गर्द निळाईने रंगले आभाळ
शांत तळ्याकाठी दिशा विसावल्या
हलकेच जरा छेडता वा-याने
पाण्यात तरंग होऊन सांडल्या
सोन्याची झळाळी माखलेली सांज
फुलवित आली प्राजक्तपाकळ्या
घुमे घंटानाद राउळाच्या दारी
दूर डोंगरात झांजाही वाजल्या
काजळे क्षितिज, अंधाराच्या संगे
गूढ, अनामिक सावल्या जागल्या
एका अवघड वळणावरून
झाल्या तुझ्या माझ्या वाटाही वेगळ्या
तुझ्या वाटेवर आतुर फुलांनी
मुलायम गंधपाकळ्या पेरल्या
माझ्या वाटेवर उदास काळोख,
काट्यांचे कुंपण, भयाच्या सावल्या
तुझी वाट साद सुखाची घालते,
उजळीत लाख चांदण्यांच्या कळ्या
माझी वाट घुटमळते एकटी,
जशा पायी मणामणाच्या साखळ्या
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2189
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर.
अहो जरा पुर्ण वाक्य लिहीत चला..
In reply to सुंदर. by उमेश कोठीकर
छान
क्लास!
अप्रतिम!
आवडेश