पाऊस - कवीच्या मनात दडलेला

सुनिल पाटकर जनातलं, मनातलं
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे...मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच ! असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो.लहानपणीच्या ईवल्याश्या छत्रीत....मित्रांसोबत सोडलेल्या कागदी होड्यांत..., तरुणाईत धबधब्याखाली लुटलेल्या त्या मजेत...असा हा पाऊस..कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गँलरीत मनसोक्त धडकणारा.सृष्टीला नवचैतन्य देणा-या प्रत्येकाला वेड लावणा-या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडले असेल तर ते कवीने. आपल्या सुंदर शब्दामध्ये पावसाला बंदिस्त करण्याचे धाडस फक्त हा कवीच करु शकतो.म्हणूनच मराठी कवितांमध्ये, गाण्यांमध्ये या पावसाची विविध रुपं उलगडत गेलेली दिसतात. पाऊस जसा वर्षानुवर्षे पडतोय ,पडत राहणारही आहे तसतसे हे बालगीतही प्रत्येकला आपल्या बालपणात भेटत राहील येरे येरे पावसा ,तुला देतो पैसा, पैस झाला खोटा , पाऊस आला मोठा. हे बालगीत लहानपणापासूनच मनात पक्क बसतं.हे बालगीत गुणगुणतच आपल्याला पावसची ओळख होते.शाळेत जातांना पावसाच्या पाण्यात खेळण्याचा आनंद कायम रहावा आणि शाळेला सुट्टी मिळावी यासाठी बालमने सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? अशी आर्जव करतात. बालमनातील ही इच्छा पाडगावकरांनी किती अलगद पकडली आहे पहा. मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेत जांभळासारखे पिकून आले, ढग हे टपोरे झुकून आले. सरी नी सरी झडेल रे,पाऊस पाऊस पडेल रे. असे पावसाचे वर्णन केले आहे. तर पावसाळी वातावरणाची शब्दरूपी मांडणी बा.भ.बोरकरांनी फार सुंदररित्या केली आहे. गडद निळे, गडद निळे जलद भरून आले शितल तनू, चपल चरण ,अनिल गण निघाले. बोरकरांची ही कविता आजही प्रत्येकाच्या ओठावर आहे. पावसाचा आनंद जितका लहान मुलांना होतो तितकीच काळजी घराबाहेर पडलेल्या आपल्या पतीची एका पत्नीला असते.प्रत्येकाच्या घरामध्ये सहजपणे जाणवणारे हे दृश्य कवी अनिल यांनी फार सुंदर रेखाटले आहे. बाई या पावसानं लावली झिमझिम भिजली की माळरान ,उदासल मन , नदी नाले एक झाले ,पूर भरूनीया आले जीवलग पडे बाई कुठे अडकून, नच पडे चैन बाई य जीवाला एका बाजूला पतीची काळजी करणारी व्याकुळ पत्नी तर दुसरीकडे पावसात मनसोक्त भिजण्या-या तरुणीचा ओसंडून वाहणारा आनंद शांता शेळके यांनी शब्दामध्ये अगदी सहज पकडला आहे. आला पाऊस मातीच्या वासात गं मोती गुंफीत मोकळ्या केसात गं. मुसळधार पडणारा हा पाऊस गुलाबी असा गारवा घेऊन येतो आणि या गारव्यात गरमागरम चहा आणि भजी खाण्याची इच्छा अनावर होऊन जाते.आद्य कवियत्री बहिणाबाईंनी प्रत्येकाच्या मनातील इच्छा केव्हाच ओळखली.आणि ती शब्दात पकडूनही ठेवली. येता पाऊस पाऊस .पावसाची लागे झडी आता खा रे वडे , भजे घरामध्ये बसा दडी बहिणाबाई पावसाबद्दल पुढे असं म्हणतात. देवा पाऊस पाऊस , तुझ्या डोयातले आस देवा तुझा रे आरास, जीवा तुझी रे मिरास नव्या दमाचे कवि संदीप खरे यांनी पावसाला आगदी सुंदर सोप्या भाषेत शब्दबध्द केलय गोष्ट सुरू होईल ,तेव्हा सुरू झाला पाहिजे गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे. असा हा पाऊस.. अनेक कवींना जसा तो दिसला ,भावला त्यांनी अनुभवला तसा तो त्यांनी शब्दबध्द केला.असा हा पाऊस..कधी अचानक गायब होणारा , बळीराजाला आभाळाकडे पहायला लावणारा तर कधी सारे काही जलमय करून टाकणारा.कुणाला तो हवाहवासा वाटतो.. तर कुणाला कंटाळवाणा.विद्यार्थ्यांची शाळा बुडवणारा..तरुणांना प्रेमात पाडणारा ,वृद्धांना गारठवणारा तर आईला काळजीत टाकणारा.त्यांने अनेकांना सावरलं तर अनेकांना उध्वस्तही केलं. असा हा पाऊस..तो कसाही असला तरी मराठी कवितांच्या पुस्तकांच्या पानावर कवीच्या शब्दातून तो बरसत राहिला आहे आणि पुढेही बरसेल. .......................................................... तुम्हाला आठवतो का कवीच्या शब्दातून बरसणारा पाऊस ? मग सांगा एखादे पावसाचे गाणे नाहितर सुंदरशी कविता.
वर्गीकरण
लेखनप्रकार

9 टिप्पण्या 8,919 दृश्ये

Comments

स्पंदना नवीन

पाउस पहिला, जणु सानुला बरसुन गेला, बरसुन गेला. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

चित्रा नवीन

मला आवडणारी बरीच आहेत - नभ उतरू आलं, चिंब थरथरवलं .. असा बेभान हा वारा, नदीला पूर आलेला.. (पावसाचे असे नाही, पण पुराचे वर्णन आहे) रिमझिम गिरे सावन (मराठी नाही, पण चालेल असे वाटते. बघायलाही आवडते) आला आला वारा, संगी पावसाच्या धारा

शुचि नवीन

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मीनल नवीन

छान लेखन आहे. असा प्रत्येक कवीच्या मनात दडलेला हा पाऊस! कित्ती कित्ती म्हणून सांगावं याचं? मीनल. http://myurmee.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

''गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात दोघांनी भिजायचं.'' हे गाणं लय आवडतं मला. :) ''येरे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना'' ........हे तर आहेच. ''ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनाद होता.'' [एवढ्या एकाच ओळीची आठवण असते. ] अजून....... 'ओळखलंत का सर मला ? पावसात आला कोणी........... याचीही आठवण होतेच. पाऊस आल्यावर कवीच्या कवितेत पाऊस, आणि संकेतस्थळावर पावसाचे धागे कसे दाटून आणि भरभरुन आले पाहिजेत. :) -दिलीप बिरुटे [रैवारचा रिकामटेकडा]

jaypal नवीन

मला पावसात जाउ दे, एकदाच ग चिंब चिंब होऊ दे........ए आई *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

दत्ता काळे नवीन

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा केकारव करी मयूर काननी उभवीत उंच पिसारा .. ह्या गाण्यातलं कृष्ण विरहीणी कोणी गौळण तिला अडविते कवाड अंगण अंगणी अवघ्या तळे साठले भिडले जल दारा हे कडवं फार छान आहे.

क्रान्ति नवीन

कवीच्या मनातला पाऊस ही कल्पनाच खास आहे. ज्याला ज्या वेळी जसा भावला, तसा तो पाऊस कवितेत, गाण्यात आणि रसिकाच्या मनात बरसतो. आरती प्रभूंची "जोगवा" मधली "आणि विजेचा देठ तुटेना" आठवली या निमित्तानं. जमते आहे ढगांत पाणी, वीज वाकते करित उताविळ, ठळता ढळता सांज सुरंगी उठे दिशांतुन वांझ भुतावळ. जमते आहे ढगांत पाणी, कळसापाशी पळस पिसाटे; वावटळीने रावुळघंटा घणघण आभार्‍यात घुसमटे. जमते आहे ढगांत पाणी, दुखतो फांद्यांमधल्या सांदित क्षणाक्षणाने असा काजवा; पाचोळ्याला भोवळ येत. जमते आहे ढगांत पाणी, अजुन परंतू ढगचि फुटेना; आणि विजेचा जराजराही त्या पाण्यातुन देठ तुटेना.