Skip to main content

छोट्या जाहिराती.

Published on मंगळवार, 24/08/2010
डिस्क्लेमर : हा धागा काढण्यामागचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवाव्यात असा नाही. त्यातून , कुणाला तसे (अकारण) वाटल्यास त्या सर्वांची आधीच घाऊक माफी मागत आहे. एका वृत्तपत्रात अलिकडे वाचलेल्या छोट्या जाहिराती : १. पाहिजे : पूर्वी सारखी टिकणारी मेंदी. रंग दोन दिवसांत जाऊन विचित्र दिसायला नको. पक्का हवा. २. पाहिजे : पडल्यापडल्या झोप लागेल असा पलंग. झोप येईल अशी खोली. खोलीत जाऊन झोपावेसे वाटेल असे घर. घरात राहावेसे वाटेल अशी जीवनशैली. शैली परवडेल असे जीवन. ३. पाहिजे : श्री. पांडुरंग पंढरपूरकर यांच्याशी एकदा तरी भेट घडवून आणून देईल असा एजंट. (बळवंतबुवा नको. या प्रकारचा एजंट या संदर्भात उपयोगी नाही.) ४. गतकाळाच्या आठवणींच्या दु:खापासून मुक्ती मिळवण्याकरता अक्सीर इलाज येथे मिळेल. आजच मागवा : गावच्या झोळीच्या, खांबाच्या, मंदिराच्या, परिसराच्या , माणसांच्या, काळाच्या हुबेहूब रेप्लिकाज. ५. सेल ! सेल !! आजच चौकशी करा : कमीत कमी दक्षिणेत जास्तीत जास्त पुण्य मिळवून देणारे भटजी/पुरोहित/गुरुजी/आध्यात्मिक गुरु. मेगा सेल. मिलेनियम डील. ६. त्वरित हवेत : मराठी सायटींवर सर्वाधिक प्रतिसाद मिळवून देतील असे धाग्याचे विषय. मात्र ते कुठल्याही प्रकारे वादग्रस्त असता कामा नयेत. कुणाच्याही भावना दुखू नयेत. चर्चा व्हावी पण शक्यतो मतभेद नकोत. ७. आजच मागवा : सर्व हिंदू सणांचे माहात्म्य सदासर्वकाळ सर्व पिढ्यांना समजेल अशी समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 5097
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

In reply to by निखिल देशपांडे

हेच म्हणतो. त्याशिवाय जेष्ठ सभासद मुसुंनी इतकी मोठी चुक करावी याचे सखेद आश्चर्य चाटले. अहो छोट्या नव्हे, चोत्या!!!

क्रमांक ६ साठी आम्ही प्रयत्न करणार होऽऽऽ! मुसु माझा पहिला प्रतिसाद आहे बरं का! माझ्या कौलाला तुमचे अनेक प्रतिसाद हवेत. मला भरघोस प्रतिसादांनी जिंकवा.;)

नमस्कार मुसुशेठ, आत्ताच मिसळपाव नावाच्या संकेतस्थळावर तुम्ही दिलेली जाहिरात पाहिली. >>पाहिजे : श्री. पांडुरंग पंढरपूरकर यांच्याशी एकदा तरी भेट घडवून आणून देईल असा एजंट. :) अहो मग आम्ही कशाला आहोत. सगळी व्यवस्था आम्ही करु. श्री च्या मुर्तीचे दर्शन, षोडशोपचार पुजा, नित्यविधी, प्रसाद आणि इतर पवित्र वस्तु, श्री ची मुर्ती आणि प्रतिमा आदी गोष्टींची व्यवस्था आमचेकडे नाममात्र दरात करु दिली जाईल. अनुभव हीच खात्री. टीप : दक्षिणा दानपेटीतच टाकावी - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

=)) =)) =)) अरे शिंच्या दोन्या, मुसुंनी यावेळी इतके सरळ लिहले तरी तुला बाउंसर गेला का रे? ;-)

In reply to by Nile

निळ्या, सध्या तुझी "गल्लत होते आहे" इतकेच म्हणतो. मी अगदी अचुक लिहले आहे, प्रतिसाद वाचुन पहा :) जेव्हा तुला ह्या वाक्याचा अर्थ कळेल तेव्हा तुला प्रतिसादातले राजकारण कळेल असे सांगतो ;)

स्वतःची ... अशी प्रतिमा बदलण्याचा श्री. मुक्तसुनीत यांचा लेखरूपी प्रथम प्रयत्न नक्कीच लक्षणीय आणि स्पृहणीय आहे. श्री. मुक्तसुनीत यांचे नाव पाहिल्यावर लेख आणि प्रतिक्रिया अतिशय अभ्यासू असतील यात शंका नसतेच शिवाय त्यांच्या लिखाणातून आमच्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांना दोन-चार नवे शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि संदर्भ समजतील अशी अपेक्षा असते. पण ही अपेक्षा दुर्दैवाने या लेखातून पूर्ण होत नाही. एकतर श्री. मुक्तसुनीत हे मेगाबायटी प्रतिसादक नसले तरी काही शे किलोबायटी प्रतिसादक आणि जीगाबायटी (धागा) लेखक आहेत. ते कधीकधीच लिहीतात, पण त्यांचे लिखाण विद्वत्तापूर्ण, लालित्यपूर्ण आणि माहितीपूर्ण असते. सदर लेखाच्या लांबीमुळे हा लेख त्यांनी चुकून घाईघाईत प्रकाशित केला अशी शंका येत आहे. तसे नसल्यास श्री. मुक्तसुनीत यांनी स्वतःच्या एका दीर्घकालीन प्रतिमेतून तरी स्वतःला मुक्त केले आहे याचा आम्हांस आनंद होत आहे. सदर छोटेखानी लेखाच्या शीर्षकातून लेखाच्या लांबीबद्दल सूचक उल्लेख करून खरंतर अधिकतम वाचक खेचून घेण्यासाठी आणि विनयाने श्री. मुक्तसुनीत यांनी 'छोट्या' हा शब्द शीर्षकात वापरला असावा असे वाटत आहे. पण जाहिराती खरोखर छोट्या आहेतच, पण त्याशिवाय लेखही छोटा आहे. अर्थात लेखाच्या लांबीपेक्षा लेखाची खोली महत्त्वाची. सदर लेखाची खोली फार जास्त नसली तरीही विनोदाच्या अंगाने जाणार्‍या (आजकाल मिपावर ज्याची समज कमी दिसते त्या) उपरोधामुळे लेखाने एक वेगळीच उंची गाठली आहे. लेखात फक्त खोलीचा उल्लेख करून लेखाची खोली वाढत नाही याची आठवण म्या पामराने श्री. मुक्तसुनीत यांना करून देण्याची गरज नाहीच; परंतु तरीही हा प्रमाद फक्त परिपूर्ण प्रतिसाद न देण्याचा प्रसंग उद्भवू नये म्हणून प्रयत्नपूर्वक केला आहे. सातच जाहीरातींबद्दल का लिहीलं असावं हा गहन प्रश्न मात्र बाँडप्रेमींना पडू नये याची काळजी लेखकाने घेतली आहे. अर्थात होम्सप्रेमींसाठी का ना काही उत्तर असेलच ते त्यांनी शोधावंच. बेचाळीस या सर्व प्रश्नांच्या उत्तराला साताने केलेले सहाय्यही या धाग्यामुळे पुन्हा एकदा उजेडात येईलच. प्रतिमाबदलाचा एक वास्तुपाठ म्हणून हा लेख वाचायला अजिबात हरकत नाही.

In reply to by चतुरंग

आम्हाला देवसमान आणि गुरूस्थानी (अर्रर्र, काय शब्द वापरायाची वेळ आली आहे माझ्यावर!) असणार्‍या दोन व्यक्तीमत्त्वांची नाव प्रतिसादात लिहीणार्‍या रंगरावांना आमचा साष्टांग नमस्कार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला वाटतं प्रस्तुत लेखक मुक्तसुनीत यांची प्रतिमाबदलाची प्रक्रिया गेले काही महिने चालू आहे. सुरवंटाने आपल्याभोवती रेशमी कोष विणावा आणि विरक्ती पत्करून त्या अंतिम प्रतिमेची आराधना करण्यासाठी तपस्या करावी तसे ते बराच काळ कोषातच होते, त्यामुळेच फारसे दिसले नाहीत. मग मध्ये अवचित तो कोष फाटताना काही झगमगीत रंग दिसल्यामुळे लोक दिपून गे'ले, भांबावून गे'ले. जुने, पूर्वग्रहांनी लिडबिडलेले मानदंड बाळगून हे रंग तुम्हाला शोभत नाहीत असंही चुकून काही म्हणाले. सध्या आपल्याला कधी हा ठिपका तर कधी तो ठिपका असं चित्र तुकड्यातुकड्यांनी दिसतंय. सत्य खंडांशांनी प्रतीत होतंय. पण आता अंतिम प्रकटनाचा दिवस जवळ आलेला आहे असं वाटतं. कदाचित ते मुक्तफुलपाखरू या आयडीने अवतीर्ण होतील. त्या दिवसाची मी वाट पाहात आहे. (बायदवे, अदितीचा रिस्पॉन्स लयभारी)

In reply to by राजेश घासकडवी

खतरा प्रतिसाद! ;) (आपल्याभोवती रेशमी कोष गुंडाळून बसलेले मुसुषेठ डोळ्यांसमोर आले आणि फिस्सकन हासलो! ;) ) मुक्तचतुरंग

मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी या. किती विनय हा मास्तर? ;) की याला 'छोट्या' म्हणताय! (हे वाक्य थोडे पश्चातबुद्धीने लिहिलेले आहे.) माझे शब्द असे इथंच यमी आणि गुर्जी खरे ठरवतील असं वाटलं नव्हतं. लईच मोठ्या गोष्टी या. आणि सगळी लोकं किती विनयशील! माझा एक मित्र म्हणायचा, विनय इतका असावा की समोरचा त्यापुढं लाजून चूर व्हावा. इथं हा परिणाम बहुदा साध्य होणार. :)

श्री.मुक्त सुनीत यांचा लेख म्हणून मी "त्या" मागील इतिहास न वाचताच (वा समजून न घेताच) "छोट्या जाहिराती"चे विश्व व त्याचा प्रभाव या अनुषंगाने थोडा विस्तृत असा प्रतिसाद इथे दिला होता. पण तो प्रकाशित झाल्यानंतर आणि अन्य प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला समजून चुकले की इथे त्या लेखावरून "स्कोअरिंग सेटलमेंट" ची इनिंग खेळली जात आहे, साहजिकच त्यामुळे माझ्या रेग्युलर कोर्समधील प्रतिक्रियेला इथे स्थान नाही. सबब ती प्रतिक्रिया मी काढून घेत आहे. बाकी ३ फिगर प्रतिसादाच्या शिखराकडील वाटचालीसाठी शुभेच्छा

काही रोचक संदर्भ : http://india.poetryinternationalweb.org/piw_cms/cms/cms_module/index.php?obj_id=3019&x=1

एका आवडत्या काकांमुळे प्रतिसादासाठी एक नवे वाक्य मिळाले आहे. 'मिपावर मिपाबद्दलचे लेखन हिट जाणारच' चान चान.

:) अवांतर - 'अलीकडे माझं खरं वय दाखवणारे आरसे मिळेनासे झालेत' ही काही(च्या) काही कवितांतली ओळ आठवली.