Skip to main content

हट्ट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी गुरुवार, 26/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी | आणि हासुनी ओळखशी तू, देउन जाशी हवे तसे मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे | 'थांब थांब तू, नकोस जाऊ' सांगावेसे तुज वाटे, त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे | म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात | असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार 'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार | हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया, थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया? -चैतन्य दीक्षित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1872
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

>म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात | इथे काही तरी हुकलय, पण कविता सुरेख.

संजय, अर्ध्या.. धन्यवाद :)

संजयजींनी पॉईण्ट केलं तिथे "सोडुनी" च्या ऐवजी "छेडुनी" टाकण्यामागे काहि विषेश रसग्रहण आहे काय ? कविता सुंदर आहे. (अशा कविता निदान कळतात तरी. नाहितर काव्य वगैरे बाबतीत आमची बोंब आहे) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ती खरं तर मिठी सोडुनीच जाते... त्या मिठीच्या आठवणीत माझं मन आणि देह दोन्ही हरवून जातात. त्यामुळे जणू सतारीच्या तारा छेडाव्यात तशी ती माझ्या मिठीतून दूर झाली आणि म्हणून 'मिठी छेडुनी' असं लिहिलंय. पुढच्या 'झिणिझिणि वलये गात्रांत' शी अन्वय लावलात की लक्षात येईल असे वाटते. -चैतन्य

In reply to by चैतन्य दीक्षित

ते "छेडुनी " आणि "झिणिझिणि वलये..." चा संबंध अदरवाईज मच्या लक्षात आला नसता :) अर्धवटराव