Skip to main content

" दि थर्टी फर्स्ट नाईट......

लेखक सुहास..
Published on मंगळवार, 03/08/2010
" सामाजिक जाणीवेला,सुधारणेच्या नावाखाली ,एका मर्यादित वर्गापुरत्या,संकुचित ठेवणार्‍या सुधारकांना समर्पित..... " " दि थर्टी फर्स्ट नाईट......" सध्या काही लोकांशी परिचय आणी स्नेह वाढला आहे.. १_ पी.एस्.आय निकम ...मी पोलीसमित्र असल्याने संपर्क वाढला आणी त्यानंतर कळाले,शेतमजुरांच हे पोर मिसरुड फुटायच्या वयात हवालदार झाल नंतर परीक्षा देत-देत फौजदार झाल. पाच वर्षाच्या खात्यातल्या प्रवासात अजुन नीटस पोलीसी वारं न लागलेला मी पाहिलेला पहिला फौजदार !! २_ बापु ...आडनावात खांदवे-पाटील असला तरी गुंठेमत्र्यांचा माज चेहर्‍यावर अजिबात नाय. लोहगावात रिलायन्सने १८ करोडला जी जागा विकत घेतली ती ह्याची....आणी १८ करोडचा हा मालक, १२००० रु. पगारावर खडी वाहतुकीच्या ट्रक चा ड्रायव्हर आहे...का म्हणुन विचारले तर एकच उत्तर "आपकमाईच्या पैशाने फोस्टरसुध्दा चढती रं." दिवस ३१ जानेवारीचा.... कामातुन निघायलाच १०.१५ वाजले,नेहमीप्रमाणे वाघजाईत बसलो.बायको ताईकडे होती.ताईची तब्येत बरी नव्हती.त्यामुळे माझा दिवस नॉर्मल असल्यासारखाच होता.झी टाकीजला "धुमधडाका" होता.आणी "वाघजाई"त गर्दीही फुल्ल होती..ईतके कारण मला घरी पार्सल न्यायला पुरेसे होते.एक तंगडी,दाल तडकाची ऑर्डर दिली आणी होईपर्यंत एक छोटा कॅन काऊंटरवरच मारला.दोन बियर पार्सल घेतल्या.गप घरी गेलो. खाली पोरांनी मस्त डी.जे. लावला होता.मी आपला आरामात घरात बियर आणी तंगडीचा आस्वाद घेत बसलो..१२ वाजले..तसा फोनही वाजला..अपेक्षेप्रमाणे तिचाच होता...१५ मिनीटे त्यात गेली ..मग स्टेटातुन बंधुराजांचा फोन आला...मातोश्रींशी बोलणे झाले ...म्हणता म्हणता दोस्त मंडळीशी बोलता-बोलता दिड-पावणे दोन झाल.....थर्टी-फर्स्ट नाईट जवळपास संपलीच असे म्हणायला हरकत नव्हती...बियरही संपत आलती...आता जावे अंथरुणात.. माझा फोन परत वाजला....फोन उचलायची माझी मनस्थिती नव्हती..नंबर बघीतला...निकमसाहेबांचा.... "कुठायस रे " "घरात बसलोय, हॅप्पी न्यु ईयर " " अरे ते वॉटर पार्क माहीत आहे का ?" " कुठल वाघोली रोडच का ?" "हां, तिथे लफडा झालाय तु येतोस का " " जाउया की , काय झालय ?" " तु घरीच थांब, आलोच " जरा तोंडावर पाणी मारले..झिंग थोडी कमी झाली..कपडे बदलले...खाली पोचतो न पोचतो तो मोबाईल वॅन पुढ्यात येउन उभी राहिली.....आत दोनच हवालदार ....एक चालविणारा....आणी एक मागे....जागा बदलल्या गेल्या....आता सुकाणु निकमसाहेबांच्या हातात आणी मी त्यांचा शेजारी....तेव्हढ्यात समोरुन बापु आला...." कुठ एव्हड्या रात्री ".....विचारपुस झाल्यावर त्याला ही बसवला....त्याच्या घरी गेलो..तिथुन क्वालीस काढली....पार्टीतली त्यातल्या त्यात कमी झिंगलेली पोर घेतली..कारण वॉटर-पार्कची पार्टी दोन-तीन जणांकडुन आवरणारा नव्हता..एक मोबाईल व्हॅन आणी एक क्वालीस भरधाव वेगाने लोहगाव-वाघोली रोडला रवाना झाली.......हा वॉटरपार्क थेट जंगलात आहे..एका उंच टेकडीत खालपासुन ते थेट टेकाड्याच्या माथ्यापर्यंत "स्लॅन्ट/स्लोप " चा पर्वा न करता एखादी ईमारत बसवावी ..असा बसविला आहे.... लोहगाव-वाघोली रोडला १५ कि.मी. अतंरावर वॉटर-पार्कला जायला फाटा फूटतो...तिथुन ३ कि.मी. कच्च्या रस्त्यावरून गाडी न्यावी लागली...साधारण वॉटर-पार्क च्या एक कि.मी आधीच रस्त्याच्या आजुबाजुला कार पार्क केलेल्या दिसायला लागल्या..काही कार झिंगलेल्या होत्या...तर काही रंगलेल्या....काही लाजलेल्या....तर काही पोलीस व्हॅन पाहुन गडबडलेल्या...तर काही मालकांविना ओसाड पडलेल्या....आजुबाजुला भरपुर झाडी आहेत...." निकमसाहेब,नेहमीचंच आहे हे " मी .... " हम्म,उद्यापासुन राऊंड वाढवतो. " शेवटी एकदाचे गेटपर्यंत पोचलो..आतून मंद स्वर एकु येत होते....पण बाहेर सारा आसमंत एका लहान बाळाच्या रडण्याच्या आवाजाने दणाणुन गेला होता....न थांबणारा...सर्वांना कसेनुसे झाले...एक स्त्री त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती.....व्यवस्थापकाने आम्हाला आत मध्ये नेले....साधारण पन्नास एक जोडपी गळ्यात गळा घालुन गोल डान्स फ्लोअर वर शांतपणे डुलत होती..काही ईकडे-तिकडे मद्याचे चुस्के घेत होती तर काही जेवणावर ताव मारीत होती....."बट ईटस नॉट अ सॅक्रीफाईस".. एल्टन जॉन.....मलाही ज्योची आठवणा झाली... व्यवस्थापकाने त्याच्या खोलीत नेले...आठ ते नऊ जण खाली जमीनीवर बसलेले....त्यातल्या काहींनी लुंग्या घातलेल्या वा काही जण नुसतेच चड्डीत होते....शेजारी एक आडवा-तिडवा ईसम उभा होता.... "काय झाल होत "निकमसाहेब व्यवस्थापकाने त्या आडव्या-तिडव्याकडे पाहिले. " साहेब हे साधारण बारा तेरा जण होते, त्यातले मला ईतकेच धरता आले, कुठुन आले काय माहीत? अचानकच पार्टीत दिसले." हवालदाराने त्यातल्या त्यात बारीक दिसणार्‍याच्या खानकन कानामागे वाजविली.. " बता साले , XXXX, XXXXX,XXXXX " हकीकत अशी की...ही दहाबारा जण वॉटरपार्कच्या टेकडीच्या मागच्या बाजुला असलेल्या एका फॅक्टरीत कामाला आहेत..शेजारीच पत्राच्या शेडमध्ये रहातात.रात्री त्यांची ही पार्टी झालती..रात्रीचा डी.जे.गलका एकुन टेकडी चढुन,तारेच कंपाऊड ओलांडुन थेट पार्टीत घुसली होती..त्यात काही कन्नडा,काही बिहारी....नशेत त्यांना काय समजना. की ही हुच्चभ्रु पार्टी आहे...एन्ट्री पास लागतो..ड्रेस-कोड लागतो...स्टॅग ईन्ट्री नसते...लोक नाचताहेत आपणही नाचु.... त्यात ह्यांचे कपडे अर्धे आणी तिथे नाचणार्‍यांचे सुध्दा....वॉटर पार्क आहे..लोक भिजण्यासाठी चड्ड्या घालतात....सगळ काही सांगीतल....आम्ही सगळे सुन्न... "हमारे ठेकेदारको बुलाव साब "हे त्यांच्यातल्या एकाने सांगीतले....मग त्या ठेकेदाराला फोन लावला...त्याला थेट लोहगावच्या चौकीत बोलविले....त्यांच्याकडे काही हत्यार वगैरै नव्हत...त्यामुळे आत घालायचा काही फायदा नव्हता....पण वार्नींग मात्र द्यायलाच हवी..." घ्या रे ह्यांना आत ", म्हटल्यावर हवालदाराने लाबंलचक दोर घेतला,त्यांचे हात आवळले...आणी वारी निघाली पंढरीला... "त्याच काय झाल साहेब ,आम्हाला अपेक्षा नव्हती की ईतकी लोक येतील " व्यवस्थापक " हम्म " निकमसाहेब " चार बाउंसर ठेवले होते, पण ईतक्या लांब एकच आला " " तुला परमीशन किती वाजेपर्यंत होती ? "असे विचारल्यावर तो थंड झाला....त्याला हवालदाराने साईडला घेतला..निकमसाहेब,मी आणी बापु बाहेर आलो.....ते लहान मुल अजुन रडतच होते.... "अरे, चुप कराईये ना उसको,दुध पिलाईये "बापु " क्या करु साब ईसकी माँ अंदर है ,और दुध खतम हो गया है " आता मात्र आम्ही सगळेच चमकलो.......आतमध्ये मध्ये विचारले तर "आज फक्त दारु आहे साहेब" असे एक वाक्य माझ्या तोंडावर फेकल्या गेले...काय करावे....मला आठवले शेजारी एक डी.वाय.पाटलाची शाळा बनतेय...अंडरकन्ट्रक्शन बिल्डींग आहे...चालत जरी गेलो तरी पाच मिनीटाच्या वर रस्ता नाही....काही मजुर तिथेच शेड करुन रहातात...बापुला म्हटल चल तिथे दुध आहे का बघुन येऊ,तर निकमसाहेब म्हणाले की त्या बाळाला पण घेउन जा...आता आमच्या तिघांची वारी तिकडे निघाली...... चालता-चालता त्या कामवालीने सांगीतले की आज मॅडमला जास्तच वेळ लागला......नाहीतर १ वाजेपर्यंत बाहेर येतात त्या...किती वर्षाची आहे मुलगी? मी विचारले " पाच महिन्याची "........चार-पाच दरवाजे ठोठवल्यावर एक दरवाचा उघडला...झिरोचा बल्ब, काळपटलेला रेडिओ,एक स्टीलचा हंडा,त्यावर ठेवलेला ग्लास, एक स्टोव्ह,शेजारी दोनचार लहानमोठी पातेली ,एक साडीचा पाळणा,एक सतरंजीवर झोपलेला,फक्त टॉवेल नेसलेला ईसम आणी समोर अर्धवट झोपेत असलेली स्त्री....क्या चाहिये....तिने मुलाच्या रुदन एकले असावे...मी मागे वळुन "थोडा बच्चीके लिये दुध चाहिये"...हां है थोडासा....दुधाची बाटली तिच्या समोर धरली.... " आप बापु हो ना ?" " हां " अरे हां , बापु ट्रक चालवतो नाय का ..म्हणुन ओळख निघली...तिने आत बसविले...स्टोव्ह पेटविला..त्यावर दुध गरम करायला ठेवले...दुध झाल्यावर चहा ठेवला....चहा होईपर्यंत दुसरा साडीचा पाळणा बांधला...त्यात त्या पाच महिन्याच्या निरागस जीवाला टाकले आणी बॉटल तोंडात दिली....बाळ शांत झाली....आम्हाला सगळ्यांनाच हायसे वाटले....आम्हीही चहा घेतला आणी निघालो..कामवाली मात्र तिथेच थांबली...परत उठली तर काय करु म्हणुन....तिला जरा गाढ झोप लागेल मग निघते....मलाही ते पटल्यासारखे वाटले...तिथुन चालत परत गेटपाशी आलो..ईथे एका कारबाहेर एक कॉलेजवयीन वाटावी अशी बाई रडत होती...आणी शेजारी एक युवक वाटावा असा गृहस्थ तिला समजावत होता...."अरे यंही कही गये है , आ जायेंगे "...मी काही बोलायच्या आतच निकमसाहेबांनी मला चुप बसायचा ईशारा केला.....आम्ही गपगुमान आत नसलो...धरलेली मंडळी क्वालीसमध्ये कोंबली होती...म्हणुन बापु मोबाईल वॅन मध्ये बसला..... " तिच्या आईला सांगु द्यायच होत " " रडु दे जरा , आत नाचायला कशी मजा येती..." यावर मी काहीही बोललो नाही....काय बोलु ? पार्टी सगळ्यांनाच हवी आहे....सर्वात जास्त दोष कुणाचा...पार्टीत शिरलेल्या त्या दहाबारा जणांचा की की आपल्या पाच महिन्याचा मुलीला वार्‍यावर सोडुन पार्टी करणार्‍या हुच्चभ्रु जोडप्याचा.... घरी न जाता, निकमसाहेब , मी आणी बापु, सकाळी ७ वाजेपर्यंत बापुच्या टेरेसवर पित बसलो....न जाणो परत फोन वाजायचा... "हल्ली समाजमानच बदलत चाललय"निकमसाहेब मी मात्र ,दुध मिळाल्यावर, त्या बाळाच्या चेहर्‍यावरचा निरागस आनंद आठवत होतो.... पुर्व-प्रकाशित..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 6557
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

सोलिड लेख आहे......... बोलायलादेखिल शब्द नाहीत.........

अरे बापरे!!! ऐकावे ते नवलच. पाच महिन्याच्या बाळाला पार्टीच्या ठिकाणी घेऊन जाऊन बाहेर कामवालीसोबत ठेवणारी आणि आत १ १ वाजेपर्यंत दारू पिणारी आई...कसले संस्कार म्हणायचे हे? आणि बाळ पाच महीन्याच असताना अंगावर पाजायचे सोडून स्वतः दारू पिणे ? काय बोलणार? आमची बोलतीच बंद... आमचं बाळ आता ५ वर्षाचं होईल तरी अजून तिला नजरेआड करत नाही...शाळा सोडली तर कुठेही माझ्याशिवाय जाऊ देत नाही...आम्ही अगदीच अडाणी म्हणायचे..

!!! आधी कुठे प्रकाशित केली असलीस तरी आताच वाचली... खास सुहास फेम.. शॉल्लेट

ही ही ही. .... कुठे थाबायचं ज्याना कळतं त्यांना जमलं. ज्यांना कळलं नाही त्यांना थांबावलं लगेच व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाली. मोलकरणीला बाहेर बसून मूल सांभाळायला लागले तसेच जास्त वेळ कामाला लावले (असे गृहीत धरून) तिचे शोषण केल्याबद्दल सदर बाळाचा निषेध. त्या बाळामुळे त्याच्या आईवर पार्टीला जाताना मोलकरीण व मूल २न्ही घेऊन जायला लागले व त्यामुले तिला जो त्रास झाला याबद्दल त्या बाळाचा पुन्हा निषेध. त्या बाळाच्या दुधापायी लेखक, मोलकरीण, मजूर यांना त्रास झाला म्हणून त्या बाळाचा पुन्हा निषेध. बाळाचा निषेध का? कारण ते बोलू शकत नाही ना. म्हणून. व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे वगैरे सगळे बोलू शकणार्‍यांना वगैरेच आहे.

एकदम जबर्‍या :) लोहगावात रिलायन्सने १८ करोडला जी जागा विकत घेतली ती ह्याची....आणी १८ करोडचा हा मालक, १२००० रु. पगारावर खडी वाहतुकीच्या ट्रक चा ड्रायव्हर आहे...का म्हणुन विचारले तर एकच उत्तर "आपकमाईच्या पैशाने फोस्टरसुध्दा चढती रं." हे तर लई भारी.. :D

In reply to by खटपट्या

"फोस्टर सुद्धा चढती रं" म्हणजे आपकमाई ची बियर सुद्धा चढते. बाप कमाई ची व्हिस्की पण चढत नाही. (असे मला वाटते) लेखक खुलासा करतीलच.

सुन्न.... जिवंत लिखाणाने, मेलेले मन परत जिवंत होते, असे ऐकले होते. अनुभवले मात्र आजच.

मस्त अनुभव, मस्त लिखाण !! तरी एक शंका आलीच... पी.एस्.आय निकम यांनी बाळाच्या आईला धडा म्हणून बाळाचा पत्ता दिला नाही... हे जग मोठं विचित्र आहे... त्या गोष्टीचा उलट परिणाम त्या जोडप्याने मोलकरणीला दोष देण्यात तर झाला नसेल ना?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

>> त्या गोष्टीचा उलट परिणाम त्या जोडप्याने मोलकरणीला दोष देण्यात तर झाला नसेल ना? अगदी हेच डोक्यात आलं शेवट वाचताना की मोलकरणीवर खापर फुटलं नाही म्हणजे मिळवली.

निव्वळ अप्रतिम!!!! आरस्पानी लिखाण!!!!, त्यात आपण मध्यमवर्गीय लोक, कधी मजुर असतो अन कधी हुच्चभ्रु. कुठेतरी आपल्यालाच आत डोकावुन अस्वस्थ व्हायला भाग पाडणारे लेखन!!! अर्जुनाच्या कर्णभेदी बाणासारखे!! :) आवडले!!!

कमावत्या मुलांनी म्हातार्‍या आई-वडीलांना न पोसता वार्‍यावर सोडून दिले तर आता तो कायद्याने गुन्हा आहे असे ऐकले आहे. तसेच, पिणार्‍या आई-वडिलांनी तान्ह्या बाळाला वार्‍यावर सोडून देणे हा गुन्हा नाही का? त्या बाईला आणि तिच्या नवर्‍याला रडारड करायला नुसतेच मोकळे सोडण्याऐवजी पोलीस स्टेशनात, किमान रात्रभर, डांबून ठेवायला पाहिजे होते. उच्चभ्रूंचे हात 'वरपर्यंत' पोहोचलेले असतात त्यामुळे, आपल्यावरच कांही बालंट येऊन, खातेनिहाय कारवाईला सामोरे जावे लागेल, ह्या भितीपोटी पोलीस निरिक्षकाने कांही कारवाई केली नाही, असे तर नाही नं?

___/\___