मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मरण...

Jayagandha Bhatkhande · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मरण... रिपोर्ट वाचून झाल्यावर, यमधर्म दिसे दारावर, मग आली भानावर, केलीच पाहिजे आवराआवर... तशी होती ती गोलमटोल, हळूहळू होत गेली अबोल, चेहऱ्यावर दिसे हसरा भाव, मनात सलत असे घाव... कोणी म्हणत नव्हते सरक, पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक, मावळली गालीची हसरी खळी, आता आळीमिळी गुपचिळी... आयुष्यभराच्या आठवणींचा, कसा सोडवायचा गुंता, सतावत सारखे हेच विचार, अन् मनात दाटे चिंता... कळलं नाही तिला शेवटी, काय झाली चूक, बदल दिसे शरीरावर, मन झालं मूक... झोपली नव्हती ती, झाली होती क्लांत, दवाखान्याच्या शय्येवर, तिला मिळाली होती उसंत.. आकाशात दूर कुठेतरी, तेजस्वी तारा निखळला, गाली तिच्या एक, चुकार अश्रू ओघळला... डॉक्टरांना येताना पाहून, मुलगा थोडा घुटमळला, "किती वेळ राहिला" विचारताना, नवरा जरासा अडखळला... अचानक सगळं शांत झालं, हृदय तिचं थांबलं....... कोणीतरी कुजबुजलं, "बरं झालं, मरण नाही लांबलं..." जयगंधा... ६-२-२०२१.

वाचन 4949 प्रतिक्रिया 0