Skip to main content

सोहळा

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 23/07/2020 15:38 या दिवशी प्रकाशित केले.

 जाई बरसुनी मेघ
 करी धरेशी सलगी
 धरा येता मोहोरुनी
 विरे मेघ तो बैरागी

आसुसल्या धरणीशी
 गाठ पडता जळाची
 बीज अंकुरुनी येई
 कुस चिरीत आईची

 हात जोडुनिया कोंब
 सांगे भूमीचे मार्दव
 जरा थांब क्षणभर
 करी मेघाला आर्जव

 वीण बांधुनी भुईशी
 करी लवलव पाते
 नवलाईचे हे बंध
 झाले नव्हत्याचे होते

 पूर्ण होता ऋतुचक्र 
 पुन्हा लागती डोहाळे
 करी नेमाने तरीही
 सृष्टी साजरे सोहळे

x
लेखनविषय:

वाचने 3252
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अप्रतिम हात जोडुनिया कोंब सांगे भूमीचे मार्दव जरा थांब क्षणभर करी मेघाला आर्जव वा.. मस्त.. अंकुर हात जोडून उभा आहे हि कल्पनाच खुप आवडली.. कविता खुप सुंदर नितळ.. मस्त

पूर्ण होता ऋतुचक्र पुन्हा लागती डोहाळे करी नेमाने तरीही सृष्टी साजरे सोहळे
सर्व जीवन-चराचर सृष्टीचा एक कालचक्राचा अर्थ यात दडला आहे, आवडल्या ओळी. लिहिते राहा...........! -दिलीप बिरुटे