कुठ कुठ जायाचे जाळ्यात -२
याआधी
कुठ कुठ जायाच जाळ्यात -१
आता लिहायच, छायाचित्र काढायच, चित्र काढायच तरी सगळी सृजनशीलता कामाला लावावी लागते. जरा जपून.....यात बरेच धोके आढळतात. यशस्वी लेखक होण्यासाठी, जाळ्यावरच यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते याची माहिती माहितीजाळ्यावरच मिळेल. पारंपारिक पद्धतीबरोबर नव्या मार्केटिंगच्या पद्धती अवगत असतील तर उत्तम अन्यथा 'आडात नाही तर पोहर्यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. आणि त्यांचे फटकारे या माहितीजाळ्यात होणार्या सर्व प्रकारच्या लेखनाला लागू आहेत.
आता एक फार महत्त्वाची गोष्ट . जाळ्यात लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्या अनुभवातून, अगदी खर्या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत, असे असले तरी त्यांच्या तणावयुक्त कामातून वेळ काढून मराठीच्या प्रेमापोटी ते लेखन करत आहेत हे मात्र तेवढेच महत्त्वाचे आहे.. एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? नाही. तर मुद्दाम अनुभव कल्पत ते लिहीत आहेत. त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा असावा ही साधी अट आहे. उचलेगिरीच्या विरुद्ध ही पिढी एकीकडे अतिशय सजग आहे तर दुसरीकडे जाळ्यावर आले की गेले ..आपलेच नाव घातले तरी काय? अशी धारणा काहींची दिसते.
दुष्काळाने चीनच्या उत्तर भागात कसे भीषण दारिद्य ओढवले यावर लेख लिहायचा असेल तर संपन्नतेने भरलेल्या अमेरिकेतल्या स्टारबक्स कॅफे मधूनही तो लिहिता येईल ही आहे या विश्वजाळयाची कृपा. वराहमिहिरापासून तर कल्पना चावला आपल्या डायरीत काय लिहायची ते सुद्धा जाळ्यावर मिळेल. ही सगळी उत्साही आणि कामसू तरूणाईची कृपा. त्यांच्याहून आपण काकणभर सरस आहोत हे दाखवण्याची कोणतीही संधी वयाने मोठी मंडळी सोडत नाहीत. सोडणार नाहीत. शेवटी त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिले हेच खरे. एकंदरीत शेवट असा की गुगलून माहिती मिळाली नाही तर अशावेळी जाळ्यावरच मदतीला अनेक जण धावून येतात, काळजी नको. शेवटी किती दिवस पाण्यात राहून माश्याशी वैर साधणार? या विश्वजाळ्यामुळे आणखी एक फायदा झाला आहे तो म्हणजे पुढच्या पिढीने काय चांगले केले ते दाखवायला एक तरी हुकमी जागा मिळाली. बाकी आपला फावला वेळ कसा घालवायचा याचे अनेक पर्याय या विश्वजालाने समोर ठेवले . आपण सर्वांनी केलेले जे काही बरे वाईट कार्य असेल अगदी समाजकार्य का असेना त्याचे पुरावे शोधायला आता घट्ट विणलेल्या विश्वजाळामुळे जास्त वेळ द्यावा लागणार नाही!
ही स्वतःला एकीकडे हौशी म्हणवणारी लेखकांची ही जाळ्यातली किंवा जाळ्यावरची पिढी, पेपरात, बातम्यात आपले नाव येण्याच्या स्पर्धेत सामील झालेली आहेत याचा विसर पडू देऊ नका. शेवटी हा त्यांच्या आत्मसन्मानाचा विषय आहे. स्वतःच स्वतःच्या दर्जाबाबत गप्पा मारणार्या मानंकित मासिकात, केवळ स्त्रियांना सवलत देणार्या काही मासिकात, पुरवण्यातून लेखन करणारी, आपल्या सोसायटीच्या वार्ताफलकावर लिहिणारी, उच्चपदवीधर असणारी माणसे एकवेळ रोज नियमाने देवाचे स्मरण करत नसतील पण या जाळ्याला एकदा नमस्कार करत असतात. याची कुणकूण लागल्यानेच बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्या साईटस वरून समजते.
हे सगळ फारच आशादायी आणि गुळगुळीत निरस वाटत आहे ना? म्हणजे चार मराठी डो़की तशी गुण्यागोविंदाने राहाणे?
पूर्वी भावंडात भांडण व्हायची, प्रेमी युगलांत एकमत होत नसे, नवराबायकोत कधी उघड आणि बरीचशी लपून भांडणे व्हायची, शेजारी भांडायचे . शेवट काय तर मग मोठ्याने आवाज, उखाळ्यापाखाळ्या, रडारड, दोन चार शिव्या , चार गुद्दे ! पण सर्वामंध्ये ध्वनीप्रदूषण अथवा कानावर अन्याय हा ठरलेलाच. याचे कारण काय ते प्रेम असो वा रागलोभ मराठी माणूस तसा वृत्तीने रांगडा आणि शेवटी साधा - जे काही करायचे ते वाजत गाजत. त्यामुळे ढोल ताशे नगारे सगळे आलेच.
(गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. एकंदरीत आता शत्रू कोण आणि मित्र कोण ते समजणेच अवघड आहे त्यामुळे सगळे कावे फसलेले आढळतात. ) तर मग या इंटनेटमु़ळे, विश्वजालामुळे जगभर संचार करायची युक्ती हाती आल्याने अनुकूल परिस्थितीत मराठी माणसाचे मराठीप्रेम जे ( कधीचे) गगनापार तर पोहोचलेले होते ते सात समुद्रापारही सहज डोळ्यात भरेल एवढे आता फोफावले आहे हे काही मुद्दाम सांगायला नको. थोडे विषयांतर झाले आहे त्याकरता क्षमा असावी पण मराठी- मराठी बाणा म्हटले की शिवाजी राजांचे नाव न काढता पुढे जाणे पुढच्या सात पिढ्यांनाही शक्य नाही हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल.
आता भांडणाकडे पुन्हा वळू या. चार मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. मंडळाच्या गणेशोत्सवाचे निमित्त्य, परदेशातल्या मराठीमंडळाचे निमित्त्य काही असू दे.. मतभेद हे आलेच. कारण एकमत झाले आणि तेही सर्वांचे तर मराठयांची अस्मिता बुडाली असा भलताच संशय इतरांना येईल. मराठयांची अस्मिता कोण असला फाजील प्रश्न मी विचारणार नाही कारण असल्या फालतू जोकला जाळ्यावर आजकाल कोणी भीक घालत नाही. दारु, बाई, मार , शिव्या यांनी भरलेले विडंबनाची जितकी किंमत तसलाच हा फालतूपणा आहे. तर खाणे, झोपणे आणि भांडणे हे सर्व जन्मसिद्ध अधिकार आहेत निदान मराठी माणसाचे तरी.. हे आजही आपल्यापैकी कुणी विसरलेले नाही.. तरीसुद्धा अशाप्रकारे फार त्रासदायक शेवट असणारे भांडणतंटे होऊ नयेत असे मत असणार्या अहिंसेचा पुरस्कार करणार्या काही मराठी लोकांनी भांडायला जरा सोपे पडावे म्हणून अताशा या विश्वजाळयाला हाताशी धरले आहे. नियतकालिकातून वाचकांचा प्रतिसाद यायला दिवस लोटत. आता सगळा दोन मिनिट का जमाना आहे. अगदी व्हिडियो कॉन्फरन्सची सोय जरी ब्लोगांवर मिळाली तरी नकोसा प्रतिसाद असला तर आवाज बंदचे बटन दाबले की झाले..ओरडणार्याचा फक्त चेहरा दिसेल! जी शक्ती आवाजात आहे ती हावभावात आणणे भल्याभल्याना जमत नाही. जे करायचे ते कर - गेंड्याची कातडी पांघरून मला काही इजा नाही ना हे धोरण जाळ्यात सुरु ठेवता येते हेच महत्त्वाचे.
भांडणाची हौस तर भागते पण रक्तपात आणि ध्वनीप्रदूषण दोन्हीवर नामी उपाययोजना असणारा हा मंत्र निदान जाळ्यावर लोकांना मिळाला आहे. असा नव्या जुन्याचा संगम इथे जाळ्यावर आपल्या लेखनाने साधता येतो.
कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदा का एखादी व्यक्ती जाळ्यात अडकली की ब्लॉग, ऑर्कूट , साईट वरून ती थेट आई बाबा, आजी आजोबा, मामा मावश्या ,मिळवत अगदी जिवश्चकंठश्च पर्यंत... आणि त्यापुढेही .......जाऊ शकते.(कम ऑन नाऊ, इथे सगळेच फुकट आपला वेळ घालवत नाहीत.)
रक्ताचे नाते नाही त्यामुळे नैतिक बंधनाच्या ओझ्याचा प्रश्न नाहीच ! शेवटी सगळे आभासी जग. हा एक धोका ओळखता आला तरच इथे राहणे सुकर होईल. बाकी सगळे अगदी खर्या आयुष्यासारखे. 'इथे वावरतांना संगणक बंद की त्यातले जग बंद' असा फुकटचा नको असलेला सल्ला देणारे माझ्यासारखे जीभ पोळलेले लोकही आहेतच. तेव्हा आता इथे आला आहातच तर फक्त कस आणि किती जाळ्यात गुंतायच (कोणाकोणाच्या जाळ्यात्? ऑ? ) हा निर्णय उरला आहे.
वाचने
6076
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
विचार करायला भाग
जालावर लिहिणे वाईट की चांगले?
In reply to जालावर लिहिणे वाईट की चांगले? by विजुभाऊ
माझी भूमिका
अरे बापरे..!
छान लेख आहे ...
उत्तम
हाही भाग चांगला...
लेख छान आहे..
सर्वांचे आभार
लेख
खरच विचार करायला हवा.....