मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चैत्र शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

धोंडोपंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लोकहो, चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे. मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय. मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल. मिथुनराशीवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो. गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील. कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे. त्यात आता मंगळराव राशीत येत आहेत. केतू सिंहेतून कर्केत येतोय. समोर राहुमहाराज आहेत. राहू मंगळ प्रतियोग कर्केतच घडणार आहे. काय करावे? परमेश्वरा...... वाचव रे या धोंडोपंताला!!!!! तर लोकहो, चैत्र महिन्यातील ग्रहराशीप्रवेश असे आहेत. चैत्र शुक्लपक्ष:- १) दिनांक १३/०४/२००८ रोजी सायंकाळी ०६ वाजून २९ मिनिटांनी रवि मेष राशीत प्रवेश करतो आहे. मेष ही रविची उच्च रास आहे. २) दिनांक १४/०४/२००८ रोजी रात्री २९ वाजून ४९ मिनिटांनी म्हणजेच दिनांक १५ एप्रिल रोजी पहाटे ०५ वाजून ४९ मिनीटांनी बुध मेषेत येतो आहे. चैत्र कृष्णपक्ष:- १)दिनांक २४/०४/२००८ रोजी सायंकाळी ०६ वाजून ५७ मिनिटांनी नेपच्यून कुंभेत जातो आहे. २) दिनांक २५/०४/२००८ रोजी रात्री ०९ वाजून ४० मिनिटांनी शुक्र मेषेत जातो आहे. ३) दिनांक २८/०४/२००८ रोजी दुपारी ०२ वाजून ४७ मिनिटांनी मंगळ कर्केत जातो आहे. ( ही ब्याद एकदा निघाली की सुटले बिचारे मिथुन वाले) ४) दिनांक २१/०४/२००८ रोजी सायंकाळी ०५ वाजून ४० मिनिटांनी बुध वृषभेत जातो आहे. ५) दिनांक ०५/०५/२००८ रोजी रात्री ०८ वाजून ०१ मिनिटांनी राहू मकरेत जातो आहे. (कुंभवाले सुटले) ६) दिनांक ०५/०५/२००८ रोजी रात्री ०८ वाजून ०१ मिनिटांनी केतू कर्केत जातो आहे. आपला, (गणकभास्कर) धोंडोपंत

वाचन 5458 प्रतिक्रिया 0