सची आवड निर्माण होईल. या लेखात पुस्तकाची माहीती देत नाही पण त्याच्या प्रस्तावनेत जे स्वा. सावरकर व पु ल देशपांडे यांचे विचार मांडले ते देत आहे. प्रस्तावनाच मनाची एवढी पकड घेते की पुढील पुस्तक सोडवत नाही. सावरकरांच्या मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव या निबंधातील उतारा आहे. त्यात सावरकर म्हणतात, "आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन. ही आशा, हा अवलंब अगदी खुळचट आहे! कारण तो असत्य आहे. ज्या संकटातुन आपणास सोडवले म्हणुन आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो, त्याची मलम लावण्यासाठी पुजा करायची तर प्रथम गळा का कापलास म्हणुन त्याची यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या ठायी या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत. ती विश्वाची आद्यशक्ती ज्या काही ठरावीक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजावून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल असा त्याचा साधेल तितका उपयोग करुन घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे.... सारांशाने माणसाच्या सुखदु:खाचे देवास काही देणे घेणे नाही, तेव्हा सत्यनारायण, जपजाप्य, स्नानसंध्या, व्रतवैकल्ये, नवस या सार्‍या निरर्थक गोष्टी होत." पुलंच लिखाण ," एक तर धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांच कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पुर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोंताडावर माझा विश्वास नाही. देव धर्म या कल्पना धुर्त सत्ताधार्‍यानी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखुन ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकिय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. विज्ञान जन्मजात ज्येष्ठ-कनिष्ठ मानत नाही; आणि सत्याचे दर्शन घडवण्यार्‍या वैज्ञानिकांचा देवाचे नाव घेणार्‍या धर्मगुरुंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणार्‍या अडाणी राजे लोकांनी सर्वात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणार्‍या लोकंइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रु नसतील, मग ते बायकांना नवर्‍याच्या चितेवर जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील आणि काय वाटेल ते करतील. धर्माच्या आणि पंथाच्या दुराभिमानातून माणसाचे रक्त सर्वाधीक सांडलेले आहे."
लेखनप्रकार

याद्या 4996
प्रतिक्रिया 5
>> धर्माच्या आणि पंथाच्या दुराभिमानातून माणसाचे रक्त सर्वाधीक सांडलेले आहे>> दुराभिमान वाइटच. याबद्दल असहमती असण्याचं कारणच नाही. बाकी विज्ञानाची आपली जागा आहे आणि धर्माची आपली जागा आहे. सुई अन तलवार दोन्हीची गरज असते. उरलं सावरकर म्हणतात म्हणून जप, सणवार, व्रतवैकल्य करणारे ते करणं सोडणार नाहीत कारण त्यांना या सर्वामधून जे मानसीक समाधान लाभत असेल ते तेच जाणोत. तुम्हाला नसेल करायचा तर नका करू.

"आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखुन ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता." इथे काही जण असे असणारच. आणि 'सुखी झालेल्या' देशातले काही पॉल ब्रन्टन, आर्थर ऑसबोर्न, एकहार्ट टोले अरूणाचलाचे दर्शन घेऊन तिथल्या महर्षीना, त्यान्च्या समाधीला प्रणाम करण्यासाठी वाट वाकडी करणारच. त्याना भूलशास्त्राचा शोध लावणार्यापेक्षा आत्मसाक्षात्कार झालेला ज्ञानयोगी मोठा वाटणे ही याच नाण्याची दुसरी बाजू. याला पिकते तिथे विकत नाही, घर की मुर्गी दाल बराबर, एकतीस शाबूत दात सोडून नेमकी पडक्या दाताकडे सारखी जीभ जाणे आणि ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड असे बरेच पैलू आहेत असे वाटते. ठराविक सामाजिक पार्श्वभूमीवर समाज सर्वार्थाने सुखी व्हावा या प्रामाणिक भावनेतून केलेले चिन्तन आणि त्यातून काढलेले निष्कर्ष व्यक्ती आणि परिस्थितीनुसार किती वैविध्यपूर्ण असतात याचे हे एक उदाहरण आहे. असो.

चांगल्या पुस्तकाचा संदर्भ (परीचय नाही) दिल्याबद्दल धन्यवाद. हे नक्कीच आता पुढच्या भेटीत पुस्तके घेण्याच्या यादीत घातले आहे... :-) बाकी या लेख/चर्चेसंदर्भात सावरकर आणि पुल लिहीत आहे, जे एकंदरीतच मोठ्या आणि आदर्श नेत्याच्या नशिबी येते, मग त्यांचे विचार कुठलेही असुंदेत.... सावरकर हे प्रखर बुद्धीवादी आणि स्पष्टवक्ते होते. इतके की, त्यांची रत्नागिरीहून सुटका झाल्यावर झालेल्या एका सत्कार सभेत न.चिं. केळकरांनी एखाद्या आदर्श (राजकीय) नेत्याची अनेक विशेषणे सांगितली आणि त्यातील सगळी स्वातंत्र्यवीरांमधे आहेत असे म्हणत म्हणाले की (जनतेशी कसे बोलायचे या अर्थाने) मुत्सद्दीपणा सोडून. सांगायचा मुद्दा इतकाच की सावरकरांचे लेखन हे एकीकडे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात आणि पुढे त्यांच्या दूरदृष्टीस दिसणार्‍या राजकारणासंदर्भात होते तर दुसरीकडे समाजसुधारणा आणि विज्ञाननिष्ठ होते. उदाहरणादाखल त्यांचा "दोन शब्दात दोन संस्कृती" हा एकच लेख सांगतो पण इतर अनेक आहेत... दुर्दैवाने त्यांच्या तथाकथीत अनुयायांनी, जे स्वत:ला त्यांचे राजकीय वारसदार समजतात अशांनी, त्यातील काहीच वाचले नाही, आचरणे तर सोडून द्या. (मंगेशकर कुटूंबियदेखील सावरकरवादी आणि हिंदूत्ववादी आहेत आणि तसे म्हणतात देखील. मात्र ते त्यांचे राजकीय वारसदार नाहीत). त्याचा म्हणून एक परीणाम झाला... पुलंच्या लेखनाने त्यांचा वाचकवर्ग त्यांचा नुसताच चाहता झाला नाही तर त्यांना अक्षरश: दैवत मानू लागला आणि एकदा का कुणाला दैवत केले की त्या व्यक्तीच्या-व्यक्तीमत्वाच्या नशिबी येते तेच कमी अधिक फरकाने पुलंच्या नशिबी आले असे म्हणावेसे वाटते. पुलंनी निरिश्वरवाद सांगितला खरा, त्यांच्या लेखनात लोकांना हसवत, मिष्कीलपणे विचार करायला लावत पण समाजाशी नाळ न तोडता उपदेश करायचा प्रयत्न केला. मात्र ते सांगत असताना त्यांनी समाजाला तुच्छ लेखले नाही. किंबहूना उमेदीच्या काळापासून ते नव्वदीच्या दशकापर्यंत (त्यावेळच्या रुपयाच्या मुल्याप्रमाणे) गाजावाजा न करता एक कोटी रुपयांची मदत करणारा हा विरळ मराठी साहीत्यिक असेल (असेच दुसरे अ-साहीत्यिक व्यक्तीमत्व म्हणजे निळू फुले). त्या शिवाय त्यांनी स्वतःची पुस्तके स्वस्तात पण ठेवली आणि अनेक ग्रंथलयांना वाटली देखील.... अर्थात त्यांच्या धर्मावरील उपरोधाला आपण पटकन घेऊ शकलो पण समाजाचे ॠण फेडणे आणि पाण्यात रहाताना माश्याशी वैर नाही की तुच्छपणा नाही तर मैत्री करत त्यांना बदलणे हा स्वभाव मात्र घेऊ शकलो नाही.... एकदम किशोर कुमारच्या आवाजातल्या खालच्या ओळी आठवल्या:
राम ने हँस कर सब सुख त्यागे, तुम सब दुख से डर कर भागे कृष्ण ने कर्म की रीत सिखाई, तुमने फ़र्ज़ से आँख चुराई,
तात्पर्य: जे राम कृष्णांचे तेच सावरकर, पुल किंवा इतर वेळेस गांधीजी, टिळक, शिवाजी, आंबेडकर अथवा अजून द्रष्ट्या नेत्यांचे... त्यांचे समर्थक केवळ सोप्या गोष्टी घेतात आणि आपापल्या दैवतांना हार घालत एका अर्थी "हार स्विकारायला" लावतात. असो. अवांतरः अच्यूत गोडबोले म्हणल्यानंतर शेजारच्या घरातील ;) ही चर्चा आणि त्यावरील माझाच हा प्रतिसाद आठवला. ;)

यावरुन फार पुर्वी एक संवाद झालेला आठवला. दुरदर्शनवर फार पुर्वी एक कार्यक्रम झाला होता त्यात चंद्रशेखर धर्माधीकारी न्यायाधीश होते. देव आहे की नाही हा वाद चालु होता. एका पक्षामधे एक डॉक्टर होते तर प्रतिपक्षामधे एक वकिल होते. त्यांची नावे आठवत नाहीत आता इतका तो जुना संवाद आहे. डॉ.चे म्हणणे होते की देव आहे तर वकीलांचे म्हणणे की देव वगैरे असं काही नाही आणि नसते वगैरे. ह्या सर्वांवर शेवटी श्री. मंगेश तेंडुलकर उभे राहीले आणि त्यांनी (sort of) ज्युरीच्या भुमीकेतुन एक अतिशय अप्रतीम मुद्दा मांडला तो असा.. एखाद्याला जर देव आहे असं मानुन जर मानसिक समाधान मिळत असेल तर ते त्यानं तसं मानणं ठीकच आहे. कारण कितीही औषधं वगैरे करुन एखाद्याला मानसिक स्वास्थ्य लाभत नसेल तर कदाचित त्यासाठी हा मार्ग बरोबर असु शकतो. तसेच एखाद्याला जर देव नाही आणि आपण जे करु ते योग्यच आहे आणि तीच पुर्व दिशा आहे असं वाटत असेल तर त्यानं अशी सगळी बंधनं झुगारुन त्याला काय वाटतं तेच स्वीकारलं पाहिजे. बाकी आजकाल पु.ल. ची उदाहरणं आपल्या सोईनं देणं ही एक फॅशन होतीये असं वाटतं. अर्थात अच्युत गोडबोलें हा मोठा माणुस आहे यात काही शंकाच नाही. पण पु.लं. सुद्धा कित्येक वेळेला संत महात्म्यांबद्दल किती आत्मियतेनं बोलले आहेत हे आपणासर्वांना माहीत आहेच. - (विटेवरल्याचा) वाट्याकरी..