मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उद्याच्या मभागौदि (#) ची कविता

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अमृताशी पैजा जिंके माझी मायबोली कळेना, क्यूँ माझ्याशी वो अंग्रेजी में बोली ? वस्त्रे अभिजाततेची भर्जरी मिरवी उपेक्षांच्या लक्तरांना खुबीने दडवी औटघटकेची राणी उद्या सिंहासनी भविष्यात असेल का तिला वाली कुणी? मायमराठी गं तुझे कसे फेडू पांग? प्लेस्कूलच्या प्रवेशाची सोडू कशी रांग? येता जाता तुझ्या नावे आसवे ढाळीन मिंग्लिशची कास घट्ट धरून ठेवीन एक एक निशाणी ही मिटविण्या तुझी निर्ढावली लेकरे गं कशामुळे तुझी? अमृताशी पैज पुन्हा लावण्याच्या आधी... सालोसाल पेरलेले उगवण्याआधी... नक्राश्रूंचे तळे पार तुडुंबण्याआधी तुझ्या साऱ्या बोलीभाषा मुक्या होण्याआधी... शेवटाची सुरूवात वेग घेण्याआधी... शेवटची शाळा तुझी बंद होण्याआधी... .....सांग, फुटलेली पाटी सांधते का कधी? ~~~~~~~~~~~~~~~~~~~ (#) मराठी भाषा गौरव दिवस

वाचने 227 वाचनखूण प्रतिक्रिया 0