भूक
लेखनविषय:
काव्यरस
आला तेव्हा होता नंगा, त्याले कपडे घातले
सोन कांतीचिये रंगा, त्याचे रुपडे झाकले
कपड्यांच्या अंगा अंगा, सदा लागलेली भूक
जिव्हा खादाडीचा दंगा, डोया हवे दृष्टीसूख
कान मागती सुराले, त्वचा आसुसली स्पर्शा
नाक सुवासा हुंगते, सारी शोधताती हर्षा
पंचेद्रियांचे चोचले, पुरविता पुरे नाही
किती ह्यांना भरविले, देह वखाखला राही
कपड्यांच्या अंतर्भागा, वसे सोनेरी झळाळी
त्याची भूक भागेना गा, मारी आक्रोशाने हाळी
सारे देहाचे चोचले, पुरे होती त्याचे लाड
तेज भुकेने गांजले, पाच गजांचिये आड
पंचेंद्रिये अंग अंग खाउ खाउनी खंगले
जीर्ण होताची तुरूंग तेज मोक्षाशी धावले
वाचन
2413
प्रतिक्रिया
0