अखेरची मानवंदना
अखेरची ही मानवंदना
नतमस्तकल्या स्वरी
अश्रू होऊन हृदय वितळले
योद्ध्या चरणावरी
कृषीवलांना, मृदश्रमिकांना
तूच आसरा होता
अर्थवादाच्या प्रबोधिनीचा
तू प्रकाशतारा होता
तूच आमुची मथुरा, काशी
प्रयाग नि पंढरी
एका दाण्यापासून दाणे
हजार निर्मित जेथे
डाकू, लुटारू बनूनी शासक
सनद घेऊनी येते
उणे सबसिडीचा मांडलास तू
हिशेब गणितेश्वरी
युगायुगाच्या अबोलतेला
फोडलीस तू वाचा
मूठ आवळून लढवैय्याची
शिकविलीस तू भाषा
आयुष्याची मशाल चेतवून
जगलास जन्मभरी
कोटी-कोटी शेतकऱ्यांचा
पंचप्राण तू होता
युगपुरुष अन् थोर महात्मा
निर्विवाद तू होता
रेखांकित सप्रमाण केलीस
तू भारत इंडिया दरी
जाऊ नकोस तू त्यागून आम्हा
जरी सोडली काया
सदैव असू दे हात शिरावर
पाईक अभय व्हाया
तूच आमचा प्रकाशसूर्य अन्
योद्धा सारथ्यकरी
- गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१२/१२/२०१५
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1074
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली कविता. शरद जोशींबद्दल
आवडली कविता. शरद जोशींबद्दल अजून वाचायला आवडेल!
धन्यवाद
In reply to आवडली कविता. शरद जोशींबद्दल by अनुप ढेरे
धन्यवाद! यथावकाश नक्की लिहितो.