मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुकसारिका

प्रकाश घाटपांडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
शुक-सारिका
Rightवरदा बुक्सचे प्रकाशक ह अ भावे यांच्या दरबारी आमची हजेरी अधून मधून असतेच. आजच बसलो होतो. त्यांना आंतरजालीय वाद व गमतीजमती याबाबत गप्पा मारत माहिती देत होतो. तेवढ्यात त्यांना पुस्तक मागणीचा फोन आला.ग्राहक अधिक माहिती विचारत होता. "शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. ....."भावे नीरगाठउकलतंत्राने फोड करून फोनवर सांगत होते तोता मैना की कहानी तो पुरानी हो गय़ी! आता मला सांगा जुन्या बाटलीत नवी दारू घ्यायला आवडेल की नव्या बाटलीत जुनी दारू घ्यायला आवडेल. ओ काय लावलंय! पहिली बाटली फोडा दारू महत्त्वाची. हॆहॆहॆ आता कसं बोल्लात! चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच ही शुकसारिका म्हणजे काय? हम बेवफा हरगीज ना थे ! पर हम वफा करना सके। पुरुष बेइमान की स्त्री चारित्र्यवान हा वाद आंतरजालावरही जुना आहे व जालाबाहेर ही जुनाच आहे. हा विषय काही क्षणाची सोबत नसून अनंत काळची सोबत आहे. जालकरी स्त्री पुरुषांना चघळायला तो आवडतो. काहींना झाडावर बसून पाहायला आवडतो. संस्कृत साहित्यात या वादाविषयी अनेक पुस्तके प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. त्यापैकी शुकसारिका या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद हिंदीत तोता- मैना नावाने फारच लोकप्रिय आहे मुख्यत: या प्रेमाच्या कथा आहेत व प्रेमात शृंगाराला महत्त्व आहेच. त्यामुळे काही शृंगारकथा या अश्लिलतेकडे कडे झुकलेल्या असतात हा आक्षेप असतोच. चटपटीत करताना हिंदी रूपांतरात देखील तसे घडलेले आहेच. मूळ संस्कृत साहित्यात श्लील अश्लील असा भेदच नाही. सर्व काही स्पष्ट आणि उघड असते. परंतु मराठी अनुवादात हा संयम पाळला आहे. कुटुंबात वाचण्यायोग्य होईल याची काळजी घेतली आहे. या तेवीस कथांत एक कथा सारिका सांगते व त्याला उत्तर म्हणून शुक चारित्र्यहीन स्त्रीची कथा सांगतो. अशी ही कथांची प्रश्नोत्तरे या तेवीस कथांत चालू असतात. शेवटच्या कथेत शुक आणि सारिका यांचे एकमत होते व ते सुखाने संसार सुरू करतात. मूळ पुस्तक हे संस्कृत असल्याने प्राचीन भारतातील समाजजीवनाचे प्रतिबिंब त्यात पाहायला मिळते. शेकडो वर्षांपूर्वीचा भारतीय समाज कसा होता याचेही दर्शन या कथांतून होते. या कथांचा समाजशास्त्रीय अभ्यास कुणी केला नसावा. या कथेत राजे राण्या प्रधान व प्रधानपुत्र श्रेष्ठी व व्यापारी, नर्तिका व नायिका, साधू व दरोडेखोर अशी नाना प्रकारची व्यक्तिचित्रे आढळतात. प्रस्तावनेत ह.अ. भावे म्हणतात," संस्कृत साहित्यात शुकबहात्तरी व कोकोलाछत्तिशी असे अर्थ असलेली दोन पुस्तके उपलब्ध आहेत परंतु मला एक शुकसारिका असे नाव असलेले हस्त लिखित प्राच्यविद्या संस्थेत पाहायला मिळाले." " शुकसारिका हे संस्कृत पुस्तक ही मूल तीनचार संस्कृत ग्रंथांवर आधारित आहे. यातील मूळ कथा जनसमूहात प्रचलित असलेल्या लोककथाच आहेत.भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून कथाकथन होते. त्या कथाकथकांची जमात विसाव्या शतकापर्यंत कथाकथन करून उदरभरण करणारी आढळली आहे. या चित्रकथीजवळ एक पेटी असते व त्यातील चित्रे दाखवत ती कथा सांगतात असे चित्रकथील मी स्वत: लहानपणी पाहिले आहे" या कथा चिरतरुणांची मन रिझवतात व चारित्र्य संपन्नतेचे ही महत्त्व पटवतात किमान तसा प्रयत्न करतात. आताच्या काळात चारित्र्य संपन्नता गोष्ट जरा अवघडच बनत चाललीय असो. कथेची नावे मोठी मजेशीर व सूचक असतात. उदा. श्रेष्ठीपुत्र श्रीयाळ व भंगीकन्या; मदनपाल, कुत्रा व हिरामण पोपट; राजकन्या पद्मावती व साधू विद्यानंद सरस्वती; नीतिसेन विमला व प्रेमलता. असो एवढा परिचय बास झाला. पुस्तकाचे नांव- शुक-सारिका संपादक - प्रकाशक:- ह. अ. भावे; वरदा प्रकाशन प्रा.लि ३९७/१ सेनापती बापट मार्ग पुणे 411016 फोन 25655654 ईमेल पत्ता- नाही पृष्ठे- २१६ मूल्य- १५०/- (एकशे पन्नास फक्त)

वाचने 3719 वाचनखूण प्रतिक्रिया 10

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/25/2010 - 23:54
श्री घाटपांडे, ओळखीबद्दल धन्यवाद. वाचकांचे कुतूहल शमावे म्हणून पुस्तकातील एखादा प्रातिनिधिक उतारा येथे देता येईल का?

पाषाणभेद Fri, 03/26/2010 - 02:27
लय भारी वळख करूं देली काका तुमी. यातल्या कथा तुमी तुमच्या भासेत टाका ना. नाय तरी इथं इक्रम येताळाच्या कथा चालू झाल्या हातती. तुमच्या कथा त्या पेक्शा लयी बेस र्‍हातील. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

प्रियाली Fri, 03/26/2010 - 03:22
एकच लेख सर्व संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याच्या मनोवृत्तीचा निषेध म्हणून दुसर्‍या संकेतस्थळावर टाकलेला माझा प्रतिसाद येथे चिकटवत आहे. ;) शुकसारिका असो किंवा अरेबियन नाईट्स (अरेबियन नाईट्सचा उगम तोता मैनाच तर नसावा) बर्‍याचशा कथा या स्त्रिया बेईमान आहेत हे दाखवणार्‍या आहेत. शुकसारिकेत कथांची सुरुवात याच कारणास्तव होते की आपल्या मालकाची बायको, मालकाच्या गैरहजेरीत प्रियकराला भेटण्याचा बेत ठरवते तेव्हा तिला त्यापासून परावृत्त करण्यास शुक गोष्टी सांगत जातो. अरेबियन नाईट्समध्ये शहरजादी शहरयारने आपला शिरच्छेद करू नये आणि त्याचा बायकांवर विश्वास बसावा म्हणून गोष्टी सांगत जाते. अरेबियन नाईटस् चे मूळच बायकांच्या बेईमानीवर आधारीत आहे. त्यातील कोळी व जीनची गोष्टही स्त्रियांची बेईमानी दाखवते. दोन्ही कथांची मांडणी कथेत - कथा, त्यात आणखी एक कथा अशी केलेली आहे.
या तेवीस कथात एक कथा सारिका सांगते व त्याला उत्तर म्हणुन शुक चारित्र्यहीन स्त्रीची कथा सांगतो.
हे असे आहे का? माझ्यामते व्यापारानिमित्त बाहेर गेलेल्या व्यापार्‍याची बायको आपल्या प्रियकराला भेटायला इतकी उतावीळ असते की ती तिला रोखू पाहणार्‍या मैनेची मान मुरगळून टाकते. पोपट शहाणा असतो तो तिला सरळसोट परावृत्त करून आपला जीव धोक्यात टाकत नाही परंतु गोष्टीरुपाने तिला बोध देतो आणि सकाळपर्यंत रोखून धरतो. असो. हे वरील पुस्तक मुलांसाठी आहे की मोठ्यांसाठी? असे साहित्य विस्मृतीत जाऊ नये म्हणून केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. तरी, तत्कालीन समाजाचे दर्शन त्यात घडते किंवा कसे हे कळत नाही कारण या कथा मुखे-परमुखे शेकडो वर्षे चालल्याने त्यात काळानुसार बदल झाले असावेत. शुकसप्ततीचे अकबराच्या दरबारी तुतीनामा असे फारशी भाषांतर केले गेले होते. त्यात गोष्टी जशाच्या तशा राहिल्या की त्यांचे मुघलसंस्कृतीत ट्रान्सफॉर्मेशन झाले हे माहित नाही. अरेबियन नाईट्स या त्यामानाने जुन्या गोष्टी. त्याही भारतीय लोककथांवरून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. शुकसारिकाच तर त्यांचे मूळ नाही ना? :-) दोन्ही कथांमध्ये, घराबाहेर असणार्‍या नवर्‍यांना आपल्या अपरोक्ष पत्नी काय उद्योग करत असावी अशी चिंता पडत असावी. शेवटी काय आहे की माणूस स्वतःवरून इतरांना जोखतो. ;-)

In reply to by प्रियाली

शुचि Fri, 03/26/2010 - 03:35
प्रियाली फक्त स्त्री एकटी बेइमान होऊच शकत नाही , साथ द्यायला पुरुष हवा ना ;) तेव्हा फक्त स्त्रीच्या बेइमानीच्या कथा कोणी म्हणूच शकत नाही. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

In reply to by शुचि

फक्त स्त्री एकटी बेइमान होऊच शकत नाही , साथ द्यायला पुरुष हवा ना
पुरुष हा मुलतःच 'बेईमान' आहे असे गृहित असते. केवळ संधी मिळत नाहि म्हणुन तो ईमानदार असतो. संधि मिळेपर्यंतच तो साधु असतो मिळाल्यावर संधिसाधु होतो. याचा उगम खर तर जैविक प्रेरणेवर आहे. बाईने वेसण घालून त्याला आपल्या काबुत ठेवायचे असते. ही जबाबदारी पुन्हा बाईवरच प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव Fri, 03/26/2010 - 13:52
हा निसर्गत: स्खलनशील मानला गेलाय आणि आहेही....त्यामुळे त्याला नैतिक अधिष्ठान नाहीये. मात्र स्त्रीला नैतिकतेत अडकवून ठेवलंय समाजाने आणि तिनेही..स्वत:ला. त्यामुळे स्त्रीने परपुरुषाशी संबंध ठेवला तर ती पातकी आणि त्याच वेळी तो पुरूष मात्र...पुरूषसिंह. ;) बिचार्‍या बायका..दोन्हीकडून दूषणं मिळतात त्यांना.

केवळ संधी मिळत नाहि म्हणुन तो ईमानदार असतो.>>>> हे मात्र पटलं बर्का दादानु ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

समंजस Fri, 03/26/2010 - 10:42
छान :) धन्यवाद, एका जुन्या पुस्तकाची तोंड ओळख करून दिल्याबद्दल. (एकदा तरी पुस्तक वाचण्याचा विचार आहे, त्यानंतरच काय ते बोलता येईल पुस्तकाबद्दल :? )

मन१ Mon, 07/16/2012 - 18:33
ह्यावरून गेल्या वर्षी आलेला "मिर्च" हा झणझणीत पिक्चर आठवला. चार कथा आहेत, चारही स्त्री/पुरुसहचे चारित्र्य ह्याभोवतीच फिरतात.