कुठ कुठ जायाच जाळ्यात -१
कुठ कुठ जायाच जाळ्यात
काय आहे मंडळी एकदा का जाळयात अडकलात की तुमची सुटका नाही हेच खर. मग ते जाळ सौंदर्यवतीच्या धुंद करणार्या सौंदर्याच असो , साखरपेरणीसारख्या स्तुतीसुमनांच्या वर्षावाचे असो, पोलिसी पहार्याचे असो की इनकमटॅक्सच्या धाडीचे असो ..किंवा आजच्या या विश्वजालाचे सुद्धा! एकदा का आत आलात की बाहेरचा रस्ता बंद एवढच लक्षात असू द्या.
तासाला पाच रूपये एवढ्या स्वस्ताईत पावसाळ्यात इथे तिथे दिसणार्या जमिनीवरील छत्र्यांसारखी ही सायबर कॅफे भारतात पसरली आहेत. शहराशहरातून थेट तालुक्याला ब्रॉडबॅंडची पावले पडू लागली आहेत. प्यायला पाणी नाही, दोन तासाहून अधिक काळ वीज नाही सिगरेट, दारू , औषधे यांच्या दुकानासारखेच इतर कुठे नाही पण निदान फोन बूथजवळ तरी एक सायबर कॅफे असलेच पाहीजे अशी अटच असावी असे वाटते. शिवाय जवळ जवळ सर्वच कंपन्यात काम करणार्यांना हवा तेव्हा हवा तितका आणि तोही फुकट जाळ्याशी संपर्क साधता येतो याची आपल्याला कल्पना असेलच. अशाप्रकारे एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्राथमिक गरजेतूनतीन पिढ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात हे विश्वजाल मोठ्या शिताफीने यशस्वी झाले आहे. ( अन्न ,वस्त्र, निवारा यापेक्षा मोबाईल आणि इंटरनेट याच सध्या प्राथमिक गरजा आहेत हे मान्य करत असाल तरच आपली गणना तरूणांमध्ये होईल लक्षात असू द्या..)
कोणत्याही प्रकारचा संवाद आता दोन सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी प्रेमी व्यक्ती प्रत्यक्षपणे नाही तर दोन संगणकाद्वारे साधतात असे संशोधनाअंती आढळले आहे.
अदयावत संगणकीय तंत्रज्ञान हाताशी असल्याने सर्वकाही वाचण्याची, ऐकण्याची सोय आता विश्वजाळ्यामुळे शक्य झाली आहे. वेगाने होऊ घातलेल्या 'डिजिटायझेशनमुळे' आपल्याला हवे असणारे पुस्तक, नवी जुनी गाणी, सिनेमा , कादंबर्या , पुस्तके हे सर्व माहितीजाळयावर उपलब्ध आहे अधिकाधिक प्रमाणात भविष्यातही होतच राहील यात तिळमात्रही शंका नाही. आज सर्व काही झटकन हवे असते आणि त्यात अधिक काळ रममाण होण्याची गरजही राहिलेली नाही अशी स्थिती आहे. आपल्याच जुन्या जमान्यात रमणारे आजही आहेत, अनेक आहेत त्यामुळे या वेगाच्या रेट्यात जाळ्यावर अगदी बाबा आदमच्या काळातील माहिती सुद्धा मिळू शकेल. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार ? असे म्हणणार्यांनी एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल. त्याला केवढी 'मेगा डिमांड' आहे हे लक्षात घ्या. (काही शब्द इंग्रजी वापरले की खास वजन येते असे अनेक मान्यवर लेखकांच्या लेखनातून आढळले आहे. म्हणून तसेच करण्याचा माझाही भाबडा प्रयत्न आहे असे समजा आणि मराठी प्रेमीं रसिकांनो मला मोठ्या मनाने क्षमा करा. )
तथाकथित कथासंग्रह, कादंबर्या, मासिके अशा काळ्या पांढर्यावर आणि शेवटी रद्दीच्या ढिगार्यात जमा होणार्या काही क्षूद्र कागदी कपट्यांवर फारसे विसंबून न राहणारी एक जमात आहे. ती अतिशय प्रगल्भ, प्रतिभावंत आणि ताज्या दमाची पिढी कधीचीच या जाळयात आपल्या लेखनाचा झेंडा मोठ्या दिमाखाने फडकावित उभी आहे. शेवटी वरवर अगदी सहजशक्य वाटणारा हा मामला अतिशय नाजूक आहे हे सांगायलाच हवे. आज चार वर्षाच्या पोराला त्याचा स्वतःचा ईमेल आयडी हवा असतो. त्याला वावरायला कायद्याने परवानगी असणार्या काही साईटस् म्हणजेच संकेतस्थळांना तोटा नाही. अगदी मराठीचा विषय काढलात तरी मराठी गोष्टी आणि बालगीते ऐकण्याची सोय आज त्याकरता उपलब्ध आहे. काही काळाने लहान बाळाच्या रडण्याचे 'डिकोडिंग' करून ही माणसे आपल्य पिल्लूला हे नकोय , ती साईट हवी आहे असे म्हणाली तरी मला वावगे वाटणार नाही. अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचे शिकला तसे ही पिढी सर्व साईटसवर काय काय करायचे, कशी माहिती शोधायची , कसा संवाद साधायचा ते आईच्या पोटातच शिकली आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो, आम्ही ब्रीज खेळतो, आम्ही अमूकच वाचतो असे जे काही अभिजात अमूक तमूक आहेत ना त्यामध्ये जाळ्यात चार ओळी लिहिता आल्याच पाहिजे हे सर्वात अग्रक्रमी आहे. नव्या काळाची पावले ओळखण्यात चतूर असणार्यांनी म्हणूनच या समांतर विश्वाला आपल्या मुख्य पानावर वेळीच मान द्यावयाला सुरुवात केली आहे.
तुमच जे काही खर खोट, खाजगी सावर्जनिक आयुष्य असेल नसेल , आपण एक दोन चार पाने ,एक दोन बुक वाचत असाल नसाल तरी त्यावर ठासून चार मराठी ओळी खरडता आल्याच पाहीजेत अशी अट आणि अपेक्षा आज गृहीत धरली आहे. आजन्म एकटे राहण्याची शपथ वगैरे घेतली असेल तर या मराठी विश्वाच्या जाळ्यात वावरतांना अतिशय सावधगिरीने वागा. शेवटी माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे तेही भावभावना ( हो भाव आणि भावना ) दोन्ही असणारा......
तिचा विषय आला की शेवटी जरा हळूवार आणि हळवे सुद्धा व्हायलाच हवे. सर्वांनीच विशेषतः पुरुषांनी. बायकांनी पारंपारिक लाजणे इत्यादी सोडले असले तरी पुरुषांकडून पूर्ण होणार्या अपेक्षात पुरुषांकडून मिळणारा अनुकूल प्रतिसाद आजही कायम आहे. मी फक्त लेखनाला अनुकूल प्रतिसाद म्हणते आहे.. विश्वास बसत नसेल तर झाडून काढा सगळे माहितीजाल याचे पुरावे कायम तिथे आहेतच. तोच मुद्दा पुरुषांना सुद्धा लागू आहे. चार पुरुष आयडिचे प्रतिकूल प्रतिसाद ते झेलतील पण एखाद्या फुलाचे काटे बोचले तर मात्र घाव अतिशय खोल जातो.....तेव्हा जाळ्यावर कस वागयच ह्याच अतिशय लवचिक धोरण असू द्या.
क्रमशः
वाचने
6898
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
बलन्स्ड..
हा भाग आवडला,
सोनाली चांगला लेख आहे.
In reply to सोनाली चांगला लेख आहे. by चतुरंग
मस्तच!
In reply to सोनाली चांगला लेख आहे. by चतुरंग
धन्यवाद
सुवर्णमयी
In reply to सुवर्णमयी by धमाल मुलगा
धमाल्या,
प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच.
In reply to प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. by विजुभाऊ
:)
In reply to प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. by विजुभाऊ
विजुभाऊ,
मिपा आम्हा लोकाना मनमुराद लिहीन्याची मस्त संधी मिळवुन देतेय
सर्वांचे मनापासून आभार