"आई, काय गं झालं? ही का रडतीये?" हा प्रश्न माझ्या आईनं तिच्या आईला केला होता. सुट्टीत मामा मामींकडे गेलं की आजीच्या तक्रारी सुरु होत असत. तिचं आपलं ठरलेलं वाक्य,"आमच्या वेळी नव्हती बाई असली थेरं!" प्रसंग म्हटला तर साधासाच होता. दर रविवारी मला आणि मामेबहिणींना न्हाऊ माखू घालण्याचा तिचा हट्ट असे. भल्या सकाळी आमच्या सुपीक डोक्यांना कोमट तेल लावून ठेवायची, मग तिच्याकडे असलेल्या पितळ्याच्या तपेलीत घरी तयार केलेली शिकेकाई भिजवून उकळून त्याचं चोथा पाणी वेगळं करायची. शिकेकाईही साधीसुधी नसायची. त्यात संत्र्याच्या वाळवलेल्या साली, रिठे आणि काय काय बरेच जिन्नस असायचे. ते सांगताना तिला अभिमान वाटत असावा. तासाभराने बंबात गरम केलेले पाणी घंगाळात काढून स्वत:च्या हाताने नातींना न्हाऊ घालणे हे आजीला कर्तव्य वाटत असे.आधी थोडं शिकेकाईचे पाणी मग तो खरखरीत चोथा घेउन खसाखसा घासायची. असं केल्याने डोकं हलकं होतं आणि केस छान वाढतात म्हणायची. बहुधा मामेबहिणींना सवय झाली असावी. मला मात्र सगळ्या गोष्टी नाजुकपणे केलेल्या हव्या असायच्या.तिला ते मान्य नसायचं. मग दर रविवारी रडारडीचा कार्यक्रम ठरलेला! "अगं, इतकी नाजुक राहून संसार कसा करशील?" असं म्हणत म्हणत तिला हवं तस्संच करायची. आई मध्ये पडली तर तीला रागावून,"तुम्हा आजकालच्या आयांना मुली कश्या वाढवाव्या ते समजत नाही, आणि येता मागाहून तक्रारी घेउन!" असं दटावत असे.मुली वाढवताना अतोनात काळजी घ्यावी लागते आणि काळजी करावी लागते. मुले कशीही वाढतात या मतावर ठाम असायची. केसांची स्वच्छता राखायला सोपं पडावं म्हणून बारीक कापलेले माझे केस आजीला पसंत नसत. दर रविवारी केस अश्याप्रकारे धुवावे लागत असतील आणि डोळे चुरचुरत असतील तर 'नक्को ते केस वाढवणं!' असं वाटायचं. माझी मोठ्ठा गजरा घालण्याची हौस मात्र बरेच दिवस टिकून होती.
तिचे स्वत:चे केस मात्र वयाच्या पंचाहत्तरीतही छान काळे कुळकुळीत होते. सगळ्यांची काळजी करून आता ते कमी झालेत असंही म्हणत असे. छान तेल लावून चापून चोपून दोन वेण्या घातल्या कि जगातल्या सगळ्या बायका सुंदर दिसतात असं म्हणताना तिचे डोळे चमकायचे. नुसते खोबरेल तेल आणून लावणे हा आळशीपणा झाला. ते तेल जास्वंदीची फुलं, मेथ्या आणि अजून बरेच प्रकार घालून उकळून सिद्ध करणं हे तिच्या मते हौसेनं संसार करणार्या स्त्रीचं लक्षण होतं.
मुलीच्या जातीला हे यायला हवं नि ते यायला हवं म्हणून आमच्याकडून रांगोळ्या काढून घेणं, पंगतीत पदार्थ वाढायला सांगणं असं करीत असे.कोणता पदार्थ पानात कुठं वाढावा याबद्दल एकदा सांगितल्यावर पुन्हा विचारायला जाण्याची हिम्मत माझ्यात तरी नव्हती.पहिल्या पंगतीला जेवायला बसणं आणि जोरात हसणं म्हणजे तर बाईच्या जातीला अशोभनीय 'कृत्य' असे.आजी लहान असताना हे अलाऊड नव्हतं म्हणे! जेवणखाण मात्र बाईच्या जातीने पौष्टीकच घ्याव या तिच्या विचारानं कितीतरी प्रकारची सार, खिरी आणि काढे आमच्या पोटात गेले असतील त्याची मोजदाद करू नये हेच उत्तम! "कश्याला हवा डक्तर? मी देते कि उलिशी हळद मधातून!" "आमच्यावेळेस नव्हते हो असले काही नखरे!"
मी दहावीत असताना एकदा तिनं आईकडे माझ्या लग्नाबद्दल चौकशी केली होती. सगळ्यांची हसून पुरेवाट झाली होती. मला हसताना बघून तर तिचा रागाचा पारा जास्तच चढला. आरती ओवाळल्यासारखं करून म्हणाली "अगं पंधरा वर्षाची घोडी झालीस तरी अशी खिदळतेस काय? या वयात माझ्या पदरात एक मूल
होतं हो!" मग आईकडे बघून निदान हुंडा आणि रुखवताची भांडी तरी जमवलीत काय अशी चौकशी करत होती. नंतर वर्षभरात आजी गेली. शेवटपर्यंत काम करत होती तशीच शेवटपर्यंत सगळ्यांची काळजीही करत होती. दारापुढे काढायच्या आणि पंगतीतल्या रंगोळ्या अजून लक्षात आहेत पण आता काढायची वेळ येत नाही. पानात ओघळ येउ न देता जागच्याजागी पदार्थ वाढले तरी त्याचं कौतुक कोणाला नसतं.शिकेकाईचं आणि माझं मात्र अजूनपर्यंत जमलेलं नाही. शांपू लावून कोरडे आणि पांढरे झालेले केस बघायला आजी नाही ते एका परिनं बरच वाटतं!
वाचने
6378
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलंस गं.. :) आज्जीच्या
रेवती, छान लिहिलं आहेस!
छान लिहिलंय ...माझ्या आजीची
रेवती ताई, छान लेख. लेख आणी
सु-रे-ख व्यक्तीचित्ररेखाटन.
छान लेख.. आजी-अजोबांचं
हुश्श!! मला वाटलं रंगाकाकांची
हेच म्हणतो
In reply to हुश्श!! मला वाटलं रंगाकाकांची by Nile
मस्त
रेवतीताई,
सुरेख लेखन रेवती..आज्जी
+ १
In reply to सुरेख लेखन रेवती..आज्जी by स्पंदना
छानच लेख.
सुरेख व्यक्तिचित्रण आहे
फक्कड लेख
छान अठवण...
मागच्या
छान..
आज्जी नातीच्या आठवणी छान.
+१
In reply to आज्जी नातीच्या आठवणी छान. by गणपा
अफाट सुरेख आहे परत वाचला. वर
सुरेख
वाह
पुन्हा एकदा वाचलं. परत तितकंच
अचूक अन लडिवाळ व्यक्तिचित्रण.
मस्तचं
मला वाटतं रेवतीताईने कमीच
वाचतंना