मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाणीव

अबोलघेवडा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जाणवे मज आज जेव्हा काहीच नसे इथे आपुले, सांगू कुणा ही व्यथाच माझी शोधूनी आता मन हे थकले ||१|| अथांग या दुनियेमधला जणू उपरा मी भाडेकरू, स्वकेंद्री अशा अवनीवरती कुणालाच मी माझे म्हणू? ||२|| मी यावे अथवा जावे लोचनी न कुणाच्या आसवे, कुणा न वाटे हृदयामधूनी मन मोकळे करावे मजसवे ||३|| धावतो मी रोज आहे काहीतरी मिळवावया, सिनेमाच तो पडदा नुसता वेळ लागला मज कळावया ||४|| कशापरी तू धाडीलेस मज सुटेल का कधी कोडे देवा? गतजन्मींच्या पापांचा वा पुण्याईचा म्हणू हा ठेवा? ||५|| माणुसकीच्या जंगलामध्ये मिळेल का ममतेचा झरा, प्रत्येकाचे पाय मातीचे कळेच ना मज कोण बरा ||६|| कलीयुगाच्या डोहामधले आयुष्याचे पाश विणू, माणसाचा मंडूक होता डबके वाटे विश्व जणू ||७|| सगळे मिळूनही रिते रिते ही जाणीव का मनी बोचतसे, इदं न मम हे शाश्वत असूनही आसक्ती का सुटत नसे? ||८|| अंतरीचे मेघ माझे पिळवटोनी हसले मजला, माझे माझे करिता करिता देव तुझ्यातील का बरं निजला? ||९||

वाचने 879 वाचनखूण प्रतिक्रिया 1