मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १०)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ९) - ह्याच भागात आधीच्या भागांचे दुवे दिलेले आहेत. --------------------------------------------------------- 'मधुशाला' हे मदिरेची भलावण करणारे स्वैर काव्य आहे इथपासून, ते थेट हे देशभक्तीपर काव्य आहे, इथपर्यंत टोकाची मते ऐकायला मिळतात. त्यातला सत्यांश कोणता असे शोधायला गेले तर असे लक्षात येते की हे कोणती एकच कल्पना घट्ट धरुन त्याभोवती फिरणारे काव्य नाही तर मधुशाला हा शब्द ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य करणारे हे काव्य आहे. त्यात आपलं आयुष्य, जन्म, मृत्यू, प्रेम, प्रेमी-प्रेमिका, सुख-दु:ख, देशप्रेम, निसर्गप्रेम, तत्त्वज्ञान असे अनंत विषय येऊन जातात. वरवर एकच वाटणारा कल्पनेचा रेशमी धागा इतक्या वेगवेगळ्या विषयांना गवसणी घालून कोठेही न तोडता फिरवून आणणे हे कसबी विणकराचेच हात करु जाणे! पाहूयात ह्यावेळी बच्चनांच्या प्रतिभेचा आविष्कार आपल्याला कुठे घेऊन जातो आहे ते - दुतकारा मस्जिद ने मुझको कहकर है पीनेवाला, ठुकराया ठाकुरद्वारे ने देख हथेली पर प्याला, कहाँ ठिकाना मिलता जग में भला अभागे काफिर को? शरणस्थल बनकर न मुझे यदि अपना लेती मधुशाला।।४६। पथिक बना मैं घूम रहा हूँ, सभी जगह मिलती हाला, सभी जगह मिल जाता साकी, सभी जगह मिलता प्याला, मुझे ठहरने का, हे मित्रों, कष्ट नहीं कुछ भी होता, मिले न मंदिर, मिले न मस्जिद, मिल जाती है मधुशाला।।४७। सजें न मस्जिद और नमाज़ी कहता है अल्लाताला, सजधजकर, पर, साकी आता, बन ठनकर, पीनेवाला, शेख, कहाँ तुलना हो सकती मस्जिद की मदिरालय से चिर विधवा है मस्जिद तेरी, सदा सुहागिन मधुशाला।।४८। बजी नफ़ीरी और नमाज़ी भूल गया अल्लाताला, गाज गिरी, पर ध्यान सुरा में मग्न रहा पीनेवाला, शेख, बुरा मत मानो इसको, साफ़ कहूँ तो मस्जिद को अभी युगों तक सिखलाएगी ध्यान लगाना मधुशाला!।४९। मुसलमान औ' हिन्दू है दो, एक, मगर, उनका प्याला, एक, मगर, उनका मदिरालय, एक, मगर, उनकी हाला, दोनों रहते एक न जब तक मस्जिद मन्दिर में जाते, बैर बढ़ाते मस्जिद मन्दिर मेल कराती मधुशाला!।५०। --------------------------------------------- भावानुवाद धिक्कारे मज मशिद बोलुनी दिसतो हा दारुवाला मजला ठोकरणारे मंदिर बघते हातातिल प्याला किती अभागी जगी मी तरी, कोण आसरा देइल हो? शरणागत मी, जवळ घेऊनी स्वीकारे मज मधुशाला ||४६|| पथिक बनुनि मी भटकत राही, सहज मिळे मजला हाला, सहज भेटतो कोठे साकी, सहज मिळे मजला प्याला, सवंगड्यांनो वाट पाहण्या मला न किंचित कष्ट तरी, मशिद ना मिळो, मिळो न मंदिर, मिळेल माझी मधुशाला ||४७|| सजली नाही मशीद आणिक भजे नमाजी अल्लाला, सजून धजून ये मदिराप्रेमी, नटून थटून साकीबाला, शेख, मुळीही तुलना नाही मदिरालय अन मशिदीची, सदाच विधवा मशीद तुमची, सदा सुवासिनी मधुशाला ||४८|| येता कानी सूर पिपाणी नमाजी विसरे अल्लाला, वीज पडे तरि मदिराप्रेमी ध्यानलुब्ध घे मदिरेला शेख, सांगतो कटू सत्य हे, मशिदीला त्या ऐक तुझ्या युगेच पुढली ध्यान शिकविण्या सज्ज पहा ही मधुशाला ||४९|| मुसलमान आणि हिंदू दोघे, एक तरी त्यांचा प्याला, एक असे मदिरालय त्यांचे, असे एक त्यांची हाला, असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते, वैर वाढवी मशीद मंदिर, हृदय जोडते मधुशाला ||५०|| चतुरंग

वाचन 7006 प्रतिक्रिया 0