Skip to main content

कुण्या देशिचा असेल वारा??

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 02/10/2022 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदेशिचा दरवळ घेऊन, झुळझुळणारा येतो वारा, धडधडणारे काळिज आणिक फडफडणा-या नयनी तारा. विशाल गो-या कपोलावरी घर्मबिंदु का सरसर जमती? वरवर सारे शांत तरीही खळखळणा-या मनात धारा.. सळसळणा-या उत्तरियाचा पोत रेशमी नकोनकोसा, थरथरणा-या कायी स्मरतो स्पर्श कोणता हवाहवासा? किणकिणणा-या कंकणास का कुणकुण कोणा अगंतुकाची? रुणझुण रुणझुण नाचति नुपुरे, पावलांस मग कुठला थारा? घेऊन घागर, घाबरघाबर, घरून निघते पाणवठ्यावर; कुणी यौवना झरझर भरभर, तमाचीच वर ओढुन चादर. कुंडल, कंकण, बिंदी, पैंजण.. जडजड होती सारे जेवर, परंतु मखमल वाटे कंकर, तलम मलमली मार्गच सारा. अशा अवेळी वेळुबनातुन कोण छेडितो अगम्य तारा? झिळमिळ कौमुदि अवतीभवती तरी तनूचा चढतो पारा? जरी रिकामी तरीहि भरली अशी कशी ती भासे घागर? यमुनेकाठी कुठून अवचित द्वारकेतला सुगंध खारा? कणकण वाळू कुंतलातली हळूच थोडी सोबत घेऊन, परिमळ लेवून, गुणगुणणारा दूरदेशी मग निघतो वारा...
लेखनविषय:

वाचने 1730
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

लयबध्द नादमय कविता आवडली, वाचतना बोरकरांची आठवण झाली, पैजारबुवा,

_/\_