मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनोहारीदांचे दु:खद निधन

डॉ.प्रसाद दाढे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रख्यात सॅक्सोफोन-वादक व निपूण संगीत संयोजक मनोहारी सिंग यांचे आज मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. आज खर्‍या अर्थाने हिंदी चित्रपट संगीतातला ब्रास पोरका झाला; सॅक्सोफोन, की- फ्लूट, बासरी अशी सर्व प्रकारची फूंक्-वाद्ये लीलया वाजविणारे मनोहारीदा आज पडद्याआड गेले आहेत. गेले काही वर्षे ते किडनीच्या विकाराने आजारी होते तरीही त्यांचा उत्साह आणि दमसास तरूणाला लाजविणारा होता. ते पंचाहत्तरीत असतांना मी त्यांचा लाईव्ह शो पुण्यात पाहिला होता ज्यात त्यांनी सुरूवातीलाच 'गाता रहे मेरा दिल' असं काही खणखणीत वाजविले की आख्खं थिएटर उभं राहिलं होतं आणि टाळ्या जणू थांबणारच नाहीत असं वाटत होतं. तेव्हा एक पुणेरी कॉमेंटही झालेली आठवते," आपण ज्या वयात फूंक मारून साधी मेणबत्तीसुद्धा विझवू शकणार नाही त्या वयात मनोहारीदा संपूर्ण कॉम्पिटिशन सॉन्ग (हम किसिसे कम नहिं) वाजवतात..तेही कट टू कट.. मनोहारीदा हे खरे टेकचे आर्टिस्ट होते. जराही चूक त्यांना खपायची नाही. कुठल्याच रेकॉर्डिंगमध्ये एकही रिटेक न करणारा हा एकमेव कलाकार असावा. मुळातच कलकत्त्याहून मुंबई इंडस्ट्रीत त्यांना आणलं होतं अनवट सुरांचे सम्राट सलिल चौधरी यांनी. सलिलदांनी त्यांची इतर संगितकारांशी ओळख करून दिली आणि मनोहारीदांनी सलिलदांच्या शब्दाचं चीज केलं. 'सितारों से आगे" ह्या चित्रपटात त्यांनी सचिनदेव बर्मन ह्यांच्याकडे पहिल्यांदा वाजवलं आणि मग तिथून तो लिजंडरी प्रवास सुरू झाला. पंचमदांशी त्यांचं खास नातं जुळलं आणि बासू-मनोहारी- मारूती अश्य त्रयीने पंचमदांची पूर्ण अरेंजिंगची जबाबदारी अश्या काही अफलातून निभावली की त्याला तुलनाच नाही. बासूदा (चक्रवर्ती) स्ट्रिंग सेक्शन (ग्रूप व्हायोलिन, चेलो इ) बनवायचे आणि मारूतराव कीर र्‍हिदम सांभाळायचे. मनोहारीदा हे पंचमच्या व दादा बर्मनच्या ब्रासचे सेनापती होते. 'रूप तेरा मस्ताना' मधली अ‍ॅकॉर्डियन आणि सॅक्सची जुगलबंदी आठवते आहे ना? गंमत अशी आहे की ह्या गाण्याचे पीस आधी बनविलेले नव्हते. केर्सी लॉर्ड (अ‍ॅकॉर्डियन) आणि मनोहारीसिंगना पंचमने गाण्याची फक्त थीम सांगितली..' बाहेर तुफान पाऊस, खोलीत फक्त धुंद प्रियकर प्रेयसी आणि विस्तवाची आग..' उरलेलं काम केर्सी आणि मनोहारीदांचं आहे.. क्या बात हैं! हम किसिसे कम नहिं मधलं कॉम्पिटिशन साँग तर कुणी विसरूच शकणार नाही. त्याच बरोबर मनोहारीदांच्या ब्रास अरेंजिंगचे बहारदार नमुने म्हणजे 'आ देखे जरा' (रॉकी), वादा करो नहिं छोडोगी (आ गले लग जा), प्यार करने वाले , दोस्तोंसे प्यार किया (शान), मेहबूबा मेहबूबा, टायटल म्युझिक (शोले), क्या यहिं प्यार हैं (रॉकी), पिया तू अब तो आजा (कारवां), दुनिया में लोगों को (अपना देश), आने वाला पल (गोलमाल) अशी लिस्ट खूप मोठी आहे. ह्यातल्या एकेका गाण्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. 'पिया तू अब तो आजा मधला सॅक्स मनोहारीदांचाच आहे आणि 'वादा करो नहिं छोडोगी तुम मेरा साथ' मधली काऊंटर मेलडीचा सॅक्सही त्यांचाच्..पण किती फरक आहे. पहिल्या गाण्यात एकदम आक्रमक आणि बेधुंद आहे तर दुसर्‍या गाण्यातला हळूवार रोमॅन्टिक आहे..जणू गालावरून प्रेयसीचा गाल फिरतोय.. हिरोचा प्रेमभंग आणि मग बारमध्ये टुन होऊन त्याने सॅक्स वाजवणं तेव्हा फारच लोकप्रिय दृष्य होतं. पण मनोहारीदा मात्र थोडेसे वैतागायचे म्हणायचे हे हिरो सॅक्सोफोन हातात नीट धरतसुद्धा नाहीत.. साफ चुकीची बोटं दाबतात. त्यांचं त्या वाद्यावर मनापासून प्रेम होतं. मी त्यांना त्यांचा सोन्याचं पाणी दिलेला अमेरिकन सॅक्स हाताळतांना पाहिलं होतं.. उपमा द्यायचीच तर आई आपल्या तान्हुल्याला न्हाऊ माखू घालते तश्या कौतूकाने आणि निगुतीने ते तो सॅक्सोफोन स्वच्छ करत होते.. मुळात सॅक्सोफोन हे वाद्यच रोमॅन्टिक आहे. जणू काळजाचा ठावच घेतं.. इतकं भावनेने ओथंबलेलं आणि आर्त व्याकूळ वातावरण निर्मिती करणारं वाद्यं मला दुसरं ठाऊक नाही. "तेरे मेरे सपने अब एक रंग हैं' मधले मनोहारीदांनी वाजविलेले दुसर्‍या व तिसर्‍या अंतर्‍यातले पीस जणू देवानंदच्या मनातलेच भाव व्यक्त करतात. तो पीस ऐकतानांच असं वाटतं की आता हा दोन्ही हात हवेत फेकून वाहिदाला साद घालणार, तिच्या मनात उचंबळून आलेल्या प्रेमाला आव्हान देणार आणि तिला कवेत घेणार.. साठ सत्तरच्या दशकात त्यांनी तेव्हाच्या आघाडीच्या प्रत्येक संगितकाराकडे हे अवघड विदेशी वाद्यं असं काही वाजवलंय की ती गाणी आठवली की ते सॅक्सचे पीस आपोआपच कानात रूंजी घालू लागतात.. नुसती ही वेचक लिस्ट पाहिली म्हणजे मनोहारीदांच्या कर्तूत्वाचा आवाका लक्षात येतो.. है दुनिया उसीकी (कश्मीर की कली-ओपी) तुम मुझे युं भुला ना पाओगे (पगला कहिं का- एस्.जे) आवाज देके हमे तुम बुलाओ (प्रोफेसर- एस. जे) तुमने मुझे देखा, आजा आजा मैं हुं प्यार तेरा (तिसरी मंझील), तेरे मेरे सपने, दिन ढल जायें (गाईड- एस.डी) खिलते हैं गुल यहां (शर्मिली- एस.डी) आओ हुजुर तुमको (किस्मत- ओपी) अजी रूठ कर अब, बेदर्दी बालमा (आरजू- एस्.जे) तुम्हें याद होगा (पोस्ट बॉक्स नं ९९९-कल्याणजी आनंदजी) जा रे उड जा रे पंछी (माया- सलिल) शोख नझर की बिजलियां (वो कौन थी- मदनमोहन) दिल तेरा दिवाना हैं सनम (दिल तेरा दिवाना- एस.जे) दिल जो ना कह सका (भीगी रात- रोशन) जिंदगी कैसी ये पहेली (आनंद- सलिल) अश्या ह्या अफाट आणि अजरामर कलाकाराला माझा सलाम..

वाचने 5658 वाचनखूण प्रतिक्रिया 39

In reply to by बहुगुणी

जे.पी.मॉर्गन 14/07/2010 - 17:19
>>त्यांचा लाईव्ह शो पुण्यात पाहिला होता ज्यात त्यांनी सुरूवातीलाच 'गाता रहे मेरा दिल' असं काही खणखणीत वाजविले की आख्खं थिएटर उभं राहिलं होतं आणि टाळ्या जणू थांबणारच नाहीत असं वाटत होतं गणेश कला क्रीडाला झालेल्या तो कार्यक्रम बघायचं भाग्य आम्हाला पण मिळालं डॉक्टरसाहेब! नुसत्या आठवणीनी सरसरून काटा आला अंगावर. अक्षरशः हिंदी चित्रपटसंगीताचा ब्रास सेक्शन पोरका झाला. मनोहारीदांना आदरांजली. जे पी

बिपिन कार्यकर्ते 13/07/2010 - 21:15
या महान कलाकाराबद्दल आणि त्यांच्या महानतेबद्दल तुझ्याचकडून ऐकलं होतं. माझी श्रद्धांजली. बिपिन कार्यकर्ते

प्रभो 13/07/2010 - 21:19
या महान कलाकाराला माझीही श्रद्धांजली.

चतुरंग 13/07/2010 - 21:22
भरभरुन लिहायचंय तुम्हाला हे जाणवतं....अजून लेख येऊदेत. खरोखर तुम्ही दिलेली गाण्यांची लिस्ट वाचतावाचता एकेक पीस कानात वाजायला लागला! क्या बात है!! कसला ताकदीचा कलावंत असणार. मनोहारीसिंगना श्रद्धांजली. (डॉक्टरसाहेब, ब्रास अरेंजिंग म्हणजे नेमकं काय? तसंही म्यूझिक अरेंजर आणि संगीत दिग्दर्शक ह्यांच्या कामात नेमके कायकाय फरक असतात? जरा समजावून सांगाल का? स्वतंत्र लेख लिहावा लागला तरी चालेल मी वाट बघेन.) चतुरंग

In reply to by चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे 13/07/2010 - 23:28
संगीतकार गाण्याची धून तयार करतो तर संयोजक (अरेंजर) ते गाणं सजवतो. अरेंजर प्रथम गाण्याची चाल, शब्द आणि सिच्युएशन लक्षात घेऊन तशी वातावरणनिर्मिती करणारे सुरूवातीचे संगीत (ज्याला इन्ट्रो किंवा एम-झीरो असे म्हणतात) तयार करतो. तसेच गाण्यातल्या दोन कडव्यांमधले संगीत (इन्टरल्यूड वा एम १/ एम २) तसेच गाणे संपतानाचे एन्डिग पीस (कोडा) तयार करतो. शिवाय गायक/ गायिका शब्द म्हणत असतांनाचे पार्श्वसंगीत कॉर्डस व काऊंटर मेलडीच्या सहाय्याने बनवितो. मनोहारिदांनी बनविलेली व वाजविलेली उत्कृष्ट काऊंटर मेलडी म्हणजे 'आ गले लग जा' मधलं 'वादा करो नहिं छोडोगी तुम मेरा साथ' हे गाणे! गाणे सुरू झाल्यानंतर किशोर जेव्हा धृपद रिपिट करतो तेव्हा मनोहारिदांचा रोमॅन्टिक सॅक्सोफोन मागे सुरू होतो.. इथे पाहा: http://www.youtube.com/watch?v=2REwdewLK5E हे अरेंजिंग म्हणजे कर्मकठिण काम आहे; त्यासाठी अफाट ब्रेन आणि अनेक प्रकारच्या वाद्यांचे संपूर्ण ज्ञान आवश्यक आहे. नोटेशन लिहिणे व ऑर्केष्ट्रा कंडक्ट करणे हेही आहेच परत. कुणी वादक चुकत असेल तर हुडकुन चूक दुरूस्त करता आली पाहिजे; म्हणून कान तयार पाहिजे. थोडे विषयांतर आहे पण एक उदाहरण देतो पक्क्या कानाचे- रायचंद बोराल नावाचे खूप जुने (सैगलच्या काळातले) थोर संगीतकार न्यू थिएटर्समधे होऊन गेले. एकदा न्यू थिएटरच्या रेकॉर्डिंग स्टुडिओतली संचातली एक सारंगी चोरीला गेली. बोरालबाबू म्हणाले "अरे सारंगी दुसरीकडे कुठे जाणार, चला गाणार्‍यांच्या कोठ्यांवर जाऊन शोधू" आणि बाबूजी निघाले टांग्यातून तवायफांच्या गल्लीत. ठिकठिकाणहून गाण्याचे, चाळांचे, सारंग्यांचे सूर ऐकू येत होते तिथे. बोरालबाबू आपले टांग्यातून डोळे मिटून चालले होते; आणि एका ठिकाणे त्यांनी टांगा थांबवला, म्हणाले," हीच 'आपली' सारंगी आहे, वर जाऊन घेऊन या.." आणि 'ती' सारंगी मिळाली! मनोहारीदांचे बासरीवरसुद्धा खूप प्रेम होते. आपल्याला सलिलदांच्या बहुतेक गाण्यांमध्ये जी टिप्पिकल दोन सुरांत वाजलेली बासरी ऐकू येते ती मनोहारिदांनीच वाजविली आहे. 'माया' मधल्या 'जा रे उड जा रे पंछी' ह्या अप्रतिम गाण्यातली सुरूवातीची बासरी आणि इंटरल्यूड तसेच अंतर्‍यात काऊंटर मेलडीतलं सॅक्सोफोन त्यांनी वाजविले आहे; आणि हे त्यांचे अतिशय आवडते गाणे होते. http://www.youtube.com/watch?v=pUcpKZ9ADuM त्यांच्याबद्दल लिहावे तितके थोडेच आहे..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

चतुरंग 13/07/2010 - 23:46
तुम्ही दिलेल्या गाण्यात सॅक्सोफोन केवळ उच्च वाजवलाय! हॅट्स ऑफ!! म्हणजे ह्या अरेंजर लोकांचं काम हे म्यूझिक डायरेक्टरांच्याच तोडीचं म्हणायला हवं की! कारण संगीतकाराचा स्टँप त्या त्या गाण्यात दिसतो तो तसाच अमिट ठेवून गाणं सजवायचं, शिवाय गाण्याचे शब्द, गाण्याची चित्रपटातली जागा त्यावेळचा प्रसंग, गायक/गायिका ह्यांच्या आवाजाची जातकुळी, वाद्यवृंदावर पकड बापरे अफाटच मामला आहे! उदा. पंचमच्या गाण्यात जे तालवाद्य असतं/जो रिदम असतो तो इतका सिग्नेचर असतो की फक्त रिदमवरुन हे गाणं पंचमचं आहे हे समजावं. तसंच किशोरकुमार ज्या नटासाठी गाणं म्हणतोय तो नट कोणता हे बहुतेकवेळा त्याच्या आवाजातून जाणवतं म्हणजे तो शशीकपूर, अमिताभ, संजीवकुमार, देवानंद, रणधीरकपूर, विनोद खन्ना, धर्मेंद्र ह्यांच्यासाठी वेगवेगळे ठेवणीतले आवाज लावून गातो त्याचा ओरिजिनल आवाज जपत! ह्याचीही जाण अरेंजरला हवीच. अजून लिहा वाचायला आवडेल. चतुरंग

संदीप चित्रे 13/07/2010 - 21:58
आत्ता एक दोन आठवड्यांपूर्वीच कधीतरी इंडियन आयडॉल कार्यक्रमात आशा भोसले पाहुण्या परीक्षक म्हणून आल्या होत्या. त्या दिवशी आर.डी.बरोबर वाजवणारे सगळे कलाकार साथीला होते. मनोहारीदादांचे ते शेवटचे दर्शन ठरलं आता :( --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

In reply to by भडकमकर मास्तर

छोटा डॉन 14/07/2010 - 07:21
खास आशाताई आणि मनोहारीदा येणार आहेत म्हणुन आम्ही हा 'इंडियन आयडॉल्'चा एपिसोड मुद्दाम पाहिला. त्यात झालेले मनोहारीदांचे दर्शन हे शेवटचे दर्शन ठरेल असे अजिबात वाटले नव्हते. थोर कलाकार होते, आमची आदरांजली ! ------ छोटा डॉन

विसोबा खेचर 13/07/2010 - 22:23
अरेरे.. वाईट झालं.. ठाणे-पूर्व येथील मैत्री बारमध्ये एकदोनदा आम्ही हमप्याला झालो होतो.. नक्की केव्हातरी लिहीन त्यांच्याबद्दल.. खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून.. माझी आदरांजली.. (पंचमप्रेमी) तात्या.

वाचक 13/07/2010 - 22:35
हे खरच गुणी वाद्य आहे, 'जॅझ' संगीत जे आफ्रिकन आणि वेस्टर्न संगीताच्या मिश्रणातून जन्माला आले, त्यात सॅक्सोफोनचा वाटा मोठा आहे. (कत्रिना पूर्वीच्या) न्यू ऑर्लिन्स मधे नदीकाठावर बसून ऐकलेले जॅझ आठवले. मनोहारीदांना विनम्र श्रध्दांजली.

३_१४ विक्षिप्त अदिती 13/07/2010 - 22:47
विनम्र श्रद्धांजली. अदिती

आळश्यांचा राजा 13/07/2010 - 23:47
मनापासून श्रद्धांजली!
इतकं भावनेने ओथंबलेलं आणि आर्त व्याकूळ वातावरण निर्मिती करणारं वाद्यं मला दुसरं ठाऊक नाही.
मनातलं बोललात! पण हे वाचेपर्यंत याविषयी इतकं माहीत नव्हतं. सारंगीची गोष्ट खासच. कुठे मिळतात या गोष्टी तुम्हाला ऐकायला? नशीबवान आहात! ते `बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है' यांचंच का? आळश्यांचा राजा

प्रभाकर पेठकर 13/07/2010 - 23:45
फार वाईट वाटले वाचून. २ वर्षांपूर्वी पुण्यात त्यांना एका कार्यक्रमात पाहिले/ऐकले होते. त्यांचे वादन अंगावर रोमांच उभे करणारे होते. पुण्यात एक कार्यक्रम वाजवून मी पाहिलेल्या दूसर्‍या कार्यक्रमात ते आले होते आणि त्या वयातही (त्यांना हाताला धरून स्टेजवर आणले होते) त्यांनी तो दूसरा कार्यक्रम वाजवला होता. अमित कुमारच्या अत्यंत भंगार कार्यक्रमाचे सर्व पाप ह्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वादकाने आपल्या ताकदीच्या फूंकीने आणि स्वर्गीय कलेने साफ धूवून टाकले आणि आम्ही श्रोते समाधानाने तृप्त झालो. मनोहारीदांना विनम्र अभिवादन.

In reply to by चतुरंग

संदीप चित्रे 14/07/2010 - 20:15
अगदी अगदी ! त्या निमित्ताने 'तू नळी'वर ह्या भन्नाट क्लिप्सही मिळाल्या Part 1: http://www.youtube.com/watch?v=6tiP7nW_nIY&feature=related Part 2: http://www.youtube.com/watch?v=CSSzGdQpDjQ&feature=related

In reply to by बहुगुणी

योगी९०० 14/07/2010 - 01:24
या थोर कलाकाराला आदरांजली.. मला खरेच माहित नव्हते की मनोहारीदा कोण होते. आज माहिती कळली. पंचमदांना त्यांची साथ मिळाली म्हणून पंचमदा पण खुलले. डॉ. तुमचे आभार की या कलाकाराची माहिती आम्हाला दिली. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

भाऊ पाटील 14/07/2010 - 17:52
मलाही हा लेख वाचेपर्यन्त माहित नव्हते की मनोहारीदा कोण होते ते. सहसा हे असे पडद्यामागचे कलाकार उपेक्षित राहतात. या थोर कलाकाराला सलाम आणि डॉ.चे आभार.

सुनील 14/07/2010 - 07:36
संगीतकाराच्या तोडीसतोड काम करूनही संगीतकाराला जे प्रसिद्धीचे वलय लाभते, ते अरेंजरला लाभत नाही, हे दुर्दैव. खूप छान ओळख करून दिली आहे. माझी श्रद्धांजली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खडूस 14/07/2010 - 10:07
या महान कलाकाराला माझीही श्रद्धांजली. - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

बबलु 14/07/2010 - 11:45
षण्मुखानंदला एकदा आणि मुलुंड पूर्वेला एका कार्यक्रमानंतर त्यांना भेटून दोन शब्द बोलणं झालं होतं. उच्च माणूस. तुफान डेडिकेशन. माझीही विनम्र श्रद्धांजली. असा माणूस परत होणे नाही. ....बबलु

प्रदीप 14/07/2010 - 18:22
लेख आवडला. ज्यांच्या अप्रतिम कलाकारीने आम्हा ('आजोबा' लोक-- शिशू लोकांनी दुर्लक्ष करावे) एकदोन पिढ्यांवर गारूड टाकले आहे, ते एकेक उठून निघून जात आहेत. 'एकेक पान लागले गळाया' असे झाले आहे. बाय द वे, डॉ. दाढे, 'अजी रूठकर अब' चा सॅक्स मनोहारींनीच वाजवला होता का? ह्या सॅक्सप्रमाणेच अजून एक व्याकूळ करणारे वाद्य म्हणजे स्कॉटिश बॅगपाईप. (दुर्दैवाने हिंदी चित्रपटांत त्याचा वापर, मला माहिती आहे त्याप्रमाणे, एकदाच 'बुढ्ढा मिल गया' मधे झालेला आहे, व तो अगदी वेगळ्याच कॉंटेक्स्टमधे!)

In reply to by प्रदीप

चतुरंग 14/07/2010 - 18:49
स्कॉटिश बॅगपाईप हे मला वाटते स्कॉटिश लोकांचे मुख्य वाद्य आहे (चूभूदेघे). मी गेल्यावर्षी मॅसॅच्यूसेट्सच्या ज्या भागात राहत असे तिथेच एक आयरिश कुटुंब होते आणि त्यांच्यापैकी एकजण संध्याकाळी बागेत फिरत फिरत हा बॅगपाईप वाजवीत असे. मी कित्येकवेळा तिथून जाताना थांबून त्याचा बॅगपाईप ऐकून पुढे जाई ते आठवले. अतिशय आर्त सुरावटी निर्माण करु शकते हे वाद्य. (स्मरणशील)चतुरंग

In reply to by प्रदीप

प्रदीप 14/07/2010 - 18:58
माझ्या वरील प्रतिसादात दोन चुका झालेल्या आहेत. १. माझा प्रश्न 'अजी रूठकर' विषयी नसून 'बेदर्दी बालमा' विषयी होता. त्यातील सॅक्सोफोन भन्नाट आहे. २. स्कॉटिश बॅगपाईप 'संगम'मधील 'बुढ्ढा मिल गया' त नसून 'बोल राधा बोल' मधे आहे. धन्यवाद.

In reply to by प्रदीप

डॉ.प्रसाद दाढे 15/07/2010 - 10:57
अर्थातच प्रदिपजी 'बेदर्दी बालमा' मधला सॅक्स मनोहारिदांचाच आहे. प्लिज तुमचा एक लेख होऊन जाऊ दे त्या घायाळ करणार्‍या गाण्यावर..

In reply to by प्रदीप

डॉ.प्रसाद दाढे 15/07/2010 - 11:01
पंचमदांच्याच 'जबरदस्त' चित्रपटातील 'जब चाहा यारा तुमने' ह्या किशोरने गायलेल्या गाण्यात बॅगपायपरचा मस्त वापर केला आहे. बहुधा हे काम (पीस बनविण्याचे) मनोहारिदांचंच असणार.. ह्या गाण्यातले संतूरचे पीस पं. उल्हास बापटांनी वाजविले आहेत. http://www.youtube.com/watch?v=bl2c-6PPPAw

सन्जोप राव 14/07/2010 - 18:47
सुरेख लेख व मर्मज्ञ प्रतिक्रिया. आभार डॉ. दाढे. सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

वेताळ 14/07/2010 - 19:12
त्याचे शेवटचे दर्शन इंडीयन ऑयडॉल मध्ये झाले. जबरदस्त माणूस होता. सॅक्सोफोन आपले खुप आवडते वाद्य आहे. आमचा रेहमान त्याचा वापर खुप सुंदररित्या करतो. दुनिया दिलवालोंकी मध्ये खुप चांगला वापरला आहे. केन्नी जी ने खरी सॅक्सोफोनची आवड निर्माण केली. वेताळ

तिमा 14/07/2010 - 20:04
तुम्ही हा लेख लिहून आमच्या डोळ्यांत पाणी आणलं राव. एका महान कलाकाराला अखेरचा मुजरा. गाण्यांची लिस्ट दिल्यामुळे सगळे पीस कानात वाजायला लागले. असो. जमाना गुजर गया. तिरशिंगराव घायाळवाणे हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

धमाल मुलगा 14/07/2010 - 20:32
_/\_ आम्हा करंट्यांना ठाऊकच नव्हते हे व्यक्तिमत्व. दुर्दैव! दुसरे काय? श्रध्दांजली.

नेहमी आनंदी 15/07/2010 - 12:15
हेच ते मनोहारी http://www.youtube.com/watch?v=yZ_zBO75Q2E&feature=related

सेवेसि 15/07/2010 - 13:45
खरच जबर् द्स्त माणुस. लिह्ण्या पेशा त्यान्चि टयुन ऐकुन त्याना आठ्वुया. =D>

मराठी_माणूस 17/07/2010 - 12:34
छान लेख आणि दुर्मिळ अशी आवडती माहीति. परख मधल्या ओ सजना बरखा बहार आई ह्या अप्रतीम गाण्या मधल्या दुसर्‍या कडव्याच्या ओळी दोनदा म्हणून झाल्यवर "सांवली सलोनी घटा..." सुरवात होण्या आधी सॅक्स सुरु होतो आणि पुढे ऑब्लिगेटो देत चालु रहतो , तो मनोहारींचाच का ?

In reply to by मराठी_माणूस

डॉ.प्रसाद दाढे 17/07/2010 - 18:25
'ओ सजना' मधील सॅक्स मनोहारीदांचाच असणार कारण ते सलिलचे खास आर्टिस्ट होते पण कन्फर्म करून सांगेन परत. बाकी त्याच गाण्यातली मरणी अवघड पण भन्नाट सतार वाजवली आहे एका मराठी कलाकाराने.. पं. जयदेव आचार्य (दादरला राहतात, अजूनही म्हणजे ऐंशी पार करूनही उत्तम सतार वाजवतात..)

नंदन 17/07/2010 - 13:20
आणि संग्राह्य लेख. त्यांच्या सॅक्सोफोनवादनाबद्दल दुमत नाहीच, पण 'जा रे जा रे उड जा रे पंछी'च्या सुरुवातीचा बासरीचा पीस त्यांनीच वाजवला आहे, हे वाचून त्यांना मनोमन पुन्हा एकदा दंडवत घातला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

डॉ.प्रसाद दाढे 17/07/2010 - 17:56
ह्या लिंकवर राहुल रानडे यांनी मनोहारिदांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी 'अरेंज' केलेल्या वेचक गाण्यांची साखळी तयार केली आहे.. http://www.muziboo.com/rahulranade/music/manohari-singh-medle/