एप्रिल फळ (३)
लेखनप्रकार
दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क
करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो.
कैरी चे लाड इथेच संपत नाहीत. गवताच्या मौ दुलई वर पहुडलेल्या कैर्या आता दिसामासाने रंगरूप पालटु लागलेल्या असतात्.सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. कर्यांच्या गालावर लाली येत असते.आता त्यांच्यावरचा पहारा ही कडक होतो. कैरी बाळाना वाईट मुलांची संगत लागु नये म्हणुन त्यांची रोज उलट सुलट तपासणी होत रहाते. वाईट मुलाना बाजुला केले जाते. हळू हळू अंगावर हळदी केसरी रंगाचा साज चढतो . कैर्या आता मोठ्या झालेल्या असतात. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजुन ..तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग .हे गाणे त्या गाउ लागतात. मोठ्याना ही कुणकुण असतेच.त्यातल्याच एका धमकपिवळ्या सुवर्णवर्खी कैरीला अलगद उचलले जाते. आळीतल्या रामाच्या पायाशी नैवेद्य ठेवला जातो. घरातले सगळे या क्षणाची केंव्हाची वाट बघत असतात्.कैरीचे हे कौतुक पाहुन झाड्सुद्धा आनन्दाने डोलत असते.
आंब्याचे दिवस आले तरी कैर्यांचा थाट ओसरलेला नसतो .पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्यांच्या दुनियेत नसतो. तिथे सगळे भीडु आपलेच असा मामला असतो.
कैर्यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो.
प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते.
पायरी हा तसा राजकारणी लहान थोरात सारख्याच सलगीने वागणारा. याला हापुस चा दर्जा मिळत नाही आणि रायवळ च्या पंक्तीला बसावे की नाही हा प्रश्न याच्या डोक्यात सतत असतो.त्यामुळेच की काय "आपल्यापायरी ने वागावे" असे कोणि म्हणताना पाहीला की मला जिन्याच्या पायरीपेक्षा पायरी आंब्याची च पटकन आठवण होते. म्हण्टले तर फोडी करा म्हंटले तर घोळुन खा असा दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा तो पायरी.
हापुस आंबा हा फक्त तबकातुन छान फोडी करुन नजराणा पेष केल्यासरखा पेष करायचा असतो.तो त्याचा मान आहे. हापुस आंबा घोळुन द्या असे कोणी म्हंटले की त्याचा अपमान होतो. आणि म्हणणार्याची जागा दिसुन येते.घोळुन आलेला हापुस आंबा हा मला नेहमीच नळदमयन्ती आख्यानातल्याघोड्याच्या तबेल्यात काम करणार्या मनातल्या मनात चरफडणार्या नळ राजा सारखा वाटतो.
सम्राटाला आणखी कीती लाजवायचे?
देवाच्या प्रसाद होण्याचा मान एक तर हापुस ला मिळतो किंवा त्या तोतया तोतापुरी ला.
पण हापुसच्या प्रसादावर जी झड पडते ती तोतापुरी वर पडत नाही . तो केवळ नगा ला नग वाटतो. हापुस चा प्रसाद हा आपला वाटतो.तोतापुरी कोणीतरी परका वाटतो.
हापुस चा रुबाब तोतापुरी मधे नाही. केवळ कापता येतो म्हनुन त्याला तो मान मिळतो. हे म्हणजे केवल सम्राटासरख्या मिशाआहेत म्हणुन एखाद्याला नाटकात सम्राटाची भूमिका देतात तसे.
एप्रिल शेवटच्या तप्प्यात असतो. "उन "मी वरुन आता "आम्ही" म्हणत असते. घरातले छोटे आता बैठे खेळ खेळुन खेळुन सूट्टी ला पण कंटाळलेले असतात.
अचानक घराबाहेर रिक्षा वाजते. घरातले छोटे उत्सुकतने बाहेर पळतात. आत्या रिक्षातुन उतरते. तिच्या सोबत एक मोठ्ठी पिशवी असते. दोघे जण मिळुन एक एक बंद धरत ती पिशवी आत नेतात.
"आत्या तू कशी आहेस विचारायच्या आतच पिशवी स्वैपाक घरात रिकामी होते. पिशवीतुन घरंगळत गोल गोलरायवळ आंब्यांची फौजच बाहेर पडते. अंगात एकच उत्साह संचारतो. आतापर्यन्त एक दोन फोडींवर समाधान करावे लागत होते म्हणुन नाराज असणार्या छोट्यांच्या हातात खाण्यासाठी आख्खा आंबा आलेला असतो.......
(क्रमशः)
वाचन
10380
प्रतिक्रिया
0