अंगणात माझ्या उभे
जांभळाचे झाड एक
त्याचे माझे नाते असे
जणू बाप आणि लेक
त्याच्या मायेची सावली
घरावर माझ्या असे
त्याच्या वा-याची झुळुक
अंगावरी मोरपीसे
त्याच्या फांदीवर किती
नाना पाखरांची वस्ती
राघु मैना चिऊ काऊ
गुण्यागोविंदाने रहाती
फांदीवरी चोच घासी
काळा कावळा तो-यात
चुळबुळ चिमण्यांची
गोड त्यांचा चिवचिवाट
झर झर खारुताई
खालीवरी जात राही
तिची लगबग बघता
खुदूखुदू हासु येई
झाड जेव्हा जांभुळते
मन माझे उल्हासते
निळी टप्पोर जाभुळे
फांदीफांदी बहरते
गोड गोड जांभळांचा
टप्प टप्प सडा पडे
सान थोर वेचिताती
णिळ्या मोतियांचे सडे
परी, पाउस येण्याआधी
त्याच्या फांद्या छाटताती
घाव कु-हाडीचा पडता
पाने पाने थरारती
हाय माणूस माणूस
असा कसा अमानुष
ज्याने केले उपकार
त्याला लावी गळफास
परी नाही तकरार
जांभळाने कधी केली
त्याच्या फांदीवरी पुन्हा
नवी पालवी तरारली
असे झाड जांभळाचे
मला शिकवी जगणे
शेंडा तुटो , तुटो फांदी
ताठपणे उभे रहाणे
याद्या
1863
प्रतिक्रिया
5
लेखनविषय:
मिसळपाव
चुचु
छान .....
मस्त कविता!
सुरेख..
गोखले