मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आईपणाचा उदोउदो

डॉ.श्रीराम दिवटे · · जनातलं, मनातलं
मे मासाचा दुसरा रविवार आला की आम्हां लेकरांच्या पोटात मायेचा गोळा उठून आम्ही आई आई करीत टाहो फोडतो. जगभर मदर्स डे साजरा होत असतो अन् आम्ही भारतीय कार्टे आईचा उदो उदो करून घेतो... मातेविना सृष्टी नाही, ममतेबिगर दृष्टी नाही हे खरे असले तरी अपत्यप्रेमाची वृष्टी कशी करायची तिचे तीच जाणे. आमच्या बापाला ते जमलं तर नाहीच, आम्ही बाप झाल्यावर आम्हालाही जमत नाही. रडणारं पोट्टं आम्ही डोईवर घेऊन गावभर फिरवलं तरी शांत होत नाही. परंतु 'ओ रे बाळा' अशी मंजुळ वात्सल्यमयी मातृसाद कानी पडली की बाळोबा तिच्याकडे झेप घेऊन खिदळणार हे जन्मापासून ठरलेले. आम्हा करंट्या बापूसांना ना तसली कोमल हाक मारता येत, ना तसला वात्सल्याचा उमाळा येत. त्यामुळेच की काय तिला पोरगं चिकटलं की आम्हाला तिच्या 'आई'पणाचा हेवा वाटू लागतो.('बाई'पणाचा नव्हे, हे शौकिनांनी ध्यानात घ्यावे.) असा हेवा व्यक्त झाल्यावर बापपणाचा दावाही तोकडा वाटू लागतो. अशा वेळी खास मैत्रिणीँबद्दलसुद्धा प्रेमाऐवजी मत्सर उफाळून का येतो ते न कळे! खरोखर आई मग ती कालची असो की उद्याची वंदनीय असते, स्पृहणीय असते. तिचा योग्य तो आदर राखणं, तिच्यायोगे आपण दुनिया पाहू शकलो याचं जागतं भान ठेऊन तिच्या आईपणाचा उदो उदो करणं आपलं कर्तव्यच आहे. तेव्हा मातृदिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा झालेल्या मातांना, होऊ पाहणाऱ्‍या आयांना अन् उद्याच्या भावी जननीँना सुद्धा दिल्याच पाहिजेत...

वाचने 2045 वाचनखूण प्रतिक्रिया 4

शुचि 06/05/2010 - 18:25
श्रीराम साहेब कालच वाचत होते - किती सोपं असतं स्वतःचा जड ठसा किंवा फिंगर प्रिंट म्हणा ना उमटवणं. प्रत्येकाची वेगळी वेगळीच प्रिंट असते. रस्त्यातून जाताना किती सहज आपण एकाला दुसर्‍यापासून वेगळं ओळखू शकतो. पण तीच गोष्ट लेखनाच्या बाबतीत होते का? असं का होतं की स्वतःची लेखनशैली निर्माण करणं हे अतिशय कौशल्याचं, वेळखाऊ काम असतं? सांगायचा मुद्दा हा की - आपली लेखनशैली मला तरी ओळखता येऊ लागली आहे. आपण स्वतःचा खरच एक ठसा निर्माण करत आहात त्याबद्दल सर्वात प्रथम अभिनंदन. आता लेखाबद्दल - सुरेख शैली, मस्त लेख. >>तिच्या 'आई'पणाचा हेवा वाटू लागतो.('बाई'पणाचा नव्हे, हे शौकिनांनी ध्यानात घ्यावे.) >> =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

स्मृती 08/05/2010 - 19:41
कशासाठी एवढा उदोउदो.. मला कळत नाही!.. जेवढी बाळाला आईची गरज असते त्यापेक्षा जास्त आईला बाळाची असते असं मला कायम वाटत आलंय... बाईला आई फक्त बाळच करू शकतं... आणि राहता राह्यलं संगोपन.. संस्कार.. ती तर प्रत्येक मनुष्यप्राण्याची भावनिक गरज आहे!.. कोणावरतरी प्रेम करावं, सर्वस्व उधळून जीव लावावा हे प्रत्येकासाठीच गरजेचं असतं.. नाहीतर पुर्वी बाळंतपणात किती बायका जायच्या.. त्यांची मुलं काय वाढायची राह्यली?! का संस्कार नाही झाले त्यांच्यावर?! समस्त कवी मंडळींचा रोष पत्करून मी हेच म्हणेन की आईपणाचं स्तोम त्यांनी उगाचच माजवून ठेवलंय..