Skip to main content

चुलीमध्ये घाल

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 22/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीमध्ये घाल

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

या मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार
चिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल

'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल

                                - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3768
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल नेह्मिच पराजित अश्रूंना बाजारात भाव असतो, आपण राणा प्रताप यांचे गुणगान करतो अपराजित बाजीरावला कोण विचारतो...

In reply to by विवेकपटाईत

खरे आहे विवेक पटाईत सर. शेतकरी पराजित आहे म्हणून त्याच्या अश्रूंना चांगला भाव मिळतो. मात्र शेतमालास भाव म्हटले की भुवया उंचावतात.