ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २
लेखनप्रकार
याआधी : ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १
योदोबाशी आणि दाई याई
बाहेर पडल्यावर समोरच दिसली ए/सी लिमोसिन बस!गुबगुबीत ऐसपैस खुर्च्या, झुळझुळीत पडदे असलेली गुलाबी रंगाची देखणी ,प्रशस्त बस!अतिशय नम्रपणे सुटाबुटातला एक जपानी चेहरा अभिवादन करून तिकिटे देत होता.तोच होता आमच्या बसचा चालक.गुळगुळीत रस्त्यावरुन,उड्डाणपुलावरून बस धावू लागली १०० किमी च्या ही जास्त वेगाने.अतिशय शिस्तीत जाणारीवाहने,सिग्नल न तोडणारे वाहन चालक,बसबरोबरच एका बाजूने धावणारा समुद्र,उजवीकडेच असलेले अतिभव्य टेंपोझान (जायंट व्हील्),युएसजे स्टुडिओ.. दिनेश एकेक गोष्टी दाखवत होता आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी मी ते सारे दृश्य मनात साठवून घेत होते.
प्रवासाचा शीण काही नव्हताच,तासाभरातच आम्ही घरी पोहोचलो.जपानमध्ये जागेची आत्यंतिक टंचाई असल्याने अति लहान लहान सदनिका आहेत, १२* १२ च्या जागेत आख्खे घर! म्हणजे एक किचन कोपरा,लहानसे न्हाणीघर आणि झोपण्याची जागा! अशा खोल्यांतून तीन/चार महिने राहून शेवटी दिनेश आणि त्याच्या २ सहकार्यांनी मोठी सदनिका घेऊन एकत्र राहण्याचे ठरवले,त्यादॄष्टीने प्रयत्न करून घर मिळवले आणि आता त्या नवीन घरात येणारी मीच शेवटची मेंबर होते.बाकीची मंडळी आधीच येऊन पोहोचली होती.
दुसर्याच दिवशी सकाळी आम्ही नांबाला जायचे ठरवले.आम्ही म्हणजे इतरांनी ठरवले,मला तिथे पोहोचून २४ तासही झाले नसल्याने नांबा हे गावाचे नाव आहे एवढीच माहिती मला बाकीच्यांच्या बोलण्यातून समजली. जपानची एलेक्ट्रॉनिक गुड्स मधली प्रगती तर सार्या जगाला माहित आहे पण प्रत्यक्ष पाहताना अक्षरशः चकित व्हायला होतं.रस्तेच्या रस्ते दुतर्फा मोठमोठया शो रुम्स्,मजलेच्या मजले नुसते कॅमेरे,डिजिटल कॅमेरे,विडीओ कॅमेरे वॉकमन्स आणि कितीतरी अशा वस्तू की ज्यांची नावंही माहित नसतील.अक्षरशः अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखी स्थिती झाली. 'योदोबाशी' ही ७ मजली इमारत फक्त कॅमेर्यांची शो रुम! मी स्वत:लाच एक चिमटा काढून स्वप्नात नसल्याची खात्री केली.
इथे येऊन ३,४ दिवस झाल्यावर सुप्रिया आणि मी दोघींनीच 'दाई याई ' या प्रसिध्द सुपरमार्केटात जाऊन रोजच्या लागणार्या वस्तू आणण्याचा बेत केला.बेत केला म्हटले अशाकरता, की ते दुकान आमच्या घरापासून साधारण ३ किमी दूर,रस्ता सरळ नाही,एकदा उजवीकडे वळा मग डावीकडे जा,परत डावीकडे वळा...असला आणि त्यात माझे दिव्य दिशाज्ञान!तो मार्ग लक्षात ठेवूनच तिथे जाणे भाग होते कारण भाषेचा प्रश्न!एकदाचे तिथे पोहोचलो.एवढ्या प्रचंड दुकानाला ५,६ दारं! आता कोणत्या दारातून आत शिरलो हे लक्षात ठेवणे आवश्यक ,नाहीतर जत्रेत हरवल्यासारखी स्थिती होणार आपली! स्वतःलाच बजावत होते.आजूबाजूला असलेल्या पाट्यांवरचे एक अक्षर समजेल तर शपथ! शेवटी 'खुणा' लक्षात ठेवल्या.बाहेर असलेले मोठ्ठे आइस्क्रीम पार्लर( आता आम्हाला अशाच खुणा लक्षात राहतात!),समोरच असलेल्या चौकातली बेकरी आणि 'वॉशिंग्टन' अशी रोमन लिपीत पाटी असलेलं एक दुकान ,जी एकमेव पाटी आम्हाला वाचता आली.असं सगळं डोक्यात ठेवून आम्ही दोघी सरकत्या जिन्यावरून धडधडत्या मनाने आत शिरलो,हव्या असलेल्या वस्तू आधी शोधल्या ,मग घेतल्या आणि काऊंटर पाशी आलो.'येन' मध्ये यशस्वी रीत्या बिल देऊन बाहेर आल्यावर काहीतरी मोठ्ठेच काम केल्याच्या थाटात बाहेरच्या लाऊंजमध्ये बसलो.लहानपणी एकट्याने दुकानात जाऊन केलेल्या खरेदीचा जो आनंद असतो ना,तसंच काहीसं वाटत होतं. नंतरच्या काही दिवसातच हे दाई याई, तिथले लोक,तो परिसरच आमचे दोस्त बनून जातील,याची त्या दिवशी आम्हाला काहीसुध्दा कल्पना नव्हती.
वाचने
13696
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
छान!
अजून
In reply to अजून by गुंडोपंत
छान लेख
छान
छान
धन्यवाद
स्वाती,
तात्या