Skip to main content

काचेपलिकडचं वास्तव!

लेखक हृषीकेश पतकी यांनी मंगळवार, 01/08/2017 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं । मोहाच्या हट्टापुढे गरजांचं हसं होतं ।। आतमध्ये शिरताच माझ्या साधेपणाचे पाश तुटतात । साऱ्या सुप्त इच्छांना मग शक्यतेचे पंख फुटतात ।। दिपून जातात डोळे, काही दिसेनासं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं...... ।।१।। चोहीकडे दिसतात मला जेव्हा वैभवाचे सडे । आणि लखलखणारी सुखं रोखून बघतात माझ्याकडे ।। कसं सामोरं जावं त्यांना मला खरंच कळत नाही । माझं आणि पाकीटाचं, मत काही केल्या जुळत नाही ।। भर पावसात कोरडं राहावं, माझं अगदी तसं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं...... ।।२।। अपेक्षांना समजावत मग मी इच्छांशी भांडत राहतो । दोन्ही बाजू त्याच तरीही नवं गणित मांडत राहतो ।। सभोवतालच्या सगळ्यांना हे समीकरण जमतं कसं । भांबावलेलं वास्तव इथे आभासात रमतं कसं ।। उत्तर याचं शोधताना माझं मन वेडंपिसं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं..... ।।३।। स्वतःवरचा ताबा माझा मला मनापासून भावतो । हसरा खिसा न थकता रिकाम्या हातांना समजावतो ।। आपल्याला जे खरंच लागतं ते अगदी थोडं आहे । पण नेमकं ओळखायचं कसं हेच खरं कोडं आहे ।। साऱ्या घटनेचा प्रभाव मग सरतो काही क्षणामध्ये । केवळ एकच प्रश्न उरतो आणि माझ्या मनामध्ये ।। फुलपाखराचं पुन्हा एकदा सुरवंट कसं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं । मोहाच्या हट्टापुढे गरजांचं हसं होतं ।।४।।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3084
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार!!

मस्त

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!