भोगदासी........
लेखनविषय:
घडयाळ्याचे काटे मध्यरात्रीकडे कलत असताना
जेव्हा सारे शहर निद्रेच्या अधीन होत असते
हरवलेल्या डोळ्यांनी, वखवखलेल्या नजरांमध्ये
तेव्हा ती आपलं गिर्हाईक शोधत असते
ओठांवर लाली,केसांत मोगर्याच्या माळा
सर्वांगावर मंद अत्तर दरवळत असते
वरकरणी लावलेल्या पावडरच्या थरांमागे
नशिबाने गंजलेला चेहरा लपवत असते.
रात्री घराकडे परतणारी जोडपी डोळ्यांत साठवूण
नकळत मग तीही मनातून सुखावत असते
त्याच्या बाहुत विश्वासाने विसावलेल्या तिच्याजागी
गुपचुप स्वतःची छबी नेऊन ठेवत असते
थंड वार्यासोबत वहावत आलेल्या त्याच्या
आठवणीने हलकेच मग आतून शहारत असते
त्याच्यासोबत रचलेला भातुकलीचा संसार आता
दररात्री एका नव्या नवर्यासंगे मांडत असते
जर दयायची होती गतपापांची शिक्षा देवा...
आजन्म भोगशिळा बनवले तरी चालले असते
रोज रोज लचके तोडुन घेण्यापेक्षा
दगड होउन जगणे कैकवेळा परवडले असते
देवानेही आपल्याला वाळीत टाकले आहे
"भोगदासी आहेस तु" हे मनाला बजावत असते
हरवलेल्या डोळ्यांनी, वखवखलेल्या नजरांमध्ये
पुन्हा ती आपलं गिर्हाईक शोधत असते
वाचन
3302
प्रतिक्रिया
0