पानगळीचे वैभव
लेखनविषय:
पानगळीचे वैभव
**********************************
*
मस्त सुस्त महिने ग्रीष्माचे । मंद रात्रिचे, दिन उष्म्याचे
दवबिंदूमात्रावर जगती । हिरव्या वल्ली हिरव्या जगतीं
*
उनाड खारी, त्यांच्या कानीं । कुणी सांगिली, काय कहाणी!
खेळ टाकुनि अर्ध्यावरती । दाणा शोधित तुरुतुरु फिरती
*
दमून दंगुन उन्हात गुंगुन । चराचर जणू निवांत बैसुन -
पेंगुळलेला निसर्ग करितो । पेंगुळलेल्या कुतूहला तो
*
अक्तूबरस्य प्रथमे दिवसे । शिरशिर वारे घेऊनि वळसे
झाडाझाडापाशी सांगीं । हेमंत-शिशिर तिष्ठतिं रांगीं
*
त्या वार्तेने गडबड झाली । नेणति अवघी सृष्टी झाली
दिनरजनीचा गोंधळ खासा । उष्ण करी कधि शीतळ श्वासा
*
पर्णधनाची क्षणभंगुरता । वनस्पतींच्या मनात येतां
लोलुपतेची तृप्ती होउन । दिलखुलास धन देती उधळुन
*
रंगुन तरुवर भरभरलेले । जर्द, लाल, अन निळे-जांभळे
नव बहरा जर डोळे बघती । नच गुंजारव भुंगे करती
*
स्पर्शुनि परीस का ही सृष्टी । स्वर्णिम झाली यष्टी यष्टी?
मग सुवर्णा सौरभ कैसा - । दंव भिजल्या पर्णाली जैसा?
*
का वणवा वन खांडव करतो । बहुरंगी तरुंवरि धगधगतो?
चेतवलेले मग हे भूतळ । उच्छ्वासा का करते शीतळ?
*
शाखांवरती सोने उगवुन । सहस्र हस्तें देती शिंपुन
तरु पानांचा करुनी पात । वर्खाने भू पांघरतात
*
शिशिरीं लेतिल दैगंबर्या । धरतिल आणिक तापस चर्या
हिमधवला जटजटिला गुंफुन । ऋतुचक्राचे करतिल चिंतन
*
या स्वर्णाची माती होइल । का केवळ विस्मरली जाइल?
छे! तो वसंत हिरवळ आणत । गतवर्षींची स्मरविल दानत!
*
**********************************
वाचने
9940
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मस्त
In reply to मस्त by सहज
कविता आवडली
In reply to कविता आवडली by चित्रा
अगदी मनातली चित्रे
In reply to कविता आवडली by चित्रा
सुंदर!
अतिशय सुरेख..
आवडली/दैगंबर्य/दैंगबर्य
In reply to आवडली/दैगंबर्य/दैंगबर्य by नंदन
दैगंबर्य हेच
अक्तूबरस्य
In reply to अक्तूबरस्य by आजानुकर्ण
यष्टीचे दैगंबर्य
In reply to यष्टीचे दैगंबर्य by धनंजय
वा! शिशिरीं
छानच
छानच
क्या बात है !!
अप्रतिम..
मस्त
वा वा वा ..
In reply to वा वा वा .. by लिखाळ
धन्यवाद - सुवर्णा सौरभ
वा वा धनंजयराव!
अप्रतिम
In reply to अप्रतिम by बिपिन कार्यकर्ते
असेच
सुरेख आहे
खरच