Skip to main content

जायफळाच्या सालींचे लोणचे आणि मुरांबा

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 15/10/2015 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाककृती देण्यापूर्वी जायफळाचे झाड ज्यांनी पाहिले नसेल त्यांच्यासाठी हा फोटो. jayfal ही झाडावर दिसणारी फळे खालच्या बाजूने तडकतात आणि त्यातून जायफळ मिळते. जायफळ, त्यावर कडक आवरण, जायपत्री आणि त्यावर जाड साल असते. हे साल चवीला आंबट असते. त्यामुळे त्यापासून लोणचे, मुरंबा होऊ शकेल असे वाटले म्हणून हा प्रयोग. साली अशा दिसतात. jayfal जायफळाचे लोणचे साहित्यः जायफळाच्या साली अर्धा कि., १०० ग्रॅ. तयार लोणचे मसाला, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद. कृती: जायफळाच्या सालींचे वरचे जाड आवरण सोलून घ्यावे. आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. मीठ लावून अर्धा तास ठेवाव्यात. अर्धी वाटी तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून गार करण्यास ठेवावी. अर्ध्या तासाने फोडीमध्ये तयार लोणचे मसाला, गार झालेली फोडणी मिसळावी. एक दोन दिवसांनी लोणचे मुरते. याच्या फोडी चावून खाल्ल्यास अगदी कैरीसारख्या लागतात. खरं तर या सालींना जायफळाचा वास येतो. पण लोणच्यात तो जराही जाणवत नाही. jayfal जायफळाचा मुरंबा: साहित्य: जायफळाच्या साली, सालींच्या वजनाएवढी साखर. जायपत्री एक दोन तुकडे. कृती: जायफळाच्या सालींचे वरचे जाड आवरण सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. तयार फोडी थोडे पाणी घालून कुकरला दोन शिट्या करून वाफवून घ्याव्या. या फोडी शिजल्यावर चाळणीवर ओतून घ्याव्या. त्याचे पाणी आपल्याला पाकासाठी वापरायचे आहे. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात घ्यावी. त्यात फोडींचे आलेले पाणी मिसळावे. पाणी साखर बुडेपर्यंत नाही झाले तर थोडे साधे पाणी साखरेत घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डिशमध्ये घातल्यावर पसरला नाही की त्यात शिजवलेल्या फोडी घालाव्यात. जायपत्रीच्या एक दोन पाकळ्या घालाव्या (ऐच्छिक. फोडी घातल्यावर पाक परत थोडा सैल होतो. पुन्हा डिशमध्ये घातल्यावर पसरणार नाही एवढा वेळ शिजवावे. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा. या फोडींना आंबट चव असल्याने मुरंबा मस्त लागतो. आणि जायफळाचा वासही येतो. जायपत्रीही वासासाठीच असते, म्हणून ती घातली पाहिजे असे नाही. या मुरंब्याला सुंदर गुलाबी रंग येतो. jayfal

वाचने 17863
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

कसलं सुंदर दिसतंय!! मस्त, एकदम नवीन कृती!

ए घरी जायफळ असुन ही हे करायच काही सुचल नाही. कोई नही आता करेन. पाकृ अफाट सुंदर आहे हे फोटो प्रुव करतात

जायफलाचे हे प्रकार फारच नविन आहेत

वेगळेच लोणचे आणि मुरांबा! मस्त! स्वाती

जायफळाचा असाही पाककृतीत वापर होऊ शकतो याची कल्पना पण केली नव्हती. एक नंबर पाककृती दिल्या आहेस अनन्नया, मुरांब्याला सुरेख रंग आलाय. सुं द र !! __/\__

हे पदार्थ कल्पनेच्या पलिकडले आहेत. एकतर जायफळाचं झाड घरी राहू देत, आजूबाजूलाही सहसा नसतं. असल्यास त्यापासून इतके मस्त पदार्थ करता येतील हा विचार तुला सुचला याचे कौतुक वाटते. फोटू आवडले.

In reply to by रेवती

अगदी अगदी.. एकतर जायफळाचे झाडच पाहिलेले नाही.. त्यामुळे त्याचा असाही पदार्थ बनु शकतो?!! आणि काय रंग आलाय ग!! माशाल्ला!!

अलिबाग कडे, बहुतेकांच्या घरी जायफळाच झाड पाहिलेय अन अस लोणचं पण.. मस्त लागत. एक मस्त जायफळाची चव लागते खाताना. मुरंबा मात्र पहिल्यान्दाच बघतेय.