आम्ही कोण?
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लोकहो,
"आम्ही कोण?" या प्रश्नावर केशवसुत, केशवकुमारांपासून ते केशवसुमारांपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या असतील. त्यात आमची ही एक भर.
आम्ही नक्की कोण आहोत आणि कसे आहोत, ते या कवितेतून उलगडेल असे वाटते.
आम्ही ही कोकणी | माणसे सामान्य
नको असामान्य | जिणे आम्हां ||
हवी आंम्हा फक्त | थंडीला शेकोटी
गांडीला लंगोटी | आम्ही सुखी ||
भोजना मिळू दे | दोन वेळा भात
पान आणि कात | थुंकायला ||
आनंदाचा क्षण | येता जरी पहा
पिऊ अर्धा चहा | टपरीत ||
नाही परदेशी | केले पर्यटन
आमुचा कोकण | आंम्हा प्यारा ||
रेवस पावस | खेड चिपळूण
लांजा मालवण | स्वर्ग आंम्हा ||
गरम चहाचा | कप अंगणात
हगावे बागेत | पोफळीच्या ||
किर्र किर्र वाजे | खळ्यात रहाट
नागमोडी वाट | समुद्राची ||
अथांग सागर | कोकणा लाभला
जगाला वाटला | हेवा त्याचा ||
समृद्धी सुबत्ता | येई ना कोकणा
हाचि परगणा | दुष्काळाचा ||
अपुरे ते अन्न | भूक वरदान
तरी समाधान | चित्तालागी ||
ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग
असे अंगसंग | कैवल्याचा ||
जसे शांतपणे | आलो या जगात
जाऊ ही स्वर्गात | शांतपणे ||
----- धोंडोपंत
वाचन
11260
प्रतिक्रिया
0