गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
लेखनप्रकार
पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या.
मी या आधी ही कथा मिपावर टाकली होती. पण काही वाचकांनी ती संस्थळावरील घडामोडींच्या संदर्भात वाचली. त्यामुळे गैरसमज नको, म्हणून आणखी जास्त दंगा होण्याआधी ती काढून टाकली. मग नीट विचारांती ह्या टिपणी सह द्यायचे ठरवले.
ह्या कथा स्वरचित आहेत. औद्योगीक जगातले अनुभव प्राण्यांच्या मुखवट्यामधून दाखवून रुपके रचली आहेत.
मी पुर्वी काम करीत असलेल्या भारतातल्या (सरकारी) कंपनितील लोकांकडून जो उपदेश ऐकायला मिळायचा, त्यावरून ह्या कथेतला बोध लिहीला आहे. त्या बोधावर ही कथा नंतर रचली.
डिसक्लेमर- ह्या पंचतंत्र कथा वाचतांना संस्थळाच्या स्थानिक घडामोडींशी संबंध लावल्यामुळे जर कोणाला त्रास झाला, तर त्यासाठी लेखक जबाबदार नाही.
गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्रित काम करून भरपूर शिकार मिळवून देतील.
गाढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.
रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत काही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.
घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण थाट एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.
सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्या जंगलात निघून गेला.
बोध-
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
वाचने
6969
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
उत्तम कथा. खरोखर अरुण मनोहर यांच्या कथा बोधप्रद असतात.
बोधकथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेला आशय. रुपकांचे आणि वापरलेल्या भाषेचे महत्व दुय्यम असते. बोध काय होतो ते महत्वाचे असते. त्यामुळे अशा कथांमधे प्राणी मानवी भाषा बोलतात, मानवी भावभावनांचे प्रदर्शन करतात, त्यांचा प्रत्यय प्रत्यक्ष येणार नाही; पण जे तत्व सांगितले आहे ते मात्र नक्कीच दिसुन येते.
बोधकथा सर्वच आपल्या स्वतःच्या जीवनाशी ताडुन पाहुन त्या बरोबर आहेत की चुक आहेत हे आकलन करणे चूक असते. आपले आयुष्य हे अथांग महासागरातील पाण्यातील एका थेंबाएवढे. तेच आणि तेच खरे आहे आणि बोधकथेतुन ते न दिसता इतरच काही दिसत आहे, सबब ती बोधकथा अर्थहिन आहे असा विचार करंटा होय.
अरुण मनोहर यांनी अशाच त्यांच्या पोतडीतुन वेगवेगळ्या बोधकथा बाहेर काढुन आधुनिक इसाप बनावे हीच शुभेच्छा !!
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
In reply to उत्तम कथा. by अवलिया
धन्यवाद अवलियाजी.
ह्या बोधकथांमधून मी स्वतःही खूप नवीन शिकलो. त्यासाठी खरं म्हणजे समस्त मिपाकरांना देखील धन्यवाद.
बोध कथा या बोध घेण्यासाठी/देण्यासाठी असतात. आपल्याला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यासाठी याचा उपयोग राजकारणात देखील केला जातो. आपल्या भाषणात प्रतिस्पर्ध्याला चिमटे / कुचाळक्या/टोमणे मारण्यासाठी अथवा आपल्या खेळीला अनुकूल असा जनाधार प्राप्त करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. निवडणूकीच्या काळात अनेक पाळलेले विद्वान याचा वापर करतात.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्या जंगलात निघून गेलाया ऐवजी एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी सगळ्यांचीच पळापळ झाली. जो तो आपला जीव वाचवुन पळू लागला. पण वणवा एवढा तीव्र होता कि सगळेच जण त्यात जळून खाक झाले. बोध- निसर्गा पुढे सगळेच प्राणी क्षुद्र असतात. मग तो सिंहासारखा राजा असो वा त्याचे नोकरचाकर असोत. आपल्या ताकदीच्या वल्गना कुणी करु नये वरील कथेत हवे तसे बदल करुन बोध बदलता येतात. याच अर्थ बोधकथा या निरोपयोगी आहेत असे मी म्हणत नाही. त्या लोककथा आहेत. व्यवहार चातुर्याचे धडे त्यातुन सोप्या भाषेत देता येतात. पंचतंत्रातल्या अनेक कथा जगातल्या व्यावाहारिक घडामोडींवर भाष्य करत असतात. प्राणी सगळे कथेत बोलतात. त्यांना सगळ्या मानवी भावभावना चिकटवल्या आहेत. बोधकथा या रुपक वा सुचकही असतात. आपल्या अवतीभवती घडणार्या घटना त्यात प्रतिबिंबित होतात. आता वरील बोधकथेत अरुणरावांणी डिस्क्लेमर टाकले आहे तरी वाचताना नकळत त्या भुमिकेतुनही वाचक आपल्याला हवा तसा अन्वयार्थ लावुन एक फेरफटका मारुन येतो. असुया, ईर्षा,राग,उद्वेग अशा मनस्थितीत त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ आपापल्या पिंडानुसार लावतो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
उत्तम कथा.