Skip to main content

आभाळ फुटलं !! (Cloud Burst)

आभाळ फुटलं !! (Cloud Burst)

Published on मंगळवार, 20/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
“आभाळ फुटणं” म्हणजे काय हे आम्ही त्या दिवशी अनुभवलं. आतापर्यंत हा एक फक्त वाक्प्रचार म्हणूनच ऐकला होता. पण त्या दिवशी त्याचा तो भयंकर अर्थ कळला. १७ एप्रिल ! सकाळ नेहेमीसारखीच उगवली. आमची सकाळ ६ वाजता सुरु झाली. पिल्लू क्रिकेट कोचिंगला जायला निघालं. त्याची तयारी झाली……..आणि मी कामं आटपायला सुरवात केली कारण आज हे सेऊलहून येणार होते. Emirates ची फ्लाइट होती. दुबईला थांबून मग इथे कुवेतला ८.२५ ला पोचणार होती. मी त्यांना घ्यायला साधारण सव्वा आठला निघणार होते. आठ वाजले. मी देवाजवळ दिवा लावला. मी दिवा लावला तेव्हा सकाळचा प्रकाश होता. दिवा लावल्यावर एका सेकंदात अचानक अंधार झाला………….अगदी गुडूप्प काळोख…..रात्रीसारखा. मी घाबरुन बाहेर बघितलं तर सगळीकडे अंधार…………रस्त्यावरचे दिवेपण नव्हते……….मी बाल्कनीत आले. तेवढ्यात रस्त्यांवरचे दिवे लागले आणि काय घडतंय हे दिसायला लागलं. भयंकर वारा सुटला होता. सगळी झाडं गदगदा हलत होती. रस्त्यावरची वाळू उडत होती. समोरच्या मैदानात तर सगळीकडे रेतीचा पाऊस ! अंगावर रेती अगदी पावसासारखी पडत होती. अचानक आकाशात एक मोठा काळा अक्राळविक्राळ ढग चालत येतांना दिसला. कार्टून मधे जसा दाखवतात तस्सा तो ढग चालत येत होता आणि अचानक तो ढग फुटला आणि धो धो पाऊस पडायला लागला. मुसळधार पाऊस सुरु झाला. सोबत जोरदार वारा……..! समोर जे काय घडत होतं त्यावर विश्वासच बसत नव्हता. मग अचानक पिल्लाची आठवण आली. तो तर मैदानावर होता. त्या सगळ्या मुलांचं काय झालं असेल……….?? त्याचे सर सोबत होते …….ते नक्कीच काळजी घेतील सगळ्यांची. पण काळजात धडधड होत होती. मग आठवलं……..अरे हे विमानात असतील…..आणि आता तर लॅंडींगची वेळ. कसं करणार विमान लॅंड…….?? तेवढ्यात फोन वाजला. मी ज्या टॅक्सीत जाणार होती त्या अलीभाईंचा फोन आला की थोडावेळ थांबूया……कदाचित फ्लाइट उशीरा येईल……..थोडं शांत झाल्यावर जाऊया म्हणून. मी “ठीक” म्हणून फोन ठेवला. पाठोपाठ सगळ्या मैत्रिणींचे फोन आले. इतक्यात विमानतळावर जाऊ नकोस म्हणून सगळ्यांनी सांगितलं. विमान जरी आलं तरी ते विमानतळावर थांबू शकतील. पण इतक्या वादळात तू बाहेर जाऊ नकोस असंच म्हणणं होतं सगळ्यांचं. मलाही पट्लं. मी धडधडत्या मनानेच पूजा केली. देवाजवळ अगदी मनापासून प्रार्थना केली. देवा सगळ्यांना सुखरुप ठेव रे बाबा ! कॉम्प्युटर वर फ़्लाइट्स चं टाइमटेबल लावूनच ठेवलं होतं. फ़्लाइट वेळेवरच दिसत होती. पण वेळ तर उलटून गेली होती. काही केल्या चैन पडेना. तेवढ्यात अजून एका मैत्रिणीचा फोन आला की मुलं सगळी ठीक आहेत आणि लवकरच घरी येतील. मन जरा शांत झालं. बाहेर बघितलं तर पाऊस कमी झाला होता. अंधारही कमी झाला होता. सारखी आत बाहेर सुरु होती. ३-४ मिनिटात सगळं शांत झालं. पाऊसही थांबला. पुन्हा उजाडलं. आभाळ होतंच पण उजेडही नेहेमीसारखाच होता. आता जरा जीवात जीव आला. अक्षरश : १५ मिनिटांचा खेळ होता. पण तेवढ्या वेळात सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. निसर्गाच्या हातचं आपण बाहुलं असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. पिल्लू घरी पोचलं. तो पण इतका excited होता ना…….! त्याला सगळं सांगायचं होतं. तो म्हणाला आम्ही खेळत असताना अचानक जोरात वारा सुटला आणि रेतीचा पाऊस पडायला लागला. आणि आकाशात ……..पाण्यात डेटॉल टाकलं की कसं दिसतं…….. तसा काळा ढग चालत येतांना दिसला. आणि अचानक तो ढग उघडला आणि पाऊस सुरु झाला……….समोर काहीच दिसेना…….पुन्हा रात्र झाली. आम्ही पळत बिल्डिंगकडे धावलो. एकमेकांवर आपटलो सुद्धा. मग आम्हाला बेसमेंटमधे नेलं. थोड्या वेळाने सगळं शांत झाल्यावर आम्हाला सोडलं. आता पप्पा कधी येणार आणि कसे येणार ह्याची काळजी त्यालाही लागली. ह्यांचं फ्लाइट अजूनही वेळेवर दिसत होतं म्हणून मी ह्यांच्या मोबाईलवर फोन केला आणि चक्क ह्यांनी उचलला. ह्यांचा आवाज ऐकून इतका आनंद झाला ना…….! सुरवातीला “अवी……..अवी………तुम्ही पोचले…??” येवढंच बोलले. तेव्हा हे विमानातच होते. पण विमान उतरलं होतं. आम्ही निघतोच आहोत असं त्यांना सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले…….”मला वाटलं तू इकडे पोचली असशील”. म्हटलं……”ते सगळं नंतर सांगते…. आम्ही निघतोय आता.” आम्ही पोचलो तेव्हा हे बाहेर आले होते. ह्यांना बघून इतका आनंद झाला ना……..! देवाच्या कृपेनी सगळं काही सुखरुप पार पडलं होतं. ह्यांच्याकडूनही त्या वेळेची कहाणी ऐकून तर अंगावर काटाच आला. हे म्हणाले…….. लॅंड व्हायच्या आधी १५ मिनिट पायलट ने धोक्याची सूचना दिली होती. विमान खूप जोरात हलत होतं ……खडखडत उडत होतं…….. Bumpy ride होती आणि अचानक एकदम विमान झूपकन खाली आलं. विमानातले सगळे प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडायला लागले. देवाची प्रार्थना करायला लागले. विमान अचानक खूप खाली आलं……एक मिनिट असं वाटलं की संपलं सगळं…….पण दुस-याच मिनिटाला पायलटने विमानावर ताबा मिळवला आणि विमान सुखरुप उतरलं. विमान उतरल्याबरोबर सगळ्या प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या……..अक्षरश: आनंदोत्सव केला. ह्यांच्याकडून सगळं ऐकल्यावर खरोखरंच देवाचे अगदी मनापासून आभार मानले. इतक्या मोठ्या संकटातून त्याने अगदी सुखरुप ह्यांना परत आणलं होतं. देवावरचा विश्वास कित्येक पटीने वाढला.
लेखनप्रकार

याद्या 4265
प्रतिक्रिया 17

प्रसंग खरेच खूप भयावह होता. त्यातून तुम्ही सर्वजण सही सलामत सुटलात....ते वाचून बरे वाटले. तुम्हाला खरोखरच देव पावला म्हणायचा. ------------------------------------------------------------------------- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

>>त्यातून तुम्ही सर्वजण सही सलामत सुटलात....ते वाचून बरे वाटले. असेच म्हणतो.

किती भयावह प्रसंग! मला वाटत प्रत्यक्ष प्रसंगात असण्यापेक्षा तो पहाणा-यालाच अधिक भिती वाटत असावा. असा प्रसंग ओढवल्यावर नैसर्गिक रित्या बॉडी, माईंड त्या पासून सुटका करून घेण्यात गुंतली जाते.त्यामुळे भिती वाटते ते काही करू न शकण्या-या बघ्याला. मीनल. http://myurmee.blogspot.com/

बाप रे!!! मी असायला पाहिजे होतो ... बिपिन कार्यकर्ते

>> अक्षरश : १५ मिनिटांचा खेळ होता. अशावेळी १५ मिनिटे म्हणजे किती मोठा वेळ आहे ते अक्षरशः जाणवतं ! सगळेजण सुखरूप आहेत हे वाचून आनंद झाला. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

अंगावर काटा आला वाचून... भयानकच आहे. पण सगळे सुखरूप आहेत हे वाचून बरं वाटलं. -अनामिक

पंधरा.. शब्दशः पं- ध- रा...! पण या इतक्याशा वेळात काय होईल आणि काय नाही सांगता नाही येणार!! बापरे!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

जबरीच अनुभव! तो तेवढा वेळ अक्षरशः काय नाही नाही ते विचार मनात येऊन जातात :( (कोरियन एअरवेजने चेन्नै-सोल प्रवासात एकदा आमचं विमान लो प्रेशर बेल्ट मध्ये सापडलं होतं जवळजवळ सात-आठ मिनिटं विमानाला एवढे जोराचे हिसके बसत होते की विचारता सोय नाही! एखादं खेळण्यातलं विमान असावं ना तसं ते अवाढव्य बोईंग ७४७ हेलकावत होतं. एकदा तर इतका जोराचा फ्री फॉल घेतला की काहीशे फुटाने उंची कमी झाली आणि रोलरकोस्टर राईडमधे येतो तसा पोटात खड्डा पडला. आजूबाजूच्या बराचश्या बायका जोरजोरात रडायला लागल्या! मीही जाम टरकलो होतो आणि आता विमान पाण्यावर पडलंच तर सीटखालून लाईफ जॅकेट काढायचं अशा तयारीत बसून होतो! सगळं स्थिरस्थावर झाल्यावर बराच काळ रेस्टरुम्सपाशी तुंबळ गर्दी उसळली होती! :D ) चतुरंग

( निसर्गाच्या हातचं आपण बाहुलं असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली .) समंदरो के सफर मे जो हवा चलाता है ! जहाज खुद नही चलते खुदा चलाता है !! हम अपने बुढे चरागो पर खुब इतराये ! और उसको भुल गये जो हवा चलाता है!! राहत इंदोरी.

जयू, अगं कसला जबरी अनुभव घेतलात गं. देवाचे आभार तुम्ही सगळे सुखरूप आहात. चतुरंग यांचाही अनुभव भयानकच आहे... शेवटची ओळ वाचून... :D

बापरे!! भितीदायक अनुभव! सगळे सुखरूप आहेत ते चांगले झाले. रेवती

हो ना........सगळे सुखरुप आहोत.........धन्यवाद :) आता विचार केला तर गंमत वाटते........ पण त्या वेळी ब्रम्हांड आठवलं !!

बाप रे! काही अपघात झाला नाही हे वाचून आनंद झाला. एकदा आमचं विमान लँड होताना (खाली काही फुटांवर जमिन आहे हे खिडकीतून दिसत होतं) वादळी वार्‍यांमुळे विमानाचा झोल जात होता तर काय भीती वाटली होती. अदिती

आभाळ फाटणं म्हणजे नक्की काय हे सध्या अनुभवतोय..! असो, तात्या.

तात्या........... देव आपली कधी कधी परिक्षा घेत असतो......थोडी कळ काढा. सगळं व्यवस्थित होईल.