मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाभारत

स्पंदना · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
टू, संपादक मंडळ. हा लेख थोडा जरी असभ्यते कडे वळणारा वाटला तर खुशाल काढून टाकणे. ही माझ्या आयुष्यातली घटीत घटना आहे. महाभारत. मंडळी, पुस्तकी भाषेपेक्षा बोली भाषा कशी श्रेष्ठ आहे याच कालच एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर घडल. कधी कधी अशी काही विदुषकी समस्या आपल्यासमोर उभी राहते की सांगताना स्वत:चा अन दुसऱ्याचा आब राखून कस बोलाव असा यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा रहातो. पण यातून तोड निघते ती आपल्या खेळकर बोलीभाषेतून. अगदी हसत हसत दुसऱ्याची चुक त्यालाही तेव्हढंच हसवत सांगावी तर या 'बाजीराव' भाषेतच! बघा केव्हढ विषयांतर झालं ! तर महाभारत. महाभारत हे एक प्राचीन एपिक आहे, आणि ते भारतात लिहिल गेलं आहे याचा आपण सर्वांना अभिमान ही वाटतो. पण हा एव्हढा उच्च दर्जाचा ग्रंथ लहाणांसाठी कितीही सोपा करून लिहायचा प्रयत्न केला तरी ते अशक्यप्राय आहे. अहो मुळची कथाच एव्हढी 'घनगंभीर' आहे ती सोप्पी सोप्पी अशी किती सोप्प्प्पपी करणार? या सोप्पी करण्याच्या भानगडीत आधीच 'सोपी' ( soapy ) असलेल्या त्या कथेवरून आपण घसरुन पडायचीच शक्यता जास्त ! तर सांगायचं म्हणजे आम्ही लहाण होतो. एकदम भरगच्च एकत्र कुटुंब! काका , काक्या , चुलत भावंड असा मोठ्ठा पसारा! म्हणजे बघा चार भाऊ, त्यांच्या प्रत्येकी एक पकडून चार बायका, अन मग ही उतरंड चिल्ल्या पिल्ल्यांवर जवळ जवळ प्रत्येकी डबल वां तिबल पकडा. घरात टेबल खुर्च्या अन पितळी फुलांचे पाट हे दोन्ही भोजन व्यवस्थेत अजून वापरले जात होते. अन टी व्ही नावाचा भान हरपवणारा प्रकार फक्त मुंबै व दिल्लीत असतो हे ऐकून माहिती होत. मला वाटतंय उन्हाळ्याची वां दिवाळीची अशी सुट्टी असावी, कारण घरात चार आत्या त्यांच्या चार मामांसह आपापली उतरंड घेवून उपस्थित होत्या. मी अगदी लहाण होते. साधारण पाच वर्षाची वां सहा म्हणा! वाचायला मी कशी काय जाणे, पण फार म्हणजे फारच लवकर शिकले होते. कदाचित घरात एव्हढ्या सगळ्या भावंडांना जे काही शिकवलं जाई ते ऐकून ऐकून असाव, पण वाचन एकदम फर्डा ! शाळेत मास्तर जेंव्हा सगळ्यांना वाचायला शिकवत, तेंव्हा मला हात जोडून 'गप्प रहा' म्हणून सांगत. पण पुस्तकात लिहिलेलं सगळं वाचायला येत म्हणून ते सार समजतच असं नाही ! मग जे काही समजत नाही ते विचारायचा प्रयत्न ! बहुतेकदा 'गप्प बस' असा ओरडा ही मिळायचा. तर अश्याच एका दुपारी आम्हा बच्चे कंपनीची जेवण झाल्यावर, बाकी सारे काही बाही udyogan मध्ये रमून गेले. माझ्या हाताला मात्र एक छोटस , ते नाही का साधारण दोन रुपयान पर्यंत मिळायचं? तसलं ,कदाचित "महाभारतातल्या कथा" वां असच काही तरी; पण महाभारताच्या कथा लहाणांना सुलभ करून सांगणारे पुस्तक लागल. वाचनाचा झपाटा असल्यान, आणि , ते फुकट आरडा ओरडा करून घेण्या ऐवजी असं अद्र्श्य होता येत असल्यान मी बघता बघता त्यात रमून गेले. कुंती पंडू सह वनात गेली , ठीक आहे . तिला देवांच्या वरान तिन पुत्र झाले ठीक आहे. मग माद्रीला पण झाले. मग राजा मेला....च च .. वारला. माद्री सती. कुंती परत हस्तिना पूर... वाईट्ट दुर्योधन..माझ्या एखाद्या मोठ्या भावासारखा..ठीक आहे. मग लाक्षागृह , बकासुर, खांडव वन इथ पर्यंत भाषा तशी सोपी वाटली म्हणजे फारसा प्रश्न नाही पडला , पुढे मागे जे संदर्भ होते ते धरून उमजत होत. शेवटी आल युद्ध ! आता इथ मात्र माझी गाडी अगदी कर्णाच्या रथ चक्रा सारखी अडली. प्रसंग होता दु:शासन वधाचा! तो पर्यंत कदाचित मला पण वीरश्री चढली असावी ! तर भीमाने त्या अतिशय अतिशय वाईट्ट दु:शासनाचे वक्षस्थल फोडून त्यातले रक्त तो गटागटा प्याला इथे माझी गाडी अडली! आता पर्यंतच्या सहा वर्षाच्या आयुष्यात हा शब्द नव्हता आला हो ! अगदी भीमा शप्पथ! त्यान कहि तरी फोडलं अन रक्त प्याला, पण नक्की काय? कसा त्या दुष्ट दु:शासनाला त्रास झाला असेल हे समजून घ्यावास वाटल. झालं!! निघाले अस्मादिक विचारायला! आता प्रसंग असा... स्वयंपाक घरात सारे जण पाटावर बसलेत सारे म्हणजे मोट्ठे . आम्हा बच्चे कंपनीला खायला घालून ही मंडळी आरामात जेवून ताटावर तशीच पाय बाजूला सोडून निवांत गप्प मारीत होती. किती जण? चार चक सोळा! अन अस्मादिक स्वयंपाक घराच्या उंबऱ्यावर !! मी आमच्या पिताश्रींना अगदी बाल सुलभ बेधडकपणे विचारलं, 'पप्पा वक्ष स्थल म्हणजे काय?" काय सांगू तुम्हाला? एव्हढ्या लहानपणी घडलेला प्रसंग पण त्या वेळच्या त्या सारया मोठ्ठ्या मंडळींच्या रिअक्शनन तस्साच्या च्या तसा माझ्या डोळ्या समोर आहे. सारे अवाक ! हातातले घास, हातात! तोंडातले वाक्य तोंडात ! साऱ्यांचे चेहरे असे बदलले की मला शंभर टक्के खात्री पटली ' आज आपल काय खर नाही'. बर पण आपण असं काय विचारलं म्हणून ही एव्हढी अश्शी रिअक्शन उमटावी हे ही समजेना ! आज आठवल की वाटत त्या भर सभेत मी काय अवस्था केली सगळ्यांची !! अहो तिथे सारे बहिण भावंड, वहिण्या नणंदा, अन घराचे मेहुणे पाहुणे होते की हो !! अन अस्मादिक त्या दु:शासनाच्या काळजीत? शेवटी कसा बसा पप्पांना कंठ फुटला, त्यांनी विचारलं ' कुठ वाचलास हा शब्द ?' आता हा प्रश्न विचारण्याच कारण अस्मादिक हाताला जे लागेल ते वाचतात अशी आमची ख्याती होती. काय वाट्टेल ते समोर दिसलं की वाचलं हा अस्मादिकांचा खाक्या ! मी पाच सहा वर्षाच्या पोराला वां पोरीला म्हणा जमेल तेव्हढ्या निरागसपणे सांगितलं ' हे इथ, भीमान दु:शासनाचे वक्ष स्थल फोडून रक्त प्याला असं लिहिलंय'. सारे जण जे जे काय समोर होत त्यात पडलेले मला अगदी लख्ख दिसले.अडकलेले श्वा:स मोठ्यान सुटलेले ही दिसले. चला म्हणजे मार नाही तर? मग पप्पांनी अगदी हसऱ्या चेहऱ्यान मला," अग त्याची छाती फोडून, ते रक्त तो प्याला" असं सांगितलं. आज मला विचाराल तर माझी पोर 'विन्ग्लीश' मध्ये म्हाभारत वाचात्यात, तवा हे मी जे पेरून ठेवलय ते माझ्यासमोर उगवायची भिती या विन्ग्लीश मूळे टळली आहे म्हणायला हरकत नाही.नसावी .

वाचने 5638 वाचनखूण प्रतिक्रिया 23

नगरीनिरंजन 12/08/2010 - 09:22
वक्षस्थळाचे महाभारत गमतीदार आहे. तेव्हा तुम्ही गीतगोविंदं वाचलं नाहीत हे किती छान झालं नै? >>शाळेत मास्तर जेंव्हा सगळ्यांना वाचायला शिकवत, तेंव्हा मला हात जोडून 'गप्प रहा' म्हणून सांगत डोळ्यासमोर चित्र येऊन ह.पु.वा. (आता मुलांना शिकवताना अक्षय हात जोडतात का? :-P )

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना 12/08/2010 - 10:45
>>आता मुलांना शिकवताना अक्षय हात जोडतात का?>> नाही साष्टांग घालतात. माझ्या धाकट्याला भेटा एकदा. मोठीला फिजिक्स शिकवताना 'वॉट इज मॅटर?' विचारल तर जवळ खेळत असलेल्या याने 'इट डज नॉट मॅटर ' म्हणुन सांगुन लोळवल होत.

सहज 12/08/2010 - 09:28
कृष्णाच्या गोष्टी सांगाव्या म्हणून लायब्ररीतुन एक पुस्तक उचलले व चाळत असताना एकदम पुतनाची गोष्ट दिसली. लगेच पुस्तक ठेवुन दिले. मधे असेच एक अमर चित्रकथा पुस्तक घेतले होते त्यात इंद्राचे प्रताप वाचून चला कार्टून बघूया म्हणून पुस्तक वाचन थांबवले. :-) आता आठवणीतुन गोष्टी सांगतो काही बाही.

इन्द्र्राज पवार 12/08/2010 - 09:44
व्वा ! जितका निरागस प्रश्न तितकेच समजूतदार उत्तर. त्यामुळे तुमच्या पप्पांना १० पैकी १० गुण दिलेच पाहिजेत. अन्यथा त्यांनी "कार्टे, फेकून दे ते पुस्तक ! काय वाट्टेल ते वाचत बसण्यापेक्षा जा अभ्यास कर." असे म्हटले असते तर तुमच्या वाचनप्रेमाची तिथेच इतिश्री झाली असती. (आणि हे बर्‍याच ठिकाणी होत असतेच असते. सो यू वेअर लकी इनफ !)

योगी९०० 12/08/2010 - 10:04
तरी बरे तुम्ही महाभारताचे खंड वाचले नाहीत.. माझ्या ऐकीवात एकाने "नसबंदी" म्हणजे काय असे त्याच्या लहानपणी सर्वांसमोर विचारले होते. रस्त्यावर कोठेतरी लिहिलेले वाचले होते. (तसे प्रत्येकाने त्याच्या आयूष्यात काहीना काही असे प्रश्न विचारून आई वडिलांना embarrass केले असावे) बाकी वयाच्या पाच/सहाव्या वर्षी वाचायला शिकणे म्हणजे कमाल आहे..किस्सा आवडला..

स्पंदना 12/08/2010 - 10:48
>बाकी वयाच्या पाच/सहाव्या वर्षी वाचायला शिकणे म्हणजे कमाल आहे..>>> अहो मराठी तस सोप्प आहे, अक्षराला अक्षर लावुन जस आहे तस वाचायच, आता आपली दोन वर्षाची मुल ए बी सी डी नाही का ओळखत? तसच असाव, माझ्यावर अं एक दोन तिन्..निदान चार पाच मोठी भावंड शाळेत जाणारी होती. माझा एक आत्तेभाउ मला बाटली पाजवत अभ्यास करत होतो अस सांगुन अजुन चिडवतो. ते मी काय वाट्टेल ते वाचते म्हणुन प्रसिद्ध होते ना , ते मोठ्यान जाहिराती वाचण्या मुळेच!! त्या वेळी अश्या विशेष जाहिराती नसायच्या , ज्या असायच्या त्या शासनाच्याच.

धनंजय 12/08/2010 - 11:04
हे संस्कृत शब्द कधीकधी कळायला खूप उशीर लागतो... (इरावती कर्वेंनी सांगितलेली "नितंब"ची कथा [दुवा] आठवली)

हर्षद खुस्पे 12/08/2010 - 11:08
मी का।इतरी वयाच्या १२ किंवा १३ व्या वर्षी असेन्.....पेपर मधिल बातमी " Blue Film तयार करताना पॉलिसांनी पकडले" वाचुन मला काही कळले नाही...तर मी तो प्रश्न आईला विचारला.....आई अवाक्......मग ती म्हणाली अरे Blue Film म्हणजे निळी फिल्म...नंतर लगेच आमच्या सहामाईच्या मार्कांवरुन आमचा सातबारा काढ्ला गेला. तेव्हापासुन कानाला खडा लावला...नसते प्रश्न विचारयचे नसतात. :)

विश्वनाथ मेहेंदळे 12/08/2010 - 12:51
मी असेच प्राथमिक शाळेत असताना महाभारत वाचताना दौपदी रज:स्वला (की रजस्वला) होती असे वाक्य आले. मग रज:स्वला म्हणजे काय हो असे वडिलांना विचारले होते. त्यांनी "मला माहित नाही" असे सांगून विषय संपवला. ते खोटे बोलत आहेत हे कळले होते तेव्हा. मग थोडा मोठा झाल्यावर संस्कृत शब्दकोशात त्याचा अर्थ शोधला. त्यांनी जो मराठीतील समानार्थी शब्द दिला होता तो ही त्या वयात कळला नाही. मात्र हा प्रश्न विचारून काही उत्तर मिळणार नाही हे कळले होते. मग पुढे कधीतरी कळला तो अर्थ. पुढे अजून दोनदा असेच अडचणीचे प्रश्न विचारले होते. दोन्ही वेळेला बाबांनी वेळ मारून नेली. :-)

अनामिक 12/08/2010 - 19:27
हा हा हा, मजेशीर अनुभव अपर्णा. अगदी चित्र डोळ्यासमोर उभं केलंस! टिव्हीवर "जरासी सावधानी, जींदगीभर आसानी" अशी फॅमीली प्लॅनींगची जाहिरात यायची ती कुणाला आठवते का? मी तिसरी-चौथीत असताना ती मोठ्याने गुणगुणायचो कधीकधी... एक दिवस घरी आलेल्या कोणासमोरतरी मोठ्याने हि जाहिरात गाऊन आई-बाबांना अडचणीत आणंलं होतं त्याची आठवण झाली.

शाहरुख 12/08/2010 - 22:00
इंग्लिश शिकायला सुरुवात केलेल्या काळात मी छातीसाठी 'ब्रेस्ट' हा शब्द वर्गात वापरल्याने मास्तर अडचणीत आले होते :-)

आळश्यांचा राजा 13/08/2010 - 00:21
एकेक धमाल किस्से आहेत सगळ्यांचे! कुमारसंभवाची गोष्ट वाचत असताना (लहान असताना) मी माझ्या आईला "वीर्य" म्हणजे काय ते विचारलं होतं. तो (अर्थातच तिने न सांगितल्यामुळे) न समजल्यामुळे शौर्य ला समानार्थी शब्द असावा असा समज करुन घेतला. पण मग आपले शौर्य शंकराने अग्नीच्या अंगावर कसे काय "सांडले" ते मला अनेक वर्षे समजले नव्हते. चालायचं.

In reply to by आळश्यांचा राजा

विश्वनाथ मेहेंदळे 13/08/2010 - 01:59
वीर्यचा एक अर्थ "शौर्य" असाही आहे असे वाचल्याचे स्मरते. महाभारतात एखाद्या वीराचे वर्णन करताना "वीर्यवान" हे विशेषण सर्रास वापरले जाते. तसे नसेल तर त्यातून भलताच अर्थ निघायचं की हो !! तपासून पाहिले पाहिजे. कुठे गेला रे तो संकृत-मराठी शब्दकोश ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आळश्यांचा राजा 13/08/2010 - 02:17
त्या वीर्यवान चा भलताच अर्थ निघायची शक्यता जास्त आहे. "मर्द", "मर्दानगी", "पौरुष" इ. इ. ठासून सांगण्यासाठी केला गेलेला शब्दप्रयोग असावा तो असं वाटतं. शौर्यवान असा शब्द ऐकला आहे काय? नुसते शूर किंवा नुसते वीर. मला वाटतं गोनीदांच्या एका ऐतिहासिक कादंबरीत मी पराक्रमाच्या संदर्भात वीर्य हा शब्द असा वाचला होता - गडी असल्या वीर्याचा की तशाही अवस्थेत पलटून वार केला - असं काहीसं. इथे शौर्य हा अर्थ अभिप्रेत नसावा. वीर्य म्हणजे आपला तो "भलताच" अर्थ लागू होत असावा.

In reply to by आळश्यांचा राजा

इन्द्र्राज पवार 13/08/2010 - 10:19
मोल्सवर्थने "वीर्यवान" चा जो अर्थ दिला आहे (Having strength, vigor, virtue, potency, capability of performance or of endurance generally) त्यावरून त्याचे प्रयोजन अगदी महाभारतकालीन वीरांच्याबाबतीत केला जाणे अयोग्य मानले गेले नसेलच. (शौर्यवान हे विशेषनाम मराठीत आढळत नाही, मात्र शूरवीर असे आपण म्हणतो.). गोनीदांनी "वीर्य" चा वापर नायक 'बघा, किती निधड्या छातीचा !' या अर्थाने केला असणार. विशेष म्हणजे "वीर" या आदरार्थी विशेषणाची व्युत्पत्ती "वीर्य" पासूनचीच आहे.

मराठमोळा 13/08/2010 - 00:41
हाहाहा ....गमतीदार किस्से... लहान मुलं कधी काय विचारतील याचा नेम नाही, कारण एकच जबरदस्त क्युरिऑसिटी. लहानपणी माणुस गोष्टी पटकन विसरुनही जातो म्हणुन प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली तरी चालुन जातं. मी लहान असताना एकदा आई मला शेजारच्यांच्या घरी सोडुन मंडईमधे भाजी खरेदीसाठी गेली, शेजारच्या काकु प्रेगनंट होत्या, घरी त्यांच्या माहेरची बरीच मंडळी होती. सर्वांच्या मधे बसुन मी काकुंना विचारलं की "काकु, तुमच्या पोटातलं बाळ कसं तयार झालं?" अर्थातच प्रश्नाचं उत्तर मिळालं तर नाही, पण माझ्यासमोर गरमागरम शिर्‍याची/खिरीची (नक्की आठवत नाही) डिश ठेवुन मला प्रश्न विसरण्यास भाग नक्की पाडलं काकुंच्या आईने. ;) (कितीही लहान असलं तरी आयुष्यातले काही प्रसंग नक्की लक्षात राहतात हे नक्की ) ;)

मनीषा 13/08/2010 - 08:49
फारच अवखळ / निरागस किस्सा ... पुस्तकात लिहिलेलं सगळं वाचायला येत म्हणून ते सार समजतच असं नाही ! हे वाक्य फार आवडले.

इन्द्र्राज पवार 13/08/2010 - 10:39
अगदी असा खट्याळ (वा निरागस) पणाचा नाही, तरीही मोठ्यांना उत्तर देताना काहीसे कोड्यात टाकणारा प्रश्न लहान विचारतात. आमच्या सोसायटीत राहणारे मराठीचे एक शिक्षक त्यांच्या घरात शनिवार/रविवारी त्यांच्या मुलांसमवेत खेळायला आलेल्यांना खेळ संपल्यानंतर खायाला काहीबाही (चुरमुरे, भडंग, तिखटमिठ लावलेले कोरडे पोहे. इ. ~ पॉपकॉर्नचा जमाना नव्हता) देता देता "महाभारता"तील किस्से सांगायचे. एके दिवशी त्यांनी "लाक्षागृह" एपिसोड सांगितला. "पुरोचन" च्या मदतीने पांडवाना एकत्रीत जाळुन टाकण्याचा दुर्योधन आणि कंपनीचा प्लॅन, व त्यानुसार त्या वाड्याची बांधणी, विदुराला घातपाताचा सुगावा लागणे आणि त्याने ती घटना घडण्यापूर्वीच धर्मराजाला सजग करणे, मग पांडवांची युक्ती, भुयार पाडणे इ. इ. इथपर्यंत ठीक होते. पण ज्या रात्री पुरोचन लाक्षागृहाला आग लावतो त्याच रात्री कुठुनतरी पाच भिल्ल व त्यांची आई पांडवांच्याकडे राहायला येतात. आगीच्या लोळात पांडव व कुंती भुयारातून निसटून जातात. दुसर्‍या दिवशी सहा सांगाडे पाहुन कौरव खोटेखोटे शोक व्यक्त करतात व व्यथित झालेले भीष्म पितामह जळून गेलेले ते सहा अवशेष गंगेला अर्पण करतात. आदी कथानक. आपापल्या घरी परतताना माझ्या शाळकरी मित्राची शंका, "हे सगळे खरे कसे रे, इन्द्रा? म्हणजे नेमके त्याच रात्री ते भिल्ल आणि त्यांची आई, ते देखील सहाच्या संख्येनेच, तिथे कसे काय येतात रे? बरं आले ते आले, तर पाहुणे म्हणून पांडवांची त्यांना वाचवण्याची, त्यांना सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी नव्हती?" चांगला शंका होती. पण उत्तर त्या शिक्षकांकडेदेखील नसेल.