दिवसभरातलं रणरणतं ऊन कमी केलं
मुलांना भेटायचं म्हणून रूप सौम्य केलं
घर जवळ येताच आठवणींच फुल फुललं
गोड आठवांनी ध्यान चक्क गुलाबी झालं
एरव्ही जो प्रखर जळजळता तप्त गोळा
डोळेभरून पाहावं अश्या दोनच त्या वेळा
आई म्हणाली किती तापलंय माझं बाळ
सुनबाई जरा गार पाण्याने अंघोळ घाल
कितीही जग गाजवलं तरी आईचा बाळ
भूमीच्या कुशीत क्षितिजावर शमला जाळ
आवरून झोपला तोच आली गोड उषा
बाबा खेळाची वेळ आता झोपतोस कसा
उशेसोबत बागडत केव्हाच सरली निशा
हा पुन्हा उगवतीला कामास सिद्ध असा
- अक्षरदास
| लेखनविषय: |
|---|
वाचने
118
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच.
सुर्याचा दिनक्रम आवडला .
विशेष म्हणजे,
दिवसभरातलं रणरणतं ऊन कमी केलं
मुलांना भेटायचं म्हणून रूप सौम्य केलं
भन्नाट. व्यतिरेक अलंकार आणी निसर्गातील घटकांवर मानवी भावनांचा आरोप केल्याने चेतनागुणोक्ती अलंकाराचीही छटा दिसून येते. (असे कृ.बु. म्हणते)
धन्यवाद
In reply to मस्तच. by कर्नलतपस्वी
मिपावरचं पहिलंच लेखन आणि ही पहिली प्रतिक्रिया, लक्षात राहील. धन्यवाद 🙏
कविता आवडली...
कविता आवडली...