चांदोबा
काही दिवसांपूर्वी हे कोडे लिहिल्यावर "का रे अजून चांदोबा वाचतोस का?" असं कुणीतरी मला विचारलं होतं. त्यावेळी उगाचच चांदोबाची आठवण येऊन पिसं उधळल्याप्रमाणं झालं. खरंच लहानपणी एका वेगळ्याच दुनियेत नेणार्या या अद्भुत पुस्तकाबद्दल अजून कोणी कसं बरं लिहिलं नाही?
"चांदोबा" ची ओळख करुन द्यायची खरं तर आवश्यकता नाही. माझ्या लहानपणी लहान मुलांच्या मासिकांचे पर्याय फारच मर्यादित होते आणि आता टीव्हीच्या धुमाकुळामुळे कोणी वाचतही नसेल. चांदोबा, किशोर, कुमार, ठकठक, चंपक आणि ज्ञान प्रबोधिनीचे "छात्र प्रबोधन" ही मासिके मला माहिती होती. त्यातही किशोर सारखे मासिक दिवाळी अंक वगळता कधी मिळालेच नाही. बहुतेक फक्त दिवाळी अंकच काढत असावेत. त्यांचे दिवाळी अंकात येणारे किल्ले करायला मजा यायची. ठकठक आणि चंपक वाचायला सुरुवातीला मजा वाटली. पण नंतर त्याचा प्रभाव फारसा टिकून राहिला नाही. चांदोबाचं मात्र तसं नव्हतं. चांदोबा वाचताना कधी कंटाळा आला नाही.
चांदोबाच्या गोष्टींमध्ये डावे-उजवे करणे शक्य नाही असे आता वाटते. पण त्यात सर्वाधिक आवडणारा भाग कोणता? असं विचारलं तर या प्रश्नाला "विक्रम आणि वेताळ" हे उत्तर सगळेच जण देतील. वेताळ पंचविशी नावाचं एक दुसरं पुस्तक त्यावेळी मिळायचं पण त्यात "चांदोबा"ची मजा नव्हती. साहस, अद्भुतरम्यता, गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण करून नंतर विक्रमाला बोलायला भाग पाडणारा वेताळाचा प्रश्न, कथेतील पात्रांची संस्कृतप्रचुर नावं हे सगळं एका वेगळ्याच जगात घेऊन जायचं.
आधी वाचलेल्या रामायण, महाभारतातल्या गोष्टी, ग्रीक कथा, लोककथा या पुन्हा पुन्हा वाचायलाही मजा येत असे.याचं महत्त्वाचं कारण कदाचित चांदोबातली लाल-पिवळ्या-हिरव्या-निळ्या अशा गडद रंगातली, पिळदार स्नायू असलेले हीरो आणि टपोर्या डोळ्यांच्या नायिका यांची रेखीव चित्रं हे असावं. चित्रांमध्ये जमिनीवर सरपटणारे नाग, निवडुंगाची झाडं, झाडावर बसलेले पक्षी आणि फांद्यावर अडकलेल्या मानवी कवट्या अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद असायची."क्रमश:" असणार्या कथामालिकेतील एखादा भाग वाचला की त्याच्या आधीचे आणि नंतरचे भाग वाचण्यासाठी उरलेले चांदोबा मिळवण्यासाठी खूप धडपड करायचो. चांदोबात २५-३० वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पुन्हा वाचताना ती तितकीच ताजी वाटायची. या कथांचे मराठी अनुवाद कोण करतो देव जाणे. अगदी सुरेख अनुवाद असतात.
चांदोबाला जुलैमध्ये ६० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने चांदोबाचा जीवनप्रवास वाचनात आला. तोदेखील चांदोबातील गोष्टींइतकाच सुरस आहे. तो इथं देणे म्हणजे जीएंच्या भाषेत दुसर्याने बनवलेला स्वयंपाक आपण गरम करून वाढण्यासारखा आहे. पण तो देण्याचा मोह आवरत नाही.
जुलै १९४७ मध्ये सुरू झालेल्या चांदोबाची स्थापना नागीरेड्डी आणि चक्रपाणि यांनी केली. सुरुवातीला चांदोबा तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रकाशित होत होता. ६ आणे इतक्या किमतीच्या चांदोबाच्या सुमारे ६००० प्रती सुरुवातीला विकल्या जात होत्या.
चक्रपाणि आणि नागीरेड्डी यांनी चांदोबा सोबतच तेलुगू चित्रपटांच्या निर्मितीचेही काम सुरू ठेवले. चक्रपाणि यांचे १९७५ मध्ये निधन झाल्यानंतर विश्वनाथ रेड्डी यांनी चांदोबाचे काम पाहण्यास सुरुवात केली. विश्वम या नावाने ते अजूनही चांदोबाचे संपादकीय काम पाहतात. हळूहळू १२ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलेला चांदोबा लोकप्रिय होत होता. १९८० मध्ये चांदोबाच्या सर्व भाषा मिळून सुमारे ९ लाख प्रती विकल्या गेल्या. नागीरेड्डी तोपर्यंत एक यशस्वी चित्रपट निर्माते म्हणूनही गणले जाऊ लागले होते. त्यांचे "राम और श्याम", "ज्युली" वगैरे चित्रपट हिट झाले होते.
१९८० मध्ये नागीरेड्डी यांच्या थोरल्या मुलाचे - प्रसादचे - निधन झाल्यावर नागीरेड्डींना नैराश्याचा झटका आला. त्यावेळी चित्रपट अभिनेते संजीव कुमार यांनी त्यांना मदत करून "श्रीमान श्रीमती" या नव्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा पाठपुरावा केला आणि नागीरेड्डींना नैराश्यातून बाहेर काढलं. मात्र नव्वदाव्या दशकात कामगारांच्या अडचणींमुळे काही कौटुंबिक तंट्यामुळे चांदोबाचे प्रकाशन काही काळ बंद करावे लागले. त्यावेळी चांदोबाची विक्री होती सहा लाख प्रतींची. नोव्हेंबर १९९९ मध्ये विश्वम यांनी पुन्हा प्रकाशन सुरु केले आणि तेव्हापासून सर्व भाषांतील चांदोबाची प्रतिवर्षी २ लाख प्रतींची विक्री होते. इन्फोसिस, प्रथम अशासारख्या संस्थांकडून मिळणारी मदत आणि वॉल्ट डिस्ने कंपनीबरोबर सहकार्यामुळे चांदोबाची आजची वाटचाल कमी अडथळ्य़ांची झाली आहे. विश्वम यांना चांदोबा ही मुलांवर भारतीय संस्कार करणारी एक विनालाभ संस्था बनवायची आहे.
चांदोबाला साठ वर्षं पूर्ण झाल्याच्या बातम्यांमुळे लहानपणी निर्भेळ आनंद देणार्या या दर्जेदार मासिकाची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आणि एका दुकानातून सप्टेंबर महिन्याचा चांदोबा घेऊन आलो. मुखपृष्ठावरच अशोकवनातल्या सीतेचं चित्र होतं. मिथिला नगरीतली सीता दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे अगदी मीनाक्षी :). जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क अशा नावांमध्ये पुन्हा गुंग होऊन गेलो. चांदोबा उगाचच इतके दिवस बंद केला. परत वाचायला सुरुवात केली पाहिजे.
हाच लेख येथेही वाचता येईल.
वाचने
22750
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
छान!
चांदोबा आणि किशोर
In reply to चांदोबा आणि किशोर by धनंजय
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by बेसनलाडू
मी दुसरीत असतानाची गोष्ट आठवली...
माझ्या जुन्या आठवणी..
वा! वा!
In reply to वा! वा! by प्रियाली
पेरूची बी
विरुपाक्ष
आपणही वाचले
चांदोबा
चांदोबा बारा आणे, रुपायाला मिळायचा
वा वा!
वावा
माझेही आवडते मासिक!
चांदोबा
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by देवदत्त
बेंगळुरू मध्ये
In reply to बेंगळुरू मध्ये by आजानुकर्ण
तो अंदाज
संकेतस्थळ
जाने कहा गये वो दिन ???
In reply to जाने कहा गये वो दिन ??? by छोटा डॉन
मलाही .....
वा, वा मस्त
अबब हत्ती, छावा
In reply to अबब हत्ती, छावा by ॐकार
टॉनिक
चांदोबातले आठवणारे शब्द , वाक्ये ...
कृतप्रणाश
In reply to कृतप्रणाश by विजुभाऊ
धन्यु !!
हाही उपक्रम व्हावा.